Tuesday, September 27, 2016

रजनीगंधा फूल तुम्हारे

"रजनीगंधा फूल तुम्हारे" हे गाणे माझे अत्यंत आवडते आहे. चित्रपट पाहिला नव्हता तो आज ऑनलाईन पाहिला. मन भूतकाळात तर गेलेच पण तितकेच ते हळवेही झाले. सहजपणा, साधेपणा आता कुठेच दिसत नाही. खूप मागे पडल्या आहेत सर्व गोष्टी. या चित्रपटात खरे प्रेम दाखवले आहे. ते तरी आता कुठे दिसते? रेल्वे मधून कोण जाते हल्ली? कोण स्टेशनपर्यंत सोडायला येते? रेल्वे सुटताना खिडकीतून टाटा करताना कुणी दिसते का? रिक्शातून येत का कुणी हल्ली? हे सर्व त्या चित्रपटात दाखवले आहे. लग्न झाल्यावर मी मुंबईवरून पुण्याला रेल्वेने जायचे त्याची आज हा चित्रपट पाहताना प्रखरतेने आठवण झाली. या चित्रपटातल्या विद्या सिन्हाने नेसलेल्या साध्या साड्या, लांबसडक शेपटा, कुंकू, आणि कानात रिंगा पाहताना खूपच छान वाटत होते.


रजनीगंधा फूल तुम्हारे महके युँही जीवनमें
युँही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमें

अधिकार ये जबसे साजन का हर धडकन पर माना मैने
मैं जबसे उनके साथ बँधी ये भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधनमें

हर पल मेरी इन आँखोमें बस रहते है सपने उनके
मन कहता है मै रंगोंकी एक प्यार भरी बदली बनके
बरसू उनके आँगनमें


रजनीगंधा फूल तुम्हारे... कवी आणि गीतकार - योगेश

Friday, September 09, 2016

इंगल्स मार्केट ...(१)

उत्पादन विभागात आम्ही तिघी म्हणजे मी विकी आणि कार्मेन आहोत. विकी सोमवार, मंगळवार व बुधवार अशी तीन दिवस असते तर कार्मेनला सोमवार आणि बुधवार सुट्टी असते. बाकीचे दिवस कामाचे असतात. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ असतात. सोमवार ते शुक्रवार मधले दोन दिवस आणि शनिवार रविवार. माझे वेळापत्रक दर आठवड्याला बदलते. विकी ६६ वर्षाची आहे तर मी आणि कार्मेन पन्नाशीच्या आसपास आहोत. आमच्या कामाची सुरवात कशी होते ते थोडक्यात सांगते. जी बाई आधी येईल तिने विक्रीकरता ठेवलेले पारदर्शक डबे असतात त्यावरच दिनांक बघून तो डबा कार्टमध्ये फेकण्याकरता ठेवायचा. ज्या दिवशीची सुरवात होते तो दिनांक माल फेकण्याकरता  झाला आहे हे ठरवलेले आहे. त्याकरता डब्यांवरचे दिनांकाचे लेबल पहायला लागते. दुकानाच्या सुरवातीच्या आवारामध्ये जिथे कार्ट असतात त्यातली एक घ्यायची. हातामध्ये वही आणि पेन घ्यायचे आणि स्टँडमध्ये जे डबे फेकायला झाले असतील ते एकेक करून कार्टमध्ये टाकायचे. आणि आता त्या जागी कोल्डरूममधले डबे आणून ठेवायचे. गिऱ्हाईक डबे विकत घेताना ते आडवे तिडवे कसेही ठेवतात ते व्यवस्थित ठेवायला लागतात. जे डबे ठेवायचे असतील त्याची एक यादी तयार होते. फेकायला झालेले डबे असतील त्या जागेवर दुसरे डबे आणून ठेवायचे असतातच याशिवाय विक्रीला गेलेल्या डब्यांच्या तिथली जागा पण रिकामी होते तर तेही यादीत लिहावे लागते. आता ही नाशिवंत डब्यांची कार्ट एके ठिकाणी ठेवायची व परत दुसरी कार्ट घेण्याकरता दुकानाच्या सुरवातीच्या आवारात यायचे. तिथून कोल्डरूम मध्ये जायचे व तिथले डबे स्टॅडमध्ये ठेवण्याकरता घ्यायचे. तिथेही नाशिवंत मालाचे दिनांक तपासून तेही फेकून द्यायचे. आता अश्या रितीने सर्व डबे व्यवस्थित स्टंडमध्ये लावून ती कार्ट परत जागेवर नेऊन ठेवायची.




आता दुसरी यादी बनवावी लागते. या यादीत उरलेले डबे किती शिल्लक आहेत याचा आकडा लिहून दिवसभरात आपल्याला किती डबे तयार करायचे  आहेत  याचा आकडा लिहायचा. हा जो आकडा आहे त्याचे पण एक गणित आहे. प्रत्येक पदार्थ दिवसभरात किती शिलकीत पाहिजे याचे प्रमाण ठरवून दिले आहे. फेकलेले डबे व रिकाम्या जागी डबे ठेवून झाल्यावर कोल्डरूम मध्ये किती डबे शिल्लक आहेत याचा आकडा लिहून त्यानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणापैकी किती डबे बनवावे लागतील याचा आकडा लिहायचा. उदा. क्लब सँडविचचे प्रमाण ८ आहे आणि कोल्डरूम मध्ये ४ डबे शिल्लक असतील तर ४ डबे बनवावे लागतील. यामध्ये सुद्धा दिनांक बघावे लागतात. शिलकीमध्ये ४ डबे आहेत आणि २ डबे जर उद्या बाद होणार असतील तर ४ डबे बनवावे लागतील. या यादीमध्ये अनेक प्रकारची सलाड व सँडविचेस असतात. शिवाय पिझ्झेही असतात. बनाना व चॉकलेट पूडींगही असते. एकूण किती पदार्थांचे डबे बनवायचे याची यादी तयार झाली की आता तिसरी यादी बनवावी लागते.




या यादीमध्ये सँडविचेस बनवायला जे मांस लागते ते किती औंस लागेल हे लिहावे लागते. प्रत्येक सँडविच करता किती औंस मांस घालायचे हे
ठरवलेले आहे. म्हणजे सँडविचचा प्रकार आणि त्यापुढे त्याला लागणाऱ्या मांसाचा आकडा लिहायचा. उदा. टुस्कान टर्कीकरता २ औंस मांस
लागते आणि २ सँडविचेस बनवायची असतील तर ४ औंस मास लागेल. ही यादी मांस विक्रीकरता ठेवलेले असतात त्यांच्याकडे द्यावी लागते.
 या यादीत सँडविचला लागणारे चीझही यादीही द्यावी लागते. मांस व चीझ विक्रीकरता जो विभाग आहे तो आमच्या बाजूलाच आहे. त्याकरता लांब जावे लागत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मांस व वेगवेगळ्या प्रकारचे चीझ यांनी मिळून सँडविच बनतो. सँडविच बनवण्याकरता ग्रीन लिफ लेट्युसही लागते त्याकरता आम्हाला फ्रेश फूड विभागात जावे लागते आणि त्याचा आकडाही तिथे
असलेल्या चार्टमध्ये लिहावा लागतो.

कच्चा माल आणण्याकरता आता आम्हाला फ्रीजरमध्ये जावे लागते. त्याची एक छोटी यादी करून कोट टोपी व हातमोजे घालून जायचे. जाताना नाशिवंत डब्याची कार्ट घेऊन जायचे. आधी ही कार्ट तिथे असलेल्या कचरापेटीत रिकामी करायची व तीच कार्ट घेऊन फ्रीजर मध्ये जायचे.  फ्रीजरमध्ये सँडविच बनवण्याकरता ब्रेड असतात ते आणावे लागता. शिवाय यादीत पिझ्झे बनवायचे असतील तर त्याचे बेस आणायचे. शिवाय व्हॅनिला व चॉकलेट पूडीग चे डबे आणि इतर सर्व यादीनुसार आणावे लागते.  तिथून आले की कच्चा माल ओट्यावर काढून ठेवायचा व कार्ट जागेवर नेऊन ठेवायची.




माझी व कार्मेनची कामावर येण्याची वेळ यामध्ये खूप अंतर नसल्याने ही सुरवातीची कामे आम्ही दोघी मिळून करतो.  विकी मात्र पहाटे ६ ला येते. मी ८ ला व कार्मेन साडे आठला येते. मी सर्व नाशिवंत डबे फेकते व कोल्डरूम मधले डबे आणून ठेवते. तोवर कार्मेन आली की ती यादी बनवते. कामाला सुरवात करताना ओटा साबणाचा फवारा मारून ओल्या फडक्याने पुसून घ्यावा लागतो  व रिकामे वेगवेगळ्या आकाराचे डबेही आणून ठेवायला लागतात त्याची एक वेगळी खोली आहे. तिथे मोठमोठाले बॉक्स असतात त्यातले लागतील तेवढे डबे काढून आणायचे. एकूणच या सर्व कामांकरता आमच्या इकडून तिकडे तिकडून इकडे बऱ्याच फेऱ्या होतात.  आम्ही खालील पदार्थ बनवतो.

सलाड -
- चिकन
-पोर्क
-एग
-टूना
- पिमंटो चीझ
- हॅम
बनाना व चॉकलेट पूडींग
चीझ केक (ब्लू बेरी व चेरी यांचे टॉपिंग) सलाडमध्ये २ प्रकारचे डबे असतात एक मोठा व एक लहान.

सँडविचेस
- चिकन सलाड
- एग सलाड
- रूबेन
- क्लब विथ पोटॅटो सलाड
- हॉट डॉग
- ३ पॅक काँबो
- टुस्कान टर्की
- बफेलो क्लब
- बीचवूड हॅम
- टेरीयाकी
- रोस्ट बीफ
- टर्की
- चिकन ब्रेस्ट
- हॅम
याशिवाय फ्रेश भाज्यांचे सलाड यामध्ये गार्डन, चेफ व फ्राईड चिकन. यामध्ये लहान व मोठा आकाराचे चोकोनी उथळ डबे असतात. पिझ्झामध्ये चार प्रकार म्हणजे चीझ, सुप्रीम, पेपरोनी आणि पेपरोनी आणि सॉसेज

पुढील भागात पदार्थ कसा बनवला जातो व त्यावर काय काय सोपस्कार होतात ते पाहू.


क्रमश: ---

Sunday, September 04, 2016

४ सप्टेंबर २०१६

आजच्या आनंदी दिवसाला कालपासूनच सुरवात झाली होती. आज मला कामावर सुट्टी असल्याने म्हणजे ती मिळाल्याने मी कालपासूनच रिलॅक्स मूड मध्ये होते. संध्याकाळी कामावरून आल्यावर  विकतचेच आणलेले थोडे खाल्ले आणि रात्रीला कारल्याची कडू पण आवडीची भाजी केली. काल अचानक एक चांगला मराठी चित्रपट पाहिला. यातली गाणी कधीच कुठे ऐकलेली नाहीत. चित्रपटाचे नाव आहे " गंगेत घोडं न्हालं " गदिमांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही छान आहेत.


आजचा रविवारचा कार्यक्रम ठरवला होता तो म्हणजे ऍशविल मध्ये असलेल्या भारतीय उपहारगृहात जेवायचे आणि संध्याकाळी आमच्या शहरातल्या ऍपल फेस्टीवला जायचे. आज हवा छानच होती. भारतीय जेवणही छान होते. ऍपल फेस्टीवलला मजा आली. तिथे मी २ कानातले घेतले. मला खूपच आवडून गेले. तिथले म्युझिक, निरनिराळे लावलेले स्टॉल बघताना खूप मजा वाटत होती. तिथेच माउंटन फेस्टीवलचाही स्टॉल होता तिथे तिकिटे घेतली. पुढच्या १५ दिवसात हा फेस्टीवल आहे. मागच्या वर्षीही आम्ही ऍपल फेस्टीवलला गेलो होतो.  इथे आज एक वेगळाच स्टॉल बघायला मिळाला तो म्हणजे काचेचे निरनिराळे काहीतरी बनवून टेबलावर  मांडून ठेवले होते. त्यात एक बदक तर खूपच सुंदर होते. काही फोटोज घेतले.
उद्या कामाला जाउच नये असे वाटत आहे  पण जायला तर हवेच.

एकूण काल रात्रीपासून जो रिलॅक्स मूड होता तो संपला आता. विनायक मात्र अजुनही रिलॅक्स मूड मध्ये आहे. लेबर डे विकेंडची त्याला सुट्टी आहे ना !


 कालपासून सुरू झालेला ऍपल फेस्टीवल उद्या संपेल पण  गेल्या आठवड्यात आमच्या कडे सुरू झालेला मटकी

 फेस्टीवल मात्र पुढच्या आठवड्यात संपेल. मागच्या आठवड्यात आम्हाला गेल्या १५ वर्षात मटकी खायला मिळालेली नव्हती, ती आम्हाला इंडियन स्टोअरमध्ये मिळाली आणि ती सुद्धा मोड आलेली. मग मोह आवरेना. खूप घेतली. म्हणून आम्ही "मटकी फेस्टीवल" असे नाव दिले आहे.