Friday, July 08, 2022

८ जुलै २०२२

 २०२२ रोजनिशीतले आजचे हे पहिले पान. मी २०११ सालापासून रोजनिशी लिहित आहे. रोजनिशी म्हणजे रोजच्या रोज नाही. असेच एखाद वेळेस काही वेगळे घडले. कोणत्या गोष्टीपासून काही आनंद झाला तर ती गोष्ट थोडक्यात लिहायची असे ठरवले आहे. मागच्या काही वर्षातली रोजनिशीतली पाने एखादवेळेस चाळली की अरे, या दिवशी आपण हे केले होते का? असे आठवून परत आपल्याला आनंद होतो. तर आजची ही रोजनिशी म्हणजे आज मी बाहेर गेले होते. एखाद्या दिवशी जाते बाहेर आणि काही दुकाने हिंडते. बघण्यात वेळ जातो आणि एखादे चांगले मिळून जाते. तर आज मी कानातले घेतले ते म्हणजे पेपरोनी पिझ्झाचे स्लाईस. टार्गेट मधे मी सहसा जात नाही. हेंडरसनविलला असताना तिथल्या मॉल मध्ये जायचे. इथे कोल्स आणि आता टार्गेट मध्ये जाते काही वेळेला.

आधी पिझ्झा खाते, कोक पिते आणि मग फिरते इकडे तिकडे. मला कानातले बघायला आणि खरेदी करायलाही खूप आवडते. आज मी केसाला लावायचा कंगोरा सारखा दिसणारा चाप पण घेतला, पहिल्यांदाच. घरी येवून लावून पाहिला तर चांगला वाटला. केस मोकळे सोडण्यापेक्षा काही वेळा आता मी चाप घेणार आहे. कानातली मस्तच होती. त्यात एक ट्र्क होता. शिवाय झाड ,काचेचा स्टाईलिस्ट ग्लास, आयस्क्रीम कोन होता. आणि दुसऱ्या एका दुकानात केकचा तुकडा पाहिला. गोगलगाय पाहिली. शिवाय घुबड होते. कुलुप, किल्ल्या, घड्याळ असेही कानातले होते. सेफ्टी पीना, कणीस, अननस, असे बरेच काही ! हे सर्व कानातले होते आणि असतात. वेगवेगळे प्रकार बघायलाही छान वाटतात. सेल असेल तर मी घेते. मला १३ डॉलर्सचे ७ मध्ये मिळाले म्हणून घेतले. मधे एकदा पक्षी आणि बगळाही घेतला होता.

माझ्या मैत्रिणीने मला मोर दिला ! खूपच छान आहे तो ! तर माझ्याकडे बरेच कानातले झाले आहेत. ते आहेत अनुक्रमे  २ कासवे, २ हत्ती, रासबेरी, कॉफी मग, ३-४ प्रकारची फुले, मासे, २ फुलपाखरू, २ बदाम, भोपळा, निवडुंग, विंचू, बाटल्या, पक्षी, बगळा



Monday, July 04, 2022

शनि - रवि - सोम

 

नेहमीप्रमाणे शनि म्हणजे कामाचा दिवस. बाकीची साफसफाई व इतर कामे म्हणून मग बाहेर जेवण. जेवण म्हणजे एकच डिश. ती पण ठरलेली. डोसा-उत्तप्पा. शुक्रवार रात्री उसळ केली होती ती शनिवारी रात्री कामाला आली. म्हणजे फक्त भात लावला. शनिवारी संध्याकाळी एक टर्किश सिनेमा पाहिला नेटप्लिक्स वर. छानच होता. भाषा जरी वेगळी होती तरी सुद्धा त्यातली गाणी ऐकताना छान वाटत होते. या सिनेमात पर्वत व समुद्र असे सर्व निसर्गरम्य सीन होते. या सिनेमातला वेगळेपणा म्हणजे अर्धा सिनेमा स्टोरी व अर्धा काल्पनिक. अर्धा काल्पनिक आहे ते सर्वात शेवटी कळते. Name of movie - Doom of Love 
 
 
रविवारी दुपारच्या जेवणाचे आमंत्रण होते विनुच्या मित्राचे. तिथे आम्हाला सर्व आयायटियन्स भेटली. त्यांच्या घराच्या अंगणात पार्टी होती. उन्हाळा असल्याने तिथे तंबू ठोकले होते आणि त्याखाली टेबल खुर्च्या आणि एका टेबलावर खाद्यपदार्थ होते. आम्ही खाऊ म्हणून काजुकतली नेली होती. मला कुत्र्याची खूप भिती वाटते म्हणून त्याचा मित्र म्हणाला की तू घरात बस. तिथे तुला एक कंपनी आहे. तिथे त्याच्या मैत्रिणीची सासू बसली होती. त्या म्हणाल्या बरे झाले तुम्ही इथे आलात ते. नाहीतर मला खूप बोअर झाले असते. मित्राची मैत्रिण लीना पण तिथे बसली होती. तिने व मी एकमेकींची ओळख करून घेतली.मी म्हणाले की आम्ही लग्नानंतर १९८८ साली होस्टेल नं. ११ ला रहात होतो. खोल्या नंबर ६९, ७० तर ती म्हणाली मी पण होते ११ ला ! मग तुम्ही दोघे कसे दिसला नाहीत मला. अर्थात बरेच वर्षे गेल्याने असे झाले असावे. बघितले असेल पण लक्षात नसेल. गप्पा मारताना मी विचारले मग तुम्हाला आशा आणि स्वरदा माहिती असतीलच. म्हणाली हो हो, स्वरदा आणि किर्लोस्कर ही माहिती आहेत. संजय सोनार आमच्याच लॅब ला होता म्हणाली. मग मी तिला सांगितले की भैरवी सोनार व मी मैत्रिणी. सर्व डिपार्टमेंटला गेला की ति व मी गप्पा मारायला एकमेकींकडे जायचो. शिंदे बाई म्हणून होत्या. 
 
 
मी म्हणाले अजूनही काही जणी मला माहिती आहेत पण आता त्यांची नावे लक्षात राहिली नाहीयेत. विनायकच्या लॅबमधला पद्मकुमार आणि त्याची बायको रुख्मिणी तिथे आली होती. मी त्यांना फक्त ओळखत होते. मी लिनाला म्हणाले की तुम्ही बाहेर बसा गप्पा मारत. मी आहे तुमच्या सासूबाईंना कंपनी द्यायला. आम्ही दोघींनी सोनी चॅनल वर एक कार्यक्रम पाहिला. हेमामालिनी व तिची मुलगी होती आणि त्यांच्यासमोर छोटे उस्ताद गात होते. लिनाचे यजमान घरात आले आणि विचारले तुमच्या दोघींकरता मी काही घेऊन येतो. मी त्यांना सॉरी म्हणाले. ते म्हणाले अहो हे काय? त्यात काय झाले? मग आमच्या करता ते आधी मॅंगो लस्सी घेऊन आले व नंतर एका डिश मध्ये एक समोसा, काही फळांच्या फोडी, थोडा केक. नंतर काही वेळाने लिनाच्या मुलाने आम्हाला ज्युस आणून दिले. ते ज्युस म्हणजे अनसासाच्या रसात नारळाचे पाणि मिक्स केले होते. छान लागत होते. नंतर अनुराधाने (त्या घराची मालकीण) तिने आम्हाला तिने घरी बनवलेल्या गुळपापडीच्या वड्या आणून दिल्या. छान झाल्या होत्या. त्यात तूप नव्हते. तेल घातले होते.
 
 
अनुराधा म्हणाली अजून जेवण बाकी आहे. थोड्यावेळाने तुमच्यासाठी घेऊन येते. लिनाच्या सासुबाई म्हणाल्या मला आता काही नको आहे. मी पण म्हणाले मलाही नको. माझे पोट भरले आहे. नंतर परत आम्हाला एका मुलाने आयस्क्रीम बार आणि केक आणून दिला. दरम्यान लिनाचे यजमान काही वेळ आमच्या सोबत येऊन बसले. मला विचारले मी विनायकला ओळखले. तुम्ही त्यांच्या मिसेस ना? माहेरचे आडनाव काय, आईवडिल कुठे असतात अश्या गप्पा झाल्या. ते म्हणाले की नॉर्थ कॅरोलायना खूप सुंदर राज्य आहे. तुम्हाल आवडते का इथे ? म्हणाले नाही. बरोबर आहे. तुम्हाला नाहीच आवडणार. लिना व त्यांची फॅमिली हॅरिसबर्गला असतात. तिथे हर्शिज चॉकलेट फॅक्टरीत आला होतात का कधी? म्हणाले आलो होतो वरदा वैद कडे तेव्हा तिनेच आम्हाला नेले होते. तर म्हणाले वरदा वैद्य तुम्हाला कशी माहिती? तर मी सांगितले की मनोगत या मराठी वेबसाईट वरून तिची व आमची ओळख झाली. ती पहिल्यांदा आमच्याकडे आली होती. त्यांची व तिची ओळख एका संगीत मैफीलीत झाली होती. मी म्हणाले की ती काय कार करत असते ! म्हणाले हो, अतिशय हुशार मुलगी आहे. तिला बऱ्याच कला अवगत आहेत. मला विचारले तुम्ही काय करता? सांगितले सर्व ! ब्लॉगलेखन, फोटोग्राफी. इ. इ. 
 
 
५ तास होऊन गेले तेव्हा विनायकला विचारले की निघायचे का आता? विनायक म्हणाला तू बाहेर ये. सर्वांची ओळख करून देतो. मी रुख्मिणीला म्हणाले की तू अजिबात बदललेली नाहीस. बऱ्याच गोष्टी झाल्या ५ तासात. आठवणींना उजाळा मिळाला. निघताना शेखर आणि अनुराधा यांना धन्यवाद दिले व म्हणालो निघतो आता. तर अनुराधा म्हणाली. थोडं थांबा. चहा घेऊन जा. चहा म्हणल्यावर आम्ही थबकलो. एकीकडे चहा व आवरा आवर चालली होती. सगळ्यांनाच उरलेले अन्नवाटप सुरू होते. आम्ही एका डब्यात फ्राईड राईस घेतला. चहा प्यायल्यावर सर्वांना टाटा बायबाय केले आणि घरी आलो. भूक नव्हतीच. रात्रीच्या जेवणाल फ्राईड राईस गरम करून खाल्ला. माझे व विनायकचे ३०-३४ वर्षापुर्वीचे स्मरणरंजन चालू झाले. 
 
 
मला आठवले..होस्टेल मध्ये रहाताना बाथरूम कॉमन होत्या. डिपार्टमेंटला जाणाऱ्या सर्वांना अंघोळीला आधी प्राधान्य दिले जायचे. ते सर्व गेले (मुलंमुली) की आम्ही घरी असणाऱ्या बायकांचे राज्य सुरू व्हायचे. आमच्या अंघोळी आणि धुणे भांडी. एकेक जणी धुणे भांड्यांना नंबर लावायचो. त्यावेळी भांडी बाथरूम मध्ये खाली बसून आम्ही घासायचो व ओंडवे उभे राहून विसळायचो. धुणे भिजवून ठेवायचो. खाली बसून कपड्यांना ब्रश मारून धोपटायचो व नंतर पाण्यात कपडे आघळायचो बरेच वेळा साबण जाईस्तोवर ! कपडे पिळून मग एका खोलीतल्या तारांवर वाळत घालायचो. खूप व्यायाम होत होता. शिवाय चालणेही बरेच होत असे आयाटीमध्ये. आमच्या कामामध्ये मिनाक्षीचा छोटा मुलगा लुडबुड करायचा. तो इतका काही गोड होता की त्याच्या आईकडे कमीच असायचा. आम्ही सुंदरचे खूप लाड करायचो. त्याचे पापे घ्यायचो, गालगुच्चे घ्यायचो. मी भांडी घासून आले की यायचा आमच्याकडे आणि टबातली सर्व भांडी बाहेर काढून हा टबात बसायचा !
 
 
आजचा दिवस ४ जुलै अमेरिकेचा स्वातंत्रदिन. आज गोसरी करायची होती पण खूपच कंटाळा आला. रविवारच्या वेगळेपणाने जरा बरे वाटले. नाहीतर रांधा वाढा, उष्टी काढा. भांडी घासा. लाँग विकेंड संपूर्णम !

Saturday, July 02, 2022

२ जुलै २०२२ FB memory

 view from window before sunset - 27th June 2018 सूर्य जेव्हा म्हणतो चला आता मी भारतात जातो, उद्या भेटू परत , तेव्हा तो त्याचे रंग बदलायला लागतो. पांढरा शुभ्र दिसणारा सूर्य पिवळा होतो आणि नंतर तोच पिवळा रंग काही वेळ स्थिर होऊन तो लालसर रंगाकडे झुकायला लागतो. नंतर लाल चुटूक होतो आणि अंतर्धान पावतो. अंतर्धान पावताना त्याची किरणे आभाळात परावर्तीत होतात. जेव्हा आकाश निरभ्र असेल तेव्हा रंगांची उधळण होत नाही पण जेव्हा ढग असतील तेव्हा त्या ढगांमध्ये रंग घुसतात आणि क्षणाक्षणाला ते बदलत राहतात. काही वेळा हा रंग बदलण्याचा सोहळा खूप देखणा असतो. रंगांची नुसती उधळण असते. भगवा, गुलाबी, सोनेरी. आणि मग काही वेळाने होत्याचे नव्हते होते. रंगांच्या खुणा काळ्या निळ्या ढगांवर राहतात काही वेळ, आम्ही येऊन गेलो होतो असे सांगण्यासाठी.