Tuesday, February 03, 2009

माझं गांव

घाटातील अवघड वळणे उतरून एस. टी सरळ रस्त्याला लागली. सडकेवरील फर्लांगाचे, मैलाचे पांढरे दगड मागे टाकीत वेगाने पुढे निघाली. भातखाचरांवरून येणारा गोड वास मनात साठत होता. वळणातील झाडांची ओळख पटत चालली. गांव जवळ येत होता. जांभूळ, वड, आंबा, फणस यांची रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडं बालपणीच्या सुखद आठवणी करून देत होती. गांवानजीक असलेल्या पाणगंगेवरील पुलावरून जात असता येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे मनांत आठवणी दाटून येत होया. नजर विमलेश्वराच्या कळसाकडे गेली. पिवळसर सोनेरी कळस लाल किरणांनी चकाकत होता. एस. टी ने गेअर बदलला. एक लहान वळण घेऊन ते धूड धडधडत एका वडाच्या पाराजवळ येऊन थांबले. याच वडाजवळून मऱ्या ओढा वाहतो. आषाढात, श्रावणात याला अवचित पाणलोट येतो. त्याला उतार पडेतोवर गांवात जायची सोय राहात नाही. दोन एक तास पारावर बसून राहावे लागते.

एस.टी तून उतरून पलीकडे गेलो. पुढे जांभूळ फाटा लागला. येथून डोंगरावरचे आमचे घर दिसू लागले. मला उतरवून घ्यावयास केशव आला होता. हसत पुढे येऊन केशवने हातातील बॅग घेतली. "अरे केशव तुला कुणी बातमी दिली मी येणार आहे म्हणून? " " परवाच राधाकाकूंनी तुम्ही येणार असे सांगितले. केशव म्हणाला "आज सकाळपासून स्टँडवर यायची ही चौथी वेळ!" खरं तर आज नारळ उतरवणार होतो! "


मी व केशव हळू हळू पायवाटेने घराकडे चालत होतो. वरच्या आळीत आमचे घर. वाडा गांव खर तर डोंगरावर वसले आहे. आमचे घर उंचावर असल्याने वारा भरपूर. तसेच पावसाळ्यात पाऊसाचा माराही फार. घरासमोर सर्व सपाटीचा भाग. तिथेच आमची शेते. मागील अंगास उंच डोंगरावर पाहिले की शिवकालीन मोडकळीस आलेल्या किल्याची तटबंदी दिसते. गावातून जाणारी गुरांची वाट थेट वरील पहाडावर जाते. या परिसरात नव्यान आलेल्या जेंगाड्या जातीच्या वाघाने खूपच धुमाकूळ घातला होता. पायवाटेवर झाडीत एखादे जनावर फाडून अर्धवट खाऊन टाकलेले गुराख्यांना दिसे. हा प्रदेश जितका रम्य तितकाच काही ठिकाणी प्रसंगी अंगावर काटा उभा करणारा आहे.

बोलता बोलता एव्हाना आम्ही वाडीत आलो. ओटीबाहेर कट्ट्यावर ठेवलेल्या तांब्याच्या मोठ्या हंड्यातील पाण्याने आम्ही हातपाय धुतले. आम्ही पडवीत आलो. माईने आतून "केव्हा आलास? " "एस. टी वेळेवर आली ना? " असे म्हणत पडवीत प्रवेश केला. अलीकडे माई बरीच थकली होती. पाण्याचा तांब्या देताना हाताची बोटे थरथरत असत.

जाजमावर बसून चहा घेतला. मागील दारी जाऊन तोंडल्याच्या वेलाकडे पाहत, रहाटाचा कूं कूं येणारा आवाज ऐकत उभा राहीलो. रानफुलांचा, गवताचा वास येत होता. उत्साह वाढला होता. सूर्य मावळत होता. वाश्याला टांगलेल्या दिव्याचा प्रकाश जाणवत होता. स्वयंपाकघरात गुरगुट्या भाताचा व भाजलेल्या पापडाचा खमंग वास आला. जेवण झाल्यावर माई जवळ बसून इकडच्या तिकड्यच्या गप्पा झाल्या. चालण्यामुळे आलेल्या थकावटीने डोळे मिटू लागले व झोप केव्हा लागली हे कळलेच नाही.

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटांनी जाग आली. मागील दारी चुलखंड्यावर हंड्यात पाणी तापत होते. चहा झाला. पोहे व पापड खात परसातील आंब्याखाली बसलो होतो. हा आंबा आजोबांनी त्यांच्या तरूणपणी लावला आहे. दरवर्षी याला अमाप फळ लागते. फळ अति गोड आहे. अगदी वरची फळे पाखरे खातात. एखादा पाड पाचोळ्यात पडलेला दिसतो. तो तर गोडीत साखरेसारखा लागतो. या वर्षी पण हा भरपूर मोहरला होता. डहाळी गणीक मोहोरांचा तुरा लागलेला पाहून लहानपणची एक आठवण झाली. लहान असताना आंब्याजवळून पाणगंगेच्या उतरणाऱ्या पाऊल वाटेने आजोबांचा हात धरून विमलेश्वराच्या दर्शनास जात होतो. वाटेत पिल्या शेतकरी भेटला. हातातील काठी वर करून आजोबा ओरडले " असे पिलोबा! काल रात्री गलका कुठून ऐकू येत होता? शेताडीत बांध्याला कुणाला खवीस दिसला की काय? का घिरोबानं सोबत केली कुणाची व एकदम दिसेनासा झाला? "

पिलोबा बोलला "च्छा! खवीस कुठचा येतावं? तिगस्ता धरलान की गांवच्या जोश्यानं शेंदऱ्या जोश्यानं नारळात अन बुडीवला नव्हं का आपल्या पातळ गंगेच्या डव्हांत! आबो! बापू अन त्याचा ल्योक चालला हुता बांदावरनं, अन त्यो आपल्या देवाच्या दरशनास येतो त्यो ढाण्या नाही का? त्यो चालला हुता गुमान गवतामधून . पन आपला बाप्या बिचकला त्येस्नी बघून. आन काय? बोबट्या मारीत आला वाडीत!" "हां हां अस झाल तर" आजोबा बोलले. आणि आम्ही पुढे निघालो. आजोबा सांगत रोज एक ढाण्या वाघ येतो शंकराच्या दर्शनास. पण कधी कुणावर गुरगुरला नाही की कुणाला त्याची भीती वाटली नाही.

सायंकाळी गांवचा गुरव येत असे आमच्याकडे. आमची आजी नैवेद्याचा दहीभात देत असे त्याच्याजवळ. दही भात देवापाशी ठेवून गुरव डोंगर उतरे. मध्यरात्री केव्हा तरी दही भात खाऊन पाणगंगेवर पाणी पिण्यास आलेला ढाण्या पाहिल्याचे लोक सांगत. अलीकडे बेसुमार झालेल्या जंगल तोडीमुळे रानातील बहुतेक प्राणी नाहीसे झाले. उपासमारीमुळे अलीकडे केव्हा केव्हा ते भक्ष शोधताना कुठे कुठे वस्तीवर येताना आढळतात. झाडी कमी झाली तशी अलीकडे वाडीत उष्मा वाढत आहे.

श्री नीळकंठ बाळकृष्ण घाटे