Wednesday, May 17, 2017

माडीवाले कॉलनी - पुणे (1)

१९६१ साली पूर आला. पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न होताच. साने माई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता. त्या आईला म्हणाल्या  "तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे एक खोली रिकामी आहे तिथे तुम्ही रहायला या." पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबागवाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती. माझी आजी (आईची आई) घरी पोळ्या करत होती. तिघेही तीन दिशेला होते. माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे. पूर येतोय ही बातमी कळताच बाबा कामावरून घरी आले  तोपर्यंत औंकारेश्वराजवळील नदीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते. बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बाबांनी पटापट जे सुचेल तसे आईचे दागिने, थोडीफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट पँटच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले, चला चला लवकर बाहेर पडा. केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल. आजी म्हणाली, एव्हड्या पोळ्या करून घेते. तर बाबा म्हणाले, अहो पोळ्या कसल्या करताय, लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा. आगाशे वाड्यात आईबाबांचे बिऱ्हाड होते. श्री व सौ आगाशे यांना बातमी कळताच सामान पटापट कुठेतरी उंचावर, गच्चीवर जसे जमेल तसे ठेवले होते आणि तेही बाहेर पडत होते. श्री आगाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले होते. ते म्हणाले मी इथून कुठेही हालणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले.




आई शिवणाच्या क्लासमध्ये होती. तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या. खरे तर बातमी रात्रीच कळाली होती की पानशेतचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट वहायला लागले आहेत.  बाबा, श्री आगाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना "काही नाही हो, अफवा असतील, दुसरे काही नाही" अशा भ्रमात ! बाबा सांगतात आम्हाला पूर रात्री  आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तुम्हा दोघी बहिणींनाही हे जग पाहता आले नसते. सगळेजण सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मामाच्या खोलीत येऊन पोहोचले. एका खोलीत १० - १५ माणसे!  आळीपाळीने काही आत आणि काही बाहेर असे करत होती. पूर येऊन गेल्यानंतर किती नासधूस झाली होती हे आईबाबांनी मला फोनवरून सांगितले आहे, त्याचे वर्णन पूढच्या लेखात करीनच. पण माडीवाले कॉलनीमध्ये सौ माई साने व श्री साने यांच्या बंगल्यामधल्या एका खोलीत आईबाबांनी त्यांचा नवा संसार कसा थाटला याचे वर्णन अप्रतीम आहे. मुद्दे लिहून ठेवलेत मी ते नंतर विस्तारीन.


माडीवाले कॉलनीतल्या त्यांच्या दुमजली बंगल्याच्या वर गच्ची होती. त्या गच्चीला लागून एक खोली होती. तिथेच माझा जन्म झाला. माझ्या बहीणीचा जन्म गोखलेनगरचा पण माई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच ! आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले व गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखलेनगरला येण्यासाठी. गोखले नगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे. तिथे माझ्या  आजोबांनी  पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली. वलसाडला असताना पुर आल्याची बातमी कळाल्यावर  त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर  मला दोनापैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे की निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतील !

क्रमश : ...



Thursday, May 11, 2017

तीर्थस्वरूप दादा


 मी माझ्या आईला नेहमी फोनवरून सांगते की तू तुजे अनुभव लिही. पण ती म्हणते मला काही लिहीता येत नाही. पण ९  मे रोजी पहाटे साधारण ३ ला तिने तिच्या वडिलांबद्दल थोडे लिहिले. सुरवात श्री नृसिंह जयंती च्या दिवशी झाली. मला खूप आनंद झाला आहे. आता ती पूर्वीचे तिचे अनुभव लिहून काढेल आणि फोनवर ते मी उतरवून घेईन आणि माझ्या ब्लॉगवर टंकेन. पूर्वीच्या काळचे अनुभव वाचायला मला खूप छान वाटणार आहे.


 *******

ती. स्व. दादा म्हणजे माझे वडील यांच्याविषयी थोडे विचार मनापासून. तुमचा व माझा तसा काहीही सहवास नाही पण ज्या काही गोष्टी आठवत आहेत त्या मी मनापासून लिहीत आहे. दुसरे म्हणजे मी तुमची सर्वात लहान मुलगी असल्याने तुम्ही खूप मोठे आहात वयाने व मनाने. तुम्ही कडक शिस्तीचे असल्याने व त्या काळच्या विचाराने मी असे ऐकले होते की तुम्ही खूप मुलांना मारलेत पण परिस्थितीच्या मानाने लाड केले असावेत.


मी तुमच्या हातून कधीच मार खाल्ला नाही. नाही म्हणायला एकदा करकरे वाड्यात (पुणे मुक्कामी) मार खाल्ला. साल १९५० साधारण असेल. पण नंतर तुम्हाला खूप वाईट वाटले व मला माझे आवडते दाणे गुळ खावयास दिलेत. नंतर १९५२ साली तुम्ही पनवेलला व मि पुण्यात होते. काही कारणाने ती. स्व. दाजीने (माझा भाऊ) मला पनवेलला पोहोचवले आणि योगायोगाने तुम्ही पण आईला सांगायचात की बाबीला इथे घेऊन ये. मी तिला मारणार नाही किंवा बोलणार पण नाही आणि थोडेच दिवसात रमा एकादशीला १९५२ साली तुम्हाला देवाज्ञा झाली.

माझ्या आईचे वय ८० आहे.

Friday, May 05, 2017

५ मे, २०१७

आजचा दिवस भूतकाळात रमणारा होता. माझ्या बाबांचे मित्र सरपोतदार काका फेसबुकावर आले आहेत. त्यांना मी फोन केला. शिवाय त्यांच्या मुलीशी सविताशी पण आज बोलले. आज माझा मूड गोखले नगर मूड होता. नंतर सुरेखा, जोशी काकू सगळ्यांना फोन लावले आणि बोलले. भाग्यश्रीला ही फोन लावला. जोशी काकू म्हणाल्या की तू भारतात आलीस की तुम्ही सर्व मैत्रिणी आमच्या घरीच जमा, मजा करा आणि खूप गप्पा मारा. त्या इतक्या काही प्रेमाने हे बोलल्या की मनाने मी लगेच गोखले नगरला जाऊन पोहोचले देखील.

गोखले नगरची आठवण येण्याचे अजून एक कारण असे आहे की आम्ही सध्या जिथे राहतो तो डोंगराळ प्रदेश आहे. पुण्यातील गोखले नगरचा भाग ही असाच डोंगराने व्यापलेला आहे. वेताळचा डोंगर, गणेश खिंड, पॅगोडा, हनुमान नगर, पत्रकार नगर, कांचन बन, चतुर्श्रींगी, पुणे विद्यापीठे, कमला नेहरू पार्क हे सर्व एकाच लाईनीत येते. आम्ही सर्व मैत्रीणींचे लहानपण, शाळा कॉलेजमधले दिवस ते अगदी आमच्या सर्वजणींची लग्न होईतोवर
आम्ही गोखले नगरला रहायचो.

आज मी आईशी फोनवर बोलतानाही तिला सांगितले की यावर्षीच्या भारतभेटीत मला गोखले नगर पहायचे आहे.
 आता मला त्याचे खूप वेध  लागलेत की मी सगळ्या मैत्रिणीना भेटून खूप गप्पा मारणार आणि खूप फोटोज घेणार. मुख्य म्हणजे आमच्या जुन्या घरी जाऊन मला माझ्या जाईला बघायचे आहे. जाईच्या फुलांचे आणि झाडाचे फोटोज घ्यायचे आहेत. हे मी जेव्हा प्रत्यक्षात करीनही पण त्याहीपेक्षा आज मी मनानेच तिथे जाऊन पोहोचले आणि सगळ्यांना भेटले आणि त्यामुळेच आज माझा सर्व दिवस भूतकाळात रमला.
 

वर जो फोटो आहे तो आम्ही जिथे राहतो तिथला  आहे.