हिमवादळ येणार याची वार्ता आम्हाला वेदर न्युजवर कळाली. तसे तर कामावर
जाताना रोजच्या रोज हवामान बघावेच लागते. विशेष करून थंडीच्या दिवसात
पाहावेच लागते. विंडचिल किती आहे, थंडीमध्येही पाउस आहे का, तापमान मायसन
मध्ये आहे का, तर वेदर चॅनलवर आम्हाला वादळाबद्दल कळाले. वेस्टर्न नॉर्थ कॅरोलायना
मध्ये म्हणजे आम्ही जिथे डोंगराळ भागात राहत होतो तिथे हिमवादळ येणार आणि
१८ ते २० इंच स्नो पडणार आहे हे कळाल्यावर इथे राहणारे सर्व पब्लिक पॅनिक
झाले. मी ग्रोसरी स्टोअर्स मध्ये डेली सेक्शनला काम करत असल्याने लोक किती
पॅनिक होतात हे जास्त कळत होते. पॅनिक होणे साहजिक आहे कारण की पॉवर
जाणार आणि ती गेल्यावर इथे इलेक्ट्रिक शेगड्या बंद होतात आणि स्वयंपाक
बनवता येत नाही. अर्थात जे लोक घरी बनवतात त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम
येतो. जे जेवण घरी बनवत नाहीत त्यांना ब्रेड आणि बटर बाहेरूनच
जास्तीचे विकत घ्यावे लागते. हातात वेळ आहे ना, होता येईल तितके सामान भरून घ्या असे सर्वांचे होते.
शुक्रवारी कामावर खूपच वैताग आला होता. हॉट बार, सब बार, मीट सेक्शन
सगळीकडे रांगाच रांगा. आम्ही म्हणजे मी , विकी आणि कार्मेन उदपादन विभागात होतो. आम्हाला सँडविचेस बनवायला जे मीट लागते त्याची यादी आम्ही मिट केस
मधल्या लोकांना देतो त्यांनाही इतके काम होते की आम्हाला लागणारे मांस
सर्वच्या सर्व कापून देता आले नाही. कारण तिथेही लोकांनी गर्दी केली होती.
उदपादन विभागात बरेच काही बनवून ठेवा असे आम्हाला आमच्या मॅनेजर जेमिने
सांगितले. कस्टमर फर्स्ट त्यामुळे आम्हाला खूपच वैताग आला. हॉट बार, सब
बारला आम्हाला मदतीसाठी जावे लागत होते आणि शिवाय आमचेही काम करायचे होते.
खुपच दमायला झाले होते. डोकेही खूप दुखत होते. घरी आले आणि विनायक पुरते
जेवण बनवले. मी कामावरून आल्यावर पोहे करून खाल्ले आणि चहा प्यायला
होता त्यामुळे मला विशेष भूक नव्हती आणि काही खावेसे पण वाटत नव्हते. डोळे
मिटून शांतपणे झोपावेसे वाटत होते. आणि तसेच केले. शनिवारी सकाळी उठल्यावर
जरा बरे वाटले पण भूक खूप लागली होती.शनिवारी सकाळी उठल्या
उठल्या शांतपणाने बसून चालणार नव्हते. कामाला जुंपून घ्यावे लागणार होते.
पॉवर जाण्याची शक्यता असते आणि इथे तर इलेक्ट्रिक शेगड्या असतात त्यामुळे
पॉवर नाही तर शेगड्यांचा काही उपयोग नाही.शॉवरला गरम पाणीही मिळत नाही.
त्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी आम्ही दोघे उठलो आणि कामाला लागलो. तसा तर
शनिवार असल्याने पुढील आठवड्याची ग्रोसरी करायचीच होती. त्याची यादी करून
विनायकला दिली. आणि विनायक अंघोळ करून बाहेर पडला. विनायकने आठवड्याची
ग्रोसरी करून आणली.
आणि मी उठल्यापासून दिवसभर स्वयंपाकच करत होते.
शनिवारी वडा सांबार केला. वडा सांबार करण्यासाठी डाळ वाटून घेतली.
इंस्टंट शेवया खीर केली. लोणी कढवले. लसूण चटणी आणि ओल्या नारळाची चटणी
वाटून घेतली. रविवारचाही दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून ठेवला. पोळी भाजी.
कोशिंबीर, थोडा भातही लावला कूकरला. सांबार थोडे जास्तीचे केले. जर का पॉवर गेलीच तर सोमवारी ब्रेड
बरोबर चटण्याही खायला होतील म्हणून जास्तीच्या करून ठेवल्या. फळे आणि
बटाटा चिप्सही आणले. सगळी जय्यत तयारी केली. दुपारी जेवताना वडा सांबार ,
चटणी खाताना खूप छान वाटत होते. आणि त्याच वेळेला स्नो फॉल व्हायला सुरवात
झाली. गरम गरम तिखट तिखट सांबाराने तोंडाला चव आली.
मला शुक्रवारी
खूप दमायला झाले होते. आणि डोके दुखत असल्याने केळे आणि कॉफी पिऊन झोपले
होते त्यामुळे अजिबात चांगली झोप लागली नाही. खूप गरम होत होते म्हणून
रात्री हीटर थोडा कमी केला तेव्हा झोप लागली. शुक्रवारचा दिवस
डोकेदुखीचा, शनिवारचा दिवस कामाचा गेला. रात्री ढो ढो भांडी पडली. सगळी
भांडी विनायकला आधी विसळून दिली. मग त्याने ती घासली आणि नंतर मी विसळली.
कचराही टाकून आलो.
रविवारचा दिवस उजाडला. मला कामावर जायचे होते. मफलर टोपी, हातमोजे, जाकीट सर्व तयारीनिशी खाली गेलो आणि पार्किंग लॉट मधून कार बाहेर काढायला लागलो. कार नेहमीसारखीच बर्फाने झाकून गेली होती.
थंडीत नेहमीच जायच्या आधी कार १५ मिनिटे गरम करून ठेवायला लागते. तसे तर
विनायकने कार गरम करून ठेवलीच होती. अपार्टमेंटच्या खाली एक फावडे होते. ते
घेऊन कारच्या आजुबाजूचा बर्फ विनायकने काढायला सुरवात केली. मी कारवरचा बर्फ साफ करायला सुरवात केली. ते
फावडे इतके काही जड असते ना की माझ्याच्याने तर ते उचलतच नाही. कार सुरू
करण्यासाठी कारमध्ये आम्ही दोघे बसलो. कार पटकन कधीच बाहेर येत नाही. बर्फ
पडताना तो भुसभुशीत असतो त्यामुळे लगेच निघतो. पण जर का तापमान खाली गेले
तर तो सगळीकडेच चिकटतो. कारच्या आजुबाजूचा वरवरचा बर्फ भुसभुशीत होता पण
अगदी खालचा घट्ट झाला होता. त्यामुळे कारची चाके तिथल्या तिथेच फिरत होती.
अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या एका माणसाने आम्हाला कारच्या आजुबाजुला साठलेला
बर्फ पटापट फावड्याने साफ करून द्यायला मदत केली. विनायक कार सुरू करत
होता. थोडी मागे, थोडी पुढे अशी कारची कसरत चालली होती.
कार थोडी मागे आणून वळवणार, पण वळतच नव्हती. परत आम्ही दोघे खाली उतरलो.
चाकाच्या आड भला मोठा बर्फाचा थर आडवा आला होता. तो विनायकने साफ केला. हे
सर्व करत असताना फ्रीजिंग रेन पडायला सुरवात झाली होती. बर्फ खूपच साठला
होता. चालण्यासाठी बर्फामध्ये पाय घालावा तर तो पटकन खाली जात होता.
त्यामुळे बुटात बर्फाचे पाणी साठले. मोजे ओले झाले. एकीकडे फ्रीजींग रेन,
एकीकडे बर्फ साफ करतोय, परत एकदा कारमध्ये बसून वळवण्यासाठी प्रयत्न करतोय.
पण कार जागची हालत नव्हती.
त्या माणसाने आमची कसरत
बघितली आणि परत एकदा तो मदतीसाठी आला. तो म्हणाला. मी ट्राय करू का? मग
त्याने आमची कार वळवून दिली. आम्ही त्याचे आभार मानले. विनायकने मला कामावर
सोडले. मी जिथे कामाला जाते तिथला पार्किंग लॉट आणि जाण्यायेण्याचा
रस्ता साफ करून ठेवतात. म्हणजे तसे काम देऊ केलेले असते. हायवे वर पण मीठ
टाकून ठेवलेले असते बर्फ वितळण्याकरता. शिवाय रस्त्यावरचा बर्फही साफ करून
ठेवायला गाड्या फिरत असतात.रविवारचा कामावरचा दिवस खूपच वेगळा
होता. खूपच तुरळक माणसे कामावर रूजू झाली होती. माझे घर कामाच्या
ठिकाणापासून खूपच जवळ आहे म्हणून मी कामावर गेले होते. डोंगरावर आमचे घर
आणि डोंगर उतरला की माझे कामाचे ठिकाण. इंगल्स मध्ये खूप वेगळे वातावरण
होते. सर्व स्टोअर्स जवळ जवळ रिकामेच होते. गर्दी असलेले स्टोअर आणि रिकामे
स्टोअर एका पाठोपाठ डोळ्यासमोर येत होते आणि असा बदल पाहून मजाही वाटत
होती. असा खूप वेगळा कामावरचा दिवस अनुभवायला मिळाला. डेली सेक्शनला
ऍसिस्टंट मॅनेजर, मी आणि अजून दोघी होत्या. आणि दोघे पुरूष माणसे होती.
ब्रेकफास्ट साठी आणि जेवणासाठी काहीजण आली होती.
मी मला होता होईल
तितके काम केले आणि एकीने मला घरी सोडले. मी तिचे खूप आभार मानले. घरी आले
आणि चहा घेतला. शनिवारचे जेवण बनवलेले रविवारी आणि सोमवारी सकाळीही कामाला
आले. पॉवर गेली नाही पण इंटरनेट अधून मधून जात होते. रविवारी पण खूप
दमायला झाले. चहा घेऊन पांघरूण घेऊन झोपले. स्वयंपाकाचे काम नव्हते
त्यामुळे रिलॅक्स वाटत होते.सकाळी सकाळी बर्फ काढायचा व्यायाम झाला. आणि
कामावर पण उदपादन विभागात मी एकटीच असल्याने दमायला झाले. रात्री काही
करायचे नव्हते. जेवून झोपलो. पण मला काल आणि परवाही अजिबात चांगली झोप
लागली नाही.
आज सकाळी लवकरच जाग आली. आजचे तापमान वाढले होते. बर्फ वितळायला सुरवतही झाली. आज दुपारी पण फक्त भाजी केली. पोळ्या
केलेल्याच होत्या. त्या कामी आल्या. आज दुपारी जेवल्यावर मात्र जरा चांगली
झोप लागली. उठल्यावर अर्थातच चहा आणि परत थोडी आडवी झाले. संध्याकाळी
अपार्टमेंटच्या आवारात एक चक्कर मारून आले. छान वाटले चक्कर मारताना.
निसर्गाचे रूप बघताना फ्रेश वाटते नेहमीच !
शुक्रवारी दुपारपासून सोमवार पर्यंत स्नो पडत राहिला. कधी हळू हळू तर कधी खूप जोरात. तर कधी स्नो
थोडी विश्रांतीही घेत होता. १८ इंच स्नो पडेल असे वर्तवले होते. पण १४
इंचच पडला. मायनस मध्ये तापमान तिनही दिवस होते. प्रत्यक्षात जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कळाले की बराच स्नो फॉल
झालेला आहे. तापमान सारखे बदलत होते. शून्य डिग्री सेल्सिअस, तर कधी थोडे
जास्त, तर कधी मायनस मध्ये. त्यामुळे काही वेळ बर्फ न साचता खाली भुसभुशित झालेला होता. या वादळामध्ये विंडचिल नव्हती ते एक बरे झाले.
सतत ३ दिवस थोडा थोडा करत स्नो पडला. वादळामुळे तिनही दिवस वेगवेगळे गेले.
भरपूर काम, नंतर आराम, जीवनात वेगळे असे काहीतरी
घडले की बरे वाटते. मन नव्याने प्रफुल्लीत होते !!