Tuesday, March 29, 2022

मी आणि माझी नोकरी - Kohl's ... (5)

 

एकदा वेळापत्रकात माझ्या नावापुढे स्पेशल प्रोजेक्ट असे लिहिले होते. मला कुतूहलता होती. कामावर आल्यावर मला एका मॅनेजरने बोलावले व ती मला स्टोअर रूम मध्ये घेऊन गेली. तिथे एका लोखंडी रॅक मध्ये ८ मोठाली खोकी होती. त्या रॅकला कप्पे नव्हते. तो रॅक मॅनेजरने बाहेर स्टोअर मध्ये आणला आणि मला म्हणाली की हे सर्व खोक्यामधले कपडे बाहेर काढायचे आणि त्या त्या डिपार्टमेंटला नेवून द्यायचे. त्या आधी मी वुमन्स, ज्युनिअर, किड्स सेक्शनला २ ते ३ दिवस काम केले होते आलेले कपडे परत त्या त्या जागेवर ब्रँडनुसार लावायचे. त्यामुळे कपडे कोणत्या डिपार्टमेंटला द्यायचे ते माहीत होते. अर्थात मेन सेक्शन, ब्युटी, ज्युवेलरी आणि होम हे सेक्शन मध्ये मला काम दिलेले नव्हते. त्या खोक्यात जास्त करून कपडेच खूप होते. हे कपडे हातात धरले तरी ते खूप जड असतात. मला हे काम खूपच आवडले.

 
मी माझ्या पद्धतीने ६ तासात सर्व ८ खोकी पालथी केली आणि सेक्शन नुसार देवून पण आले. मला खूप दमायला झाले होते. चालून चालून पाय पण दुखत होते. कार्ट्स पण शिल्लक नव्हत्या. सर्व कस्टमर लोकांनी घेतल्या होत्या. कपडे वेगवेगळे करायला जागाही नव्हती. सर्व स्टोअरभर फिरत होते पण तरीही मला हे काम आवडले. कस्टमर लोकांनी खरेदी केलेले कपडे/वस्तू की जे काही कारणास्तव परत करतात ते लावायला मला अजिबात आवडले नव्हते. एक तर ट्रेनिंग नाही. ब्रॅंड नुसार कपडे जरी वेगळे केले तरी सुद्धा ते परत जागेवर लावताना चुकीच्या जागेवर लावून चालत नाही. तसाच एखादा कपडा दिसला तर तो पटकन सापडतो. मग त्या लाईनीत कपडे लावता येतात. रंग, डिझाईन, फॅशन, या सर्व गोष्टी पहायला लागतात. त्यातही काही कपडे घडी करून ठेवायचे असतात. कपडे तरी किती ! खूपच ! वेगवेगळ्या फॅशनच्या जीन्स, स्वेटर, जाकिटे, आणि Topsचे प्रकार पण कितीतरी असतात. मला कपडे त्या सेक्शनला नेवून द्यायचे होते त्यामुळे हे काम मी खूप आवडीने केले. आणि त्यानंतर मला असेच काम दिले गेले. कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला जी खोली होती तिथे रॅक मध्ये कपडे होते ते फक्त मला नेवून द्यायचे होते. इथल्या सणांच्या सीझन मध्ये परत आलेले कपडे/वस्तू इतके काही असतात की रॅक नुसते ओसंडून वहात नाहीत तर तिथल्या फरशीवर पण मोठाले ठीग जमा होतात !

 
मला दुसऱ्या देशाची बाई परत भेटली. ती आणि मी जाम वैतागलेल्या होतो. किती हे ढीग ! आम्ही फक्त हेच काम करत होतो. कपडे डिपार्टमेंट प्रमाणे नेवून देण्याचे काम ! तरीही कपडे कमी व्हायला तयार नव्हते. कस्टमर सर्विसच्या डेस्क वरचे कॅशियर पण जाम वैतागलेले होते. अजून मी एक पाहिले ते म्हणजे स्टोअर पिक अप असते ना तेव्हा ज्यांनी जे खरेदी केलेले असते ते पार्किंग मध्ये ज्या कार लावलेल्या असतात कस्टमर लोकांच्या तिथे त्यांना ते नेऊन द्यायचे. कस्टमर सर्विसच्या बाजूला एक मुलगी उभी होती. मनात म्हणले ही अशी नुसती उभी का आहे. नंतर कळाले की आतून ती वस्तू घेऊन बाहेर पार्किंग मध्ये बसलेल्या कस्टमर लोकांना नेवून देत होती. असे पण काम असते तर इथे ! बापरे!नंतर मला होम डिपार्टमेंट आले. मला जर बरे वाटले. कामात थोडी तरी विविधता. पण इथेही पहिल्यांदा डोके गरगरायला लागलेच. एके दिवशी मला परत आलेल्या वस्तू जागेवर नेवून ठेवायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिथल्या एका रॅकमध्ये ठेवायच्या होत्या. हे काम मला आवडले. चालणे खूप कमी झाले त्यादिवशी. मी होम डिपार्टमेंटच्या गोष्टी एका रॅक मध्ये ठेवल्याने दुसऱ्या शिफ्टला जे येतील त्यांच्यासाठी हे काम कमी झाले होते. परत आलेल्या गोष्टी रूम मध्ये इतक्या असतात की आतल्यांना बाहेर येता येत नाही की बाहेरच्यांना आत जाता येत नाही. जीव दडपून जातो.


पुढील आठवड्याचे वेळापत्रक लागले नव्हते. असे कधी झाले नव्हते. २५ डिसेंबरच्या आधीचे वेळापत्रक होते. आम्ही दोघी म्हणालो म्हणजे आपली नोकरी संपली वाटते. बरे झाले संपली ते ! असे एकमेकींकडे हासून बोललो. २५ डिसेंबरच्या नंतरच्या एका आठवड्यात मला फोन आला की शुक्रवार, शनिवार, रविवार तू कामावर येऊ शकशील का? १० ते ४. मी हो सांगितले. तसे तर मी एकदम हो नाही सांगितले. मला वाटले नोकरी संपली. मॅनेजरचा फोन आला. मी तो घेतलाच नाही. कशाला आता परत? सुंठेवाचून खोकला गेला तर बरे होईल. परत दुसऱ्यांना फोन आला. विचार केला की ज्या अर्थी २ वेळा फोन आलाय त्या अर्थी खूप गरज उद्भवलेली दिसत आहे. तिला फोन केला आणि तिला सांगितले की मी तिनही दिवस येईन. तिने माझे अनेक वेळा आभार मानले.
या ३ दिवसात मला खूप मजा आली. कस्टमर सर्विसचा डेस्क पूर्ण पणे बंद होता. त्यांची जागा हालवली होती. मेन्स रजिस्टरच्या ठिकाणी ३ कॅशिअर होते. मला त्यांना मदत करायची होती. मदत पण खूप छान होती. २५ डिसेंबर नंतर जे लोक वस्तु/कपडे परत करतात ते या ३ कॅशिअरकडे करत होते. तशी पाटीच तिथे लावली होती. कस्टमर लोकांनी परत केलेले कपडे मला कॅशिअर कडून घेऊन वेगवेगळ्या खोक्यामध्ये ठेवायचे होते. ही खोकी डिपार्टमेंट प्रमाणे केली होती. तिथे चिनी मुलगा आणि एक म्हातारी अमेरिकन बाई कस्टमर सर्विसला काम करणारेच होते. ते मला ओळखत होते. ती बाई म्हणाली परवा तू असायला हवी होतीस. कुणीही मदतीला नव्हते. परत आलेल्या कपड्यांचा ढिगच्या ढीग साठला होता. मला टेबलावरून हालता येत नव्हते कारण कस्टमर लोकांची रांग होती. चिनी मुलगा आणि मी त्या बाईला म्हणालो की काल अशीच गर्दी होती. पण तिसऱ्या दिवशी गर्दी त्यामानाने खूपच कमी होती. आम्ही तिघे अधुन मधून गप्पा मारत होतो. ज्या खोक्यात मी परत आलेले कपडे डिपार्टमेंट प्रमाणे टाकत होते. ते सर्व कपडे परत स्टोअर रूम मध्ये न्यायला दोघे येत होती.

 
ही म्हातारी अमेरिकन बाई (वय ७५ वर नक्किच असेल) तिला १५ नातवंड होती. मी जेव्हा कामावर यायचे तेव्हा हाय करायची, हासायची, बोलायची. त्या दिवशी खूप गप्पा मारत होती. ती वर्जिनिया वरून न्यु जर्सीत आली होती. मी तिला सांगितले मी पण नार्थ कॅरोलायनातून आले. अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. मी तिला माझा फोटो घ्यायला सांगितला. एक कोल्सची आठवण म्हणून.

 
सप्टेंबर ते जानेवारी अशी ४ महिन्यांची माझी सीझनल नोकरी संपली. तसे कोल्सचे मला पत्र आले. एक वेगळा अनुभव मिळाला. इंगल्स आणि कोल्स मी केलेल्या नोकऱ्यांची तुलना केली. मला बराच फरक जाणवला. इंगल्स मध्ये सर्वच जण एकमेकांकडे बघून स्मितहास्य करायचे. इथे सर्वांचे चौकोनी चेहरे ! काही अपवाद होते. इंगल्स मध्येही सर्वजण दमायचे की ! नंतर विचार केला की मी production सेक्शनला होते. आणि तिथे अनेक पदार्थ बनवण्याची विविधता होती त्यामुळे मला कधीच कंटाळा आला नाही जरी तिथे मांस घालून सॅंडविचेस बनवायचे तरीही ! मी कुकिंग मध्ये जास्त रमते. कपड्यांमध्ये नाही. इंगल्स मध्ये जर एकसुरी काम असते तरी सुद्धा मी सलग ४ वर्षे नोकरी केली नसती. तिथे ट्रेनिंग छान दिले मला कार्मेन ने. आणि अर्थातच इंगल्सची नोकरी कायम स्वरूपी होती आणि ही सीझनल होती ! या फरकामुळेच कदाचित सीझनल लोकांना जास्त मह्त्व दिले जात नसावे किंवा ट्रेनिंग पण देत नसावे. मी नंतर जेव्हा फेरफटका मारला तर मला तिथे जे कायम स्वरूपी काम करणारे होते तेच फक्त दिसले. वातावरण सूनसान होते. माझ्याबरोबर कामावर लागलेले काही चेहर मला तिथे दिसले नाहीत. कदाचित मी कोल्स मध्ये सीझनल नोकरी साठी परत अर्ज करीन. कारण जेव्हा मी अर्ज केला तेव्हा तिथे विचारले होते की तुम्ही या आधी कोल्स मध्ये नोकरी केली आहे का? Rohini Gore
समाप्त


Monday, March 28, 2022

मी आणि माझी नोकरी - Kolhs ... (4)

 

कॅशिअरचे काम मला आवडले होते पण सलग ६ किंवा ८ तास एकाच जागी उभे राहून प्रचंड दमायला व्हायचे. नंतर मला वुमन्स सेक्शनला टाकले. स्टोअर १० वाजता उघडते त्यामुळे जर कॅशिअरचे काम असेल तर माझे वेळापत्रक १० ते ४ असायचे. काही वेळा कस्टमर लोक आयत्यावेळेस मला अमूक अमूक वस्तु/कपडे नकोत असे जेव्हा सांगायचे ते ते सर्व कॅशिअर टेबलाजवळ असलेल्या बास्केट मध्ये टाकायचे असतात. काम झाले की कस्टमरने परत केलेले कपडे घेऊन कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला जी खोली आहे तिथे त्या त्या सेक्शन मध्ये ठेवायचे असतात. जेव्हा मला वुमन्स सेक्शनला टाकले तेव्हा माझे वेळापत्रक ८ ते ४ होते. स्टोअरचे बाहेरचे दार उघडेच असते. ते उघडून आत गेल्यावर एका भिंतीवर एक बेल असते ती वाजवायची म्हणजे आतल्या बायका स्टोअरमध्ये जाण्याकरता जे दार असते ते उघडायला येतात. आत कुणीहि कस्टमर नसतात. जेव्हा मी गेले तेव्हा मला एक देशी बाई दिसली. ती गरोदर होती. ती व मी एकमेकींकडे पाहून हासलो. ती किड्स सेक्शनला नियमित काम करते. तिला तिथे काम करून २ वर्षे झाली होती. मी तिला म्हणले की सेक्शन मध्ये कोणीच नाही. काय काम करायचे. तर ती मला कस्टमर सर्विसच्या मागच्या खोलीत घेऊन गेली आणि समजावून सांगितले की हे सर्व रॅक आहेत सेक्शन प्रमाणे त्यानुसार कपडे घेऊन जायचे व त्या त्या जागेवर लावायचे. हेच काम करायचे दिवसभर !
काही वेळा कपडे सेक्शन नुसार नसतात तर ते दुसऱ्या रॅक मध्ये ठेवायचे. वुमन्स सेक्शनचा रॅक भरून वाहत होता. मला तर दडपणच आले. वुमन्स सेक्शन फिरून आले. कोणकोणते ब्रॅंड आहेत ते बघितले.
 

नंतर त्या सेक्शनची मुख्य बाई आली. ती अमेरिकन होती. तिने पण हासून माझे स्वागत केले. ती म्हणाली की तू नवीन आहेस. मी कपडे लावते. तू फक्त सेक्शन मध्ये जाऊन जे कपडे विस्कटले असतील ते घडी करून ठेव. या घड्या पण विशिष्ट पद्धतीने घालायच्या असतात. काम करता करता ती परत आलेले कपडे लावत होती व मला सांगत होती, इथे जा , तिथे जा, कपडे विस्कटलेले आहेत. पूर्वी मी जेव्हा वाल मार्टला जायचे आणि तिथे पहायचे की काही बायका कपड्यांच्या घड्या करत असायच्या. तेव्हा मी मनात म्हणायचेे असे काम मिळाले पाहिजे, किती सोपे आहे ना ! नथिंग इस इझी हे मला प्रत्यक्ष काम करताना कळाले. पार्किंग मध्ये ज्या कार्ट असतात. त्या सर्व कार्ट्स वाहून आणतात ते काम पण सोपे नाहीये. स्नो पडत असताना, हाडे गोठवणारी थंडी असताना, पाऊस पडत असताना, थंडीमध्ये प्रचंड बोचरे वारे असताना,या कार्ट्स गोळा करून आणायच्या, हे कामही वाटते तितके सोपे नाही !
 
 
जेवणाच्या सुट्टीत मला ती देशी बाई परत भेटली. ती म्हणाली की इथे प्रत्येक सेक्शनला २ ते ३ दिवस टाकतात. काही वेळेला रात्रपाळीला पण बोलावतात. मी तिला विचारले की रात्रपाळी करताना सेफ आहे ना इथे ! तर म्हणाली हो. काळजी करू नकोस. तुला आधी विचारतील. तू नाही म्हणू शकतेस. रात्रपाळी रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत असते. आणि पगार दुप्पट मिळतो. त्या देशी बाईचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिला पण किड्स सेक्शनला एक खूर्ची दिली होती अधुम मधून बसायला. पण तरीही ८ तास उभे राहून ही कशी काय काम करू शकते या दिवसात? ते पाहून मला आश्चर्यच वाटले. प्रत्येक सेक्शनला काही कपडे घड्या घालून ठेवायचे असतात तर काही कपडे हॅंगरला लटकवून ठेवायचे असतात. दुसऱ्या दिवशी वुमन्स सेक्शनला मी काम करत होते तेव्हा दुपारी १ ला दुसऱ्या शिफ्टला काम करणारी एक अमेरिकन बाई आली. तोपर्यंत मी अंधारात चाचपडल्या सारखे कपडे लावत होते. डोके खूपच गरगरत होते. वुमन्स सेक्शनही खूप मोठा आहे! त्या अमेरिकन बाईने पण हाय हॅलो केले. तिने ढिगच्या ढीग उचलून आणला परत आलेल्या कपड्यांचा आणि एका तासात तिने सर्व कपडे लावूनही टाकले ! अर्थातच खूप वर्षे झाली की कामात आपोआप सुलभता येतेच ! पण इथे ना मला ट्रेनिंग दिले नाही. फक्त तोंडी सांगितले. खरे तर त्या जेव्हा कपडे लावतात त्याबरोबर नवीन लोकांना पण आमच्याबरोबर या आणि बघा आम्ही कसे कपडे लावतो ते ! असे सांगायला हवे. पण इथे ट्रेनिंग नीट नाहीये. 

कॅशिअर मध्ये ट्रेनिंग जरी दिले ते सुद्धा १ दिवसच ! पण तरीही कितीतरी गोष्टी मला जेव्हा मी काम करायला लागले तेव्हाच कळाल्या किंवा सांगितल्या गेल्या. बऱ्याच गोष्टी कळल्या मला ! कपड्यांना सेक्युरिटि टॅग कसे लावायचे, टॅग कसे काढायचे, नोटा दिल्या की त्या खऱ्या आहेत की नाही ते कसे ओळखायचे? गिफ्ट रिसिट कश्या प्रिंट करायच्या. नुसते कार्ड पेमेंट असेल तर ते कसे करायचे? त्यातही काही लोक कॅश देतात तर काही चेक देतात. Transaction कॅन्सल कसे करायचे.कोल्स कार्ड हवे आहे का? आणि हवे असल्यास त्या करता काय करायचे? एकदा एका कस्टमरने मला विचारले की कार्ड काढायचे आहे. तेव्हा मला एका आफ्रिकन बाईने मदत केली. एकदा एकाने ४०० dollars ची खरेदी केली. आणि कॅश दिले. तेव्हा मागची कॅशियर आली आणि मला म्हणाली की कोल्स कार्ड असेल तर कॅश घ्यायची नाही. तू असे केलेस तर प्रोब्लेम मध्ये येशील. असे एक ना अनेक बरेच शिकायला मिळाले आणि कामही आवडले मला !
 
 
नंतर मला एक दिवस intimate सेक्शन मध्ये टाकले. हा सेक्शन मला आवडला कारण चालणे कमी होत होते. इथेही डोके गरगरायला लागलेच ! सापडता सापडत नव्हते. ब्रा आणि पॅंटीज मध्ये इतके प्रकार की ब्रॅंड, रंग, डिझाईन, खूप वेगवेगळे. एखादे काहीतरी सापडले की धन्यता वाटायची. किड्स सेक्शन मध्ये तर भूलभुलैयाच आहे ! मी आणि अजून एक माझ्यासारखीच सिझनल वर्कर होती. ती आणि मी. आम्ही दोघीच होतो. ती दुसऱ्या देशाची होती. ती म्हणाली मला काहीच सापडत नाहीये. मी म्हणाले मलाही ! सर्व कपडे एकसारखेच दिसत आहे. नंतर दुसऱ्या शिफ्टला देशी बाई आली आणि म्हणाली की असेच होते पहिल्यांदा. आणि तिने आम्हाला दोघिंनाही कपडे घड्या घालून दिले आणि जागाही सांगितली की ते कुठे ठेवायचे. आम्ही दोघींनी तिचे आभार मानले.

 
आम्हाला दोघींनाही हा किड्स सेक्शन आवडला नाही. मी म्हणाले आधी मला हेच समजत नाही की हा कपडा मुलीचा की मुलाचा? सगळे कपडे सारखेच दिसतात ! आणि बाळांच्या कपड्यामध्ये तर आणखीनच भूलभुलैया आहे. कधी एकदा या सेक्शन मधून बाहेर पडतोय असे आम्हाला दोघींनाही झाले होते. खेळणी पण इतकी. ती पण आम्हाला दोघींना सापडत नव्हती. आम्ही दोघीही गप्पा मारत होतो. किती मोठा सेक्शन आहे हा ! ती पण वुमन्स आणि ज्युनिअर सेक्शन फिरून आली होती. नंतर माझ्या असे लक्षात आले की सणांच्या सीझनला पहिल्या शिफ्टला सीझनल लोक ठेवतात आणि ज्या कायमस्वरूपी बायका आहेत सेक्शनच्या त्यांना दुसरी शिफ्ट देतात. सीझनला तर खरेदी करून परत केलेले कपडे इतके असतात की रॅक ओसंडून वाहत असतात. आणि कस्टमर सर्विस वाले पण इतके वैतागलेले असतात की ते परत आलेले कपडे कुठेल्याही रॅक मध्ये टाकतात. स्पेशल प्रोजेक्ट आणि अजून काही अनुभव पुढील भागात Rohini Gore
क्रमश: ....

Thursday, March 24, 2022

कधीतरी केव्हातरी...

 

कधीतरी केव्हातरी पूर्वीच्या काही काही गोष्टी आठवतात आणि खूप हासू येते. काही गोष्टींमध्ये मन गुंतून रहाते. गेले काही दिवस मला काही गोष्टी खूप आठवत आहेत. आम्ही आयायटी सोडून डोंबिवलीला आमच्या घरी राहायला आलो तेव्हा काहीही नव्हते. आयायटी वसतिगृहात रहाताना घेतलेली गॅसची शेगडी, शिष्यवृत्ती वाढल्यावर केलेल्या दोन गाद्या, आमच्या दोघांच्या सूटकेसा ! इतकेच सामान होते. डोंबिवलीच्या घरात एक पलंग होता. विनु तिथे काही दिवस राहात असताना त्याने सनमायका लावलेला लाकडी पलंग करून घेतला होता. तिथे राहिलेल्या पेईंग गेस्ट लोकांनी आमचा प्लॅट खूप घाण करून ठेवला होता. तो आम्ही यायच्या आधी आम्ही दोघांनी मिळून साफ केला. कपडे ठेवायला बिग shopper पिशव्या होत्या. भांडी कुठे ठेवायची हा प्रश्न होता. आम्ही दोघांनी फडके रोड वरून एक मोठी ६ फुटी अल्युमिनियमची मांडणी आणली. (600 rupees) यामध्ये सर्व काही बसत होते इतकी ती छान होती. या मांडणीमध्ये ताटाळे. चमचाळे, कपबशाळे तर होतेच. शिवाय डबे व पातेली ठेवायला आडवे कप्पेही होते.
आमच्या लग्नाच्या अहेरात सर्वांनी काही ना काही दिले होते आणि ते सुद्धा सर्व स्टीलचे. त्या भांड्याचे पोते होते. आम्हाला काहीही घ्यायला लागले नव्हते. आईकडून आणलेला दगडी रगडा होता. हा जड रगडा आम्ही पुण्यावरून आयायटी मध्ये वाहून आणला होता! अर्थातच बिग shopper मोठी पिशवी विनुनेच धरली होती. हा दगडी रगडा आणण्याचा हट्ट माझाच होता. चटणी व थोडे काही वाटण्यासाठी मला हवा होता. मिक्सर नव्हताच. तर ती मांडणी, दगडी रगडा, बिग shopper पिशवी (ही पिशवी वेगळीच होती. दोन लाकडी दांड्या अडकवल्या होत्या या पिशवीमध्ये हातात धरायला) कारपेट या गोष्टी मला खूप आठवत आहेत गेले काही दिवस. जमिनीवर अंथरायला एक कारपेट आणले. कारपेट घ्यायचे मीच सुचवले होते. ते hall मध्ये अंथरले. हे पण इतके काही छान गुळगुळीत होते. फिकट पांढऱ्या रंगावर फिकट डिझाईन होते. कारपेट घातल्याने त्यावर नुसते बसता तर येतेच पण शिवाय त्यावर अंगत पंगत पण होते. 
 
 
या घरात विनुची पिएचडीची छोटी पार्टी झाली. त्यात आम्हाला कुंदा आत्याने व प्रतिभा काकूंनी मिळून हिंडालियमचे मोठे पातेले भेट म्हणून दिले. त्यात बासुंदी केली होती. बटाटेवडेही केले होते. जेव्हा आयायटीमध्ये विनुच्या मित्रांना घरी बोलावले होते तेव्हा काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्न होता. आम्ही नुकतेच पुण्याला गेलो होतो आणि मी वहिनींना (सासूबाई)विचारले होते की मी काय करू? मला स्वयंपाक जुजबी येत होता. त्यांनी मला सांगितले की श्रीखंड आण म्हणजे गोड झाले. पुऱ्या कर. मी विचारले पुऱ्या किती करू? आणि अंदाज सांगा. त्या म्हणाल्या की १ वाटीत ४ पोळ्या होतात म्हणजे पुऱ्या ६ किंवा ८ होतील. बटाट्याची उकडून भाजी कर. आणि चटणी कर. ४ मित्र होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ४ जणांना बोलावले होते. दगडी रगड्यामध्ये चटणी छान झाली. मित्रांनी मिळून आम्हाला टी सेट दिला होता. खूप छान आणि नाजूक होता. हा सेटही आम्ही बरेच वर्ष वापरला नव्हता. मला भिती होती की माझ्या हातून फुटला तर? किटली, दुध ठेवायचा भांडे पण खूप नाजूक होते. कपही वेगळ्या आकाराचे होते. डिझाईन म्हणजे नुसत्या रेषा होत्या आकाशी, पिवळ्या व गुलाबी. वर्णन करू शकत नाही. फोटोही नाही. पूर्वीच्या कितीतरी गोष्टी फोटो मध्ये असत्या तर किती छान झाले असते ना !असे काही आठवले की लिहीनच परत कधीतरी. Rohini Gore

Friday, March 04, 2022

मी आणि माझी नोकरी - Kohl's .... (3)

 

Juniors सेक्शन मधे गेले तेव्हा तिथे एक देशी बाई आणि एक आफ्रिकन बाई होती. देशी बाई मला म्हणाली की तु सेक्शन फिरून ये म्हणजे तुला कोणकोणते Brand आहेत ते कळेल आणि परत आलेले कपडे परत त्या त्या जागेवर लावायचे असतात. काही कपडे विशिष्ट पद्धतीने फोल्ड करून टेबलवर ठेवायचे असतात तर काही हॅंगरला लटकवायचे असतात. मी सेक्शन फिरून आले. हा सेक्शन खूप मोठा नाही त्यामुळे चालणे कमी. कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला एक खोली आहे त्यात कप्पे असलेले मोठ्या उंचीचे रॅक असतात तिथून (Returns from customers ) कपडे आणायचे आणि ते जागेवर लावायचे. या रॅकवर पण डिपार्टमेंटची नावे लिहिलेली असतात. इथल्या सणांच्या दिवसात खूप गर्दी असते आणि अमेरिकन/देशी लोक कपडे/वस्तू विकत घेतात आणि परत करतात. जितकी खरेदीला रांग असते तितकीच रांग कपडे/वस्तू परत करण्यासाठीही असते. परत करायचे तर घेतात कशाला कपडे/वस्तू? 
 

 
मला हा सेक्शन आवडला. चालण्यासाठी जागा कमी. आधी कपडे आणून ते क्रमवार लावायचे आणि जागच्या जागी लावायचे. तरी सुद्धा पहिल्यांदा हे काम अवघड असतेच. कपड्यांचे इतके प्रकार असतात की पटकन नाही सापडत ! बारीक नजर ठेवून कोणत्या जागी कोणते कपडे ठेवायचे ते बघायला लागते. डोके गरगरायला लागते. मी गोंधळलेली पाहून तिथे असलेल्या आफ्रीकन बाईने मला मदत केली. ती म्हणाली सुरवातीला असेच होते. बरेच महिने गेले आणि तेच तेच काम केले की तुम्ही त्या कामात तरबेज होता. ही बाई मी स्टोअर मधे आले की नेहमी हासायची माझ्याकडे पाहून ! मलाही बरे वाटायचे.

 
मी जेवणाच्या सुट्टीत जेवायला गेले. तिथे सर्व कामगारांचे आणि मॅनेजर लोकांचे वेळापत्रक बनवणारी बाई बसली होती. तिने मला विचारले की तुला कॅशिअरचे (Bank Register) काम करायला आवडेल असे बोलली होतीस. मी हो म्हणाले. कॅशिअर सेक्शनची प्रमूख मॅनेजर मला काम करता करता एकदा भेटली आणि तिने मला विचारले की तुला हे काम आवडेल का? थोडे दिवस करशील का? तर मी तिला हो म्हणाले होते. तसे तर पहिल्या दिवशीची मॅनेजर होती तिला पण मी हेच सांगितले होते की तुम्हाला पाहिजे असेल तर मी कॅशिअरचे काम करायला तयार आहे. मला मुलाखतीमध्ये सांगितले होते आणि नेमणूक पत्रात पण असे लिहिले होते की तुम्हाला आम्ही कोणत्याही सेक्शन मध्ये गरजेनुसार टाकू. कामाच्या वेळा, दिवस आणि तासही बदलते राहतील. जेवणाच्या सुट्टीत एक देशी बाई पण जेवायला होती. मॅनेजरने सांगितले की तु जेवण झाल्यावर कॅशियरचे (Bank Register) काम कर आणि तिलाही सांगितले की काम समजावून सांग. 

 
आम्ही दोघींनी हिंदी मध्ये एकमेकींची विचारपूस केली. तिने काम करता करता मला कामाचे स्वरूप सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस मला एका अमेरिकन बाईबरोबर कॅशिअरचे काम दिले. मला काम समजले आणि स्वारस्यही वाटले. देशी बाई हे काम गेले १५ वर्षे करत आहे असे तिने मला सांगितले. नंतर माझी मी कॅशिअरच्या टेबलवर उभी राहून कामाला सुरवात केली. इथे स्टोअर मधे काम उभे राहूनच असते. ६ तासाची शिफ्ट असेल तर २० मिनिटे जेवणाचा ब्रेक असतो. ७ तासाची शिफ्ट असेल तर ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक आणि १५ मिनिटांचा एक ब्रेक. ८ तासांची शिफ्ट असेल तर ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक आणि २ ब्रेक प्रत्येकी १५ मिनिटांचे असतात.
माझी शिफ्ट वेगवेगळी असायची. जेव्हा ६ तासाची शिफ्ट असते तेव्हा २० मिनिटांच्या ब्रेक मध्ये घड्याळाच्या काट्याकडे बघूनच जेवायला लागायचे. तिथल्या देशी/विदेशी बायका ज्यांना बरीच वर्षे झालेली आहेत त्यांचा नवीन आलेल्या कामगारांना धाक असतो. दटावतातही. अनुभवले आहे. काही चांगल्या आहेत.


 मी जेव्हा माझी मी कामाला उभी राहिले तरी काही वेळा विचारावे लागते. इतके वर्षे काम करणारे त्यांनाही पहिल्याप्रथम शंका आल्याच असणार ना. काम जितके तुमच्या हाता खालून जाईल तितके तुम्ही तरबेज होता. मी कामाला उभी होते. कस्टमर लोकांची रांग लागलेलीच असते. ते येतातच की रांगेतून. तरी सुद्धा देशी बाई देखो कस्ट्मर है. मनात (माहीत आहे की) मला शंका आली की मी तिला विचारायचे. काही वेळा मॅनेजरलाच बोलवावे लागते. त्याप्रमाणे स्क्रीन वर तसे टॅब असतात ते प्रेस करायचे. मी एखाद वेळेस शंका विचारली की मी विचारायचे. मैने तुझको बताया था ना? अरे हो ना ! पण मी परत विचारू शकते ना एखादवेळेस. तर मला म्हणाली मॅनेजरला बोलाव.

 
कॅशिअर सेक्शनची प्रमुख किंवा इतर मॅनेजरही येतात लगेच. त्यांना यावेच लागते. कारण की समोर कस्टमर उभा असतो. तर कॅशिअर सेक्शनची प्रमुख मॅनेजर आली आणि तिने देशी बाईला सांगितले की तू हिला मदत कर. तिच्या देखतच ही मला म्हणते की तिला बोलावू नकोस. मी सांगीन काही अडले तर !रेस्ट रूम मध्ये जाण्यासाठी पण एकमेकींना सांगून जावे लागते. तर एकदा मी गेले दुसऱ्या एका देशी बाईला सांगून. म्हणाली लवकर ये. तिला हो म्हणाले. मनात म्हणाले (रेस्ट रूम/wash room मध्ये बसायला मला हौस नाहीये) मी आले आणि ती म्हणाली की मी हा एक ड्रेस ठेवून येते. अर्धा तास झाला तरी ही आली नाही. मग मी जिने मला काम समजावून सांगितले त्या देशी बाईला सांगितले की ही मला म्हणाली लवकर ये आणि अर्धा तास झाला तरी ही आली नाही अजून. ड्रेस ठेवायला इतका वेळ लागतो ? मला म्हणाली असे म्हणाली तूला लवकर ये? तिला तिने विचारले किधर गयी थी? तर म्हणाली की रेस्ट रूम मधे. तर म्हणाली इतनी देर क्या कर रही थी उधर? मग त्या दोघी त्यांच्या भाषेत जोरजोरात भांडायला लागल्या. तिथे एक बाई आली आणि म्हणाली आम्हाला दोघींना की आपण इथे काम करायला येतो. कोण कुठे जातय आपल्याला काय करायचे आहे? मी मनातल्य मनात (मला इतर कोणाशी देणे घेणे नाही, पण जर का कुणी मला सांगितले की लवकर ये आणि ते सुद्धा रेस्ट रूम मधे जाण्याकरता तर तिने पण तसेच वागले पाहिजे.) मी बघितले ही बाई तिचे टेबल सोडून जायची आणि काय हवे ते घेऊन यायची आणि किंमत बघण्यासाठी स्कॅन करायची आणि कपडे टेबला खाली लपवून ठेवायची. मला दुसरी म्हणाली ही अशीच करते. कधी कामावर वेळेवर येत नाही.

 
मला ज्या दिवशी तिने काम समजाऊन सांगितले त्या दिवशी काही वेळाने तिला रेस्ट रूम/wash room ला जायचे होते. मी म्हणाले जा ना तू ! मी आहे. तर ती म्हणाली नको. तू नवीन आहेस. तुला एकटीला सोडून मी जाऊ शकत नाही ! आणि दुसऱ्या शिफ्टची बाई अजून यायची होती. बिचारी. मला खूप दया आली तिची. असाच प्रकार अमेरिकन बाईचा झाला. तिची पण अशीच अवस्था. जेवणाचा ब्रेक पण तिथे असणाऱ्या फोन वर मॅनेजरला विचारून जेवायला जायचे असते.मला कस्टमर लोकांचा चांगला अनुभव आला. काही वेळेला कॅरी बॅग मधे कपडे त्यांचे तेच भरून घेतात. मला कॅशियरचे काम आवडले होते. अर्थात एके जागी उभे राहून पाठीला चांगलीच रग लागते. पोटातही दुखते. फक्त एक जाणवले की कस्टमर लोकांची रांग असली की आपण त्यांच्याशी बोलण्यात, वस्तुंचे स्कॅनिग करण्यात गुंतून जातो आणि आपण इतके तास उभे आहोत ते जाणवत नाही. ज्या देशी बाईने मला काम समजावून सांगितले तिला बसण्यासाठी एक स्टुल दिले होते कारण की तिच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती (knee replacement) आणि Doctor's certificate दाखवल्या नंतर तिला स्टुल दिले होते. मी एकदा त्यावर बसले तर म्हणाली बसू नकोस. मॅनेजरने बघितले तर ती तुला ओरडेल. हे फक्त माझ्यासाठीच आहे. Rohini Gore
क्रमश:....

Thursday, March 03, 2022

मी आणि माझी नोकरी - Kohl's .....next episode

 

माझी जेव्हा कोल्स मध्ये नोकरी सुरू झाली तेव्हा मॅनेजर ने मला विचारले की कॅशिअरचे काम करशील का? मी तिला सांगितले की मी तितकी खुश नाही या कामात. ती म्हणाली तुला अनुभव आहे ना? मी म्हणाले हो पण जास्त नाही. तर म्हणाली ओके. तुला ओमनीत टाकते (८ ते ४) मी म्हणाले मला ते काम आवडेल. ओमनी (online fulfillment) नावाचा एक ऍप तयार केलाय. यामध्ये कस्टमरच्या ओर्डरी असतात. लोकेशन पण कळते. मला ट्रेनिंग देणारी माझ्या बरोबर होती. तिच्या पाठी पाठी मी जात होते. ती खूप जलद चालायची. तिच्या पाठी धावता धावता मला धाप लागायची. 😃 ओमनी ऍप तयार केले असले तरी त्यात घोड्यासारखे धावावे लागते ते कोणालाही कळले नसावे. म्हणजे असे की एक वस्तू एके ठिकाणाहून उचलायची असेल तर दुसरी वस्तू दुसऱ्या टोकाला असते. परत या टोकाला परत मधेच कुठेतरी. या ८ तासात ३ ब्रेक असतात. एक ब्रेक जेवणाची सुट्टी अर्धा तास आणि २ ब्रेक १५ मिनिटांचे. सोबत पाण्याची बाटली पाणी प्यायला ठेवतातच सगळे. स्केचर्स चे नवे घेतलेले बूट खरे तर मला परत करायचे होते पण कंटाळा केला. दुसऱ्या दिवशी जुने बूट घातले. परिस्थितीत काहीच फरक नाही ! पहिल्या दिवशी पळून पळून डोके, पाय, पाठ सर्व काही इतके प्रचंड दुखत होते की मला रात्री झोप येता येईना. शेवटी सूर्यनमस्कार (८) घातले. जोर बैठका, (प्रत्येकी २/२)आणि हाताचे व्यायाम, तरी जैसे थे परिस्थितीच होती. हा व्यायाम केल्यावर झोप लागली. मला हा व्यायाम पण आता जास्त होत नाही. आठवड्याला जेमतेम एकदाच होतो. 
 
 
दुसऱ्या दिवशी कामावर रूजू झाले. मी म्हणाले मला कळाले आहे ओमनी काय असते ते ! मी करीन एकटी काम ! दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखी अवघड होऊन बसली. आदल्या दिवशीचा प्रचंड थकवा होताच ! माझ्या चालीने काम केले. लंबकासारखी इकडून तिकडे वस्तू घेण्यासाठी जात होते. यामध्ये ठराविक पिक अप झाले की त्याचे पॅकिंग व लेबलींग करून USPS, UPS पोत्यात त्या त्या वस्तू घालायच्या असतात आणि परत धावायला सुरू. पॅकिंग/लेबलिंग करायला स्टोअर रूम मध्ये जावे लागते. तिथे उंच ऊंच छताला टेकलेले रॅक असतात ! आणि प्रचंड सामान असते, ट्रोलीज असतात. तिथेच एका रॅकमध्ये जागा करून दिलेली असते. तिथे पॅकिंग करायचे. हे आवडले काम मला. प्लॅस्टिकची मोठाली पोती असतात. त्यावर USPS, UPS असे लिहिलेले असते. त्याप्रमाणे त्यात सर्व टाकायचे. या प्रकारात bopus (Pick up from store) हे पण एक ऍप आहे. यामध्ये जे order केलेले असते ते दुसऱ्या स्टोअर रूम मध्ये जाऊन ठेवावे लागते. इथे सुद्धा मोठाले रॅक असतात. या रॅक मध्ये बरेच छोटे छोटे कप्पे असतात. त्यापैकी ठराविक ठिकाणी ठेवायचे. सर्व काही बरेच वेळा स्कॅन करावे लागते. वस्तू शोधून झाल्यावर, पॅक करताना, ठेवताना. 
 
 
वस्तूचे लोकेशन दिले असले तरी सापडायला वेळ लागतो. उदाहरणार्थ एखादा कपडा, त्याचा रंग, डिझाईन, साईज, ब्रॅंड हे सर्व चित्रात दिले असले तरी इतक्या सर्व कपड्यांमध्ये order केलेला नेमका कपडा शोधायला वेळ लागतोच. शिवाय डोळेही दुखायला लागतात ! बाईचा बूट order मध्ये असेल तर साईज, कलर, डिझाईन, ब्रॅंड सर्व शोधण्यासाठी डोळे किलकिले करून पहावे लागते. box वर साईज लिहिलेला, त्यात त्या त्या रंगाचे बूट आहेत का, असे सर्व काही ! मिळाला वेळ लागला की खूपच चिडचिड होते !
 
 
शोधण्यासाठी त्याच सेक्शन मध्ये इकडून तिकडे फिरावे लागते. मी ८ तासापैकी ७ तास चालत होते ! दुसऱ्या दिवशी आल्यावर मी आजारीच पडले. तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितले की मी आज कामावर येऊ शकत नाही. ओमनी मुळे मला आजारपण आले आहे. मला नोकरी सोडून द्यावीशी वाटत होती. पुढच्या आठवड्याच्या वेळापत्रकाप्रमाणे गेले आणि मला सांगितले की तू Amazon Return section मध्ये काम कर. कामाला सुरवात केली म्हणजे तिथली बाई म्हणाली मी काम कसे करते ते बघ. तिथे एक अमेरिकन माणूस नव्यानेच लागला होता. काम बघत होते तितक्यात वेळापत्रक बनवणारी मॅनेजर आली आणि म्हणाली की तू ज्युनिअर सेक्शन मध्ये जा. इथे एक देशी बाई आणि दुसऱ्या देशातली बाई होती. Rohini Gore

Tuesday, February 08, 2022

माझी आवडती गाणी

लता मंगेशकर - भावपूर्ण श्रद्धांजली - माझी आवडती गाणी

१) फैली हुई है सपनोंकी बाहे ..... (कल्पना कार्तिक)
२) कांटोसे खीच के ये आचल ..... (वहिदा रहेमान)
३) रिमझिम गिरे सावन ..... (मौसमी चटर्जी)
४) रूलाके गया सपना मेरा ...... (वैजयंतीमाला)
५) ए फसा ...... (बिंदू)
६) कुछ दिलने कहा .... (शर्मिला टागोर)
७) ओ घटा सावरी ..... (हेमामालिनी)
७) बंगले के पिछे तेरी बेरी के नीचे ..... (अशा पारेख)
८) नैनोमें बदरा छाए .... (साधना)
९) जरासी आहट होती है .... (प्रिया राजवंश)
१०) मोरा गोरा अंग लै ले ...... (नूतन)
११) पल भरमें ये क्या हो गया ..... (शबाना आझमी)
१२) अखियोंको रहेने दे ..... (डिंपल कपाडिया)
१३) माई री मै कासे कहू .... (रेहाना सुलतान)
१४) पानी पानी रे खारे पानी रे ( तब्बू)
१५) कारे बदरा तू न जा न जा ( नलिनी जयवंत)
१६) रहे ना रहे हम ....... (सुचित्रा सेन)
१७) दुश्मन ना करे दोस्त ने ..... (सिम्ता पाटील)
१८) राधा ने माला जपी ...... (मुमताज)
१९) बेईमान तोरे नैनवा निंदिया न आए..... (मधुबाला)
२०) किसीने अपना बनाके मुझ्को ...... (उषा किरण)
२१) कही तो मिलेगी बहारोंकी मंझिल ..... (मीनाकुमारी)
२२) जाने कैसे सपनोमें खो गयी अखिया ........ (लीला नायडू)
२३) सावन के झुले पडे ...... (राखी)
२४) जिंदगी प्यार का गीत है .... (पद्मिनी कोल्हापुरे)
२५) ओ बसंती पवन पागल .... (पद्मिनी)
२६) दिलबर दिल से प्यारे ..... (अरूणा इराणी)
२७) आजकल पाव जमी पर ..... (रेखा)
२८) मेरे हाथोमें नौ नौ चुडिया है ..... (श्रीदेवी)
२९) माये नि माये .... (माधुरी दिक्षित)
३०) तेरे मेरे बीचमें ......... (रती अग्निहोत्री)
३१) ना जिया लागेना .... (सुमित्रा संन्याल)
३२) जाने काहे जिया मोरा डोले ...... (शुभा खोटे)
३३) हवामें उडता जाए ..... (वीणा कुमारी)
३४) मुझे किसीसे प्यार हो गया ....... (नर्गिस)
३५) मस्त पवन है चंचल धारा ...... (कामिनी कौशल)
३६) मोरे नैना सावन भादो ........ (सिमी गरेवाल)
३७) जिया बेकरार है .... (निम्मी)
३८) किस लिए मैने प्यार किया ..... (नंदा)
३९) जोगियासे प्रीत किए दुख होय ...... (निरूपा राय)
४०) जा रे उड जा रे पंछी ..... (माला सिन्हा)
४१) धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार ..... (सुरेखा पंडित) ??
४२) बेचारा दिल क्या करे ...... (फरिदा जलाल)
४३) न जाने क्यु होता है ये जिंदगी के साथ ..... (विद्या सिन्हा)
४४) सुबह और श्याम काम ही काम ....... (सुलक्षणा पंडीत)
४५) मेहेलोंका राजा मिला के रानी बेटी राज करेगी ......... (जाहिदा)
४६) नदिया किनारे हेर आए आयी कंगना ..... (जया भादुरी)
४७) भोर भये पनघटपे ..... (झीनत अमान)
४८) आप मुझे अच्छे लगने लगे ..... (तनुजा)
४९) कब आओगे बालमा ........ (?? ?)
५०) पंख होते तो उड आती रे ...... (संध्या)
५१) ये दिल और उनकी निगाहोंके साये ..... (?? ?)
५२) हमने देखी है उन आखोंकी महकती ..... (?? ?)
५३) धानी चुनर मोरी हाय रे ..... (? ??)
Rohini Gore

Monday, January 24, 2022

हस्ताक्षर दिनानिमित्ताने

 

हस्ताक्षर दिनानिमित्ताने बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. माझ्याकडे जो खजिना आहे त्यातले मी अधुन मधून काय आहे ते पहात असते तसे आजही पाहिले. काही वेळेला खूप पूर्वीच्या मेल चेक करत बसते. त्यात कोणाकोणाला काय काय पाठवलेले असते ते पाहून पण मन आठवणीत रमून जाते. तर आज डायरीमध्ये काय लिहिले ते पाहिले. मी माझ्या हस्ताक्षरात बरेच काही लिहिले आहे. १९९९ सालातली ही डायरी मी २००१ साली इथे अमेरिकेत येताना आणली होती. यात मी आधी पत्र लिहायचे. मग ते जसेच्या तसे परत कार्डावर किंवा आंतरदेशीय पत्रात लिहायचे आणि पाठवायचे. या डायरीमध्ये बरेच काही काही आहे. नंतर मी मनोगतावर लिहायला लागले ते पण आधी मी वहीत लिहायचे आणि नंतर मनोगतावर टंकायचे. १०० पानी २० ते ३० वह्यांमध्ये मी लिहिले आहे. नंतर थेट मनोगतावर टंकायला लागले. बाकीचे पण काही मिळाले. आज खजिन्यामध्ये मला काही जणांचे हस्ताक्षर बघायला मिळाले. पूर्वी पत्रलेखन व्हायचे. पत्र आले आणि ज्याने ते लिहिले आहे त्याचे हस्ताक्षर बघताच तो/ती आपल्याला भेटली आहेत असेच वाटायचे ना ! 
 
 
तर माझ्याकडे पत्रातली हस्ताक्षरे आहेत ती म्हणजे आईचे बाबांना लिहिलेले पत्र १९६३ साल, बाबांनी मामांना (आजोबांना लिहिलेले पत्र) १९६१ साल, बाबांनी माझ्या बहिणीला लिहिलेली पत्र, १९८७, माझ्या भाचीने मला लिहिलेले पत्र २००३ साल. मी आईबाबांना, रंजनाला लिहिलेली पत्रे, काकाने माझ्या बाबांना लिहिलेली २ पत्रे, विनुच्या भावाने व भाचीने आम्हाला दोघांना लिहिलेल पत्र २००५ साल.
प्रतिभा काकूंनी मला लिहिलेले पत्र २००५ साल, मी डायरीत लिहिलेली पत्र २००१ सालातली इथे आल्यावर खुशालीची, ती म्हणजे आईबाबा, रंजना, प्रतिभा काकू, वैशाली, सुषमा नेर्लेकर. एकूणच आजचा दिवस माझा असाच मागच्या आठवणीत गेला. आणि डायरीत मला गुलाबांच्या पाकळ्याही सापडल्या. डायरीत अमेरिकेत ओळख झाल्यांचे फोन नंबर, मूव्हींगसाठी केलेली यादी. रेसिपीज, जे काही सूचेल ते लिहिलेले, अजून बरेच काही ! रंजानचे हस्ताक्षर पण मी अजूनही खूप जपून ठेवले आहे. अमेरिकेत येताना तिने माझ्या बॅगांमध्ये काय काय भरले आहे त्याची यादी केली होती.
 
 
आता सर्वजण टंकलेखन करतात. पूर्वी टंकलेखन फक office मध्ये होत असे. शाळेत असताना आपण वहीत हस्ताक्षर सुधारण्याकरता शुद्धलेखन लिहायचो. मागच्या आठवड्यात मेल मध्ये पाठवलेला एक फोटो इथे देत आहे. पानांचे रंग बदललेले एक झाड मला फूटपाथवरून जाता येता दिसायचे हेंडरसनविला ला रहातअसताना. त्याचीही आठवण आली.Rohini Gore

माझ्या आईचे हस्ताक्षर सन १९६३



माझ्या सर्वात मोठ्या मामाचे हस्ताक्षर



 माझे हस्ताक्षर









माझी सख्या बहीणीचे हस्ताक्षर




बाबांच्या आत्येभावाचे अक्षर



माझ्या बाबांचे अक्षर
 

माझ्या काकाचे अक्षर

 




 
 

Wednesday, December 08, 2021

मी आणि माझी नोकरी - kohl's- black friday

 आज पहिल्यांदाच ब्लॅक फ्रायडेची खरेदी केली. आज कामावर मजा आली. काम खूपच होते. आज ८ तासाची ड्युटी होती. Kohl's मध्ये आज जत्रा होती. 😃 Kohl's मध्ये आज सर्वांना ब्रेकफास्ट आणि जेवण होते. मी जेवण नाहि घेतले. रांगाच रांगा होत्या. दुकानाबाहेर पोलीस सेक्युरिटी होती. सकाळी वुमन्स डिपार्टमेंटला होते तर लंच नंतर men's बॅंक रजिस्टरला होते. मी माझ्यासाठी आधीच खरेदी करण्यासाठी कपडे राखून ठेवले होते. काम झाल्यावर मी कपडे ट्राय केले आणि भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले. एका top चा आवडीचा रंग आणि टी शर्टवर काहीतरी कोरलेले घ्यायचे असे बरेच वर्ष मनात होते ते ही खरेदी केले. shopping साठी सीझन सुरू झाल्याने माझे आठवड्याचे वेळापत्रक खूप हेक्टिक आहे. रिटर्न्स तर इतके येत आहेत की रॅक भरून ते ओसंडून वाहत आहे. कपडे खाली पडत आहे. 😃 मि आज women's departmentला होते. माझ्याबरोबर कामाला होती ती म्हणाली मी रिटर्न्स जागेवर ठेवते. यु जस्ट कीप फोल्डिंग. मी कपडे फोल्ड करत होते आणि कस्टमर परत कपडे उचकटत होते. 😃 Black Friday deal प्रत्येक गोष्टीवर आठवडाभर होते. मला एक मॅनेजर म्हणाली की लंच नंतर मेन्स bank रजिस्टरला जा. मागच्या आठवड्यात तर सकाळी ९ ते १ bank register ला होते की मला एक कणही हालता आले नाही. भुकेने व्याकुळ झाले होते. स्टोअर पिक अप and online order filling वेगळेच. वेळ मिळाला की लिहीन एकेक करत सर्व. Wish you All Happy Holidays !

Tuesday, November 30, 2021

आठवणी खिडकीच्या (१)

 

खिडकी म्हणलं की खिडकीतून बाहेर बघणं आलचं. तर अश्याच या खिडक्यांच्या आठवणी. मी आता जिथे रहाते तिथे स्वयंपाकघराला लागूनच एक खिडकी आहे. खिडकीला लागूनच डायनिंग टेबल आहे त्यामुळे काही खाताना किंवा जेवताना घरबसल्या खिडकीबाहेरील करमणूक पहाता येते. खिडकीबाहेर एक मोठे पटांगण आहे जिथे मुले खेळत असतात. उन्हाळ्यात संध्याकाळी पटांगण भरलेले असते. मोठी माणसे, छोटी मुले/मुली दिसतात. कोणी क्रिकेट खेळत असते तर कुणी चेंडू. बाकड्यांवर काही बायका/माणसे बसलेली दिसतात. घसरगुंडी/झोपाळ्यावर मुले खेळतात. खारी इकडून तिकडे धावताना दिसतात. उंच मानेच्या बदकांचा थवा येतो सकाळी सकाळीच. या बदकांना इथे राहणारी माणसे भात/ब्रेड घालतात. या बदकांना हिवाळ्यात अन्न कमी पडते. तेव्हा मी पण त्यांना ब्रेड खायला घालते. पाऊस पडला की मात्र कोणीही या पटांगणात फिरकत नाही. पक्षी मात्र गवतात मान घालून काही ना काही वेचून निवांतपणे खात बसतात. स्नो पडला की पटांगण पूर्णपणे पांढरे शुभ्र होऊन जाते. इथे झाडेही आहेत त्यामुळे स्नो पर्णहीन फांद्यांवर लटकताना दिसतो. बाकड्यांवर स्नोचा मोठाच्या मोठा थर जमा होतो. स्नो मध्ये बरीच माणसे/बायका/लहान मुले चालतात आणि एकमेकांवर स्नो उडवतात. चालल्यामुळे अनेक बुटांचे वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईनचे छाप स्नो वर उमटतात. इथे जेव्हा प्रचंड थंडी सुरू होते तेव्हा मात्र कोणीही दिसत नाही. मोकळे पटांगण बघताना मन निराश होते.

 

Friday, August 13, 2021

सई व तिचे आजोबा 🙂

 

चि. सई - चिमुरडी- माझी नात -श्रद्धा हास्पिटल मध्ये दिनांक २-११-८९ रोजी सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी सईचा जन्म झाला. हे पाखरू बहुधा काश्मीर - जम्मू कडून आले आहे. आमचा आनंदाचा दिवस. आम्ही (मी व सौ निर्मला ) नात मुख पाहिले. तांबुस चेहरा, लुकलुकणारे काळेभोर डोळे व काळे जावळ. नर्सने दुपट्यात गुंडाळून पाळण्यात आणून ठेवले.तिच्या चिमुकल्या बाल मुठीत मी व हिने १०० रुपयांच्या दोन नोटा ठेवल्या. नोटेसह मुठी मिटल्या व गालावर स्मितहास्य उमटले. घरी आलो. रोज तेल पाण्याने आंघोळ सुरु झाली. नंतर धुरी व मग मउ मउ गादीवर झोप. एक महिना केव्हा गेला ते कळले नाही. तीला घेण्यात वेळ जाउ लागला. मी तिला म्हणे, सई, आपलं काय ठरले आहे (वय १ महिना) मी लाडाने तिला माझ्या छातीवर घेउन झोपत असे आणि म्हणे सई आपण कॅरम खेळायचा ना? आता आता तिला समजू लागल्यावर मी तिला गोष्टी सांगण्यास सुरवात केली. ती गोष्टी मनापासून ऐकते. एखादे वाक्य गाळल्यास ती मला सांगते, असे नाही आजोबा, तिथे असे आहे.उंदराची गोष्ट सांगताना मी सांगायचो, उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला, गोंडेवाल्या गोंडेवाल्या, टोपीला २ गोंडे लावून देतोस? गोंडेवाला म्हणाला, हो डेकोटी !ती म्हणते असे नाही आजोबा, तो म्हणाला देतो की ! डेकोटी नाही !
 
 
 
१ जून १९९२ रोजी तिला हातात पेन्सील धरता आली. आगस्ट १९९२ मध्ये १ ते २० अंक ती पाटीवर लिहू लागली. १ ते १० पर्यंतचे अंक ती बरोबर ओळखते व काढते. १ - २ करता करता ती म्हणते, एकावर पूज्य दहा, सईचा नाच पहा ! हे पालुपद झालेच पाहिजे. चि. रंजनास सांगताना ती म्हणते, आई आई आजोबांच्या खिशातून जेम्सच्या गोळ्या, कॅटबरीच्या वड्या निघतात. श्री सुरेशराव यांच्या मातोश्री तिला नेहमी म्हणत, जगदंबा माझे आई ! म्हणून ती त्यांना जगदंबा आजी म्हणते आणि सौ निर्मलास नांदुरी आजी म्हणते. आजोबा आजोबा मी तुमची लेक, आई तुमची नात आणी बाबा जावई, तर मी तिला म्हणतो, अग सई, तू माझी आजी आहेस. ती मामांची आई.एकदा सत्यानारायणाच्या पूजेसाठी मी सोवळे नेसले होते. सई आईला म्हणाली, आई, तो बघ आजोबांनी नवीन फ्राक घातला आहे. सई ६ महिन्यांची असतानाखूप रडत होती. काही केल्या थांबेना. मी तिला उचलली आणि फाटका बाहेर ठेवली आणि म्हणालो आधी रडणे बंद कर. तर तुला आत घेईन. थोडावेळाने रड्णेथांबले. मी तिला घरात आणले. ती म्हणाली आजोबा पोपटाला बाहेर ठेवायचे ना? मला नाही ना? खरे तर ती खूप बोलायची म्हणून मीच तिला माझा पोपट आहे असे म्हणायचो. त्यानंतर असे काही झाले की मी म्हणायचो, सई बाहेर कुणाला ठेवायचे? सई म्हणे मला नाही, पोपटाला बाहेर ठेवायचे. तिच्या जन्माच्या दिवशीमी श्री. शहा काकांना फोन करून रंजनाला मुलगी झाली आहे असे सांगितले. तसे ते म्हणाले की बाबा, तुमच्याकडे लक्ष्मी आली आहे. आणि खरच माझ्या आजीचे (ती मामांची आईचे नाव लक्ष्मी होते) मी सईला म्हणे तू माझी आजी आहेस ! तिला बऱ्याच कविता पाठ आहेत. फुग्याची गोष्ट, लहान बाहुलीची गोष्ट. ती गोष्टी छानच सांगते. खिरीची, उंदराची टोपी, मगरीने हत्तीचा पाय धरला. इ. इ. आकाशातील पळणारा ढग ती मला दाखविते. झाडांना नळीने पाणी घालण्याची तिला भारी हौस ! घरा भोवतालची बाग अमितची व सईची.
 
 
 
 
आमच्या अंगणात सिडलेस पपईचे झाड होते. मी तिला पपई कुठे ? असे म्हणले की ती चटकन पपई कडे पहात असे. ती बोलायला लवकर लागली. आई नंतर तिने पपई हा शब्द उच्चारला. ९० च्या ७ जूनला पहिला पाऊस पडला. मी तिला खांद्यावर घेऊन पावसात खूप भिजलो. घरा भोवताली सीताफळाची ७ ते ८ झाडे होती. सिताफळे खूप येत असत. अंगणात कडेला एका झाडावर लहान पक्षाने एक घरटे बांधले होते. जास्वंदीचे ४ फूटी झाड होते. त्यावर घरटे होते. त्यात पक्षाने ३ गुलाबी रंगाची अंडी घातली होती. त्यात वाकून ती मी सईला दाखवित असे. सकाळ मध्ये येणारी पक्षांची, जंगली श्वापदांची चित्रे मी तिच्यासाठी कापून ठेवली. त्यात वाघ, तरस, माकड, बोकड, सांबर, सिंह रानमांजर, पाणमांजर कोल्हा, लांडगा, बिबट्या, कोळसुंद्र, रानकुत्रा, डुक्कर, गवा, हरण, चितळ, तसेच पक्षी मोर, हळद्या, कोतवाल, बुलबुल, वटवट्या, धोबी, खंड्या, निळकंठ. वाघाचेचित्र दाखवले की ती हमखास म्हणते "हा पहा हागोबा " तशी ती फार धीट आहे.ती दुपारची झोपायला खळखळ करायची. मी म्हणे, सयो, माळ्यावर मांजर आहेबरं का ! ते शेपटी फुगविते व खाली येते. त्याला कोणी रडत असेल तर आवडत नाही. तिची ३ चाकी सायकल माळ्यावर आहे. ती माळ्यावर जाते आणि म्हणते आजोबा, मांजर खाली बागेत गेले का हो? वर दिसत नाही. नेहमी मी तिला विचारतो, सई ही बाग कुणाची? माझी ! अंगण कुणाचे? माझे ! फरशी कुणीघातली गं? मी ! हे घर कोणाचं? माझं आणि तू कुणाची सई? तुमची आणि माझ्या बाबांची ! १९- ३- १९९३ ला संजना व सुरेश कोकणात ट्रीपला गेले होते. २१.३.९३ ला रविवारी रात्री ९-४० ला श्री सुरेश यांचा फोन दिपाली मध्ये आला. दिपाली म्हणजे शहा काकांचे दुकान. चि. सई बाबांशी व रंजनाशी बोलली. हॅलो कोण बोलत आहे? बाबा, येताना फणस, आंबे आणणार आहात ना? सायकल पण आणा. मी मजेत आहे. सिंपल डिंपल बरोबर खेळते. उद्या आजोबांबरोबर पार्कमध्ये जाणार आहे. अच्छा, बाय बाय ! नंतर ती मला विचारते, आजोबा, बाबांनी कोणता शर्ट घातला आहे? सांगा ना, मी म्हणले अगं फोनवर बोलणे ऐकू येते. शर्टाचा रंग कसा दिसेल? रविवारी ९.३० ला लागणारी जंगल बुक ही सिरियल सईला फार आवडते. त्यातील पात्रे तिला फार आवडतात.
 
 
 
१० जून १९९३ रोजी सईला मँटेसरीत प्रवेश मिळाला. ११.३० वाजता पटांगणात सर्व पाल्य व पालक जमले होते.चि. सई अजिबात रडली नाही. शाळा भरण्या आधी सईला कॅटबरी घेऊन दिली. नांदुरी आजीने तिला तुळशी बागेतून खेळ आणून दिला आहे. ती भातुकलीत रंगते. मला जेवायला वाढते. अंगणातील फरशीवर तीन चाकी चालविते. दिनांक २१.१०.९३ ला पर्वती पायथ्याशी घेतलेल्या नवीन घरात सौ रंजना, श्री सुरेश , त्यांच्या मातोश्री व सई यांनी गृहप्रवेश केला. नोव्हेंबर मध्ये येणारा तिचा वाढदिवस आता नवीन जागेत साजरा होणार आहे ! त्यामुळे सई व आम्ही सर्व आनंदात आहोत....... हे माझ्या बाबांचे लेखन आहे - श्री निळकंठ बाळकृष्ण घाटे २१.१०.१९९३ त्यांच्या हस्ताक्षरातली पाने मी स्कॅन केली आहेत.
Rohini Gore
 




 
 
 

Friday, July 02, 2021

इंगल्स मार्केट ... (९)

 

गेले २-३ दिवस मला इंगल्स मधल्या दिवसांची खूप आठवण येत आहे. 🙁 त्यामुळे पुढचे भाग लिहिले गेले. अजूनही काही भाग लिहून होतील.मग ही मालिका संपेल.
 
 
 
मी पक्की शाकाहारी असल्याने तिथले पदार्थ मला खाता यायचे नाहीत. पण ज्या मध्ये मांस नाही असे पदार्थ मी बनवायचे. म्हणजे ते जणु माझेच होऊन गेले होते.आणि ते विकी आणि कार्मेनलाही माहित होते. पोर्क पुलींग मी कधी केले नाही की हॅम सलाड कधी केले नाही. मला ते बनवताना ड्चमळायला लागायचे आणि मी सांगितले की हे २ पदार्थ मी बनवू शकत नाही. एक वेळ हॅम सलाड मी कालवू शकते आणि प्लॅस्टिक डब्यात भरु शकते पण पोर्क पुलींग अजिबातच नाही.सलाड मध्ये चिकन कापायला मला काही त्रास झाला नाही. इथे चिकन सलाडचा खप तडाखेबंद असतो ! आणि ही जी काही सलाड बनतात त्यात मेयोनिज घालतात. त्यामुळे मेयोनिजचे मोठे च्या मोठे डबे आम्हाला खूप लागायचे. आणि ही सलाड मोठमोठाल्या घमेल्यात आम्ही बनवायचो. एग सलाड बनवायचे असेल तर आम्हाला कमीत कमी ५० अंडी किसून घ्यायला लागायची. कापलेले हॅम फूड प्रोसेसर मधून किसुन घ्यायला लागायचे. पिमंटो चिझ बनवायलाही २ ते ४पिशव्या मध्ये असलेले सर्व लागायचे. हे जे पदार्थ आम्ही बनवायचो त्याकरता आम्हाला फ्रीजर रूम मध्ये जावे लागायचे. हे फ्रिजर खोली एवढे मोठे असतात. तिथे सर्व कच्चा माल ठेवलेला असतो. हा माल सर्व ट्रक मधून येतो. या ट्रक मधून माल उतरवून घेण्याकरता डेली मॅनेजर जातात. अवाढव्य खोकी की जी खोली एवढी ढिगाने असतात ती पॅलेट वरून उतरवली जातात. फ्रीजर मध्ये ठेवली जातात. हे सर्व काम डेली मॅनेजर आणि त्याला त्याची मदतनीस करते. विक्रिकरता ठेवलेले आणायचे नसते. आणि इथे काम करताना तुमच्या हातात कुणी साहित्य आणुन देत नाही ते सर्व आपले आपल्यालाच करायला लागते आणि त्याकरता चकरा खुप होतात. अर्थात यादी बनवली की आम्ही ते ते सर्व आणत असु. पण तरीही ते एकाच वेळेला सर्व आणले जायचे नाही.
 
 
 
मला हळूहळू कळाले की मांस असलेले पदार्थ जरी आपल्याला खाता येत नसतील तरी बाकीचे बरेच काही खाता येईल आणि मी ते खायचे. काम करताना खाणे अलाउड आहे पण लपत छपत खायचे, किंवा कोल्ड रूम मध्ये जाउन खायचे. बनाना पुडींग बनवताना त्यात केळ्यांच्या चकत्या आणि कुकीज घालायला लागतात त्यामुळे केळी खाता यायची. काही सलाड मध्ये बेबी टोमॅटो, काकड्या, स्ट्रऍबेरी, दाक्षे घालायचे असल्याने मला ते पण खाता याायचे. सब मध्ये मी काही वेळेला लंच साठी माझा मीच सब बनवून घ्यायचे. त्यात मी भरपूर काकड्या, टोमॅटो, चिरलेले लेट्युस घालून घ्यायचे. शिवाय थोडे किसलेले चीझ पण टाकायचे. टोमॅटो सँस घालायचे. काही वेळेला मी लिहून द्यायचे मग मला तिथल्या सब मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणी बनवून द्यायच्या. जेव्हा तिथे छोटे पिझ्झे order ्नुसार बनवून द्यायचे तेव्हा पण मी एखाद वेळेला पिझ्झा घ्यायचे. आणि एशियन बार सुरु झाला तेव्हा मला व्हेजी नुडल्स खाता यायचे. हे छान असायचे. आठवड्यातून एक दिवस मी डबा न आणता हे असे खात असे.फ्रुट बार करता फळे कापली जायची ती कापताना आम्ही आशाळभुत नजरेने बघायचो. 😃 कूकींगच्या शेजारीच आमच्या मागेच जेव्हा फळे कापायच्या तेव्हाआम्हाला पण त्यातल्या काही फोडी खाता यायच्या. त्यात अननस, कलिंगड, टरबूज असे. मग त्यातल्या काही फोडी एका बाउल मध्ये ठेवून काम करता करता मी खायचे. त्यामुळे फ्रेश वाटायचे. काही वेळा तर असे वाटायचे की तू कापत रहा मी आयत्या फोडी खात रहाते, असे मी म्हणायचे काही वेळेला. 😃 लंच मध्ये कस्टमर लोकांना २ व्हेजी आणि एक चिकन वडा असे ५ dollar ला असते. त्यात मॅक and चिझ, mashed पोटॅटो असायचे किंवा ब्रोकोली भात, उकडलेले बीन्स, यात सुद्धा लंच शिवाय कस्टमर नुसते चिकन वडे खूप घ्यायचे. चिकन सलाड सारखाच चिकन वड्यांचा तडाखे बंद खप व्हायचा. अरे बापरे. ही लोक किती फॅट खातात असे मनात म्हणायचे मी. 
 
 
 
आम्ही तिघी म्हणजे मी विकी आणि कार्मेन उद्पादन विभागात असल्याने आम्ही सर्व कोरडे पदार्थ बनवायचो. कुकींग व फ्रुट बार सेक्शन आमच्या अगदी मागेच होता. hot बार, सब बार, एशियन बार आमच्या पुढे होते. कूकींग आणि फ्रुट बार साठी घासायला भांडी खूपच व्हायची. आमची भांडी कमी व्हायची. सलाड बनवण्यासाठी आम्हाला फक्त घमेली लागायची. ती आम्ही सिंक मध्ये विसळून ठेवायचो. तिथे डिश washer जरी असले तरी कुकींग सेक्शन आणी फ्रुट बार साठी खूपच भांडी व्हायची, इतकी की डिश वाशर ला लावून सुद्धा प्रत्यक्ष हाताने बरीच भांडी त्यांना घासावी लागत ! लंच टाईम १२ ते २ खुप गर्दी असायची. त्यामुळे आम्हाला तिथे मदतीला जावेच लागायचे. लोकांना लंच box मध्ये पदार्थ घालून, लिस्ट मधे पाहून त्याप्रमाणे कोड घालून लेबल प्रिंट करून लावायचे आणि द्यायचे. तिथे नेमून दिलेल्या बायकांना आम्ही मदत करायचो. इथे बरेच आले आणि गेलेले पाहिले. दुसरी नोकरी मिळाली की इथली नोकरी सोडून गेलेले, कुणाला फायर केले म्हणून सोडून गेलेले. त्यामुळे इथे नेहमी माणसांची कमतरता असे.
अश्या वेळेला डेली मॅनेजर उपलब्ध असलेल्या माणसांमध्ये फिरवा फिरवी करायची. आज तू सब मध्ये काम कर, तर तु कुकींग साठी जा. काही वेळेला मांसकापणाऱ्या लोकांना ती डेली सेक्शन ला टाकायची. आम्हाला तिघींना उद्पादन सोडुन जेमिने दुसऱ्या विभागात टाकले नाही. कारण तिला माहिती होते की इथे खूप काम असते. आमच्या मदतीसाठी ती नेमणूक करायची पण नंतर तिची रवानगी दुसऱ्या सेक्शन मध्ये व्हायची कारण की माणसांची कमतरता खूप असायची. आम्ही तिघी अजिबात दांड्या मारायचो नाहीत. अगदी क्वचित खूप बरे वाटत नसेल तर मी जायचे नाही. कारण गेले नाही की त्यांच्यावर खूप भार पडायचा.अश्या वेळेला डेली मॅनेजरची पण खुप कसरत होते. डेली मॅनेजर पण ३ ते ४ झाले. त्यांच्यावर पण खूप प्रेशर असते. डिस्ट्रिक्ट मॅनेजर आला किंवा फूड इन्स्पेक्टर आला की आमची खूप धावपळ व्हायची. फ्लोअर भरलेला असला पाहिजे. जर शिलकीत डबे शिल्लक नसतील तर ते आधी बनवून प्लोअर वर ठेवावे लागत. फूड इन्स्पेक्टर रेटींग देवून जाई. Rohini Gore 
 
 
क्रमश : ...
 

















 


Monday, June 28, 2021

इंगल्स मार्केट ... (८)

 

विल्मिंग्टन सोडून आम्ही जेव्हा हॅंडरसनविल ला आलो तेव्हा मला बदल मिळाला. अपार्टमेंट शोधात खूप त्रास झाला. जेव्हा राहायला सुरवात केली तेव्हा विनायक सकाळी ८ ते रात्री ७ नोकरी करू लागला. त्याला ये-जा करण्यासाठी कारने ९० मिनिटे लागायची. जेवायचा डबा घेउन जायचा. मला खूप एकटेपणा आला. पुढे काय? हा प्रश्न सतावायला लागला. हजारोंच्या संख्येने फोटो काढून झाले होते. जवळ जवळ सर्व प्रकारच्या रेसिपीज लिहून झाल्या होत्या आणि इथे येणारे अनुभव पण बरेच लिहून झाले होते. अर्थात अनुभव कधीच संपणार नाहीत. तसेही विल्मिंग्टन मध्ये २००५ ते २०१५ मित्रमंडळ नव्हतेच. मनोगताने खूपच साथ दिली होती. ती साथ २००५ ते २०१० पर्यंत होती. तिथे मिळालेले मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी बिझी झाले होते. याहू वरच्या अमर्याद गप्पा पण संपल्या. मनोगतावरच्या चर्चा संपल्या.
 
 
 
त्यानंतरही बरेच काही छोटे छोटे उद्योग केले. ते सर्व उद्योग मी माझ्या blog्वर लिहिलेले आहेत. नविन शहर आणि आलेला एकटेपणा. एकटेपणा जाण्यासाठी बाहेर पडा. चाला. काही ना काही मिळते. आमच्या घरापासून फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स पर्यंत जातो. एकदा विनायक या फुटपाथ वरून चालून आला आणि म्हणाला एकदम सुरक्षित फुटपाथ आहे. तू पण आठवड्यातून एकदा इंगल्स पर्यंतजात जा. एकदा गेले इंगल्स मध्ये. माझ्या चालीने हा रस्ता ये-जा करण्यासाठी ६० मिनिटांचा आहे. दर आठवड्याचा माझा चालण्याचा कार्यक्रम ठरून गेला. दर आठवड्यात १ ते २ वेळा इंगल्स पर्यंत ये-जा करायचे. त्यामुळे वेळही जायचा. चालणेही व्हायचे. एकटेपणा कमी व्हायला मदतही झाली. इंगल्स मध्ये जायचे. तिथे स्टारबक्स आहे. तिथे coffee प्यायची. भूक लागली असेल तर एखाद डोनट खायचा आणि परत यायचे. एकदा अशीच इंगल्स मध्ये गेले असताना एका टेबलावर बसले होते. तिथे एक बाई ब्रेडचे गठ्ठे लावत होती. मनात म्हणाले अशी नोकरी हवी. किती छान ना ! त्या बाईला विचारले की इथे नोकरीचे चान्सेस आहेत का? ती म्हणाली थांब. तिने मला सांगितले तो तुला पांढऱ्या शर्ट मधला माणुस दिसतोय का? तर त्याला जाऊन विचार, तो तुला सांगेल. त्याला जाउन विचारले. मला कुठे माहिती होते की ज्या माणसाला मी नोकरी संदर्भात विचारले तो स्टोअर मॅनेजर होता. त्याने सांगितले की तू online अर्ज कर. अर्ज कर आणि मला येऊन भेट. मी म्हणाले की तुझे नाव काय? तर त्याने एक इंगल्स चे कार्ड दिले आणि त्याच्यावर त्याचे नाव लिहिले रिचर्ड. मला खुप आनंद झाला. ज्या अर्थी अर्ज करून मला भेटायला ये असे म्हणत आहे त्याअर्थी इथे नक्कि नोकरी आहे.
मी अर्ज भरला. त्यामध्ये तुमची उपलब्धता विचारतात. 
 
 
तिथे मी माझी उपलब्धतासोमवार ते रविवार ७ दिवस आणि वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी लिहिली. नंतर जाऊन रिचर्ड ला भेटले. आणि सांगितले की मी अर्ज केला आहे. तर तो जरा थांब असे म्हणाला. मी तुझ्या अर्जाची प्रिंट घेउन येतो. अर्जाची प्रिंट घेउन आला आणि म्हणाला की तू सही केली नाहीस. मी म्हणाले की मी इथेच सही करते. तर तो म्हणाला electronic सही पाहिजे. परत घरी जाउन सही केली आणि परत इंगल्स मध्ये त्याला भेटायला गेले. मला म्हणाला की अमुक एका दिवशी ये. त्या दिवशी गेले तर म्हणाला की डेली मॅनेजर आज आली नाहीये. आणि तुला कोणत्या सेक्शन मध्ये घ्यायचे हे पण अजून ठरले नाही. विचार चालु आहे. अर्जामध्ये मी सर्व सेक्शन ला टिक मार्क केली होती. तर म्हणाला उद्या येशील का? मी म्हणले २ दिवसांनी आले तर चालेल का? तर म्हणाला चालेल. त्याने हे पण विचारले की तु सेकंड शिफ्ट साठी येशील का? दुपारी २ ते ११. मी ठामपणे नकार दिला. दोन दिवसांनी गेले. मनात विचार आला ही नुसती टोलवा टोलवी चालू आहे का? नोकरी दिसत नाहीये. पण विचार केला की अजुन एक चान्स घेऊ.त्या दिवशी डेली मॅनेजर होती. तिच्याशी हस्तांदोलन केले. 
 
 
तिने मला जुजबीप्रश्न विचारले ते असे की तु या आधी असे काम केलेस का? तुला पर आवर ९ dollar मिळतील आणि शिफ्ट कोणती हवी ८ ते ४ की ९ ते ५. मी म्हणाले की मला या आधी असे काम केले नाहीये. पण शिकवले तर मी नक्कीच चांगले काम करीन. मला पगार मान्य आहे आणि ८ ते ४ शिफ्ट चालेल. शिवाय तिने हे पण विचारले की नोकरी करायची झाली तर तुझा कोणत्या प्रकारचा विसा आहे. तर मी म्हणाले की माझ्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. हे सांगितल्यावर ती खुषच झाली. म्हणाली की मी तुला offer इमेल ने पाठवते. ते तुला मान्य असेल तर
offer accept कर. मग तुझी background चेक केली जाईल. तुला ड्र्ग टेस्ट द्यावी लागेल. नोकरी करण्याकरता जे जे सोप्सकार लागतात ते ते सर्व झाले. विनायक मला आधीपासुनच सांगत होता की तु अश्या प्रकारची नोकरी कधी केली नाहीस. ८ तास उभे राहुन ही नोकरी आहे. आणी नुसते ८ तास उभे राहयचे नाही तर कामही करायचे आहे. तुला ही नोकरी झेपणार नाही. मी त्याला सांगितले की मी ८ तास काय २४ तास उभी राहायला तयार आहे इतका मला कंटाळा आला आहे. इथे अमेरिकेत घरी बसले की वेड लागते. डिपेंडंट विसावर नोकरी करता येत नाही. बऱ्याच बायका इथे डिपेंडंट विसावर बेकायदेशीर नोकरी करतात पण आम्हाला ते पटत नव्हते. म्हणून केली नाही.
गरजेसाठी नोकरी करावी लागते पण सततची टांगती तलवार असते. आम्हाला पैशाची गरज नव्हती पण मला वेळ कसा घालवावा याची गरज इथे हॅंडरसन्विललाआल्यावर जास्त भासली. 
 
 
तोपर्यंत विल्मिंग्टनला माझा वेळ मी छान घालवला. एक संपले की दुसरे असे करत करत बरेच काही उद्योग केले. मी इंगल्स मध्ये २०१५ ते २०१९ पर्यंत डेली मध्ये उत्पादन विभागात नोकरी केली. इथे बरेच विभाग आहेत. सब बार, हऍट बार, सुशी, फ्रुट बार, कुकींग आणि उद्पादन. मला उद्पादन विभाग खूप आवडतो. काम खूप असते पण एकसुरी नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविचेस, सलाड आणि बरेच काही प्रकार करावे लागतात. उद्पादन विभागात कामाची विविधता खूप आहे. मी तिथे नोकरी करत असताना निरिक्षण करायचे आणि मला अमुक अमुक सेक्शनला नोकरी दिली असती तर? पण नको रे बाबा. उद्पादन विभाग छान आहे. इथे काम तर जास्त आहेच. हालचाल खूप आहे. चालणे खूप आहे. तसे तर इतरांना पण आहेच. उद्पादन विभागात काम करायला कोणीही तयार होत नाहीत. इथे आम्ही तिघी होतो. मी कार्मेन आणि विकी. माझे दोघांशी छान जमून गेले होते. काम करता करता गप्पाही होत होत्या. मी विचार केला की बेकरीमध्ये मला टाकले असते तर पण नाही टाकले तेच बरे झाले तिथे ब्रेड, कुकीज, आणि केक्स बनतात. तिथे कस्टमर लोकही विचारपूस करत नाहीत. डेली सेक्शन्ला आम्ही hot बार, सब बार, एशियन बारला मदत करायचो. म्हणजेकस्टमर आले की त्यांना सर्व्ह करायला मदत करायचो. लंच टाईम मध्ये त्यांना मदत करावी लागायची इतकी गर्दी असायची. शिवाय डेली सेक्शनला कॅशियरची पण एक वेगळी पोस्ट निर्माण केली होती. तिथे पण मदतीसाठी जायला लागायचे. तिथे वेगळी कॅशियर असायची. पण ती आली नाही तर आम्हाला जायला लागायचे. 
 
 
 
प्रोड्युस डिपार्टमेंटला मला टाकले असते तर? नको रे बाबा, तिथे दिवस भर मोठमोठाली फळे कापत रहायचे ! म्हणजे उजवा हातावर किती भार पडत असेल? कॅशियर पण नको तिथेही उजव्या हातावर खूप भार पडतो. फ्रुट बार नको, कुकींग तर नकोच नको ! मी हॅंडरसनविलला गेले तर मला अजूनही तिथे नोकरी मिळेल. पण शेवटी शेवटी उत्पादन विभागातले काम इतके काही वाढले होते की मला नोकरी सोडून द्याविशी वाटत होती. मी आठवड्यातले ४ दिवस कामाला जायचे. ते मी ३ दिवस करून घेतले होते तरी मला खूप दमायला व्हायचे. पण नोकरी सोडून घरी बसायचे म्हणजे पुढे काय हा प्रश्न आहेच. अर्थात हा प्रश्न सुटला आणि विनायकच्या नोकरी बदलामुळे आम्ही न्यु जर्सीला आलो. Rohini gore
क्रमश : .....

Saturday, June 26, 2021

इंगल्स मार्केट ... (७)

 ३ पॅक सॅंडविच म्हणजे कठिण आणि किचकट, उत्पादन विभागात आम्हां तिघींपैकी कुणालाच हे बनवणे आवडायचे नाही. दुपारी २ नंतर हे बनायचे. अगदीच पटापट विकले गेले तर मात्र सर्व काम सोडुन आधी हेच बनवायलाघ्यायचो. आणि बनवायचे असतिल तर फ्रिजर मधून ते सकाळिच आणायला लागायचे म्हणजे रुम टेंप्रेचरला यायला अवधी असायचा. जर का आणायचे राहिले तर मात्र अरेरे ! किती त्रास होतोय कापायला असे व्हायचे. मी हे बनवायचे पण अगदीच कुणी नाही बनवले तर बनवायचे. नाहीतर मी आणि कार्मेन मिळुन बनवायचो. लुलु तिचे सुशीचे काम झाले की आमच्या मदतीला यायची आणि ती हे सॅंडविच बनवायची. याकरता जे ग्रीन लीफ लेट्युस लागते ते आम्ही प्रोड्युस डिपार्टमेंट मधुन आणायचो. हे धुवुन घ्यायला लागायचे. नंतर ते चाळणीतनिथळत ठेवायचे. ३ पक संडविचला संपूर्ण टेबल रिकामे असले तर चांगले व्हायचे. १० सॅंडविच बनवायला टेबल भरुन जायचे.

 

 हे गोल आकाराचे ब्रेड मधोमधकापुन त्याच्या वरचा भाग, (मी त्याला टोप्या म्हणायचे. :D ) ब्रेड कापला की एकावर एक टोप्या ठेवायला लागायच्या. खालचे डगले (कापलेल्या ब्रेडचा खालचा भाग )एका खाली एक असे पुर्ण टेबल भरुन जायचे. मग सर्वांवर आधी लेट्युसची पाने, नंतर ठरलेले २ औंस मांस ठेवायचे व नंतर चिझच्या चकत्या ठेवायच्या. प्रत्येक डगल्यावर वेगवेगळे मांस. हे सर्व झाले की प्रत्येक डगल्यावर ज्याच्या त्याच्या टोप्या ठेवायच्या. :D मग प्रत्येक सॅंडविच एका कागदामध्ये रॅप करायचा. रॅप करायचा कागद सुळसुळीत आणि कापायही कडक असायचा. रॅप करायचीपण एक पद्धत आहे. विकी आणि कार्मेनची पद्धत वेगवेगळी होती. मला कार्मेनच्या पद्धतीने रॅप करायचे.



१० सॅंडविच बनवायचे असतिल तर प्रत्येक डब्यामध्ये ३ म्हणजे ते ३० झाले पाहिजेत. म्हणजे एका पॅक मध्ये ३ सॅंडविच याप्रमाणे. रॅप केले की ते मधोमध कापायचे. कापायचे म्हणजे पुर्ण नाही, सॅंडविच दुमडण्यासाठी अगदी थोडे कापायचे ठेवायचे. हे सर्व कापुन झाले की आयताकृती प्लॅस्टीकच्या पारदर्शी डब्यात ते भरायचे आणे मग त्याची लेबले प्रिंट करायची. ती डब्याला चिकटवायची.


प्रत्येक सॅंडविचचे लेबल प्रिंट करण्यासाठी वेगवेगळे आकडे आहेत. सवयाने सर्व आकडे सॅंडविचचे आणि सलाड चे पाठ झाले होते.प्लोअरवर ठेवली की बाकीची बॅक अपला ठराविक ठेवावि लागत. मी जेव्हा नोकरीला सुरवात केली म्हणजे २०१५ साली तेव्हा हे ३ पॅक सॅडविच फ्लोअरला ६ व बॅक अप ला ६ ठेवायचो. जेव्हा ऐशियन बार सुरु केला तेव्हा बिझिनेस इतका वाढला की डेली सेक्शन मध्ये उद्पादन विभागातले आमच्या तिघींचे काम प्रचंड वाढले. नंतर शिलकीत ठेवण्याची संख्या ६ वरून २० वर गेली ! रॅप करून हे सॅडविच जेव्हा कापायला लागायचे ना तेव्हा खूप जोर लावायला लागायचा. याची सुरी लांबलचक होती. ही सुरी आम्ही लपवून ठेवायचो कारण ती आमच्याकरता खुप महत्वाची होती.

याकरता आम्हाला रोस्ट बीफ, टर्की आणि हॅम हे मांसाचे प्रकार लागायचे. शिवायया मांसाचे प्रत्येकी वेगवेगळे सॅडविचही बनवायला लागायचे. चिकन ब्रेस्ट मांस घालुन पण एक प्रकार बनवायला लागायचा. हे वेगवेगळे ४ प्रकारचे सॅडविचकरता प्रत्येकी ३ औंस मास घालायला लागायचे. बाकी सर्व तेच म्हणजे लेट्युसची पाने, आणे चीझ. हे सॅन्डविच प्रय्तेकी ४ फ्लोअर वर ठेवायला लागायचे आणि शिलकीत प्रत्येकी ८ ठेवायला लागायचे. या सर्व सॅंडविचला लागणारा ब्रेड साारखाच. तो आम्हाला फ्रीजर मधून आणायला लागायचा. मोठा boxआणायला लागायचा. प्रय्तेक प्लॅस्टिक च्या पिशवीत ६ असायचे. याप्रमाणे १० पिशव्या म्हणजे ६० ब्रेड लागायचे. बाकीच्या सर्व सॅंडविचेस साठीचे ब्रेड आम्हाला विक्रीकरता जे ब्रेड ठेवलेले असतात तिथुन आम्ही घेऊन यायचो. स्लाईस ब्रेड. या सर्व बाकीच्या सँडविच साठी काहींना ग्रीन लीफ लेट्युस लागायचे तर काही सॅंडविच बिना लेट्युसचे. प्रत्येकाला चीझही वेगळ्या प्रकारचे. या सर्व याद्या मी बनवायचे. मी कामावर आले की फ्लोअरवरचे वापरण्यासाठी बाद झालेले सॅंडविच फेकून द्यायचे. नंतर कोल्ड रुम मधून रिकाम्या झालेल्या जागांवर शिलकीतलेसॅंडविचचे डबे ठेवायचे. नंतर कोणत्या प्रकारचे किती सॅंडविच बनवायचे याची यादी तयार करायची. नंतर सॅंडविचला लागणारे मांस order करायचे. मांसाचे नाव आणि त्याला लागणारे मांस प्रत्येकी गुणिले जितके सॅंडविचेस बनवायचे असतील त्याचा आकडा. ही यादी मांस कापणाऱ्या विभागात नेवून द्यायची. आणि त्याकरता एक प्लॅस्टिकचा डबाही द्यायचा. आणि शिवाय प्रत्येक सॅंडविचला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे चीझची पण यादी द्यायचे.


चीझ प्रत्येकी १ औंस याप्रमाणे. कार्मेन आली की मग ती टेबल सॅनिटाइझ करायची आणि फ्रीजर मध्ये जऔउन ब्रेड, व्हनिला पुडिंग, मेयानिझचे डबे आणि अजून जे जे काही बनवायचे असेल ते ते एका कार्ट मध्ये घालून घेऊन यायची. आणि मग आमची खऱ्या अर्थाने कामाला सुरवात व्हायची. Rohini Gore

क्रमश : ....

Wednesday, June 02, 2021

सायकल डे

 

आज म्हणे जागतिक सायकल दिवस आहे. सायकल म्हणली की मला रंजना आठवते. आमचे घर शाळेपासून खूप लांब होते. आम्ही शाळेत बसने जायचो. सायकल शिकायला बाबा नाही म्हणायचे. ते म्हणायचे आधीच आपले घर शाळेपासून खूप लांब आहे. तुम्ही सायकलने ये-जा केलीत तर आमचा जीव टांगणीला लागेल. आधीच रस्त्यावर खुप वाहने असतात आणि गर्दीपण असते. त्यात तुम्हाला काही झाले म्हणजे? बाबा प्रेमापोटी सांगत पण तरीही रंजनाने बाबांचे म्हणणे ऐकले नाही. मी सायकल शिकले नाही. मी मुळात घाबरट्ट आहे. नंतर मी सायकल शिकायला गेले पण सराव केला नाही. स्कुटर थोडीफार शिकले आणि सराव न करता चालवायला गेले तर मला अपघात झाला.
रिक्शाचे पण २ अपघात झाले. त्यानंतर मी खूपच भीती घेतली.
 
 
 
रंजना बाबांच्या नकळत सायकल शिकली. बाबा घरी जेवायला आले की ते जेवुन थोडावेळ विश्रांति घेऊन परत कामाला जायचे ते ६ ला घरी यायचे. सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ अशी त्यांची कामावरची वेळ होती. बाबा दुपारी घरी जेवायला आले की रंजना बाबांच्या नकळत सायकची किल्लि घ्यायची आणि भिंतीला धरून तिची ती सायकल शिकली. एके दिवशी म्हणाली की आज मी तुम्हाल एक गंमत दाखवणार आहे. बाहेर येऊन उभे रहा रस्त्यावर. आणि ती सायकल चालवत येताना दिसली. आम्हाल सगळ्यांनाच तिचे खूप कौतुक वाटले. माझी पहिली नोकरी सुरू झाली होती. मी तिला माझ्या स्वकमाईच्या पैशाने ( त्यावेळेचे रुपये ७०० ) तिला सायकल घेऊन दिली. मला अजूनही ती सायकल डोळ्यासमोर आहे. तिचा रंग लाल होता. रंजनाने भरपूर सायकल चालवली आहे. तिला नोकरी लागल्यावर सकाळी ७ ला ती सायकल घेऊन बाहेर पडायची ते संध्याकाळी ६ ला घरी यायची. सकाळी उठून ती college मध्ये जायची. तिथून परस्पर नोकरीवर जायची. नंतर तिथून ती क्लास करायची. आणि लग्नानंतर तिने स्कुटर घेतली. सायकल शिकल्याचा तिला खूप फायदा झाला. माझ्या अजोबांनी खूप सायकलींग केले आणि बाबांनी पण ! बाबा ४ वेळा सायकलने ये-जा करायचे कामावर जाताना. मला सायकल चालवता येत नाही पण सायकल खूप आवडते. पूर्वी सायकल भाड्याने पण मिळायची. सायकल वर चित्रित झालेले "हे मैने कसम ली" हे गाणे मला खूपच आवडते. Rohini Gore