Monday, February 26, 2018

हम दोनो

आमच्या लग्नाला आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्ही आता ३१  व्या वर्षात पदार्पण करत आहोत.  आम्ही दोघांनि एकमेकांना कधीच पाहिले नव्हते, पण आमच्या आईवडिलांनी एकमेकांना पाहिले होते.  माझे सासरे आणि आणि माझी आई पूर्वी सख्खे शेजारी होते. सासरे नोकरीनिमित्ताने पुण्यात आले आणि आई लग्न होऊन आली.

माझ्या सासूबाईंनी मला मागणी घातली आणि आमचे लग्न झाले.  बघण्याचा कार्यक्रम १ जानेवारी १९८४ साली सकाळी ७ वाजता झाला.  मी नोकरी करत असल्याने आधी आम्ही गोऱ्यांच्या घरी गेलो.  कांदे पोहे कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने झाला.  माझ्या सासूबाईंनी मला कांदे पोहे आणून दिले आणि आम्ही दोघे बोलण्याऐवजी त्यांच्या चोघांच्या गप्पाच झाल्या. आम्ही दोघे त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता एकमेकांकडे कटाक्ष टाकत होतो.

आमचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम जरी १ जानेवारी १९८४ झाला असला तरी लग्न मात्र २६ फेब्रुवारी १९८८ साली झाले. ती एक लई मोठी ईष्टोरी आहे बगा. जशी प्रत्येकाच्या लग्नाची एक वेगळी गोष्ट असते.

आमचा साखरपुडा झाला आणि आम्ही तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलो.  त्यादिवसानंतर आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. आयायटी पवई वरून विनायक दर शुक्रवारी यायचा आणि आम्ही शनिवार रविवार फिरायचो. फिरण्यापेक्षा आम्ही सिनेमे पहायला जायचो. संगम, मधुमती, बीस साल बाद, मेरा नाम जोकर इ. इ. आधी मी विनायकच्या घरी जायचे. मग तिथे चहा पाणी व्हायचे.  सुरवातीला सासूबाई खायला करायच्या. नंतर मीच करायला लागले. सिनेमा पाहून झाल्यावर रिक्शाने विनायक मला आईच्या घरी सोडायला यायचा. आई मात्र होणाऱ्या जावयाला जेवल्याशिवाय सोडायची नाही. अगदी पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर चटणी असे साग्रसंगीत जेवण करायची. पिक्चर पाहिला गेल्यामुळे आमचे दोघांचे बोलणे जास्त व्हायचे नाही. वि ला पिक्चर पाहायची आवड आहे त्यामुळे मी खुश होते. 


लग्नाच्या आधी फिरायला जाताना एकदा माझा वाढदिवस आला. तेव्हा वि ने आपणहून मला आणलेली पहिली आणि शेवटची साडी ! आणि गजराही आणलेला ! त्यात भर म्हणजे आम्ही त्यादिवशी मेरा नाम जोकर हा पिक्चर पहायला गेलो होतो. आणि त्या तिकिटाचे पैसे माझ्या बहिणीने दिले होते ! ती म्हणाली माझ्यातर्फे तुम्हाला भेट ! आम्ही तिला आमच्याबरोबर यायचा आग्रह केला तर म्हणाली मी कशाला कबाब में हड्डी!


एकदा पर्वतीवर फिरायला गेलो. तेव्हा आमच्या मध्ये झालेला संवाद

तुला पोळ्या करायला येतात का?

हो. येतात की ! ( म्हणायला काय हरकत आहे, ) नुसत्या पोळ्या नाहीत तर मला पुरणपोळ्याही करता येतात.

पण मी रोज पुरणपोळी खाणार नाहीये.  तुला साध्या पोळ्या येतात का?

 तू रोज किती पोळ्या खातोस?

 दुपारी ४ आणि रात्री ४

म्हणजे चार नि चार ८ आणि माझ्या २ म्हणजे १० , मॅनेजेबल.


नंतर विचारले तुला डाळ तांदुळाचे भाव माहीती आहेत का?

असतील काहीतरी, का रे?

अगं आपल्याला १२०० शिष्यवृत्ती मध्ये भागवायचे आहे म्हणून विचारले.

भागेल की. न भागायला काय झाले.

तुला वाचनाची आवड आहे का?
"नाही" हे उत्तर देऊन एका फटक्यात प्रश्न निकालात काढला.  म्हणजे आहे असे उत्तर दिले की मग काय वाचतेस, किती पुस्तके वाचलीस, कोणते लेखक आवडतात, नकोच त्या भागगडी. म्हणजे मला वाचनाची आवड आहे पण ति कथा कादंबऱ्यांपुरतीच.

गाण्याची आवड आहे का?

हो. खूपच. अनिल बिस्वास माहीती आहे का?


नाही.

रोशन

 हो रोशन माहीती आहे. म्युझिक डायरेक्टर आहे ना?

 मी पण एकदा वि ला विचारले तुला फक्त एकच शर्ट पँट आहे? मला तरी कुठे जास्त ड्रेस होते. फिरायला जाताना मी आईच्या साड्या नेसून जायचे आणि ब्लाऊज काळा ठरलेला ! त्यामुळे नंतर फिरायला जाताना लगेच त्याचा दुसरा ड्रेस बाहेर आला !
लग्न झाल्यावर संसाराला सुरवात झाली. आमच्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे गाणी.  विनायकच्या बॅचलर दिवसातला  ट्रांन्झीस्टर आता आमच्या मॅरिड लाईफ मध्ये नांदू लागला. सकाळी सकाळी विनायक सिलोन लावायचा. सिलोनची गाणी ऐकायची म्हणजे ते एक प्रकारचे दिव्यच असते. आधी बरीछ खुडबुड खुडबुड करावी लागते तेव्हा कुठे एखाद दुसरे गाणे ऐकायला मिळते. ते गाणे तो रेडियोपाशी कान देऊन ऐकायचा. म्हणायचा सुंदर गाणे. मला ती गाणी अजिबातच ओळखीची वाटायची नाहीत.


एकदा एका गाण्याला विचारले मी, कोण गातय. तर वि म्हणाला तलत. म्हणजे तलत महेमुद. ईई मला अजिबात नाही आवडत तो. वि म्हणाला तलत इज तलत पण त्यापेक्षाही सैगल. सैगल आणि तलत? किती हळूहळू गातात ते ! मला तर किशोर कुमारच आवडतो. किशोरचे गाणे ऐकले की कसा उत्साह संचारतो.

अशी किती गाणी ऐकलीस तू तलत आणि सैगलची. खूप गाणी आहेत. ती ऐक आधी आणि मग सांग मला. नंतर मी बरीच गाणी ऐकली. आपणहून नाही ऐकली. विनायकने ऐकायला लावली आणि मग हळुहळू मलाही तलतच्या आवाजाची गोडी आवडायला लागली. पण तरीही किशोरकुमारच्या आवाजात जादू आहे ना ती तलतमध्ये नाही. पसंद अपनी अपनी !

मला गाण्याचा ठेका आवडतो आणि विनायकला गाण्यामधली कविता आवडते. म्हणजे आधी त्याचे कान गाण्याच्या कवितेकडे जातात आणि माझे कान ठेक्याकडे ! मी पण मग गाण्याचे बोल काय आहेत ते नीट ऐकायला लागले. खरचं गाण्याच्या बोलांमध्ये खूप सुंदर सुंदर अर्थ दडलेले असतात हे खरे आहे.


एकदा विचारले तू व्यायाम नाही करत? मी म्हणाले व्यायाम? छे, कधीच केला नाही. मग म्हणाला रोज करत जा. सूर्यनमस्कार घाल रोज. बायकांकरिता हा व्यायाम चांगला आहे. कसे घालायचे सूर्यनमस्कार? मी सांगतो ना तुला. मग एके दिवशी १२ सूर्यनमस्कार घातले. पहिल्या दिवशी चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी ताप आल्यासारखा वाटला. वि म्हणाला असेच वाटते ताप आल्यासारखे पण तरीही रेटून व्यायाम करायचा. नंतर तुला चांगले परिणाम दिसायला लागतील. आणि खरेच खूपच छान परिणाम दिसायला लागले. चपळपणा (होताच आधी) वाढला. आणि मग मी रोजच्या रोज एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायला लागले. स्टॅमिना वाढला आणि माझे वजनही वाढले. एके दिवशी मग मीच वि ला सूर्यनमस्कार घाल असा सल्ला दिला. अरे, तू घालून बघ, खूपच छान वाटते. हा फक्त जोर बैठकाच घालायचा. त्यालाही ते पटले. आणि त्याच्या व्यायामात नमस्कारांची भर घातली गेली.

एके दिवशी म्हणाला योगासने येतात का तुला? मी म्ह्णाले कधी केली नाहीत पण मला  करायला आवडतील. योगासनामध्ये मला सर्वांगसन छानच जमले आणि अजुनही काही पायांची आसने छान जमली की जी विनायकला जमली नव्हती. मी त्याला म्हणाले की तु फक्त जोर बैठका घालतोस त्यामुळे लवचिकता आणि चपळपणा आलेला नाहीये. एके दिवशी मला म्हणाला की तू जोर बैठका घाल. नाही हं जोरबिर नाही मारणार मी. हे काही बायकांचे व्यायाम नाहीत. असे काही नाहीये. मुली जीम मध्ये जातात ना? मसल पॉवर येणार कशी मग? मग त्याने मला १२ सूर्यनमस्कारांमध्ये १२ जोर आणि १२ बैठका घाल असा सल्ला दिला. तसे केलेही. माझी हालत खूपच खराब झाली. मला बसता येईना की उठता येईना. खूप जडत्व आले. मग मी पण प्रयोग करून करून एक व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ जोर, ४ बैठका आणि योगासने.

एकदा साप्ताहिक सकाळमध्ये वाचनात आले की एकसूरी व्यायाम चांगला नाही. आमच्या व्यायामात चालणे ऍड झाले. रोज जेवणानंतर आम्ही दोघं अर्ध्या तासाची फेरी मारायला लागलो. व्यायाम म्हणजे लाख दुखोंकी एक दवा आहे ! पण अति व्यायाम अजिबात नको. जसजसे वय वाढते तसतसे तरूणपणातला व्यायाम उपयोगी पडतो. नंतर नंतर आठवड्यातून २ ते ३ वेळा व्यायामही पुरेसा होतो. हे अनुभवाचे बोल आहेत.


आम्ही दोघे खावस असल्याने केलेला पदार्थ अर्धा अर्धा वाटून घेतो. पण तो पदार्थ चवीला चांगला झाला नसेल तर मी उदारपणाचा आव आणून पाहिजे का अजून? असे वि ला विचारते आणि बघ मी माझ्या वाटणीतला पदार्थ तुला कसा दिला हे सांगते. मग म्हणतो मी काय तुला आज ओळखतो काय? आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत. पण काहीकाही मात्र नाहीत. मला लग्ना आधी आयस्क्रीम अजिबात आवडायचे नाही ते आवडायला लागले. मला कच्चे तिखट मीठ पोहे खूप आवडतात. वि ला आवडत नाहीत म्हणून लॅपटॉपवर काही गाणी पाहत होतो आणि माझ्या हातात वाडगा होता कच्च्या पोह्यांचा तेल तिखट मीठ घालून केलेला. मग म्हणाला मला दे थोडे. असे म्हणता म्हणता ह्यानेच जवळजवळ सगळे पोहे खाऊन टाकले. आता का रे पुंगाण्या? पुंगाण्या हा शब्द बाबांचा आहे. आम्ही लहानपणी नको म्हणत असताना, आम्हाला नाही आवडत हा पदार्थ असे म्हणायचो. खाऊन बघितल्यावर आवडला की मग खायचो तेव्हा बाबा आम्हाला म्हणायचे. आता का गं पुंगाणे.

प्रयोगशीलता मात्र खूपच आहे वि मध्ये. लग्न झाल्यावर एकदा कॉंफरन्सला बंगलोर ला गेला असताना तेथे रसम भातं, सांबारं खाण्यात आले. आल्यावर म्हणाला खूप हलके हलके वाटते आणि मला पोळ्या अजिबात न करता भात आमटी रोजच्या रोज करायचा असे सांगितले. ४ च दिवसात खूप अशक्तपणा आला. तसेच भाकरीचेही झाले. कितीही म्हणले तरी भाकऱ्या कोरड्याच पडतात. पोळी भाजीला पर्याय नाही. काही दिवसांनी दुपारी फक्त दही साखरच खाण्याचा प्रयोग केला. एक ना दोन हजारो प्रयोग. कोणताही नवीन प्रयोग वि च्या डोक्यात आला की मला धडकीच भरायची. पण आता मलाही कळून चुकले आहे की प्रयोग केल्याशिवाय काय चांगले काय वाईट, कोणते उपयोगी आणि कोणते निरूपयोगी असते ते !

लग्नानंतर माझ्या आवडीच्या भाज्या मी करायचे. त्यात भरली वांगी, कारली, आणि शेपू जास्त प्रमाणात असायचे. सुरवातीला जाम वैतागायचा. मग मी पण त्याला डोस पाजायचे. कारल्याने रक्त शुद्ध होते. भरल्या वांग्याने तोंडाला चव येते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात आमच्या किराणामालात
सर्वात खप कश्याचा झाला असेल तर तो पोह्यांचा !

प्रयोग करून करून आता आमचा आहारही सेट झाला आहे. पोळी भाजी कोशिंबीर, डाळींची धिरडी, उसळी. भाज्या तर आवडतातच. भाजीशिवाय आमचे पान हालत नाही. अमेरिकेत आल्यावर आयस्क्रीम बादल्याच्या बादल्या खाल्ले. पोटॅटो चिप्स बरेच खाल्ले. चॉकलेटेही बरीच खाल्ली. आता हे पदार्थ आम्ही अजिबात आणत नाही. एक मोठी काट मारली आहे यावर !

एकतिसाव्या वर्षात पदार्पण करतोय. आत्तापर्यंतचा अनुभव गाठीशी असताना भीती कशाची?
या दिवशीच्या निमित्ताने मी फक्त हेच म्हणेन की  मित्रमंडळींनो तुमच्या मनात जे जे काही असेल ते ते सर्व तुम्हाला मिळो !!


रौप्य वर्षाचे स्वागत करू या
हर्ष मनीचा प्रकट करू या
ओळखीतून हा विवाह ठरला
बघता बघता संपन्न जाहला /

वधुवर दोघे अनुरूप असता
तर मग फूका उशीर कशाला
संसारगाडा मार्गी लागला
मुंबई क्षेत्री कार्यरत झाला /

शिक्षणपूर्तता ध्येयास जागला
वधूचीही मनोमन साथ त्याजला
डॉक्टर सन्मान कष्टसाध्य मिळवला
गोऱ्यांचा हा कुलदीपक ठरला/

लक्ष्मी सरस्वतीचा उशीरा लाभला
परदेशगमनाचा बहूमान मिळाला
विनायकरोहिणीची ही संसारगाथा
दीर्घायू चिंतिते तुम्हा उभयता/

माझ्या चुलतसासूबाई सौ सीमा गोरे यांनी ही कविता आमच्या २५ वर्ष लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केली आहे.