Thursday, November 28, 2024

२८ नोव्हेंबर २०२४

Wish you All Happy Thanksgiving 2024 🙂
आजचा दिवस खूप वेगळा आणि छान गेला. काल संध्याकाळी आमची मनोगती मैत्रीण वरदा आमच्या घरी आली. काल रात्रीचा आणि आजचा जेवणाचा बेत मुद्दामहून वेगळा केला. जेवणाचा बेत सर्वांच्याच आवडीचा होता म्हणून ठरवला. काल रात्रीच्या जेवणाला भरली कारली, दह्यातला दुधी, मेथीचे पराठे, मुगडाळ तांदुळाची खिचडी. आणि रेडिमेड गुलाबजाम. आजचा बेत उपासाची थाळी होती. वऱ्याचे तांदुळ, दाण्याची आमटी, भोपळ्याचे भरीत, बटाट्याची भाजी. काल रात्री मी, विनु, वरदा आणि आमची भारतातली मैत्रीण ऋजुता मध्यरात्री ३ वाजेपर्यंत जागलो. वरदा आल्यापासून गप्पा टप्पा चालू होत्या त्या अगदी ती आज दुपारी निघेपर्यंत. ओघवत्या गप्पांमध्ये सर्व विषय होते. भारत/अमेरिका राजकारण, मराठी शुद्धलेखन, मराठी मालिका, भविष्य, वाचन/गायन. इत्यादी अनेक विषय. मुख्य म्हणजे मी ठरवले होते की काहीतरी वेगळे करायचेच ! पत्ते खेळलो. त्या दोघींना लॅडीज माहीती नव्हते. ३०४ थोडे आठवत होते. खेळता खेळता विसरलेले सर्व आठवले. ३०४, पाच- तीन- दोन, बदाम सात खेळलो. सोबत गरमागरम आलं घातलेला चहा. खालीच बसलो होतो. सर्वांना मांडी घालून बसता येत होते. नंतर पाय अवघडले. पत्यांचे काही डाव खेळून झाल्यावर नाव गाव फळ फूल आम्ही तिघी खेळलो. जाम मजा आली. पूर्वीचे शाळेचे दिवस आठवले. नाव गाव फळ फूल या खेळाला विनु अक्षर देत होता. सर्व बैठे खेळ आठवून त्यावर चर्चा झाली. rohinigore










Saturday, November 09, 2024

९ नोव्हेंबर २०२४

 आजचा दिवस वेगळा होता म्हणूनच रोजनिशीत लिहीत आहे. शुक्रवार-शनिवार-रविवार हे इतर कामाचे म्हणजेच साफसफाई, किराणा-भाजीपाला आणणे इत्यादी. २ दिवस थंडी २ दिवस उन्हाळा असे ऋतू आहेत सध्या. थंडी अजूनही स्थिरस्थावर झालेली नाहीये. शनि-रवि कडे एक दिवस बाहेर जेवायला जातो. केसर इंडियन थाळी या उपाहारगृहात गेलो की आम्ही तिथे पाणीपुरी घेतोच घेतो. ६ पुऱ्यांमध्ये मी ४ व विनु २ खातो. एक भाजी घेतो त्याबरोबर भात येतोच. मी एक चपाती घेते. तर आज आम्ही बासुंदी आणि कुल्फी पण घेतली. बासुंदी आता इतिहासजमा झाली आहे. खरे तर मला बासुंदी खूपच प्रिय आहे. आम्ही विल्मिंग्टन मध्ये रहात असताना अतिशय चवदार अशी बासुंदी केली होती ती शेवटची. माझ्या वाढदिवसाला केली होती. त्या बासुंदीची आज प्रखरतेने आठवण झाली. भारतात रहात असताना पाणीपुरी मी दर महिन्याला खायचे. आता एक पुरी तोंडात घातल्यावर अगदी हळूहळू खाते ठसका लागण्याच्या भितीने.



आज या उपहारगृहाच्या जवळच्याच इंडियन ग्रोसरी स्टोअर मध्ये गेलो होतो. इथे गेलो की मी नेहमी शेपू किंवा मेथी घेते. भारतात असताना मी रोज एक पालेभाजी करायचे. मला पालेभाजी खूपच प्रिय आहे.आता दूध फक्त चहापुरतेच. आधी होल मिल्क घ्यायचे. नंतर २% घ्यायला लागले. लॅक्टोज फ्री. आता अल्मोंड दूध आणि त्यात प्रोटीन पावडर. इथे अमेरिकेत आल्यापासून प्रोटीन पावडर घ्यायला सुरवात केली ती आजतागत. पहिल्यांदा स्लिमफास्ट घ्यायचो. नंतर plant based protein powder घ्यायला लागलो. भारतात असताना आम्ही दोघे दूधातून सुकामेव्याची पावडर घालून घेत होतो. एखादवेळेस मी दुधातून बोर्नव्हीटा घ्यायचे. अधुन मधून जाता येता पण खायचे. मला प्रचंड आवडतो.cereal चे बरेच प्रकार खाऊन पाहिले पण आता बंद केलेत. तर आजचा दिवस अजून एका कारणाकरता वेगळा गेला. आपण सगळेच युट्युबवर काही ना काही बघत असतो. त्यात एका मालिकेत पोहे करताना दाखवले. मला पोहे खूपच आवडतात. कालचा भात-भाजी खाल्ली होती. पण तरीही पोहे बघितल्यावर मला परत भूक लागली आणि आज मी भारतात असताना पोहे बनवायचे तसे बनवले म्हणजे लाल तिखट न घालता. तिखटपणा मिरच्यांचा होता. मी मिरच्या घातलेच पण लाल तिखट पण घालते. काही महिन्यांपूर्वी आम्ही दोघे असेच युट्युब वर काही पहात होतो. त्यात डोंबिवलीत कुठे कुठे वडा पाव चांगला मिळतो हे दाखवले होते. बटाटेवडे बघितल्यावर माझी भूक चाळवली आणि मी असेच बटाटेवडे केले होते. तुमचे होते का असे कधी? स्क्रीनवर पदार्थ करताना पाहिला आणि करावासा वाटला? Rohinigore