Thursday, September 15, 2022

मराठी मालिका

 

आई कुठे काय करते - या मालिकेमधला "आशुतोषने अरूंधतीपुढे मांडलेला लग्नाचा प्रस्ताव" हा एपिसोड आवडला. संवादलेखन छान झाले आहे. मी लिहिलेले संवाद खालीलप्रमाणे. मला संवादलेखन करायला आवडेल. 
 
अरुंधती, बस ना थोडावेळ, खूप दमलेली दिसतेस.
 
अहो आशुतोष असे बसून कसे चालेल, उद्या कामावर जायचे आहे ना आपल्याला.
 
अगं म्हणून तर मी थांबलोय ना तुझ्या मदतीला.
 
हो ते खरे आहे. पण...
 
आता पण बिण काही नाही. बस थोडावेळ.
 
ते दोघेही बसतात. काही क्षण शांतता.
 
अरूंधती मला तुला काहीतरी सांगायचे आहे, पण कसं सांगू कळत नाहीये. कुठून सुरवात करु?
 
अहो सांगा ना मग?
 
अगं आपल्या कामाविषयी मला अजिबात काहीही सांगायचे नाहिये. मला माझ्या मनातले सांगायचे आहे. सुरवात करतो, पण शांततेने ऐकून घेशील का प्लीज? माझे बोलणे पूर्ण होऊ दे. मग तुला काय बोलायचे ते बोल.
 
सांगा. मी पूर्णपणे तुमचं म्हणणे ऐकून घेईन.

 
अरूंधती, मी तुला यापूर्वीच माझ्या मनातल्या तुझ्या बद्दलच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. आणि तु म्हणालीस की मी अजून तसला काहीही विचार केला नाहीये. आपली मैत्री असणे हे माझ्या साठी खूप मह्त्त्वाचे आहे. मी तुझ्यावर खूप पूर्वीपासून प्रेम करतोय हे तुला माहिती आहेच. पण आता मात्र राहवत नाही. तू सतत माझ्या आजुबाजूला असावीस असे मला वाटते. तुझ्याशी खूप गप्पा माराव्या, सगळी कामं एकत्र करावीत असे मला वाटते. आपण भेटतो ते फक्त कामानिमित्तानेच. आपल्या आजुबाजूला सतत कोणी ना कोणी असते. आज तसे नाहिये, आपण फक्त दोघेच्या दोघेच आहोत. आवरायच्या निमित्ताने मी थांबलो आणि आज मनातले सर्व काही तुला सांगावे असे ठरवूनच आलो होतो.
 
 
अरूंधती मी कसं सांगू तुला. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी तुझ्या शिवाय राहूच शकणार नाही असे मला वाटते. या प्रेमाचे रुपांतर लग्नात व्हावे असे मला मनापासून वाटत आहे. आपण दोघे आता चाळीशीच्या आसपास आहोत. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. दिवस तर असेच जात राहतील आणि माझं प्रेम अपूरे राहील की काय अशी मला भिती वाटते. आपण लग्न केले तर आपण दोघे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकू असे मला वाटते. आयुष्य म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही तर आपल्या मनासारखा जोडीदार असणे हे जास्त महत्वाचे आहे. कदाचित तू नंतर एक नामांकित गायिका होशील. तुला भरपूर काम मिळेल. आणि आपला सहवास पण कमी कमी होऊ लागेल. पण त्यात मला आनंद होणार आहे हे मात्र निश्चित ! लग्न होऊन आपल्याला जो एकत्र वेळ मिळेल तो किती सुखाचा असेल याचा विचार केला आहेस तू कधी? नसेल केलास तर कर.तू पण आता जबाबदारीतून बरीचशी मोकळी झाली आहेस. जास्त गुंतत जाशील तर आयुष्य केव्हा निघून जाईल ते कळणारही नाही. नंतर तुला खंत वाटत राहील. मी फक्त माझाच विचार करत नाहीये तर तुझाही करत आहे. तू आता स्वतंत्र राहतेस. बरीच कामे हातावेगळी करतेस. घर काम,ऑफीस चे काम, आणि तुझ्या जबाबदाऱ्या तू आता एकटीने पेलत आहेस. पण असे किती दिवस? आता कुठेतरी तुला थांबायला हवं. मन घट्ट करायला हवं. आणि पुढचे पाऊल आता तू उचलावेस असे मला वाटते. तू तुझा वेळ घे. निर्णय कोणताही घे. पण मी काय म्हणतोय याचा जर तू विचार केलास तर तुझे तुलाही पटेल मी म्हणतोय यात तथ्य आहे ते ! तू जरी नाही म्हणालीस माझ्या प्रस्तावाला तर हरकत नाही. मी तुझ्यावर अजिबात रागावणार नाही पण मी खूप निराश मात्र नक्की होईन. अगं या जन्मात बरेच काही घडून गेले आहे आपल्या दोघांच्या आयुष्यात. माझे एकटेपण दूर होईल. आईची पण काळजी मिटेल आणि तुझ्या जीवनाला स्थिरता येईल. माझे बोलून झाले आहे अरूंधती. आता तू बोल. काहीतरी बोल गं. नाहीतर मी तुला खूप दुखावले याचा माझ्या जीवाला घोर लागून राहील.
 
 
.... ... आशुतोष तुम्ही आज इतके काही धडाधड बोललात की माझ्या मनावर खूप दडपण आलयं हो. काय बोलावे मला काहीच सूचत नाहीये. तुम्ही आता बोललेल्या गोष्टींचा इतका खोलवर विचार मी केला नव्हता. मला फक्त एकच कळलं होतं की मला एक चांगला मित्र मिळाला आहे. तुम्ही माझा इतका आदर करता की जो आयुषात मला कधीच मिळाला नव्हता. माझ्या तीन मुलांपैकी यश मात्र माझ्यासोबत कायम होता आणि राहील हे मात्र मी तुम्हाला खूप अभिमानाने सांगते. माझे सासरे तर मला वडिलांप्रमाणेच आहेत. मी रात्री जेव्हा झोपाण्यासाठी गादीवर पाठ टेकते ना तेव्हा माझ्या मनात उलटेसुलटे विचार खूप येतात. दुसऱ्या लग्नाचा विचार मात्र कधी मनाला शिवला नाही. मी माझ्या कर्तव्यात कधीही चुकले नाही. मुलांकडे लक्ष दिले. त्यांना वाढवले याचे मात्र पूर्ण समाधान आहे मला. तुम्ही तुमचे प्रेम माझ्याकडे पूर्वीच व्यक्त केले होते. लग्नाबाबत तु आता निर्णय घ्यायला हवास असे मला माझ्या आइने, सासऱ्यांनी, भाऊजींनी सुचवलेही होते. तुमच्याबद्दल लग्नाचा विचार करावा असे त्यांना वाटते. सगळे पुढे निघून जातील आणि तू एकटी पडशील असेही त्यांनी मला बोलून दाखवले आहे. तुमच्याशी लग्न करून तुम्ही मला फसवाल हे मात्र मला कधीही वाटले नाही इतका विश्वास वाटतो मला तुमच्याबद्दल. ध्यानीमनी नसताना असा लग्नाचा प्रस्ताव तुम्ही माझ्यापुढे मांडाल असे वाटले नव्हते. त्यामुळे मी खूप बावरून गेली आहे हो. खरच सांगते. दुसरे लग्न, दुसरा संसार मला आता या वयात झेपेल का? याची भिती वाटते. शिवाय बाकीचे माझ्या बद्दल काय विचार करतील या भितीने माझा तर थरकापच उडतो.
 
 
तुम्ही आता जे काही मला सांगितले त्याचा विचार मी करीन शांतपणे. तुमचे म्हणणे पण मला पटतयं. कुठेतरी मलाही माझ्या आयुषाचा एक धाडसी निर्णय घ्यायला हवा असेही वाटतयं. माझे सासरे आणि माझा यश या धाडसी निर्णयला खूप पाठिंबा देतील याची खात्री आहे मला. नकळतपणे माझ्या मनातले विचार मी बोलून दाखवले, तरीही मला साधक बाधक सर्व बाजूंनी विचार करायला हवा.
 
 
ग्रेट ! अरूंधती माझे म्हणणे तू शांतपणे ऐकून घेतलेस आणि त्याचा तू विचार करून निर्णय सांगणार आहेस हे ऐकूनही मला खूप बरे वाटले आहे. चल. आता मी तुझ्या साठी एक गरमागरम कॉफी करतो. आणि हो बाकीचा पसारा मी आवरणार आहे. तुझी लुडबुड मला नकोय. कळलं का? आणि अजून एक ऐकशील? मी तुला दोन दिवसाचे एका रिसोर्ट मध्ये बुकींग करून देणार आहे. तिथे तू फक्त एकटी असशील. शांततेने विचार करशील. आणि मग तुझा निर्णय तू मला कळवशील. वाट बघतोय तुझ्या निर्णयाची. Rohini Gore

Tuesday, September 13, 2022

बायको ही बायको असते

 

बायको ही बायको असते
तुमची आमची सेम असते
आपण काही सांगायला जावे
तर ती दुसरच काहीतरी ऐकवते
तेच तेच बोलते
आणि म्हणते विस्मरण होते
भाजीत मीठ टाकायला विसरते
तेव्हा म्हणते मीठच अळणी असते
जास्त झाले तर म्हणते
मी मल्टीटास्कींग करते
झोपली का बघायला जावे
तर ही मोबाईल चाळत असते
सकाळी उठून बघावे
तर ढाराढूर झोपलेली असते
बायको ही बायको असते
तुमची आमची सेम असते
Rohini Gore
मी कवियित्री नाही याची नोंद घ्यावी. जसे सुचले तसे लिहिले आहे.

१३ सप्टेंबर FB memory

 

आज पहाटे मला एक भन्नाट स्वप्न पडले.
आम्ही दोघे युएस बॉर्डरवरून नेपाळमध्ये चालत गेलो म्हणजे अगदी एक पाय युएस मध्ये आणि लगेच दुसरा पाय नेपाळात इतकी लागून बॉर्डर आहे. 🙂 तिथल्या एका डोंगराच्या पायथ्याशी उभे आहोत आणि एक खूप छान सूर्यास्त पहायला मिळाला. तो मी कॅमेरात कॅप्चर केला आणि परत चालत युएस मध्ये आलो. मी वि ला म्हणाले की आपण आता दर रविवारी इथे चालत जायचे. हा स्पॉट सूर्यास्ताच्या फोटोसाठी खूप छान आहे. अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे चित्र उभे आहे. खूप सुंदर स्वप्न होते. 🙂