Friday, December 25, 2009

गोंधळात गोंधळ

सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर. आमचे दोन मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सामान बरेच असल्याने दोन कार कराव्या लागल्या. अर्धा संसार ups तर्फे पाठवला व अर्धा आमच्या चार बॅगांमधे.



निघण्याच्या वेळी रविने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले. श्रीनिवास अवाजवी आत्मविश्वासात म्हणाला," हो हो. मला माहित आहे सर्व. मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे."



आमच्या कार निघाल्या. एका कारमधे मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमधे रवि व विनायक. विमान दुपारी साडेबाराचे होते म्हणून २ तास आधी निघालो. एक तास जाण्यामधे व एक तास सामानाची क्ष किरण तपासणी याकरता. श्रीनिवास व मी ११ ला विमानतळावर पोहोचलो व रवि-विनायकची वाट पाहू लागलो. साडेअकरा व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता. श्रीनिवास ३-४ वेळा शोधायला गेला त्यांना. तसे रवि-विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर, ते पण आम्हाला शोधत होते. शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर. कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनीयंत्र नव्हते .



गंमत काय झाली होती की रवि ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते. श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो. श्रीनिवासच्या अवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता.



आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, " आता १२ वाजले आहेत. तुमच्या सामानाची क्ष किरण तपासणी होईपर्यंत एक तास जाईल. तुमचे विमान चुकले आहे. पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते. जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागोतर्फे ग्रीनवीलचे बुकींग करून देते." आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला.



श्रीनिवास रविला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्ष किरण तपासणी करायला. एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती. चार बॅगांमधला भरलेला संसार उलथापालथा केला गेला.



आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते. ३ ते ५ डॅलस-शिकागो, शिकागोला ३ तासांच्या अवधीनंतर ८ ते १० शिकागो ते ग्रीनवील असे दुसरे उड्डाण. विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आमचे विमान चुकले आहे, त्यामुळे दुपारी ३ च्या ऐवजी रात्री ११ च्या सुमारास आम्ही ग्रीनवीलला पोहोचत आहोत." आणि डॅलस-शिकागो विमानात प्रवेश केला.



शिकागो विमानतळावर पहिल्याप्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली. आता विमानतळावर तीन तास थांबावे लागणार होते. मला गर्दी पाहून खूप आनंद झाला. त्या गजबजलेल्या विमानतळावर तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर. सरकती पायवाट व सरकते जीने यावरून फिरले. प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता. बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली. काचेच्या तावदानातून विमानतळाच्या बाहेरील दृश्य सहज दिसत होते की जेथून विमाने प्रत्यक्षात उडतात. बरीच वर्दळ असते तिथे. वर्दळीचे निरिक्षण करताना लक्षात आले की तेथील कर्मचारी खूपच व्यग्र असतात.



विमानतळावर फिरताना एका गेटवर एकीचे विमान अगदी थोडक्याकरता चुकले, तिने तिथल्या माणसाला खूप विनवले, पण तो म्हणाला, आता विमानाचा विमानतळावरचा संपर्क तुटला आहे. मी काहीही करू शकत नाही. दुसरीकडे सर्व प्रवासी विमानात बसले होते पण विमानचालक गायब होता, शेवटी माईकवरून त्याचे नाव २-३ वेळा पुकारण्यात आले.



इकडे तिकडे फिरल्यावर बरीच भूक लागली म्हणून विमानतळावरच्या उपहारगृहात शिरलो. तिथे एक मद्रासी दिसला. त्याला पाहिल्यावर असे वाटले की आत्ता इथे गरम गरम इडली सांबार मिळाले तर किती छान होईल! उपहारगृहात पण विमानचालक त्यांच्या गणवेशात बसून त्यांचे जेवण घेत गप्पा मारताना दिसले.



फ्राईड राईस खाऊन घेतल्यावर परत एकदा प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आम्ही शिकागोवरून निघालो आहोत, दोन तासात पोहोचू" ८ ला निघणारे विमान ९ वाजता गेटवर लागले. विमानात बसल्यावर पण विमान लवकर उडेना. विमानातील छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापाठोपाठ एक अशी विमाने लागली होती. धावपट्टीवरून हळूहळू विमान सरकत होते. विमानांचा वाहतुक मुरंबा झालेला पाहून खूप आश्चर्य वाटले. पाऊस व जोराचा वारा असल्याने विमाने उड्डाणाकरता हळूहळू सोडली जात होती. डेंटनच्या घरातील साफसफाई करण्याने व सामानाची बांधाबांध करण्याने आधीच जीव मेटाकुटीला आला होता, त्यातून हा दीर्घकाळ प्रवास!! पण काय करता?



शेवटी एकदा पंखातील सर्व बळ एकवटून घेतली उडी आकाशात आमच्या विमानाने. थोड्याचवेळात हवाईसुंदरीने शीतपेय आणून दिले, त्यामुळे थोडे बरे वाटले. खिडकीतून खाली पाहिले तर एकदम नयनरम्य दृश्य दृष्टीस पडले. आकाशात जणू काही पिवळ्या रंगांच्या माळा पसरल्या आहेत. हवामान चांगले नसल्याने विमानाचा वेग कमी होता. रात्री सुमारे १२ ला आम्ही ग्रीनवील साऊथ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सरकत्या जिन्यावरून खाली उतरताच प्राध्यापकांना हस्तांदोलन केले. आमची छायाचित्रे त्यांना आधीच पाठवल्याने आम्हाला त्यांनी लगेचच ओळखले.



तिकडे प्राध्यापकांचाही थोडा गोंधळ उडाला होता. आन्सरिंग मशीनवर ठेवलेले ४-५ निरोप न ऐकताच ते आम्हाला दुपारी ३ ला ग्रीनवील विमानतळावर न्यायला आले होते. घरी परत गेल्यावर निरोप ऐकले व रात्री परत १२ ला आम्हाला घ्यायला आले. डेंटन ते ग्रीनवील साधारण १००० मैलाचा प्रवास. तीन तासाची थेट फ्लाईट बुक केली होती. पण या गोंधळामुळे सकाळी ९ वाजता निघून तब्बल १५ तासांनी ग्रीनवीलला पोहोचलो.



ग्रीनवील ते क्लेम्सनचा तासभराचा प्रवास रात्री दिसणाऱ्या घनदाट झाडांनी सुखावून गेला. विनायक प्राध्यापकांशी बोलत होता. मी मात्र डोळे मिटून दिवसभर झालेल्या गोंधळाची उजळणी करत होते.

हे आमचे अमेरिकेतील येथे आल्यापासून वर्षाच्या आतले पहिले स्थलांतर. दुसऱ्या स्थलांतरात A to Z सर्व सामान ups तर्फे पाठवले. फक्त आमचे पिटुकले दूरदर्शन यंत्र व संगणक आमच्याबरोबरच आमच्या कारमधे. अर्थात दुसरे स्थलांतर कारने जाण्याच्या टप्यात होते.

Wednesday, December 23, 2009

दूध

दूध अशी हाक आली की आम्ही स्टीलचे/हिंडालियमचे पातेले विसळून टेबलावर उपडे करून ठेवायचो कारण की आम्हाला तसे तांब्यांनी सांगून ठेवलेले होते की मी बऱ्याच ठिकाणी दूध घालतो, मला अजिबात वेळ नसतो, पातेले तयार ठेवलेत तर मला पटकन दूध घालून दुसरीकडे जाता येईल. त्यांचा एक टेंपो होता त्यामध्ये ३-४ मोठाले कॅन असायचे. कॅनमध्ये ३-४ मापे असायची. प्रत्येकाच्या घरी ४ मापे, ६ मापे असे ठरलेले दूध ते घालत असत. जेव्हा जास्तीचे दूध हवे असेल तर सांगायचे आधी ८ दिवस सांगून ठेवत जा. सणासुदीचे दिवस असतील तर, किंवा कुणी पाहुणेरावळे आलेले असतील तर, किंवा घरी लहान मूल आलेले असेल तर दूध जास्त लागते. थंडी असो, पाऊस असो, नियमितपणे दूध घालणे आणि ते सुद्धा घरोघरी जाऊन हे काही सोपे काम नाही. दूध नासले की कॅलेंडरवर टीक मार्क करायचो आम्ही. कमीचे, जास्तीचे दूध, दूध ज्यादिवशी आले नाही, अशा सर्व नोंदी कॅलेंडरवर असायच्या. दूध एकदम चांगले दाट असायचे. श्री तांबे अजूनही आमच्या आईच्या घरी दूध घालतात, आता ते पिशवीतून येते.



श्री. तांबे यांच्या आधी खूप पूर्वी आईकडे सरकारी दूध घेत असत. हे सरकारी दूध एका चौकोनी लाकडी टपरीमध्ये येत असे. त्यांच्या एक लिटरच्या काचेच्या बाटल्या खूप जाडजूड असायच्या. त्यावर चांदीसारखी दिसणारी टोपी होती. चांदीसारख्या दिसणाऱ्या कागदावर थोडे पट्टे, काहींवर निळे, तर काहींवर हिरवे, लाल. निळ्या रंगाचे पट्टे म्हणजे म्हशीचे दूध आणि हिरव्या किंवा लाल रंगाचे पट्टे असतील तर ते गायीचे दूध असे काहीतरी होते. हे दूध आणायला पहाटे पहाटे जायला लागायचे. सरकारी दूधाची गाडी यायची. त्यातून बाटल्या खाली उतरवल्या जायच्या आणि मग त्याचे वाटप व्हायचे. रिकाम्या बाटल्या देवून भरलेल्या बाटल्या द्यायच्या. बाटल्यांचे दूध घरी आले की ते पातेल्यात काढून तापवायचे व रिकाम्या बाटल्या धुतल्या जायच्या दुसऱ्या दिवशी नेण्याकरता. पहाटे ४ ला चौकोनी टपरीसमोर रांग लावावी लागत असे. वेळेवर गेले नाही तर दूध संपायचे. सरकाअरी दूध घेणाऱ्यांकरता एक कार्ड असे ते दाखवायचे व दूध घ्यायचे. पहाटे दूध आणण्याचे काम माझे आजोबा नाहीतर बाबा करत असत. उन्हाळ्यात पहाटे उठायला काही वाटायचे नाही. उलट गार हवेत छान वाटायचे. आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर जायचो कधीकधी दूध आणायला. थंडीपावसात जायला थोडे कठीण असे. त्यावेळेला पुण्यात कडाक्याची थंडी पडायची. पहाटे पहाटे दूध आणण्याकरता बाबांनी दार उघडले की इतके काही थंडगार वारे आत यायचे की आम्ही दोघी बहिणी लगेच ओरडायचो बाबांवर " बाबा दार लावून घ्या ना पटकन, खूप थंडी वाजत आहे" आई बजावायची "अंधार आहे, जाताना बाहेरचा दिवा आठवणीने लावून जा. बाबांचे मित्र दूध आणायला यायचे. तिथे कधीकधी निरोपांची देवाणघेवाण होत असे. "आज आमची सौ येणार आहे बरंका वहिनींना भेटायला. त्यांना आठवणीने निरोप द्या."




लग्न झाल्यावर सासरी आमच्याकडे कॅनचेच दूध होते. दूध घालायला घरी आले की लगेच मनीमाऊ यायची दूध प्यायला. दूध गॅसवर तापवायला ठेवायच्या आधी ही मनीमाऊ इतकी काही भंडावून सोडायची की तिला पहिले बशीत ओतून द्यायचे दूध मग गॅसवर तापवत ठेवायचे. नंतर चितळ्यांचे दूध सुरू केले. जेंव्हा मुंबईत आलो तेव्हा घरी येऊन नाही कुणी दूध घातले. घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी. मुंबईत जिथे आम्ही राहत होतो तिथे खालीच एक डेअरी होती. तिथे पातेले घेऊन जायचे. हे पातेल्यातले दूध घरी घेऊन जाताना श्वास रोखून जावे लागत असे कारण की पातेल्यातले दूध हेंदकाळून खाली सांडायची भीती. हे दूध इतके काही "महापातळ" होते की काय बिशाद चहाचा रंग बदलेल. नंतर जरा थोड्या लांब असणाऱ्या डेअरीतून चांगल्या प्रतीचे दूध आणायला लागलो. हे दूध तो डेअरीवाला आम्हाला एका पातळ प्लॅस्टीकच्या पिशवीतून देत असे. त्यावर एक छोटा दोरा बांधून. अलगद पिशवीत भाजीच्या सर्वात वर ठेवायचे मी हे दूध. हे दूध पातेल्यात ओतताना पण एक कसरतच असे. एक तर आधी त्या पिशवीला निरगाठ असायची. डाव्या हाताने पिशवी धरायची व उजव्या हाताने ती गाठ सोडवायची. गाठ सोडवायची म्हणजे ब्लेड घेऊन ती अचुक कापायची. कापली की प्लॅस्टीकची पातळ पिशवी पूर्णपणे उघडायची त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हे दूध पातेल्यात ओतावे लागायचे. त्याकरता मी एक युक्ती काढली. ही पिशवी पातेल्यातच ठेवायची व वरून कापायची निरगाठीच्या खालूनच म्हणजे दूध पातेल्यात आणि मग प्लॅस्टीकची पिशवी काढायची. थोडे दिवसांनी पिशवीतले दूध सर्रास येऊ लागले. आधी महानंदा आले, नंतर वारणा व गोकुळ.



इथे अमेरिकेत आल्यावर अगदी पहिल्यांदा सवयीने कॅनमधले दूध मी पातेल्यात घेऊन तापवायचे. पण इथे कुठची साय, नि कुठचे लोणी, नि कुठचे तूप! जरूरीपुरते दूध काढा, तापवा अगर तापवू नका, तसेच प्या. खरे तर दूध म्हणजे चहा आलाच. चांगला चहा हा पूर्णपणे दूधावर अवलंबून असतो. अगदी थोड्या दुधाने चहाचा रंग बदलायला पाहिजे. चहा म्हणजे कसा अमृततुल्य चहा लवकरच घेऊन येते!!

Monday, December 21, 2009

पक्षी

















यातील काही पक्षी ब्रेड खाताना तो हवेतच झेलून खातात. परत बागडत एक फेरी मारून येतात. पाण्यात एक डुबकी मारतात. परत पंख हालवत येतात ब्रेड खायला. खूप मजा येते यांना ब्रेड देताना.

Monday, December 14, 2009

मी जरा फ्रेश होऊन येते !

तीन चार महिने झाले की माझी चुळबुळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनुला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.



पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.



सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सूरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतयं आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलिकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.



रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धूऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेऊ? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवत जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सूरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर रंजनाला फोन. ती पण लगेच ऑफीस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सूरू.



आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी व रंजन माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची. लवकर या बरं का! आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामुनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ वसुधा व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!



मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धूउन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालिपीठाची भाजणी काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर रंजना सई किंवा आईबाबा जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत रहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!


गाडी सुरू होऊन प्लॅटफॉर्म सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय ! गरम चाय! कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

Friday, December 11, 2009

टंकलेखन (३)

तक्ते बनवताना सर्व गोष्टींचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. त्यात रकाने किती आहेत, प्रत्येक रकान्यात मजकूर किती आहे, आकडेवारी किती आहे. शिवाय डाव्या व उजव्या बाजूने कितीवर मार्जिन सेट करायचे. तक्त्याच्या खाली जो कोणी सही करणार आहे त्याचे नाव व पद. सही करण्याकरता सोडलेली जागा, शिवाय तक्त्यावरचे शीर्षक. प्रत्येक गोष्टीचे मोजमाप, अंदाज घेणे, शिवाय तक्ता कशा प्रकारे सुबक दिसेल हे पण विचारात घ्यावे लागते. तक्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॅब लावणे. किती अंतरावर किती टॅब लावायचे आणि टॅब लावताना विचारात घ्यावे लागते ते म्हणजे दोन टॅबमधले अंतर. उदाहरण घ्यायचे झाले तर पहिला रकाना no. of items तर याचे आधी स्ट्रोक मोजायचे, दोन शब्दांच्या मधली जागा मोजायची, शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक मोकळी जागा आणि दोन रकान्यांमधल्या रेषा मोजायच्या. आता no. of items मध्ये १२ स्ट्रोक आहेत दोन शब्दांच्या मधल्या मोकळ्या जागा धरून. शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक आणि दोन रेषा म्हणजे १२ + ४ = १६ म्हणजे पहिला टॅब १६ अंकावर लावायला लागेल याप्रमाणे सर्व टॅब लावून घ्यायचे. टॅब लावायची एक की असते कळफलकावर ती दाबायची प्रत्येक टॅब लावल्यावर म्हणजे मग ते लागतात. हे टॅब नेमलेल्या ठिकाणी लागलेले आहेत का नाही ते कळफलकाच्या सर्वात वरची पट्टी असते स्पेसबारसारखी दिसणारी ती दाबली की कळते. सर्व तक्ता कळफलकाच्या साहाय्याने बनवता येतो. उभ्या रेषेसाठी एक युक्ती आहे. कॅरेज वर कागद लावलेला असतो त्यावर एक पट्टी असते तिथे एक छोटे भोक असते तिथे बॉलपेन घालायचे व रोलर फिरवायचा की त्या रकान्यासाठी उभी रेष मारली जाते. अशाच बाकीच्या उभ्या रेषा मारून घ्यायच्या. तक्ते बनवून झाले की सर्व लावलेले टॅब मोकळे करायचे. याकरताही एक की असते. स्पेसबार सारखी दिसणारी पट्टी दाबायची की ज्या ठिकाणी टॅब लावलेले आहेत तिथे जाता येते. त्या त्या ठिकाणी जाऊन टॅब मोकळे करण्याची की दाबायची की ते मोकळे होतात.



टंकलेखन मशीनमध्ये रिबीन बसवण्यासाठी ती नीट बघून बसवायला लागते कारण की रिबीन अर्धी लाल व अर्धी काळी असते. उलटी बसली तर लाल अक्षरे उमटतील. कार्बन पेपर दोन कागदांमध्ये घालताना तो सुद्धा नीट घालावा लागतो. तोही उलटा नजरचुकीने बसवला जाऊ शकतो. दोन कागदांमध्ये कार्बन पेपर नीट खोचला गेला आहे ना हे बघावे लागते. आता टंकताना ज्या चुका होतात त्या चुका खोडणे पण त्रासदायक आहे. चुका टाळण्यासाठी टंकलेखन वेगाबरोबर कमालीची अचूकता असणे फायद्याचे ठरते. एखादे अक्षर चुकीचे टंकले गेले तर ते एकतर खोडरबराने खोडायचे नाही तर व्हाईटफ्ल्युएडने. खोडरबराने खोडायचे असेल तर मुख्य कागदाच्या मागे जिथे खोडायचे असेल तिथे एक जाड कागद ठेवायचा व खोडायचे कारण की कार्बन पेपर लावलेला असल्याने खोडताना सर्व प्रतींवर खोडले जाते व बाकीच्या प्रतींची वाट लागते. सर्व काळे होऊन जाते. व्हाईट फ्ल्युएडने खोडायचे असल्यास ते आधी पातळ करून घ्यायचे व अलगद नेमक्या चुकलेल्या जागी नेलपॉलिश लावतो त्याप्रमाणे लावायचे. ते लावल्यावर थोडी फुंकर मारायची की मग ते वाळते आणि मग बरोबर शब्द अगदी त्याच जागेवर परत टंकायचा. हे खूपच कटकटीचे व त्रासदायक असते. शिवाय बाकीच्या कार्बन लावलेल्या कागदांवरही असेच नेमके व अचूक करायचे.

http://www.youtube.com/watch?v=CIBnKb-L-D8&feature=related इथे टंकलेखन प्रात्यक्षिक पहा.

सुधारित टंकलेखन पुढील भागात पाहू.

क्रमश:...

Thursday, December 10, 2009

चिटुकली पिटुकली









आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे तिथे हे पक्षी येतात. बदकांबरोबर त्यांनाही ब्रेड देते मी. पण हे पक्षी बदकांना काही खाऊ देत नाहीत. नुसते टणाटण उड्या मारत असतात. किलकिलाट तर फारच. ब्रेडचा तुकडा फेकला की लगेच उडी मारून हवेतच झेलतात. त्यांचे मी नामकरण केले आहे. चिंटुलं पिटुकलं, गोटुलं, छोटुलं .....

Friday, December 04, 2009

गीतसंगीतांचे ऋणानुबंध

भावगीते भक्तीगीते लागली की मला नेहमी शाळेची आठवण होते. सकाळी साडेसातची शाळा त्यामुळे सहाला उठून गाणी ऐकत ऐकतच आम्ही आमचे सर्व आवरायचो. सव्वासातची बस असायची. माझ्या आईबाबांना गाण्याची आवड असल्याने आमच्याकडे सतत रेडिओ लावलेला असायचा. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, विविध भारतीवर छायागीत, बेलाके फूल हे तर अगदी आठवणीतले. गाण्यांची आवड असलेले सर्वच गाणी ऐकतात. रेडिओ, दूरदर्शन, किंवा गाण्यांच्या कार्यक्रमातून विविध गाण्यांची ओळख होते. त्यातली काही गाणी आवडली की आपण तीच तीच ऐकतो आणि अशातूनच काही गाण्यांच्या आठवणी पण कायमच्या जोडल्या जातात. काही वेळेला गाणे आधी ऐकले जाते व ते गाणे आवडले म्हणून तो चित्रपट आपण पाहतो तर काही वेळेला एखादा चित्रपट पाहिला तर त्यातले गाणे आपल्या मनात कायम घर करून राहते.



कौसल्येचा राम बाई, रूप पाहता लोचनी, पूर्व दिशेला अरूण रथावर, उठी उठी गोपाळा ही गाणी सकाळी रेडिओवर लागायची आणि थंडी पावसाळ्यात दुलईतून उठणे जीवावर यायचे. असे वाटायचे ही गाणी ऐकत असेच झोपावे, नको ती शाळा! माझे बाबा सुधीर फडक्यांचे खूप चाहते आहेत. "सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला" व "शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम" ही दोन्ही गाणी ऐकली की मला माझ्या बाबांची आठवण येते. ही गाणी बाबा इतके काही छान म्हणतात कि हुबेहूब सुधीर फडके! पूर्वी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये लाऊडस्पीकरवर गाणी मोठमोठ्यांदा वाजवली जायची त्यातले हे एक गाणे. पुणे सातारा रोडवर मी नोकरी निमित्ताने जायचे तेव्हा सकाळी सकाळी हे गाणे मी बरेच वेळा ऐकलेले आहे. " जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे.. " हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे व मनातल्या मनात गुणगुणायचे. हे गाणे आधी ऐकले व नंतर बेताब पाहिला. मला वाटते की या चित्रपटात गायक शब्बीरकुमार, सनी देओल व अमृतासिंग हे सगळे नवीनच होते. गणपती आणि "होठोमें ऐसी बातमें... " ही जोडी ठरलेली. पूर्वी पुण्यात आम्ही गणपती उत्सवात गणपती पहायला जायचो तेव्हा बाबू गेनू चोकात जो गणपती असायचा त्यावर हे गाणे लायटिंगवर असायचे. त्या फिरत्या लायटिंगवर अगदी तल्लीन होऊन जायचो. कितीही वेळा पाहिले तरी समाधान व्हायचे नाही.




"आखोही आखोमें इशारा हो गया.... " व हम किसीसे कम मधली दहा मिनिटांची मेलडी म्हणजे आमचे कॉलेजचे गॅदरिंग. आमच्या वर्गात एक मुलगा किशोरकुमार फॅन होता आणि आवाजही अगदी सेम किशोरकुमार. त्याचे दुसरे विशेष असे की तो मुलगा व मुलगी दोन्ही आवाजात गाणे गायचा. आँखोही आँखोमें इशारा... हेही असेच दोन्ही आवाजात गायले होते आणि "मै हँ झूम झूम झुमरू बनके.... " हे गाणे आवाजांच्या कसरतीसह म्हणले होते. हम किसीसे कम नही च्या मेलडीवर तिघांनी डान्स केला होता टायकोट घालून. त्यातल्या मुलीला आम्ही नंतर काजलकिरण म्हणायचो. नंतर बरेच दिवस आमच्या मैत्रिणींमध्ये हीच चर्चा की आँखोही आँखोमें कसे काय दोन्ही आवाजात गायले असेल गाणे??




" राधा कैसे न जले... " हे लगानमधले गाणे अगदी न चुकता रोज अमेरिकेतल्या रेडिओवर लागायचे. डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित व्हायची. एक दिवस लागले नाही तरी चुकल्यासारखे वाटायचे. यामध्ये आशाचा आवाज खूपच मधूर आहे. सकाळी उठून रेडिओ ऑन . घरातली कामे करता करता कान मात्र राधा कैसे न जले कडे. आता युट्युबचा जमाना आला आहे. पूर्वी बरेच वेळा ऐकलेली गाणी युट्युबवर पाहिली आणि एक वेगळाच आनंद देवून गेली. त्यातले "निगाहे मिलाने को जी... " हे गाणे पूर्वी बरेच वेळा ऐकले होते पण ते जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हापासून मी या गाण्याच्या प्रेमातच पडले आहे. इतके सुंदर चित्रिकरण आहे. नूतनचे बोलके डोळे, निरागस चेहरा त्यावरील गाण्यांच्या ओळीप्रमाणे केलेले हावभाव. हे सर्व पाहिले की त्या गाण्यामध्ये अगदी तल्लीन व्हायला होते.




आजकालच्या नेटच्या जमान्यात पूर्वीचे ऋणानुबंध संपल्यासारखे वाटतात. रेडिओच्या माध्यमातून गाणी ऐकणे. tape recorder जरी असला तरी आपल्याला पाहिजे असलेली गाणी शोधणे, त्याकरता कॅसेट विकत घेणे. एखादे आवडीचे गाणे एखाद्या कॅसेटमध्ये असले तरी ती पूर्ण कॅसेट विकत घेणे किंवा two-in-one मध्ये रेडिओवर आवडीचे गीत लागले की ते आपल्या कॅसेटमध्ये साठवून घेण्यासाठी अगदी लगच्यालगेच हातातले काम टाकून, play +record एकाच वेळी ऑन करणे. टेपचे ट्युनिंग सेट केलेलेच असायचे. अर्थात अनेक आवडीची गाणी आपण घरबसल्या कितीही वेळा आणि कोणत्याही वेळेला ऐकूबघू शकतो हे मात्र मान्य करायलाच हवे.



रेडिओवरून टेपवर आवडती गाणी साठवून घेताना काहीवेळा ते नीट घेता आले नाही तर खूप चिडचिड व्हायची. एकदा कुणीतरी टेपचा आवाज बंद करून ठेवला होता, एकदा टेप संपली होती आणि एकदा घाई गडबडीत पलंगावरून उठले गाणे टेप करायला तर पायच मुरगळला. अश्या आठवणी आहेत. मी माझ्या आवडत्या गाण्यांच्या २ कॅसेट तयार केल्या होत्या. त्यातली एक अजूनही माझ्याकडे आहे आणि एक हरवली. त्यावेळची मजा काही औरच होती. रेडिओवरचे पुढचे गाणे कोणते लागणार हे माहित नसल्यामुळेच जास्त रेडिओ ऐकला जातो. आणि मुख्य म्हणजे गाणी ऐकता ऐकता बाकीची कामे पण होतात. शिवाय गाण्याच्या अधूनमधून जे निवेदन करतात ना ते पण छान असते त्यामुळे गाण्याची एक वातावरणनिर्मिती होते.

Monday, November 23, 2009

टंकलेखन (२)

टंकलेखनामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन करताना काय काय करावे लागते ते पाहू. कळफलकावर जसे ए टु झेड अक्षरे असतात. त्याप्रमाणे इतर अनेक प्रकारची चिन्हे असतात जसे की स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक चिन्हे व इतरही दुसऱ्या काही कीज जसे की स्पेसबार, टॅब लावण्याची की, टॅब मोकळे करण्याची की कॅपलॉक वगैरे. टंकलेखन मशीनच्या वरील भागात अक्षरे प्रत्यक्ष कागदावर उमटवले जाणारे छोटे छाप अर्धवर्तुळाकार दिसणाऱ्या चापाच्या टोकाला बसवलेले असतात. त्यावर सर्व इंग्रजी अक्षरे कोरलेली असतात. टंकलेखन मशीनवर असणाऱ्या विविध कीज (बटणांवर) दाब देऊन ही अक्षरे रोलर वर जाऊन रिबीनीवर आदळतात आणि कोऱ्या कागदावर अक्षरे उमटतात. टेपरेकॉर्डरमध्ये ज्या कॅसेट असतात त्याप्रमाणे रिबीनीचे रीळ जोडण्याकरता टंकलेखनाच्या मशीनवर डाव्या व उजव्या बाजूला दोन स्तंभ असतात. त्या स्तंभावर पत्र्याच्या दोन चकत्या असतात तिथे रिबीन लावून घ्यायची. ही रिबीन त्या चकत्यांमध्ये रिळाप्रमाणे गुंडाळली जाते. रोलरच्या उजवीकडे एक स्टीलचा छोटा नॉब असतो तो पुढे ओढला की रोलरमधून कागद घालण्याकरता थोडी मोकळी जागा होते, त्यातून कागद घालायचा. कागदाचे वरचे टोक त्यात घातले की पुढे आणलेला नॉब मागे करायचा व रोलरच्या साहाय्याने फिरवून कागद गुंडाळून मशीनच्या वर येतो म्हणजेच तो रिबीनीच्या व रोलरच्या मध्ये येतो. तिथे एक स्टीलची बारीक पट्टी असते ती त्या कागदावर आणायची. परत रोलरच्या उजव्या बाजूला असलेला नॉब पुढे आणायचा. आता कागदाचा पुढे आलेला भाग व कागदाचा शेवटचा भाग एकावर एक हाताने जुळवून घ्यायचा आणि परत तो नॉब मागे करायचा. आता तुमचा कागद टंकलेखन मशीनवर सरळ व घट्ट बसला आहे असे समजावे.



हा कागद लावताना रोलरला लागूनच कॅरेज असते व त्यावर एक मोजपट्टी असते तिथे शून्यावर किंवा मोजपट्टी नसेल तर एक छोटी रेष रंगवलेली असते तिथे कागदाची डावी कड येईल असा कागद लावायचा. कॅरेजच्या डावीकडे एक हँडल असते ते ओळ पुढे जाण्यासाठी वापरतात. दोन ओळींमध्ये किती अंतर हवे यासाठी पण एक स्पेस मार्जिन असते, ते सेट केले की त्याप्रमाणे पुढच्या ओळीवर जाता येते. याला कॅरेज रिटर्न म्हणतात. स्पेसबार वापरून कागद पुढे जातो. ही स्पेसबारची पट्टी कळफलकावर खाली असते. रोलरला लावलेला कागद डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी किंवा लावलेले टॅब योजलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहचतात की नाही किंवा लावलेले टॅब सर्व मोकळे झाले आहेत का हे पाहण्यासाठी स्पेसबार सारखीच एक पट्टी कळफलकाच्या वर असते. कॅरेजवर मार्जिन लावण्यासाठी दोन बाजूला दोन छोटे नॉब असतात. कागदावर मार्जिन सेट करण्यासाठी कागदाच्या डाव्या बाजूच्या सुरवातीपासून १० मोकळ्या जागा मोजायच्या आणि कॅरेजवरचा डावा नॉब त्या सेट केलेल्या मार्जिनावर आणायचा. असेच उजव्या बाजूने पण मार्जिन सेट करायचे. आता या सेट केलेल्या मार्जिनामध्येच तुम्ही जे टंकणार आहात ते टंकले जाईल. कळफलकाच्या साहाय्याने टंकीत करताना दोन शब्दांमध्ये किती मोकळी जागा सोडायची किंवा वाक्यानंतर किती मोकळी जागा सोडायची यासाठी स्पेसबारचा वापर केला जातो. साधारण दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा व एका वाक्यानंतर दोन मोकळ्या जागा सोडण्याची पद्धत आहे. हा स्पेसबार दाबताना उजव्या हाताचा अंगठा वापरला जातो. स्पेसबारप्रमाणे एक मोकळी जागा मागे न्यायची असल्यास बॅकस्पेस या बटणाचा वापर केला जातो. त्याकरता डाव्या हाताचा अंगठा वापरतात. कागदावरच्या डावीकडून उजवीकडे सर्व मोकळ्या जागा मोजायच्या असतील तर स्पेसबार वर दाब देण्याकरता मधले बोट वापरले जाते.



टंकलेखनाच्या मशीनवर तुम्ही कागद लावलेला आहे. मार्जिन सेट झालेले आहे. आता सुरवात करा तुमच्या टंकलेखनाला! टंकताना कळफलकाच्या साहाय्याने एकेक अक्षरे कागदावर उमटवली जातात. मजकूर टंकित करताना "कागदाची उजवी बाजू आता संपत आली आहे. दुसऱ्या ओळीवर जा" असा संदेश देणारी "टिंग" अशी एक बेल वाजते. कारण आपण टंकित करताना कागदाकडे किंवा कळफलकाकडे पाहात नाही आहोत. तुमची नजर टेबलावर असलेल्या कागदाकडे आहे की ज्यावर लिहिलेले तुम्ही टंकत करत आहात. आता ही "टिंग" बेल वाजली की कागदाकडे पाहायचे किती जागा शिल्लक आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन टंकून मग दुसऱ्या ओळीवर जायचे. आता ही "टिंग" बेल वाजल्यावर टंकता टंकता पुढे येणारा शब्द तिथे बसेल का? किंवा अर्धा बसवून पुढील शब्द खाली घेऊ का? किंवा ती जागा तशीच रिकामी सोडू? हे सर्व तुमचे तुम्हाला ठरवावे लागते. शेवटी टंकीत केलेले पत्र सुबक दिसायला हवे ना!



कॅरेजवर अजून एक पट्टी असते ती उभी करून ठेवायची. त्यावर तुमचा रिकामा कागद असेल. जसजसे तुम्ही टंकाल तसतसा हा रिकामा कागद खाली सरकेल. याचा उपयोग अशा करता होतो की आता कागद संपत आलेला आहे. मजकूर अजूनही शिल्लक असेल तर तो आता दुसऱ्या पानावर घ्यायला हवा. आता हा कागद टंकलेखन मशीनवरून काढा आणि पाहा कागदावरचा मजकूर कसा दिसतो ते!


तक्ते कसे बनवायचे व अजून काही गोष्टी पुढच्या भागात पाहू.

..... क्रमशः

Sunday, November 22, 2009

टंकलेखन (१)

ए, एस, डी, एफ, जी, एफ (स्पेसबार) सेमीकोलन, एल, के, जे, एच, जे या अक्षरांनी सुरवात होते टंकलेखनाच्या धड्यांची. ही अक्षरे म्हणजे कळफलकाचा गाभा म्हणले तरी चालेल. सर्वात मुख्य म्हणजे कळफलकाकडे न पाहता या अक्षरांचा सराव करावा लागतो. डाव्या हाताची चार बोटे ए, एस, डी, एफ करता व उजव्या हाताची चार बोटे एल, के, जे, एच करता. डाव्या हाताची चार व उजव्या हाताची चार बोटे वापरून म्हणजे कळफलकावरील बटणांवर जोर देऊन टंकले ही अक्षरे कोऱ्या कागदावर उमटतात. एका कागदावर ही अक्षरे मोठ्या अक्षरात टंकीत केलेली असतात तो कागद घ्यायचा तो टंकलेखन मशीनच्या डाव्या बाजूला आपल्या नजरेला सहज दिसेल असा ठेवायचा व सराव करायचा. पानेच्या पाने टंकीत करायची. प्रत्येक बोटाला जे अक्षर ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे टंकायचे की मग ती अक्षरे आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. टंकलेखनाचा संबंध बरीच वर्षे आला नाही तरीही तुमच्या पुढ्यात टंकलेखन मशीन आले की आपोआप कळफलकाकडे न बघता ही अक्षरे आपण टंकीत करू शकतो. याच पद्धतीने हा लेख मी संघणकाच्या कळफलकाकडे न बघता डावीकडे असलेल्या माझ्या वहीत लिहून ठेवलेल्या लेखाकडे बघून टंकत आहे.


दुसरा धडा म्हणजे ए, एस, डी, एफ च्या वरची अक्षरे आहेत त्यांचा. या अक्षरांचाही असाच पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा. तिसरा धडा म्हणजे तीन, चार, सहा अक्षरी शब्द की ज्या शब्दांची अक्षरे कळफलकाच्या वरच्या व खालच्या ओळीत असतील असे सर्व शब्द, किंवा ज्या शब्दांची अक्षरे फक्त डाव्या बोटांमध्ये येतील किंवा फक्त उजव्या बोटांमध्ये येतील असे शब्द. असे बरेच शब्द टंकीत करून करून पूर्ण कळफलक आपल्या डोक्यात बसतो. अक्षरे, शब्द, वाक्ये, परिच्छेद टंकीत करायचे. या सर्वांचा पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा.


एकूणच टंकलेखनाचा हा सराव म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्ये व परिच्छेद टंकीत करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळफलकाकडे बघायचे नाही, जसे की सायकल शिकताना सायकलकडे न बघता समोर रस्त्याकडे बघायचे व सायकल चालवायची अगदी तसेच हे तंत्र आहे की जे आत्मसात केल्यावर आयुष्यात कधीही विसरत नाही. टंकलेखन ही एक कला आहे. सराव करताना चुका होतात, कळफलकाकडे पाहिले जाते. सराव झाला की मग टंकलेखन वेग. या टंकलेखन वेगाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दणादणा वेगाने टंकत आहात आणि त्यात जर असंख्य चुका निघाल्या तर त्या टंकलेखन वेगाला काहीही अर्थ नाही. वेग कमी असला तरी चालेल पण जे टंकीत केले आहे ते बिनचूक असायला हवे.


जेव्हा टंकलेखन वेगाची परीक्षा घेतली जाते तेव्हा अमुक शब्द अमुक एका वेळात टंकीत केले गेले पाहिजेत. जेवढे शब्द टंकीत होतील ते सर्व मोजतात एक दोन असे करत त्यात स्पेस बार व दोन शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये रिकामी सोडलेली जागाही मोजली जाते. त्याचे एक गणित आहे. हे सर्व पूर्ण पान टंकीत कसे करायचे याबद्दल झाले. टंकलेखनामध्ये तुम्हाला तक्ते पण टंकीत करायचे असतात की ज्यामध्ये उभे आडवे रकाने आहेत. लाख कोटी असे आकडेही आहेत. तसेच त्यात मजकूरही टंकीत करायचा आहे. तक्त्याला शीर्षक आहे, तेही कागदाच्या मधोमध यायला हवे. या सर्वांचा तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो. कागदावर तो तक्ता उभा बसेल की आडवा, किंवा कसा चांगला दिसेल याचा अंदाज घ्यायला लागतो. प्रत्येकाचे मोजमाप घ्यावे लागते. तक्ता जर खूप मोठा असेल तर तो नेहमीच्या कागदावर न बसवता फूलस्केप कागदावर बसवावा लागतो. कागदाच्या वरून किती जागा सोडायची, शीर्षक लाल अक्षरात हवे की नको हे विचारात घ्यावे लागते. रकाने असतील तर टॅब लावावे लागतात. हे सर्व अचूक, खाडाखोड न करता, देखणे दिसेल याकडेही लक्ष द्यावे लागते. तक्ते बनवण्याचा पण बराच सराव करायला लागतो.


संपूर्ण कळफलक शिकायला सहा महिने लागतात. त्यानंतर क्लासला जायचे ते वेग कमावण्यासाठी. एकेक दोन दोन तास वेगवेगळी इंग्रजी मासिके घेऊन त्यातला मजकूर टंकीत करून सराव करायचा. नंतर वाचून त्यातल्या चुका काढायच्या.

टंकलेखनाचा भरपूर सराव, त्याचा वेग, त्यातील अचूकपणा हे सर्व आत्मसात झाले आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागतात की तुम्हाला एकच पत्र नाही तर बरीच पत्रे, तक्ते व इतरही बरेच काही टंकीत करावे लागते. यात बिनचूक व देखण्या पत्राची विशेष दखल घेतली जाते. पूर्वी कंपनीमध्ये एखादे पत्र टंकीत करायचे झाल्यास त्याच्या दोन प्रती काढल्या जायच्या. एक म्हणजे मुख्य पत्र की जे दुसऱ्या कंपनीत पाठवायचे असते आणि त्या पत्राची कार्बन प्रत की जी कचेरीत ठेवली जाते. किंवा त्याच्या अजूनही काही प्रती कार्बन पेपर लावून काढल्या जायच्या की जी पत्रे कंपनीतच कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या कंपनीतल्या एखाद्या महत्त्वाच्या माणसाला पाठवण्यासाठी. ही कचेरीतली पत्रे दोन चार प्रकाराने टंकीत केली जायची. पहिले म्हणजे लिहून दिलेली पत्रे, त्यात अक्षर बरे असेल तर ठीक नाहीतर ते लावता लावता खूप किचकट वाटायचे. दुसरे म्हणजे डिक्टेशन देऊन, किंवा काही वेळेला थेट तोंडी सांगतील त्याप्रमाणे लगेचच तो मजकूर टंकीत करायचा, किंवा ठराविक साचेबद्ध पत्रे टंकीत केली जायची.

दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन कसे होते ते पाहू.

..... क्रमशः

Friday, November 20, 2009

एका तळ्यात होती बदके पिले बरीच, होते सुरेख तान्हे पिल्लू तयात एक!

आमच्या समोरचे तळे पाहिले की मला म्हणावेसे वाटते की एका तळ्यात होती बदके पिले बरीच, होते सुरेख तान्हे पिल्लू तयात एक!

एक अतिशय सुंदर तान्हे पिल्लू की ज्याचा विसर पडणे शक्य नाही! सर्व बदकांमध्ये वेगळे! तळ्यात सर्व बदके काळ्या व करड्या रंगाची. त्यांचे पंख पण वेगवेगळे. कुणाची निळी शेड तर कुणाची करडी. कुणाची पांढरी तर कुणाची गडद काळीच! पण हे तान्हे तसे नाही. पांढरे शुभ्र! गोंडस! त्याचे डोळे काळेभोर जणू काही काळे मणी बसवले आहेत की काय असे वाटावे!

नवीन जागी रहायला आलो तेव्हा एकदा दार उघडून पाहिले तर अनेक छोटी मोठी बदके चालत चालत येताना दिसली. खूप गंमत वाटली. काही जण त्यांना ब्रेडचे छोटे तुकडे त्यांच्या दिशेने खाण्यासाठी फेकत होते. त्यात हे लक्ष वेधून घेणारे पांढरेशुभ्र बदकपिल्लू होते. खाली उतरले व त्यांच्या घोळक्यात गेले. मी त्यांना पकडेन की काय असे समजून ती बदके दूर व्हायला लागली पण हे छोटे बदकपिल्लू मात्र निरागसपणे माझ्याकडे बघत होते! मनात म्हणले याला भीती कशी काय नाही वाटत?!

आमच्या अपार्टमेंटच्या समोरच हे तळे आहे. त्यात अनेक छोटी मोठी बदके, त्यांची छोटी छोटी पिल्ले आहेत. त्यांना पाहण्याकरता माझी अधूनमधून चक्कर असतेच. संध्याकाळी ही सर्व बदके आळीपाळीने बाहेर चक्कर मारायला येतात. ते पांढरे बदकपिल्लू दिसले की मला खूप आनंद व्हायचा. त्याच्याकडे बघत बसावेसे वाटायचे. सर्व बदकांमध्ये ते खूपच उठून दिसायचे. तळ्यावर जाऊन तळ्यावरच्या लाटा पाहणे, पाण्यात पडलेले आकाशाचे वेगवेगळे प्रतिबिंब पाहणे, व ही बदके काय करतात, कुठे जातात याचे निरिक्षण करणे हा आता मला छंदच लागला आहे. काही बदके गवतातील किडे मुंग्या खाण्यासाठी येतात तर काही गवतात येऊन आपले पंख चोचीने साफ करतात. काही जण दुसऱ्या तळ्यावर जाताना चक्क चालत चालत रस्ता ओलांडून जातात. दिवस असेच भराभर जात होते. काही दिवसांनी मला त्या बदकांचा थोडा विसर पडला......

...... आणि एक दिवस! एक दिवस अचानक माझ्या लक्षात आले की अरेच्या! पांढरे बदकपिल्लू कसे काय दिसत नाही! कुठे गेले हे? जेव्हा जेव्हा म्हणून तळ्यावर जायचे तेव्हा शोधायचे त्याला. पण नाहीच! अरेरेरे! काय हे, आपण का नाही त्याला आपल्या कॅमेरामधून साठवून ठेवले?? कोणता मुहूर्त बाकी ठेवला होता आपण!!

आज माझ्याकडे त्या तळ्यातील सर्व छोटी मोठी बदके आहेत, पण ते सुरेख पांढरेशुभ्र पिल्लू नाही. बरेच वेळा विचार येतो की आजूबाजूच्या सर्व तळ्यांवर पाहून यावे कुठे दिसते का ते. पण तो फक्त विचारच राहतो. एक मात्र नक्की की माझ्या मनात त्याला मी पूर्णपणे साठवून ठेवले आहे. जेव्हा त्याची आठवण होते तेव्हा त्याला मी पाहते. मनाला खूपच हुरहुर लावून गेले हे गोंडस पिल्लू!!!

Wednesday, November 11, 2009

केट व मॅगी

एक दिवस मला माझ्या मैत्रिणीचा दूरध्वनी आला व तिने मला विचारले " तू माझ्याकरता पर्यायी बेबीसीटरचे काम करशील का चार दिवसांकरता?" माझा होकार कळताच तिला खूप आनंद झाला व तिने माझे अनेक आभार मानले.



एलिझाबेथ नावाच्या एका अमेरिकन बाईच्या घरी माझी मैत्रीण तिच्या ६ महिन्यांच्या जुळ्या मुलींना सांभाळायला रोज सकाळी ७ ते ६ पर्यंत जाते. एलिझाबेथला मार्गारेट उर्फ मॅगी व कॅथेलीन उर्फ केट नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. सातव्या महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या मुली वजनाने खूपच कमी आहेत व त्यात मॅगीला थोडा प्रॉब्लेम आहे. तिचे डोके नेहमीच्या आकारापेक्षा थोडे मोठे आहे, त्यामुळे एलिझाबेथ त्या मुलींना पाळणाघरात ठेवू शकत नाही.



एलिझाबेथ मलाही चांगली ओळखते कारण ज्या पाळणाघरात पर्यायी बेबीसीटर म्हणून मी काही दिवस काम केले तिथे तिचा मोठा मुलगा पण आहे. मी दोघींनाही दूरध्वनी करून सांगितले की मला इतक्या लहान मुलांची व त्यातूनही जुळ्या मुलांची देखभाल करायची सवय नाही, पण शिकवलेत तर हे काम मी निश्चितच करू शकेन. त्या जुळ्या मुलींची दिवसभरात कशी देखभाल करायची याचे मी दीड दिवस प्रशिक्षण घेतले, अर्धा दिवस एलिझाबेथ बरोबर व एक संपूर्ण दिवस माझ्या मैत्रिणीबरोबर.



एलिझाबेथने मला पावडरचे दूध कसे तयार करायचे, दुधाच्या बाटल्या स्वच्छ धुऊन मायक्रोवेव्हमधून कशा कोरड्या करायच्या, बाटलीत दूध भरून ते फ्रीजमध्ये कशा पद्धतीने ठेवायचे, म्हणजे दुधांच्या बाटल्यांवर स्टीकर चिकटवून त्यावर नावे लिहायची. शिवाय केटला दुधातून तांदुळाची पावडर घालून दूध पाजायचे हे लक्षात ठेवणे. पावडरचे दूध तयार करताना अजिबात गुठळी होवून द्यायची नाही वगैरे.


मैत्रिणीबरोबर एक संपूर्ण दिवस प्रशिक्षण घेतले त्यात तिने मला सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे;


१. दर ३ तासाने बाटलीतील दूध पाजणे व ते कशा पद्धतीने पाजणेः सोफ्यावर बसून मांडीवर उभी उशी ठेवायची , त्यावर मुलीला उताणे झोपवायचे , एका हाताने तिचे दोन्ही हात धरून बाटलीतील दूध पाजणे. दुसरे महत्वाचे म्हणजे दूध पिताना त्यांना ठसका लागत नाही ना तेही पाहायचे.

२. दर तीन तासाने डायपर बदलणे.

३. औषध कसे ड्रॉपरने तोंडात घालायचे.

४. फोन नंबरची यादी कुठे आहे ते सांगितले, त्यामध्ये एलिझाबेथचा व तिच्या नवऱ्याचा सेलफोन नंबर, त्या दोघांच्या कार्यालयातील फोन नंबर, एलिझाबेथच्या शेजारणीचा फोन नंबर असे सगळे फोन होते.

५. त्या मुलींना ताप आला तर तो थर्मामीटरने कसा पाहायचा.

६. सकाळी ११ वाजता एलिझाबेथच्या कार्यालयात दूरध्वनी करून सांगायचे की " सर्व काही व्यवस्थित चालले आहे, काळजी नसावी." ती फोनवर भेटली नाही तर आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवणे.

७. त्या मुलींना झोपवायचे कसे ते सांगितले. त्या मुलींच्या खोलीत दोन पाळणे आहेत त्यात त्यांना पालथे ठेवून झोपवायचे. नंतर दार अर्धवट लावून घ्यायचे.

८. अर्धापाउण तास सतत कोणी रडले आणि सर्व उपाय करूनही रडणे थांबले नाही तर फोनच्या यादीतून फोन लावून लगेचच कळवणे. फोनवर कोणीही उपलब्ध झाले नाही तर ९११ ला फोन करुन पोलिसांची मदत घेणे.

९. जाताना एलिझाबेथ संपूर्ण घर बंद करुन जाईल. बाहेरुन कोणीही आले तरी दार उघडू नकोस असे सांगितले.

१०.त्या मुलींशी सतत बोलत राहा.

११.फ्रीजमध्ये कायम त्या दोघींच्या मिळून ८ दुधाच्या बाटल्या तयार ठेवणे.

प्रत्यक्ष अनुभव

दीड दिवसाचे प्रशिक्षण घेतल्याने प्रत्यक्ष सांभाळायला मला काहीही जड गेले नाही. मुली पण खूप गोड व छान होत्या. पहिल्यांदा मला पाहिल्यावर आज ही कोण आपल्याला नवी बाई आली सांभाळायला? अशा प्रकारचे अविर्भाव चेहऱ्यावर होते, पण ते २ सेकंदच टिकले. त्यांच्याकडे हासून बोलल्यावर त्याही हसल्या व रमल्याही.


एक दिवस त्यांच्याशी इंग्रजीतून बोलले, मग विचार केला त्यांना काय कळतय इंग्रजी का मराठी? नंतर मनसोक्त मराठीतूनच बोलले त्या मुलींशी. "उठलात का तुम्ही?", " तुम्हांला भूक लागली का?", "एक मिनिट हं आलेच मी" अशा प्रकारे.


एके दिवशी भुकेच्या वेळी केट पेंगली होती, मग तिला तसेच झोपू दिले, मॅगीला आधी दूध दिले तरीही ती उठेना. मग विचार केला आता जर हिला तसेच झोपू दिले तर पुढचे सगळे वेळापत्रक बिघडेल, तशीच तिला जबरदस्तीने उठवले, दूध दिले, मग झाली ताजीतवानी आणि लागली खेळायला. मॅगी लहान आहे, ती दूध प्यायल्यावर लगेच झोपायची. केट चपळ आहे व दूध प्यायल्यावर ती खूप खेळायची. मग ती व मी टॉम व जेरी पाहायचो.


त्या चार दिवसात खूप लळा लागला होता मला त्या गोड मुलींचा. आलिशान बंगल्यामधील केट मॅगी यांच्या सहवासातील ते चार दिवस मी कधीही विसरणार नाही.

Tuesday, November 10, 2009

पानगळीचे रंग (३)


















आज फिरायला छान वाटत होते म्हणजे माझा आवडता पाऊस झिमझिमत होता. आजुबाजूला दाट झाडींमध्ये असलेले पानगळीचे रंग काही हिरव्यागार झाडांमध्ये उठून दिसत होते. खूप छान वाटले आज फिरणे.

Monday, November 09, 2009

Art Photography (3)






Friday, November 06, 2009

रांगोळी







ऑर्कुटवर माझ्या मैत्रिणीच्या अल्बममध्ये ही रांगोळी पाहिली. ही प्रत्यक्षातली रांगोळी आहे. मला ही खूप आवडली म्हणून कागदावर रेखाटली. अर्थात प्रत्यक्ष जमिनीवर रांगोळी काढून त्यात रंग भरण्याची मजा व आनंद जास्त आहे यात वाद नाही.

कुंडीतली पानेफुले याची रांगोळी लाकडी खुर्चीवर काढली आहे.

Sunday, November 01, 2009

Art Photography




समुद्रकिनारा

Friday, October 30, 2009

एका गोल्डनज्युबिलीचा आगळावेगळा कार्यक्रम....(1)

आईबाबांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या लग्नाची गोल्डन ज्युबिली धूमधडाक्यात व थाटामाटात साजरे करायचे ठरले. आम्ही दोघी मुली, भाच्चे, भाच्या, जावई, भाचेजावई, व डझनभर नातवंड असा प्रचंड गोतवाळा होता.

हॉलवर आल्यावर आईबाबांना वेलकम करण्यासाठी फुलांच्या पायघड्या, त्यांना ओवाळण्यासाठी तबकात ५१ज्योती, शिवाय केक, फुगे, फुलांची सजावट, त्यांचे अनेकविध फोटो, काही मुलींबरोबर, तर काही जावयांबरोबर काढलेले, लग्नातले कृष्णधवल फोटोज आकर्षकरित्या एका टेबलावर मांडले होते. या बरोबरच काहीतरी वेगळे केले पाहिजे असा हिनीचा म्हणजेच त्यांच्या मोठ्या मुलीचा आग्रह होता. अमेरिकेवरून ती खास आईबाबांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतात आली होती. आईबाबांना वेलकम केल्यावर ते एका सुंदर सजवलेल्या सोफ्यावर स्थानापन्न झाले. त्यांच्या समोर विशिष्ट कोनातून व विशिष्ट पद्धतीने खुर्चांची मांडणी केली होती. आईबाबांना सहजसमोर दिसतील अशी नातवंडे बसली होती. मुलांच्या डावीकडे आईबाबांच्या भाच्या व भाच्चेसूना, उजवीकडे भाचे व जावई मंडळी. मागे आईचे भाऊ, बाबांच्या बहीणी, आईचे दीर जाऊ बसले होते.

हिरवीगार साडी सावरत सावरत हातात माईक घेऊन हिनी आली. सर्वांकडे तिने एक कटाक्ष टाकला, स्मित हास्य केले आणि बोलायला सुरवात केली.

" आज आपण सगळे इथे जमलो आहोत ते एका खास कारणासाठी. आज आईबाबांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तर मग आपण खास ठरवलेल्या कार्यक्रमाला सुरवात करू या का! पहिल्याप्रथम मी माझ्या लाडक्या बहिणीला बोलावू इच्छिते "जनाला" जना कुठे गं? "अगं ती काय! कोपऱ्यात जाऊन मोबाईलवर बोलत्ये! इति घनाताई (हिनी व जनाची लाडकी मामेबहीण)

"हो हो. आले गं! एक मिनिट. जनाने आंबा कलरची साडी नेसली होती. तिने माईक हातात घेतला व आईबाबांबद्दल इतके काही भरभरून बोलली की काही क्षणांकरता सर्वांचे डोळे पाणावले.

हिनीची परत एकदा अनाउन्समेंट. आता मी निमंत्रित करते घनाताईला. घनाताई ये गं स्टेजवर. ती बोलण्या आधी मी तिच्याबद्दल काही सांगते. आमच्या दोघींपेक्षा घनाताईच खरी आईची मुलगी शोभते. आईसारखीच गोरी गोरी पान! टापटीप, व्यवस्थितपणा अगदी आईसारखाच! बोल गं घनाताई. घनाताईने आईबाबांबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. आता नंबर आहे आईबाबांचा सर्वात लाडका भाचा हासदादाचा. अमिताभ स्टाईल हासदादा उठला. माईक हातात घेऊन बोलण्या आधी त्याने आईबाबांना वाकून नमस्कार केला. नंतर त्याने त्याचे आईबाबांबद्दलचे मनोगत व्यक्त केले.

दुसरा भाचा आला आणि म्हणाला की मी काही बोलणार नाही. माझ्या भावना मी काव्यातून व्यक्त करतो. काव्यामध्ये आमच्या दोघींची, जावयांची व नातींची अक्षरे पण गुंफली होती. सगळ्यांच्या आश्चर्यचकित मुद्रा!! अरे कुंदा दादा तू काव्य? कधी? कुठे?

आता टर्न होती जावई व भाच्चे जावयांची. जावई म्हणाले आम्हाला काही बोलता येत नाही बुवा! आम्ही किनई अगदी साधीसुधी माणसे! घनाताईच्या नवऱ्याने हातात माईक घेतला. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे. त्यांनी बोलायला सुरवात केली व एका वाक्यात गुंडाळले. आमच्या सासुबाई व सासरे इतके काही प्रेमळ आहेत, इतके काही प्रेमळ आहेत की शब्दच नाहीत बोलायला. अशा रितीने सर्व जावयांनी पळ काढला! बोलून चालून जावईचे ते!

आईबाबांची नातवंड हिनीमावशीकडे रागारागाने बघत होती. ही आम्हाला का बोलवत नाहीये!? त्यांच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव पाहून हिनी गालातल्या गालात हसत होती. शेवटी म्हणाली एकदाची या रे पोरांनो, बोला काय बोलायचे ते तुमच्या आज्ज्जीआजोबांबद्दल. नातू म्हणाले आज्जीसारखा खाऊ कुणालाच बनवता येत नाही म्हणून आम्ही आईच्या मागे सारखा लग्गा लावतो व आजीकडे येतो खाऊ खायला. नाती म्हणाल्या गोष्टी सांगाव्यात तर त्या आजोबांनीच. आमच्या बाबांना अजिबात गोष्टी सांगता येत नाहीत.

आता खरी टर्न होती भाचेसुनांची. पण त्या म्हणाल्या इथे नको. आम्ही घरी आल्यावर सांगू आमच्या खाष्ट सासुबद्दल काय वाटते ते! असे म्हणल्यावर आईचा चेहरा थोडा पडला. हिनी आईला म्हणाली अगं आई त्या मजा करत आहेत गं तुझी!

कार्यक्रमाच्या शेवटी हिनीने बोलायला सुरवात केली. तिने तिच्या आईबाबांबद्दलच्या भावना इतक्या छान रितीने व्यक्त केल्या की सगळे एकदम प्रभावित झाले.

" आता सर्वांनी जेवायचे आहे. हा कार्यक्रम इथेच संपलेला नाहीये. जेवणानंतर अजून एक खास कार्यक्रम आहे, त्याची एक छोटी अनाउन्समेंट करून मी आपला निरोप घेते. नमस्कार!!!

.... ‌सनईचोघड्यांचे सूर निनादत होते... पंगतीची सजावट खूपच उत्तम होती.... आईबाबांच्या जेवणाच्या ताटापुढे सुंदर रांगोळी घातली होती... उदबत्तीचा घमघमाट होता.. जेवणाचा मेनू खास लग्नपंगतीसारखाच होता..... वरणभात, अळूची भाजी, मसालेभात, आम्रखंड पुरी, तळण, बाकीचे पंचपक्वान्न.... ‌सगळ्याजणींनी ठेवणीतल्या साड्या परिधान केल्या होत्या.. ‌साड्यांचे अकेकविध रंग डोळ्यांना सुखावत होते... हिरवा, केशरी, लाल, गडद पिवळा.... विडिओ शुटींग चालू होते.... आईबाबांच्या चेहऱ्यावर सुखसमाधान नांदत होते..... आईबाबांचे सुखीसमाधानी चेहरे पाहून हिनी व जना दोघीजणी खूप खूप सुखावल्या होत्या... गोल्डन ज्युबिलीचा हा सोहळा ठरवल्यापेक्षाही छान झाला होता.....

सीडीचा आधार घेऊन व थोडा कल्पनेचा वापर करून हा लेख लिहिला आहे. प्रत्यक्ष सोहळ्यात हिनी म्हणजे मी रोहिणी काही कारणांमुळे हजर नव्हते.

Thursday, October 29, 2009

पानगळीचे रंग (२)













पानगळ २००९ झाडांच्या जवळून घेतलेले पानांचे रंग व त्यावरचे नक्षीकाम.