Friday, July 05, 2024

निसर्गसौंदर्याने नटलेली अमेरिका.....

 

निसर्गसौंदर्याने नटलेली अमेरिका..... पूर्वप्रकाशन बीएमएम स्मरणिका २०२४



आम्हां दोघा नवरा बायकोचे अमेरिकेत पहिले पाऊल पडले ते २००१ मध्ये. सुरवातीला विद्यापीठात विनायकच्या ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या संधोधना निमित्त व नंतर नोकरी निमित्ताने वेगवेगळ्या शहरात राहिलो. मी गृहिणी आहे. अमेरिकेत आल्यावर मला रिकामा वेळ पुष्कळ होता. या रिकाम्या वेळात माझ्यातल्या कलागुणांना वाव मिळाला. माझी फोटोग्राफीची सुरवात इथेच झाली. मी फुलवेडी आहे. त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्यात अनेक छोट्या फुलांचे व पानांचेही फोटो काढता आले. ब्लॉग लिहायला सुरवात केली. फोटो काढायला सुरवात झाली ती आधी साध्या कॅमेराने, नंतर डिजिटल आणि आता मोबाईल फोटोग्राफी सुरु आहे.



नॉर्थ कॅरोलायनाच्या पूर्वेला समुद्रकिनारपट्टीवर व नंतर पश्चिमेस पर्वत रांगांवर रहाण्याचा योग आला. विल्मिंग्टन शहरा जवळचे सर्व समुद्रकिनारे आम्हाला खूप आवडले. तिथे उन्हाळ्यात वाळूत खूप चालणे व्हायचे. एकदा ठरवले की समुद्रातून वर येणारा सूर्य पहायचा. हा अनुभव खूपच छान होता. मला तर अगदी देवळात गेल्यासारखेच वाटले. सूर्योदयाच्या आधी आकाशात निरनिराळे रंग होते. लाल चुटूक सूर्याचा गोळा समुद्रातून वर वर येताना पाहून भारावून गेलो. विल्मिंग्टनच्या जवळ असलेला दुसरा समुद्रकिनारा होता. हवा छान असली की आम्ही तिथे जायचो. इथेही मनसोक्त चालणे व्हायचे. या किनाऱ्याचे वैशिष्ट असे होते की आधी समुद्र, त्याला लागूनच ओबडधोबड खडक आणि त्याच्या बाजूने रस्ता. चालता चालता समुद्राला बघत चालायचो. अंतरा अंतरावर बसायला बाकडी होती. तसेच या गावात केप फिअर नावाची नदी होती. त्या नदीवर लाकडी पूल होता. त्यावर चालणे होत असे. शनिवार किंवा रविवार आम्ही या पूलावर संध्याकाळचे चालायचो आणि सूर्यास्त पाहूनच घरी परतायचो. तिथले अनेक सूर्यास्त मी कॅमेरात बंदीस्त केले आहेत.


या शहरात एक सुंदर तळे होते. तिथेही चालणे व्हायचे. तळ्याच्या सभोवतालच्या गवतावर अनेक छोटी गवतफुले पाहिली. त्यात पिवळी, शेंदरी, जांभळी फुले खूपच गोड दिसायची. फुलांचे फोटो घेण्याचा ध्यासच जणू मला लागला. नॉर्थ कॅरोलायनच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या हेंडरसनविल शहरात जेव्हा आलो तेव्हा या शहराच्या प्रेमातच पडलो. आमचे घर डोंगरावर होते. घरातून बाहेर फिरायला किंवा कारमधून ग्रोसरी घ्यायला बाहेर पडायचो तेव्हा तर इतके छान वाटायचे ! चहूबाजूने डोंगर, त्यावरची हिरवीगार उंच उंच झाडी दिसायची. सर्वत्र नागमोडी आणि उंचसखल रस्ते ! पानगळीच्या ऋतूमध्ये जिकडे पहावे तिकडे रंगीत झाडे ! हिवाळ्यात पर्णहीन फांद्यांवर पांढराशुभ्र भुसभुशीत बर्फ लटकत रहायचा. या पांढऱ्या रंगाचे वेगळे सौंदर्य पहायला मिळाले. इथे रहात असताना घरातल्या बेडरूम मधून आम्हाला सूर्यास्त दिसायचा. सूर्यास्ता आधी आकाशात क्षणाक्षणाला बदलणारे रंग आणि नंतर होणारा सूर्यास्त आम्ही रोजच्या रोज बघायचो. इथे आभाळ निरभ्र असते. जेव्हा ढग येतात तेव्हा प्रत्येक ढगाचे रूपडे वेगळे. असे ढग मी प्रथमच पाहिले. काही वेळा ढग कापसांच्या पुंजक्याप्रमाणे विरळ असायचे तर काही वेळा एकावर एक ढग यायचे, जणू काही ढगांचा पर्वतच ! काही वेळा तर अनेक छोटे छोटे ढग एकत्र यायचे जणू काही रांगोळीच !



विल्मिंग्टन व हेंडरसनविल या दोन्ही शहरात अनेक इंद्रधनुष्य पाहिली. हेंडरसनविल शहरात तर पाऊस आणि उन्हे एकत्र झाली की लगेचच ठळक इंद्रधनु पहायला मिळायचे. अमेरिकेतल्या चारही ऋतूंची वेगवेगळी मजा अनुभवायला मिळाली. पानगळीत रंगीत झाडे तर हिवाळ्यात बर्फ. या बर्फाची दोन्ही रूपे पाहिली. भुसभुशीत बर्फ झाडांवर लटकलेला पाहीला. बर्फाचे एक वेगळे रूप पाहिले, ते म्हणजे गवताच्या काड्या, छोटी पाने यांना बर्फ लपटलेला असायचा आणि त्यातून पारदर्शक हिरवी पाने व गवताच्या काड्या पहायला मिळायच्या. विल्मिंग्टन मधला वसंत ऋतु अगदी ठळकपणे आठवतो. हिवाळ्यात झाडांच्या फांद्यावर एकही पान नसायचे. दिवस छोटा आणि रात्र मोठी असायची. जेव्हा पक्षांचा किलबिलाट ऐकायला यायचा तेव्हा वसंत ऋतुचे आगमन झाले हे कळायचे. त्याच वेळेस पर्णहीन फांद्यांवर छोटी छोटी पाने उमलायला लागायची. गवतावर अनेक पिवळी फुले दिसायची. खारू ताई, ससे बागडताना दिसायचे. काही दिवसातच सगळीकडे हिरवेगार होऊन जायचे. दिवस मोठे व्हायचे आणि रात्र लहान व्हायची.



उन्हाळयात शनिवार-रविवार जोडून सुट्ट्या आल्या की दूरवर बाहेर फिरायला जायचो. बाहेर फिरायला जायचो तेव्हा उंच उंच पर्वतांवर जायचो. त्यात हॅंगिंग रॉक व चिमनी रॉक, गॉडफादर रॉक होते. हॅंगिंग रॉक हा कर्नाळा सारखाच खूप उंच खडक आहे. चिमनी रॉकवर जायला ५०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यावरही वर आम्ही गेलो आणि चिमनी रॉकचा फोटो काढला. या उंच पर्वतांवर गेलो आणि तिथून दूरवर पसरलेले डोंगर पाहिले. विस्तीर्ण आकाश पाहिले. उंचावरून घेतलेला चिमनी रॉकचा फोटो मी ली रिंगरला पाठवला आणि त्याने लगेचच न्यूज चॅनलवर तो “वेदर शॉट ऑफ द डे” मध्ये दाखवला होता.


आम्ही अमेरिकेत आल्यावर खूप चाललो. इथल्या शहरातले डाऊन टाऊन आम्हाला खूप आवडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चालण्याकरता फूटपाथ, फूटपाथला लागून अनेक दुकाने, उपाहारगृहे, बसायला बाकडी. फूटपाथला लागूनच कार पार्किंग. मला तर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्याची आठवण व्हायची. हेंडरसनविल मध्ये लेबर-डे वीकेंडला होणारा सफरचंदाचा सण कधी चुकवला नाही. इथे अनेक सफरचंदे विक्रीला असायची. सफरचंदाचा ताजा ताजा रसही छान लागायचा. पूर्ण रस्ताभर सर्व वयोगटातली माणसे असायची. गिटार वाजवून गाणी म्हणणारी मंडळी असायची. लहान मुलांसाठी गोल गोल फिरणारे पाळणेही असायचे. विनायक कामावर ब्रेव्हार्ड शहरात जायचा तेव्हा कारने जाताना आजुबाजुला असणाऱ्या डोंगरातून जाताना त्यालाही रम्य वाटायचे. दूरदर्शनच्या न्यूज चॅनलवर हवामानतज्ञ ली रिंगर रोज सकाळी हवामानासंदर्भातले फोटो दाखवायचा. त्याला मी सूर्योदय सूर्यास्ताचे फोटो पाठवायचे. त्यातले त्याने ३० फोटो "वेदर शॉट ऑफ द डे" मध्ये दाखवले. यात मला इतरांनी पाठवलेले खूप सुंदर फोटोही पहाता आले. बरेच हौशी कलाकार फोटो पाठवायचे.


मी काही वर्ष नोकरी केली. तिथल्या अमेरिकन मैत्रिणींना मी ख्रिसमस मध्ये काही भेटवस्तू दिल्या. या सर्व भेटवस्तु मी भारतभेटीतून खास त्यांच्याकरता आणल्या होत्या. तसेच काही अमेरिकन मित्र मैत्रिणी, भारतातल्या इतर राज्यातल्या ओळख झालेल्या मित्रमैत्रिणींना मी आपले मराठमोळे पदार्थ खाऊ घातले. (पुरणपोळी, बटाटेवडे, साबुदाणा खिचडी, सामोसे) फोडणी मध्ये भाज्या घालून पास्ता शिजवला तर काही अमेरिकेतल्या दुकानात मिळणाऱ्या भाज्यांना लसूण-कांद्याची फोडणी दिली ! अमेरिकेतल्या विद्यापीठात सोशल लाईफ असते. त्यामुळेच भारतातल्या इतर प्रांतात व देशात रहाणाऱ्या लोकांची मैत्री झाली. मूळचे पाकिस्तान मध्ये रहाणारे कुटुंब मित्र सर्वांना "ईद" ला बोलावत असत. तेलुगू मैत्रिणी वरदलक्ष्मीच्या हळदी कुंकवाला बोलावत असत. मी सर्वांना संक्रांतीच्या हळदीकुंकवाला बोलवायचे. संक्रांतीचे वाण लुटताना सर्व बायकांना खूप छान आणि वेगळे वाटायचे. इथे माझी एक कॅथेलीन नावाची अमेरिकन मैत्रिण झाली होती. ती चर्चमध्ये इंग्रजी शिकवायची. तिथे मी व श्रीलंकन रेणूका शिकायला येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळायचो. तिने एकदा तिच्या विद्यार्थ्यांना व आम्हाला ख्रिसमस पार्टीला घरी बोलावले होते. भेटवस्तुंची देवाण-घेवाण झाली. प्रत्येकीच्या हातात सुशोभित भेटवस्तूच्या पिशव्या होत्या. तिने घरी जाताना सर्वांना जेवणही घरी बांधून दिले होते. स्मरणशक्तिचा खेळ खेळताना खूपच मजा आली होती. यावरून जाणवले देश असो किंवा परदेश, सगळीकडे चालीरिती सारख्याच, देवाणघेवाण सारखीच, फक्त रूप निरनिराळे ! 

 
भारतात असताना जे काही केले नव्हते ते इथे केले. लेखन केले. वाचन केले. फोटोग्राफीचा छंद जोपासला. आम्ही दोघे ज्या शहरांमध्ये राहिलो ती सर्व शहरे खूप टुमदार होती. त्या शहरांमध्ये भारतीय खूपच तुरळक संख्येने होते. ब्लॉगलेखनामुळे मी अमेरिकेतल्या मराठी मित्रमैत्रिणींशी जोडली गेले. दूरध्वनीवरून त्यांच्या संपर्कात अजूनही आहे. खरे सांगायचे तर अमेरिकेतल्या निसर्गसौंदर्यांने आम्हाला खूप आनंद आणि उत्साह दिला !


BMM स्मरणिका टीम मधल्या सर्वांची मी आभारी आहे. Ashwini Kanthi Prerana Kulkarni,, Pranita Saklikar,, Amaltash book या लेखात वर्णन केलेले सर्व फोटो मी इथे देत आहे. सौ अश्विनी कंठी ❤ यांनी मला लेख लिहायला प्रोत्साहीत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार !!! लेखनाचा एक वेगळा अनुभव मिळाला!
स्मरणिकेतील मला आवडलेले लेख:
- माझे अमेरिकेत आगमन
- अवघे गर्जे पंढरपूर
- अवघा रंग एक झाला
- मराठीचा वेलू गेला गगनावरी
- दगडधोंड्याच शेत
- माझा बे एरिया
rohini gore

माझ्या वरील लेखाचे अभिवाचन केले आहे ऐश्वर्या गोडबोले यांनी. त्यांचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर आणि गोड आवाजामध्ये निसर्गसौंदर्याने नटलेली अमेरिका हा लेख ऐकता येईल खाली दिलेल्या ऑडिओ लिंक मध्ये.

https://cdn.bmm2024.org/wp-content/uploads/2024/06/BMM-Ebook-25.06.2024.pdf?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR2dc-cAXTXTWX2epRv6tmMg6xi_OqVF45ntsOQ






















या अधिवेशनाची खासियत म्हणजे स्मरणिका २०२४ ही ३ माध्यमांतून प्रकाशित करण्यात आली आहे. एक पुस्तक (प्रिंट) दुसरे ईबुक आणि तिसरे म्हणजे सर्व लेखांचे अभिवाचन ! ऑडिओ स्वरूपात.

Rohini Gore

Monday, April 29, 2024

सुंदर माझं घर ..... (८)

 

हे घर म्हणजे मिळाले बाई एकदाचे असे होऊन गेले होते आणि तिथल्या बाईने जे घर दाखवले की जे रिकामे होते तेव्हा ते खूपच आवडून गेले, फक्त आम्हाला जे अपार्टमेंट मिळाले ते खूप मागे होते आणि पथम दर्शनी घराच्याही मागे होते. या घराला एक मोठी बाल्कनी होती जिथे उभे राहिले असता फक्त झाडांचे दर्शन व्हायचे, पण घर मिळाले होते ते खूपच महत्वाचे होते. एक तर आधी आम्ही ज्या शहरात जागा बघायला गेलो होतो तिथे कुणी हजरही नव्हते, शिवाय फोनही उचलत नव्हते, खूप मनस्ताप झाला होता. शेवटी कंपनीत येऊन तिथल्या काहींना विचारले तर त्यानी या कॉम्प्लेक्सचा पत्ता दिला आणि लगेचच घर मिळून गेले. परत 15 दिवसांनी मिळालेल्या घराचा ताबा घेऊन विनायक कंपनीत रुजू होणार होता. Wilmington च्या घरात पसारा पडलेला होता. मी घरीच असल्याने जे सामान वापरात नाही ते खोक्यात घालायला सुरवात केली होती. मूव्हर्स आणि पॅकर्सना सामान हालवायचा खर्च किती येणार हे विचारून ठेवले होते.


त्या घरात आम्ही 10 वर्षे राहीलो होतो त्यामुळे बरेच सामान साठले होते आणि बरेचसे फेकायला झाले होते. ज्या दिवशी निघणार त्या दिवशी सकाळी मूव्हर्स वाले आले आणि सर्व सामान एकेक करत ट्रक मध्ये भरले. लाकडी समान खूप जड होते ते त्यानी पद्धतशीर पणे गुंडाळले आणि मी तयार केलेली 16 खोकी पण ट्रक मध्ये टाकली, सामानात मोठा व छोटा बेड, सहा जणांचे डायनींग टेबल व त्याच्या 6 खुर्च्या, मोठा टीव्ही, सोफा सेट, एक आरामदायी खुर्ची, ड्रेड मिल, वॉशर आणि ड्रायर होते. शिवाय 2 मोठी कपाटे होती, त्यातल्या एका कपाटाला मोठा आरसा होता. 2 तासात सर्व सामान ट्रक मध्ये भरले गेले आणि ते दोघे निघाले. आम्ही पण बाहेर मेक्सिकन उपाहारगृहात जेवून निघालो. सोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप ,फोन,त्याच्या वायरी, नवीन घरात गेल्यावर लगेच स्वंयपाक करता यावा म्हणून तांदुळ, कणिक, चहा, साखर आम्ही नेहमीच घेतो तशी घेतली. आम्हाला जे घर मिळाले होते ते खूप मागे तर होतेच शिवाय तिसऱ्या मजल्यावर होते, कचरा टाकायला कचरापेटी पण खूप लांब होती. हे घर रेल्वेचे डबे कसे असतात तसे होते. सुरवातीला हॉल आणि त्याला लागून कीचन, नंतर डाव्या, बाजूला एकेक अशा दोन बेडरूम, उजव्या बाजूला टब बाथ, कमोड यांच्या खोल्या. मधून जायला जागा. घरात हवा यायला फक्त एक बाल्कनी की जी हॉलला लागूनच होती. या बाल्कनीचे दार उघडले की किडे येत असत. त्यामुळे उन्हाळ्यात दार जास्त उघडे ठेवता येत नसे. शिवाय हिवाळ्यातही नाहीच. फक्त थोडे किलकिले करून ठेवायचो. घर आणि आजूबाजूच्या निसर्ग मात्र खूपच छान होता.


या घरापासून विनायकाची कंपनी खूप लांब होती. कारने जायला त्याला 40 मिनिटे लागायची. सकाळी 8 ला विनायक पोळी भाजीचा डबा घेऊन जायचा ते घरी यायला त्याला 6 वाजायचे. काम खूप असेल तर कधी 8 ही वाजयचे तोपर्यंत मी घरात एकटीच असायचे. या घरात मला खूप निराशा आली. एक तर भारतीय अगदी तुरळक होते. तसे ते Wilmington मध्येही नव्हतेच, पण तिथे विनायकचे ऑफिस खूप जवळ होते त्यामुळे तो दुपारी घरी जेवायला यायचा. कार ने अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर त्याचे ऑफिस होते, त्यामुळे कंटाळा यायचा नाही, शिवाय मी काही ना काही उद्योगात मग्न असायचे. असलेले उद्योग करण्याची लिमिटही संपून गेली होती. काहीतरी नवीन शोधायला हवे होते. या अपार्टमेंट complex च्या बाहेर पडल्यावर एक फूटपाथ होता तो थेट इंग्लस नावाच्या वाणसामानाच्या दुकानात पाशी संपायचा. आठवड्यातून 2 वेळा चालत इंग्लस मध्ये जाऊन तिथे काहीतरी खादाडी करू घरी परतायचे. दर आठवड्यात 2 वेळा असे चालण्याचे रुटीन आखून घेतले होते. एके दिवशी मी दुकानात विचारले मला इथे नोकरी मिळेल का, तर तिथल्या store manager ने ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आणि अर्ज करून लगेच भेटायला या असेही सांगितले आणि त्याप्रमाणे मी केले. माझी नोकरी सुरू झाली. ही नोकरी खूप वेगळी होती. 8 तास उभे राहून पदार्थ बनवण्याची होती. मी शाकाहारी असून मांस घालून सँड्विचेस बनवायला शिकले. इतरही बरेच शिकायला मिळाले. नोकरी आठवड्यातून 4 दिवसांची होती. खूप दमणूक व्हायची पण माणसात आल्याने उत्साह आला होता. इतर देशातल्या बायकां बरोबर काम करता करता गप्पाही व्हायच्या.


येताना मी चालत यायचे. चालायला बराच उतार आणि नंतर चढ उतार होते. चालून पाय मोकळे व्हायचे. ८ तास उभे राहून काम असल्याने पाय मोकळे व्हायला चालत येताना पायाच्या शिरा मोकळ्या व्हायच्या. एक दोन ठिकाणी एका कट्यावर बसून मी थोडा ब्रेक घ्यायचे. निघताना कॉफी आणि डोनट खाऊन निघायचे. घरी आल्यावर खाली जिन्यातच मी धापा टाकत बसायचे. माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू यायचे. घरी आले की केसांचा बांधलेला बुचडा सोडायचे. डोक्यावर असलेली इंगल्सची टोपी पण भिरकावून द्यायचे. कपडे बदलून गाऊन घातला की मोकळे मोकळे वाटायचे. टब मध्ये पाण्याखाली पाय सोडून बसले की पाय शेकून निघायचे. हिवाळ्यात गरम पाणी आणि उन्हाळ्यात गार पाणी टबामध्ये असायचे. लगेच पोहे, चहा करून पलंगावर आडवी व्हायचे. डोळे मिटून शांतपणे पडले की आराम वाटायचा. नंतर पोळी भाजी करून जेवण, दोघांचे डबे भरून ते फ्रीज मध्ये ठेवायचे. भांडी विनायक घासून विसळायचा. कारण की मला घासलेली भांडी विसळाची पण ताकद उरायची नाही. रात्रीच ओटा बिटा स्वच्छ करून कचरा पण टाकून यायचे आणि सकाळी घाई होऊ नये म्हणून कामावर जाण्यासाठी जय्यत तयारी करून ठेवायचे. उठलो की पटापट आवरून निघणे व्हायचे. विनायक आधी मला इंगल्स मध्ये सोडायचा आणि तो पुढे कामावर जायचा.


एका वर्षानंतर आम्ही जागा बदलली ती होती डोंगरावर आणि माझे नोकरीचे ठिकाण होते डोंगराच्या पायथ्याशी. मला नोकरीचे ठिकाण चालत जाण्यासाठी जवळ पडावे म्हणून घर बदलले. कामावरुन घरी येताना खूपच चढण होती. हे जे घर होते ते आम्हाला दोघांनाही खूपच आवडले होते. आत्तापर्यंतच्या घरामध्ये सर्वात हे घर आवडले. प्रत्येक खोलीत भरपूर उजेड होता. दारातून प्रवेश केला ही हॉल आणि त्याला लागूनच कीचन. हॉलच्या दुसऱ्या बाजूला दुसरी बेडरूम आणि हॉल नंतर मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला ३ खिडक्या होत्या. हॉलला ३ खिडक्या आणि दुसऱ्या बेडरूमला एक खिडकी होती. या घराला बाल्कनी नव्हती. कुठल्याही खिडकीतून बाहेर डोकावले की निळंशार आभाळ दिसायचे. ढगही दिसायचे. आकाशात निर्माण होणार रंग आणि सूर्यास्त दिसायचा. सूर्योदय कधी दिसला नाही पण तरीही पहाटे आकाशातले रंग आणि ढग दिसायचे. या घरात आम्ही ५० इंची टिव्ही घेतला आणि नेटफ्लिक्सही घेतले. इथल्या आणि आधीच्या घरातही डायनिंग टेबल वर जेवायला बसायचो. विल्मिंग्टनला मात्र कधीही बसलो नाही. तिथे सोफ्यावर बसून एकीकडे लॅपटॉपवर काही ना काही बघायचो. तिथल्या घरात कॉफी टेबलवर खूप पसारा असायचा. पुस्तके, लॅपटॉप, चहाचे कप, पिण्याची भांडी. हे कॉफीटेबल खूप मोठे होते आणि अजूनही आहे. फक्त त्यावर आता मोठा टीव्ही बसवला आहे.


विनायकच्या तिसऱ्या नोकरीनिमित्ताने आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्याला कायमचा रामराम ठोकला. या राज्यात खूप ठिकाणी हिंडलो. जवळजवळ काही समुद्रकिनारे सोडले तर आम्ही सर्व राज्य पालथे घातले. इथून न्यु जर्सी मध्ये येताना नेहमीप्रमाणेच पॅकिंग बिकींग झाले. मी जिथे नोकरी करायचे तिथल्या मैत्रिणीना मिठी मारून रडले. सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या आणि एक शुभेच्छापत्रही दिले. इथले स्थलांतर कारने १२ तासांचे होते म्हणून एके ठिकाणी आम्ही रात्रीचे एका हॉटेल मध्ये थांबलो आणि नवीन शहरी नवीन घरी आलो. ही जागाही खूप मोठी आणि रेल्वेच्या डब्यासारखीच आहे. एकापाठोपाठ एक खोल्या. इथे हॉल आणि स्वयंपाकघरातून समोरे मोठे पटांगण दिसते. पटांगणात ठिकठिकाणी बसायल लाकडी बाकडी आहेत. शिवाय मुलांना खेळायला झोपाळे आणि घसरगुंड्याही आहेत. उन्हाळ्यात घरात बसून पटांगणातील जत्रा बघायला छान वाटते. इथे मुलांचा कलकलाट असतो. कोणी बॉल खेळतो तर काहीजण क्रिकेट खेळतात. थंडीत चिटपाखरूही नसते. बर्फ पडला तर चोहोबाजूने बर्फच बर्फ असतो. त्यावर पक्षी बसलेले असतात.


आम्ही सध्या ज्या घरात रहातो तिथे आल्या आल्या लॉक डाऊन सुरू झाला. त्यामुळे त्याच्या आठवणी आहेत. या घरात मी माझी २ पुस्तके स्वप्रकाशित केली त्या आठवणी आहेत. पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मी पुण्याचे श्री पुरंदरे यांच्याकडे ईमेलने वर्ड फाईल पाठवायचे. नंतर ते मला परत टाईप करून वर्ड फाईल आणि पिडीएफ फाइल्स पाठवायचे. त्या सर्वाचि प्रिंट काढून मी चुका दुरूस्तीचे काम करायचे. लाल पेनाने मजकूर खोडणे, दुसरा मजकूर लिहिणे, फालतू टायपिंगच्या चुका दुरूस्ती, शुद्धलेखन असे बरेच काम होते. दुरुस्ती करून ते परत मला फाईल्स पाठवायचे. सरतेशेवटी प्रत्येक पुस्तकाच्या १०० प्रति काढल्या आणि नातेवाईक, मित्रमैत्रिणींना वाटल्या. पुस्तक विनामुल्य ठेवले. एकाचे नाव आहे स्मृती आणि दुसऱ्याचे नाव आहे केल्याने देशाटन. या दोन्ही पुस्तकात अनुक्रमे पहिल्या पुस्तकात माहेरच्या घराच्या आठवणी व दुसऱ्यात अमेरिकेत आलेले माझे अनुभव आहेत.


लॉकडाऊनच्या आठवणी मी ब्लॉगवरच्या २०२० या लेबलमध्ये लिहिल्या आहेत. आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकूण १० घरे झाली. स्थलांतर इथले आणि तिथलेही झाले. एकूणच खूप अनुभव जमा झाले आणि मला ब्लॉगवर लिहायला निमित्त मिळाले. सुंदर माझं घर ही लेखमाला मी इथेच समाप्त करत आहे. ही लेखमाला ज्यांनी वाचली, आवडली, अभिप्राय दिले त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. Copy Right - Rohihi Gore


https://archive.org/details/20230308_20230308



https://archive.org/details/20230309_20230309_0202