सी सेव्हन मधली एक बेडरूम की जी नंतर माझीच होऊन गेली होती. याचे कारण
पहिल्यांदा तिथे डेस्कटॉप होता. नंतर लॅपटॉप आला. आधी इंटरनेट कनेक्शन खूप
स्लो होते, नंतर ते फास्ट झाले. मास्टर बेडरून मधून मध्यरात्री मी हळूच
उठून दुसऱ्या बेडरून मध्ये यायचे. डोक्यात सतत काही ना काही घोळत असायचे आणि जे काही सुचेल ते लगच्यालगेच वहीत उतरवण्यासाठी मी दुसऱ्या
बेडरूम मध्ये येत असे.
वहीत लिहिण्यासाठी म्हणून यायचे खरी, पण ते लिहून झाल्यावर साहजिकच मला डेस्कटॉप उघडून मनोगतावर काय काय लेखन आले आहे ते बघण्याचा मोह व्हायचा व याहू मेसेंजर आपोआप उघडल्यामुळे तिथे असलेल्या काहीजणींशी बोलणेही व्हायचे. असे करता करता ती बेडरूम माझीच होऊन गेली ! पहाटे जेव्हा मला आपोआप जाग यायची तेव्हा पक्षांची चिवचिव ऐकू यायची.
बेडरूमला लागूनच एक झाड होते. तिथे पक्षी असायचे. हे पक्षी पहाटे पहाटे खूप
छान गप्पा मारायचे. एकाने किलबिल केली की लगेचच दुसरा पक्षी त्याच्या आवाजात त्याला साथ द्यायचा. मधूनच तिसऱ्या पक्षाची त्याच्या आवाजातली साथ. वेगवेगळे आवाज एकमेकांना साथ देत आहेत हे ऐकून खूप छान वाटायचे. हा काळ साधारण पहाटे ५ ते ६ च्या सुमाराचा असायचा. एकदा का उजाडायला सुरवात झाली की पक्षांची किलबिल अचानकपणे बंद व्हायची. एकदा जेव्हा मला अशीच पहाटे जाग आली तेव्हा या पक्षांच्या गप्पा मी डिजिकॅम मधून टेप केल्या होत्या. काहीवेळेला जेव्हा पहाटे जाग यायची तेव्हा मी खिडकीतून डोकावले की फटफटलेले दिसायचे. आकाशातही सुंदर रंग जमा झालेले असायचे. दार उघडून बघायचे तर उजवीकडे क्षितिजावर लालसर छटा उमटलेली असायची. . लगेचच कॅमेरा घेऊन खाली जायचे. हवेत एक प्रकारचा छान थंडावा असायचा.
क्षितीजावर उमटलेली लालसर छटा छेदून सूर्याचा लाल गोळा हळुहळू सरकत वर
यायचा. काही क्षणातच लाल चुटुक गोळ्याचे पिवळ्या रंगात रूपाअंतर व्हायचे
आणि नंतर पांढरा शुभ्र सूर्य दिसायला लागायचा. डोळे दिपून जायचे. एकदा तर लाल चुटूक सूर्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातील रंग आणि ढगांचेही वेगळे रंग होते. आकाशात कुणीतरी पेंटींग केलयं असेच वाटत होते. सूर्योदयाची अशीच काही वेगवेगळी रूपे मी कॅमेरात साठवलेली आहेत. शिवाय ती ली रिंगरलाही पाठवलेली आहेत.
विल्मिंग्टन मध्ये कोणताही ऋतू तीव्र नव्हता. १० वर्षात मोजून ३ वेळाच
हिमवर्षाव झालेला आहे. २००९ साली हिमवृष्टी झाली ती म्हणजे कापसा सारखा स्नो पडून सर्वत्र पांढर झाले खरे, पण काही क्षणातच ढ्गात लपलेला सूर्य वर आला आणि बर्फाचे पाणी पाणी झाले. २०११ साली चा स्नो मात्र छानच पडला. जिन्यातही बर्फाचा ढीग साठला होता. त्यावरून चालत
खाली उतरणे म्हणजे एक दिव्यच होते. पण तरीही कठड्याचा आधार घेत घेत खाली
उतरले. पूर्ण अपार्टमेंटच्या आवारात सावकाश चालत एक चक्कर मारली. तळ्याच्या आजुबाजूला साठलेला बर्फ आणि मधोमध पाणी खूप छान दिसत होती. बदकांचे पाय चालताना घसरत होते. अनेक फोटो घेतले. नंतर स्नो मॅन, स्नो डॉल आणि स्नो गर्ल बनवली. या बनवलेल्या कलाकृतींचेही फोटो घेतले. २०११ सालची हिमवृष्टी खूप आनंद देवून गेली. २०१४ साली मात्र जो बर्फ पडला तो खुप क्रिस्पी होता. त्यावरून चालणे खूप अवघड होऊन बसले होते. या बर्फाचेही रूप छानच दिसत होते. जिन्यावर साठलेल्या बर्फाची एक स्नो वुमन बनवली.
अगदी सुरवातीला जेव्हा या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा प्रत्यक्षातले
मित्रमैत्रिणी कोणीही नव्हते आणि अशी परिस्थिती १० वर्षे झाली तरी तशीच राहिली. ऑनलाईन मित्रमंडळी जमा होण्या आधी सुरवातीला डेस्कटॉपवर म्युझिक इंडिया ऑनलाईन वर गाणी ऐकायचो. शिवाय मनोगतावर लिहिलेल्या कविता, लेख, चर्चा वाचायचो. जेव्हा मनोगतावर पाककृती विभाग सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या लेखनाला सुरवात झाली. पण एकूणच या सर्वांच्या आधी मी टिव्ही बघत होते. डीश नेटवर्क घेतले होते. तिथे सोनी, झी सिनेमा आणि सहारा वन अशी ३ चॅनल्स घेतली होती. तिथल्या काही मालिका मला अजूनही आठवत आहेत. त्या अनुक्रमे "एक लडकी अंजानी सी" " हरे काँच की चुडियाँ" "वो रहनेवाली महलोंकी" "साँस बिना ससुराल" "वैदेही" खूप छान होत्या या मालिका. मला खूपच आवडल्या होत्या. घरही मी खूप टिपटॉप
ठेवायचे. शिवाय झी सिनेमावर सिनेमे पाहण्यातही छान वेळ जायचा. त्यावेळेला
कॉलिंग कार्ड होते. १० डॉलरला २० मिनिटे मिळायची. या कार्डावरून भारतात फोन व्हायचे. नंतर ही कार्ड स्वस्त झाली. vonage आल्यापासून मात्र अगणित इंडिया कॉल्स सुरू झाले. अमर्याद बोलणे
सुरू झाले. अमेरिकेत झालेल्य मैत्रिणींशीही अमर्याद बोलणे सुरू झाले ते आजतागायत !!
रात्री जेवल्यावर फिरायला जायची सवय की जी भारतापासून होती. ती इथे २००१ ला आल्यानंतरही ४ ते ५ वर्षे टिकली. नंतर मात्र विनायकचे ऑफीसमधले काम वाढल्यावर आमच्या दोघांचे मिळून फिरणे बंद झाले. इतरत्र शनिवार रविवार होत असे. पण रोजच्या रोज चालणे हे बंद झाले. मी संध्याकाळचे चालणे सुरू केले. अपार्टमेंटच्या आवाराबाहेर जो रस्ता होता
तो डाव्या बाजूला विनायकच्या ऑफीसकडे जाणारा होता आणि उजवा रस्ता काही वेळाने बंद होऊन परत त्या रस्त्याला दोन वेगवेगळे रस्त फुटत होते. मी त्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांना ज्या स्टॉप साईन्स आहेत की ज्या काही ठराविक अंतर पार पाडून गेल्यावर असतात त्या सर्व ऍड करत खूप चालायचे.
सर्व मिळून माझे तासाच्या वर चालणे व्हायचे.
विनायक रविवारी सकाळी २ मैल चालून यायचा. त्याने एक रस्ता शोधून काढला होता की जो
पूर्ण वेटोळा होईपर्यंतचा रस्ता होता.
क्रमश : .....