Monday, August 31, 2020

स्वर्गात विचारसभेचे अधिवेशन

 मनोगत या मराठी संकेतस्थळावर विनायक गोरे यांचे प्रकाशित झालेले लेखन मी माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.

मूळ हिंदी लेख - स्वर्ग में विचारसभा का अधिवेशन

लेखक - भारतेंदु हरिश्चन्द्र

१. स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू १८८३ च्या ऑक्टोबरात झाला, तर केशवचंद्र सेनांचा १८८४ च्या जानेवारीत. प्रस्तुत लेख भारतेंदू यांनी या दोन घटनांनंतर काही महिन्यातच लिहिला असावा. कारण भारतेंदूंचा मृत्यूही १८८५ च्या जानेवारीत झाला. या लेखामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एका समकालीन व्यक्तीच्या दृष्टीकोनातून दोघांच्या कार्याचे मूल्यमापन मांडले आहे. लेखामधील उपरोध आणि नर्मविनोद लक्षणीय आहे.

२. मूळ लेखातले कंझर्वेटिव, लिबरल, असे अनेक इंग्रजी शब्द अनुवाद न करता तसेच वापरले आहेत.

स्वामी दयानंद सरस्वती आणि बाबू केशवचंद्र सेन 

मृत्यूनंतर स्वर्गात आल्याने तिथे मोठीच खळबळ उडाली. स्वर्गवासी लोकांपैकी अनेक त्यांचा तिरस्काराने  धिक्कार करू लागले तर इतर अनेक त्यांची स्तुती करू लागले. स्वर्गातही कंझरवेटिव आणि लिबरल असे दोन पक्ष आहेत. जुन्या काळचे जे ऋषीमुनी यज्ञ किंवा कठोर तप करून, उपास-तापास करून, शरीर कृश करून मृत्यू पावल्यावर स्वर्गात गेले त्यांच्या आत्म्यांचा कंझर्वेटिव पक्ष, तर जे केवळ आत्म्याची उन्नती करून, चांगले सामाजिक कार्य करून किंवा परमेश्वराची भक्ती करून स्वर्गात गेले त्यांच्या आत्म्यांचा लिबरल पक्ष. वैष्णवांना दोन्ही पक्षांनी बहिष्कृत केले होते, कारण त्यांचे संस्थापक लिबरल पक्षाचे असले तरी नंतर हे लोक "रॅडिकल्स" काय "महा- रॅडिकल्स" झाले. बिचाऱ्या वयोवृद्ध व्यासांना दोन्ही पक्षांचे लोक पकडून नेत आणि जबरदस्तीने आपापल्या सभांचे "चेअरमन" बनवत. आपला प्राचीन अव्यवस्थित स्वभाव आणि सत्शीलपणा या गुणांमुळे व्यासही ज्या सभेत जात तिथे त्या पक्षाला अनुकूल भाषण करीत. कंझरवेटिव पक्ष प्रबळ होता, त्याचे मुख्य कारण असे की स्वर्गातले इंद्र, गणेश असे जमीनदार लोक या पक्षाबरोबर होते. कारण स्वर्गात उदारमतवादी लोकांचे बहुमत झाले तर बंगालच्या जमीनदारांप्रमाणेच त्यांनाही अग्रपूजेचा मान आणि हविर्भागातील प्राधान्य न मिळण्याचा धोका होता.

अनेक ठिकाणी प्रकाशसभा झाल्या. दोन्ही पक्षाच्या लोकांनी अभिनिवेशाने आपापली मते मांडली. कंझर्वेटिव पक्षाच्या समर्थनासाठी देवताही आल्या आणि आपापल्या लोकांमध्ये त्या पक्षाची स्थापना केली. इकडे लिबरल लोकांची सूचना प्रसृत झाल्यावर मुसलमानी स्वर्ग, जैन स्वर्ग, ख्रिश्चन स्वर्ग या लोकांमधून पैगंबर, सिद्ध, येशू वगैरे लोक हिंदू स्वर्गात आले आणि लिबरल लोकांच्या सभेत भाषणे करू लागले. कंझर्वेटिव लोकांचे म्हणणे होते "छे! दयानंद स्वर्गात येण्याच्या योग्यतेचे अजिबात नाहीत. त्यांनी  १. पुराणांचे खंडन केले , २. मूर्तिपूजेची निंदा केली, ३. वेदांचा उलट-सुलट अर्थ लावला, ४. दक्ष नियोग करण्याचा विधी सुरू केला, ५. देवतांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आणि ६. शेवटी संन्यासी होऊन स्वतःस जाळून घेतले.  नारायण! नारायण!  ज्याने (वैदिक) धर्म विकृत केला आणि आर्यावर्ताला धर्म-पराङमुख केले, अशा मनुष्याच्या आत्म्याला कधीही स्वर्गात प्रवेश मिळता कामा नये.
 
एका सभेत काशीच्या विश्वनाथाने उदयपूरच्या एकलिंगजींना विचारले" अरे बाबा, अशा पतित माणसाला आपले म्हणायला तुझे डोके फिरते होते का? आणि आता त्याच्या पक्षाचा सभापती झाला आहेस. असेच करायचे होते तर तिकडे लिबरल लोकांच्या सभेत जाऊन बसायचे होतेस. " त्यावर एकलिंगजी उत्तरले "तुम्हा लोकांना माझा खरा उद्देश समजलाच नाही. त्याने सांगितलेल्या चुकीच्या गोष्टी मी मानत नाही किंवा त्यांचा प्रचारही करत नाही. फक्त काही दिवस आमच्या जंगल सफाईचा ठेका त्याला दिला होता, दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता त्याला योग्य ठिकाणी आणले तर त्यात काय वाईट केले? "

कोणी म्हणत "केशवचंद्र सेन! छे! छे! ह्याने साऱ्या भारतवर्षाचा सत्यानाश केला. १. वेद - पुराणांचे अस्तित्व संपवले, २. ख्रिश्चन, मुसलमान सर्वांना हिंदू बनवले, ३. खाण्या-पिण्यावरचे धार्मिक निर्बंध उठवले, ४. मद्याच्या तर नद्या वाहवल्या, हाय! हाय!, असा (पापी) आत्मा स्वर्गात कसा काय येऊ शकतो?

अश्या रीतीने दोघांच्या चारित्र्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली.

इकडे लिबरल लोकांचा पक्षही जोरात होता. या पक्षात दोन गट होते. एक केशवचंद्र सेनांची स्तुती करणारा तर दुसरा दयानंदांबद्दल आदर बाळगणारा. कोणी म्हणत "अहा! धन्य ते दयानंद, ज्यांनी आर्यावर्तातल्या मूर्ख, आळशी आणि निंदेचे धनी झालेल्या लोकांची मोहनिद्रा भंग केली. हजारो मूर्ख लोकांना ब्राह्मणांच्या (जे कंझर्वेटिवांचे पाद्री आणि प्रजेचे द्रव्य हरण करणारे होते) कचाट्यातून सोडवले. बऱ्याच लोकांना उद्योगी आणि उत्साही केले. वेदांमध्ये रेल्वे, तार, कमिटी, कचेरी वगैरेंचे उल्लेख दाखवून वैदिकांचे नाक कापले जाण्यापासून वाचवले." तर कोणी म्हणत "धन्य ते केशव(चंद्र सेन)! तुम्ही साक्षात् केशव आहात. तुम्ही ख्रिश्चन समुद्राला मिळू पाहणाऱ्या बंगाली जनांच्या वेगवान प्रवाहाला रोखलेत. ज्ञान आणि कर्म मार्गांचे अवडंबर कमी करून परमेश्वराची निर्मळ भक्ती करण्याचा मार्ग तुम्ही प्रचलित केलात. "

कंझर्वेटिव पक्षात देवतांव्यतिरिक्त अनेक लोक होते ज्यात याज्ञवल्क्यासारखे जुने ऋषीमुनी होते तर काही नारायणभट्ट, रघुनंदन भट्ट, मंडनमिश्र यांच्यासारखे स्मृती-ग्रंथकार होते. लिबरल पक्षात चैतन्य प्रभृती आचार्य, दादू, नानक, कबीर प्रभृती, भक्त आणि ज्ञानी लोक होते. अद्वैतवादी भाष्यकार, आचार्य (आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य), पंचदशीकार ( विद्यारण्यस्वामी)  प्रथम दलमुक्त राहू शकले नाहीत. मिस्टर ब्रॅडलाँप्रमाणेच या लोकांच्या समावेशाबद्दल कंझर्वेटिव लोकांनी तीव्र आक्षेप घेतला, पण शेवटी लिबरल लोकांच्या उदारपणाने त्या पक्षात ह्या लोकांना स्थान मिळाले.

दोन्ही पक्षांनी  "मेमोरॅन्डम" तयार करून, त्यावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन,  ते परमेश्वराकडे पाठवले. एकात दयानंद आणि केशवचंद्र या दोघांनाही स्वर्गात कधीही स्थान मिळू नये असा युक्तिवाद आणि आग्रह होता तर दुसऱ्यात असे म्हटले होते की दोघांनाही स्वर्गात सर्वोत्तम स्थान मिळावे.   ईश्वराने दोन्ही पक्षांच्या "डेप्युटेशन" ला बोलावून म्हटले "बाबा, आता तुमच्या लोकांची सेल्फ-गवर्नमेंट आहे. आता आम्हाला कोण विचारतो? ज्याच्या मनाला जे येईल तो ते करतो.ज्याला संस्कृतचा गंधही नाही तो धर्मविषयावर वाद करायला लागतो. आता आमचा उपयोग फक्त न्यायालय, व्यवहार किंवा स्त्रियांनी शपथ घेण्याच्या कामापुरता उरला आहे. कोणाला धाक आहे आमचा?  कोण आमचा सच्चा भक्त आहे? भूत-प्रेत, ताजिये यांच्याइतकेही आमचे महत्त्व राहिले नाही. आता वैकुंठात कोणी यावे याच्याशी आम्हाला काय देणेघेणे आहे? आम्ही जाणतो की (सनकादिक) चार मुलांनी आधीच रीत बिघडवून ठेवली आहे. आता कोणाला अडवण्यासाठी जय-विजयांना आम्ही पुन्हा राक्षस बनवावे? हवे तर सगुण माना, हवे तर निर्गुण, हवे तर द्वैत माना, हवे तर अद्वैत, आता आम्ही काही बोलणार नाही. तुम्ही आणि तुमचा स्वर्ग. काय ते बघून घ्या."

परमेश्वराच्या अशा खजील करणाऱ्या बोलण्याने डेप्युटेशनवाले वरमले. त्यांनी परमेश्वराला मोठे निवेदन वगैरे केले. त्याचा राग कसातरी शांत केला. शेवटी परमेश्वराने या विषयाचा निर्णय करण्यासाठी एक "सिलेक्ट कमिटी" स्थापन केली. त्यात राजा राममोहन रॉय, व्यास, तोडरमल, कबीर, अश्या भिन्न भिन्न मतांचे लोक निवडले. मुसलमानी स्वर्गातून एक इमाम, ख्रिश्चन स्वर्गातून मार्टीन ल्यूथर, जैनांमधून पारसनाथ, बौद्धांमधून नागार्जुन आणि आफ्रिकेतून सिटोवायोंचे बाप यांना कमिटीचे "एक्स ऑफिशिओ" सदस्य नेमले. रोमच्या जुन्या हर्क्युलिस प्रभृती देवता, ज्या आता गृहसंन्यास घेऊन स्वर्गातच रहायला आल्या होत्या आणि पृथ्वीशी संबंध तोडून बसल्या होत्या, त्यांना आणि पारश्यांच्या झरतृष्टांना "कॉरस्पाँडिंग मेंबर" म्हणून नियुक्त केले आणि आज्ञा केली की सर्व कागदपत्रे तपासून मला अहवाल द्या. आणखी एक गुप्त आज्ञा अशीही केली की (परमेश्वराने) अहवाल वाचण्याआधी त्याची कुणकुण संपादकांच्या आत्म्यांना अजिबात लागू देऊ नका. नाहीतर कोणी त्यांचे ऐको न ऐको, ते लोक उगीचच गोंधळ माजवतील.

सिलेक्ट कमिटीचे अधिवेशन झाले. सर्व कागदपत्रे नजरेखालून घालण्यात आली. दयानंदी आणि केशवी ग्रंथ, त्यांच्यावरचे आक्षेप, त्यांची खंडने आणि वर्तमानपत्रांमधून झडलेल्या चर्चा तपासल्या गेल्या. बाळाशास्त्रींसारख्या कंझर्वेटिव आणि द्वारकानाथांसारख्या लिबरल आत्म्यांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. शेवटी कमिटीने जो अहवाल दिला त्यातला महत्त्वाचा भाग असा होता.

आमची इच्छा नसतानाही परमेश्वराच्या आज्ञेवरून आम्ही खटल्याची सर्व कागदपत्रे तपासली. त्यावरून या दोन मनुष्यांबद्दल जे आम्हाला समजले ते इथे सांगतो. आमच्या मते ह्या दोन पुरुषांनी परमेश्वराने निर्माण केलेल्या मंगलमय सृष्टीमध्ये कुठलेही विघ्न आणले नाही उलट त्यात सुख आणि संतती कशी वाढेल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.  दुराग्रह आणि वाईट चालीरीतींमुळे मनासारखा वर धर्मानुसार न मिळाल्याने लाखो स्त्रिया वाईट मार्गाला लागतात, लाखो स्त्रिया विवाह होऊनही जन्मभर सुखापासून वंचित राहतात, लाखो गर्भ नाश पावतात, लाखो बालहत्या होतात त्या पापमयी, नृशंस रीती नष्ट करण्यासाठी या दोघांनी शक्य तितके प्रयत्न केले.

जन्मपत्रिकेतील ग्रहांमुळे (वधूवरांच्या आवडीनिवडी, गुणावगुणांचा विचार न करता केवळ पत्रिका जमवून लग्न ठरवण्याच्या प्रथेमुळे) नवरा - बायकोमध्ये विसंवाद राहतो. असंतोष आणि वैमनस्यामुळे स्त्रिया व्यभिचारी तर पुरूष कामांध होतात, एकमेकांत सतत भांडणे होतात, शांती स्वप्नातही मिळत नाही, वंश चालत नाही, हे प्रकार या दोघांना सहन झाले नाहीत. विधवा गर्भपात करून घेत आहेत, धर्मगुरू हे सर्व सहन करत आहेत इतकेच नव्हे तर गुपचुप उपायही करत आहेत, पाप सतत लपवत आहेत, शेवटी (विधवेचा) त्यात मृत्यू झाला तर त्यात आनंद मानत आहेत, हा प्रकार बंद करण्याचा दोघांनी नि:संशय प्रयत्न केला. जातीत योग्य नवरा न मिळाल्याने मुली मूर्ख, आंधळे किंवा नपुंसक नवरे करत आहेत.  मुले काळ्या, कर्कशा मुलीशी विवाह करत आहेत.  या गोष्टींचे दूरगामी दुष्परिणाम होत आहेत. असा हा दुराग्रह या लोकांनी दूर केला. ब्राह्मण लोक, शिकलेले असोत की मूर्ख, सुपात्र असोत की कुपात्र, व्यभिचार करोत किंवा दुसरे काही पाप करोत, पण गुरू आहेत, पंडित आहेत म्हणून त्यांना दोष देऊ नका, दोष द्याल तर पतित व्हाल, अश्या समाजाचा सत्यानाश करणाऱ्या संस्कारांना त्यांनी दूर केले. आर्य लोकांचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे, लोक कधी स्त्रीच्या मोहाने तर कधी धन, नोकरी, व्यापार यांच्या लोभाने तर कधी मद्याच्या व्यसनाने, पराभूत मनस्थितीत मुसलमान किंवा ख्रिश्चन होत आहेत. एकही मनुष्य आर्यजातीत नव्याने येत नाही, फक्त लोक धर्म सोडून बाहेर चालले आहेत, शेवटी आर्यांचा धर्म आणि जाती फक्त इतिहासात नोंद करण्यापुरत्याच राहतील, अशी परिस्थिती आधी होती. एकदा अपराधी तो कायम अपराधी. परत जातीत कसा येईल? कोणतेही पाप केले तर लपून छपून का केले नाही? या वृत्तीमुळे हजारो लोक आर्य (हिंदू) समाजातून दरवर्षी बाहेर जात होते हे या लोकांनी थांबवले. सर्वात मोठे कार्य या दोघांनी केले ते म्हणजे सगळा आर्यावर्त परमेश्वरापासून विन्मुख झाला होता, देव राहिले दूर, भूत - प्रेत, पिशाच्च, साप चावून मेलेले, आत्महत्या करून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, इतकेच नाही तर अवलिये, शहीद, ताजिये, गाझीमिया वगैरेंना देव मानून लोक त्यांची पूजा करायला लागले होते. जणू विश्वास हे व्यभिचाराचे अंग झाले होते. पाहून - ऐकून लाज वाटते की हे कसले आर्य आहेत? कुणापासून हे जन्माला आले? दयानंद आणि केशवचंद्रांनी आपल्या वक्तृत्वाने या लोकांना थपडा मारून त्यांची तोंडे दुराचारापासून सन्मार्गाकडे वळवली आणि सर्व आर्यावर्तास शुद्ध आणि निष्ठावंत केले.

बाकी या दोघांच्या चरित्रामध्ये जो फरक आहे तोही सांगितला पाहिजे. आमच्या मते दयानंदांची बुद्धी विशेष आणि प्रसिद्ध होती. आपले विचार त्यांनी अनेक वेळा बदलले. सुरूवातीला त्यांनी फक्त भागवताचे खंडन केले, नंतर सर्व पुराणांचे. काही ग्रंथ मान्य केले, काही अमान्य. आपल्या सोईची वचने मान्य केली, विरोधी वचनांना "प्रक्षिप्त" म्हटले. सुरुवातीला ते अंगाला राख फासणारे त्यागी दिगंबर साधू होते. पुढे संग्रह करीत एक एक वस्त्रे त्यांनी धारण केली. वेदभाष्यामध्ये रेल्वे, तारा (असण्याबद्दलचा) अर्थ बळेच लावला. त्यामुळेच संस्कृत चांगल्या प्रकारे न जाणणारेच त्यांचे अनुयायी झाले. जाळ्याला सुरीने कापण्याऐवजी दुसऱ्या जाळ्याने कापायचा प्रयत्न केला, त्यामुळे दोन्ही जाळी एकमेकांत गुंतून धार्मिक गृहकलह उत्पन्न झाला.

ह्याविरुद्ध केशवचंद्र सेनांनी जाळे कापून एक नवीन आणि शुद्ध मार्ग निर्माण केला. परमेश्वराला  भेटण्यासाठी कुठलाही अडथळा किंवा मध्यस्थ (ब्राह्मण, धर्मगुरू) ठेवला नाही. त्यांच्या  (बौद्धिक) शक्तींच्या उंच लाटांमुळे लोकांची अंतःकरणे आर्द्र झाली.  ब्राह्मण लोकांमध्ये मद्यपानाचे आणि मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे. पण त्यात केशवचंद्रांचा दोष नाही. परंतु कूचबिहारच्या संस्थानिकाशी संबंध जोडल्याने (आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याने) आणि येशू वगैरे लोक मला भेटतात अशी वक्तव्ये केल्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या मनाची दुर्बलता दिसून आली. पण हा एक प्रकारचा उन्माद असावा. जश्या बऱ्याच धर्मप्रसारकांनी मोठमोठ्या गोष्टी परमेश्वराची आज्ञा म्हणून सांगितल्या, तश्या एखाद - दोन गोष्टी ह्या बिचाऱ्यांनी केल्या तर असे काय मोठे पाप केले?


वर सांगितलेल्या कारणांनी केशवचंद्रांचा जसा जगभरात  मरणोत्तर सन्मान झाला तसा दयानंदांचा झाला नाही. ह्यापेक्षा वेगळे असे काही पापपुण्य या दोघांच्या मनात दडलेले असेल तर ते आम्ही जाणत नाही. ते सर्व जाणणारा तू आहेस!

अहवालाचे निष्कर्षाने नाराज झालेल्या काही विदेशी सदस्यांनी अहवालावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. अहवाल परमेश्वराकडे सुपूर्त केला गेला. त्यावर परमेश्वराची काय आज्ञा झाली आणि या लोकांना कुठे पाठवले हे एक तर आम्ही तिथे जाऊन परत येऊ तेव्हाच वाचकांना सांगू शकू किंवा काही दिवसांनी तुम्ही स्वतःच जाणू शकाल!

 

मुमताजमहलची इयरिंग

 मनोगत या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले लेखन (विनायक गोरे यांचे लेख) इथे मी माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.

मूळ कथा - मुमताजमहल का इयरिंग

लेखक - रमेश बक्षी

सकाळच्या थंड हवेमध्ये तो ताजमहालाच्या घुमटाकडे बघत होता आणि फाटक्या कपड्यांतले दोन तरूण त्याला निरखून बघत होते. ते एकमेकांत बोलत होते "हजार वेळा सांगूनही ऐकत नाही. इंग्रजी  येतं म्हणून इतका भाव खातोय. इंग्रजी येत नसतं तर त्याला काहीच करता आले नसतं. " एकीकडे घुमटाकडे पाहत तो हे बोलणे ऐकत होता. तो उत्तरला "ताजमहाल ना तुमच्या मालकीचा आहे ना माझ्या. तुम्हाला धंदा करायचा आहे आणि मलाही. त्यामुळे आपण गिऱ्हाईके वाटून घेऊ".  "जाऊ दे रे," दोघांमधला एक म्हणाला "राहा बाबा सुखात, पण एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्याच्या पोटावर पाय आणून कोणी सुखी होऊ शकत नाही. " तितक्यात दोन पर्यटक आले आणि ते दोघे त्यांच्यामागे धावले. एक जण म्हणाला "चला, तुम्हाला ताजमहालावरचे सर्वात सुंदर फूल दाखवतो. " तर दुसरा म्हणाला "चला, तुम्हाला तळघरातल्या कबरींचे दर्शन घडवतो. "

तो संगमरवरी बाकड्यावर बसला. फिकट रंगाची विजार आणि ढगळ शर्ट घातल्याने तो खरोखर कलावंत दिसत होता. आग्र्याला आल्यापासून दिवसातला जास्तीत जास्त वेळ तो इथेच घालवत असे. तो स्वतःशीच विचार करत होता- इथे आलो होतो एखादी छोटी नोकरी शोधायला, पण ताजमहालात मन इतके गुंतले आहे की आता त्याला सोडवत नाही. कॉलेजात शिकत असताना पदवीसाठी इतिहास  विषय निवडल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होत असे. पण आता मात्र स्वतःवर खुश होता. कारण इतिहास घेतला नसता तर ही संगमरवरी नोकरी कशी मिळाली असती? तितक्यात त्याचे दोन मित्र परतले.  त्यांच्या आनंदी चर्येवरून त्यांना प्रत्येकी आठ आणे मिळाल्याचे त्याने ताडले.

तेवढ्यात एक मुलगी लाल दरवाज्यातून फोटो काढताना त्याला दिसली. तो जागेवरून उठला आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाला "इथून नका काढू फोटो. बाजूने काढा. " मुलीने त्याचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले. तो परत म्हणाला "ताजमहालाची डागडुजी सुरू असल्याचे तुम्ही समोर बघताच आहात. इथून फोटो घेतले तर त्यात बांबू वगैरे येतील." "हा तर वैतागच आहे. म्हणजे काय, आता चांगला फोटो मिळणारच नाही? "  त्यावर त्याने स्वच्छ, सुंदर फोटो खिशातून काढून तिला दिला.

मुलीने त्याला धन्यवाद दिले त्याचे आभार मानले. तो तिच्याबरोबर चालू लागला. मध्येच म्हणाला "एक मिनिट इथे थांबा.  याच ठिकाणी उभे राहून ख्रुश्चेव आणि बुल्गानिन यांनी रशियन भाषेत ताजमहालाची प्रशंसा केली होती. " या माहितीने मुलगी खुश झाली. ती पायऱ्या चढत असताना तो म्हणाला "आजपर्यंत या पायऱ्या कोणी मोजू शकला नाही. " "का? तशा काही फार दिसत नाहीत!" मुलीने हळूच विचारले. "त्याचे कारण असे आहे की पायऱ्या चढताना माणसाची नजर वर राहते. संगमरवराच्या सौंदर्यामुळे दृष्टीभ्रमच नाहीतर स्मृतीभ्रंशही होतो. त्यामुळे खालच्या पायऱ्या मोजण्याचे तो विसरून जातो. " तो पाठ केलेली वाक्ये बोलत होता.

"इथे थांबा आणि आपले सँडल्स काढून ठेवा." तो म्हणाला, "संगमरवरावर चरा पडू नये म्हणून हा नियम असल्याचे लोक सांगत असले तरी खरे कारण माझ्या मते वेगळंच आहे. " "कोणते? " मुलीने उत्सुकतेने विचारले. " हा नियम शहाजहाननेच केला होता. तुम्हीच सांगा, ज्या ठिकाणी त्याची लाडकी मुमताजमहल चिरनिद्रा घेत आहे तिथे पादत्राणे घालून गेलेले त्याला कसे आवडले असते? "

तो तिच्याबरोबर चालत राहिला. पहिल्या  दरवाज्यावर कोरलेली अक्षरे तिला दाखवत म्हणाला " हे लेखन बघा. या कुराणातल्या 'आयती' आहेत. ह्यांत विशेष काय आहे ते सांगा पाहू? ",  "मला तर यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही. " मुलीने विचार करून उत्तर दिले. "मी सांगतो. हे पहा, खालची आणि वरची अक्षरं सारखीच दिसताहेत की नाही? अक्षरांचा आकार सारखाच असेल तर विज्ञानाच्या नियमांनुसार वरची अक्षरं लहान दिसायला हवीत की नाही? पण हेच तर ताजमहालाच्या निर्मात्याचे कौशल्य आहे ! वरची अक्षरं अशा हिशोबाने मोठी कोरली गेली आहेत की पाहणाऱ्याच्या नजरेला ती खालच्या अक्षरांएवढीच दिसतात. " ही गोष्ट ऐकून मुलगी भारावून गेली. नंतर त्याने तिला संगमरवरावरची फुले दाखवली. मग म्हणाला" जरा वर बघा आणि एका बाजूकडून सुरूवात करून किती प्रकारच्या रंगांचे दगड वापरले आहेत ते मोजा. " मुलीने मोजायला सुरूवात केली पण चार- पाच प्रकार झाल्यावर तिला गरगरल्यासारखे झाले. "राहू द्या, अवघड काम आहे ते. मी सांगतो तुम्हाला, एकूण वीस प्रकारचे दगड वापरले आहेत. "

"वीस? " मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारले.  'एका ऐतिहासिक पत्रात शहाजहानला शंभर प्रकारचे दगड वापरायचे असल्याबद्दल लिहिले आहे. पण आपल्या कारकीर्दीत शहाजहानने जे काही केलंय ते काय कमी आहे? फेब्रुवारी १६२८ मध्ये तो सिंहासनावर बसला ते १६५६ पर्यंत. या अठ्ठावीस वर्षात त्याने बरीच कामे केली. बुंदेलखंडातल्या रजपूत लोकांचे बंड मोडून काढले, खानजहान लोदीचा पराभव केला." "पण सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ताजमहाल बांधला. " मुलगी त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत म्हणाली. "नक्कीच. इथे चारही बाजूला बघा. मला तर वाटते की कोणी हळूवारपणे तारा छेडते आहे.  तसेही 'आर्किटेक्चर इझ फ्रोझन म्युझिक' म्हटलेलेच आहे. ताजमहाल काय आहे? तर गोठलेले संगीत आहे. " तो म्हणाला.

मुलीची नजर ताजमहालावर ठरत नव्हती. तो एकीकडे बोलत होता "तुम्हाला माहिती असेल की  मुमताजमहल ही आसफ खानाची मुलगी होती. लग्नाआधी तिचे नाव अंजुमनबानू होते. विलक्षण सुंदर होती ती. शहाजहान तिला म्हणाला होता की तू चालता बोलता स्वर्ग आहेस आणि तुझ्या सावलीत एक महाल बांधला जाऊ शकेल. " "ताजमहाल बांधून शहाजहान बादशहाने आपला शब्द खरा केला असे म्हणायचे का?" मुलीने विचारले. " असेच समजा.  "त्यावेळी मुमताजमहल थट्टेत म्हणाली होती ' माझी सावली तर काळी आहे, मग महालही काळाच होणार का?' शहाजहान त्यावेळी काही बोलला नाही, पण मला वाटते मुमताजमहलची सावलीही गोरीच असणार. " तो म्हणाला.

मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारले "किती भव्य आहे हा ताजमहाल? किती खर्च आला असेल त्याला? किती वर्षे बांधकाम चालले असेल? "

"पन्नास लाखांपेक्षा जास्त खर्च झाला त्या काळी. १६३२ मध्ये बांधकाम सुरू  झालं ते १६४३ पर्यंत चाललं. म्हणजे ११ वर्षे.  ही फुले नाहीत. अंगठीत जडवलेले हिरे आहेत. टायटन लोकांनी याचे डिझाईन तयार केलं आणि जवाहिऱ्यांनी ते काम पूर्ण केलं " "तुम्हाला तर सगळे बारकावे माहिती आहेत असं दिसतंय," ती मुलगी कौतुकाने म्हणाली.  "माझ्या आधीच्या पाच पिढ्या इथे काम करत होत्या." हे ऐकून मुलगी खुश झाली. ती मध्येच थांबून त्याने सांगितलेली माहिती आपल्या वहीत टिपून घेत होती. "मला वाटतं स्वप्नांचे दगड आणि कल्पनेचे सिमेंट वापरून ताजमहाल घडवलाय." तो एका फुलाच्या पाकळ्यांवरून बोटे फिरवीत म्हणाला, "मुमताजमहलने चौदा मुलांना जन्म दिला आणि ७ जून १६३१ रोजी तिने शेवटचा श्वास घेतला. शहाजहान किती रडला असेल त्यावेळी? तिला बुऱ्हाणपुरात दफन केले, नंतर तिची कबर आग्र्यात आणली.  चला बघू या. "

मुलगी त्याच्याबरोबर तळघरात उतरली. म्हणाली "इथे बराच अंधार आहे. " त्याने मेणबत्ती पेटवली आणि तिला पुढे येण्यास सांगितले. "या पाहा शहाजहान आणि मुमताजमहलच्या कबरी. इथे १५ सेकंदांपर्यंत आवाजाचा प्रतिध्वनी घुमतो. " मुलगी काहीतरी बोलली आणि आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकत राहिली.  तो पुढे म्हणाला " शहाजहान इथेच उभा राहून मुमताजमहला साद घालायचा. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. आग्र्याच्या पहिल्या पावसात या कबरींवर एक थेंब पडतो. हे कसे होते आणि तोच एक थेंब कसा कबरीवर पडतो मला कळत नाही.  पण मी तो थेंब पाहिला आहे. असे वाटतं की तो अश्रूचा थेंब आहे. याच कबरीला पाहून रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की ताजमहाल काळाचा गालावरच्या चमकत्या अश्रूच्या थेंबासारखा आहे.

मुलगी तो सांगत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होती. तो तिला ताजमहालाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला, "ही पाहा यमुना. ताजमहाल सर्वच बाजूंनी सुंदर दिसतो. इथेच बसून साहिर लुधियानवी म्हणाले होते " "काय? " मुलीने उत्सुकतेने विचारले. त्याने कवितेच्या ओळी गुणगुणायला सुरूवात केली.
"यह चमनजार, यह जमना का किनारा, यह महल
यह मुनक्कश दरोदीवार, यह महराब यह ताक
एक शहेनशाहने ने दौलत का लेकर सहारा
हम गरीबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक"

मुलगी ऐकत होती. तिची नजर उंच मिनारांकडे गेली. तेव्हा तो म्हणाला "आता त्यांना कुलुपे लावली आहेत. कारण लोक वर चढून आत्महत्या करायचे. आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले प्राण दिले आहेत. खरे सांगायचे तर ताजमहाल हीच मृत्यूची पूजा आहे. या कोपऱ्यात या. इथेच उभे राहून सुमित्रानंदन पंत म्हणाले होते "हाय मृत्यूका ऐसा अपार्थिक पूजन"

मुलगी प्रत्येक गोष्ट लिहून घेत होती. तो एका कोपऱ्यात गेला आणि म्हणाला " समोरच्या भिंतीवर एकावर एक अशा सर्पाकृती कोरलेल्या आहेत. त्यातल्या कितव्या आकृतीपर्यंत तुमचा हात पोचू शकेल? " मुलगी अंदाजाने म्हणाली " मी आठव्या आकृतीला स्पर्श करू शकेन. " तो हसला आणि मुलीला भिंतीजवळ घेऊन गेला. चवड्यांवर उभी राहूनही तिचा हात जेमतेम दुसऱ्या आकृतीपर्यंत पोचला. तो म्हणाला "हीच ती ताजमहालाची छोटी छोटी वैशिष्ट्यं! आता एक सांगा, घुमटाच्या वरचा भाग किती उंच असेल? " , मुलीने सांगितले "सहा ते सात फूट" "चला माझ्याबरोबर! कबरीजवळच्या फरशीवर त्याचे चित्र आहे. " ते चित्र पाहून मुलगी थक्क झाली. तो भाग कमीतकमी १५ फूट होता.  "बघा, मी सांगत नव्हतो? हीच आहेत ताजमहालाची छोटी छोटी वैशिष्ट्यं? " तो म्हणाला.  मुलीने त्याच्याबरोबर ताजमहाल बघण्यात अनेक तास घालवले . तिने जाताना त्याला दहाची नोट दिली. तो हरखून गेला. पहिल्यांदाच कोणा पर्यटकाने त्याला एकरकमी दहा रूपये दिले होते. ते पाहिल्यावर त्याच्या दोन मित्रांचा जळफळाट झाला.  त्यांच्यातला एक जण म्हणाला "हे बघ माझे पोट. त्याच्यावर या बाबूचे दोन पाय आहेत. "

त्याच्याजवळ रोजीरोटीचा व्यवसाय असल्याने तो खुशीत होता. प्राप्ती बऱ्यापैकी होत होती. सहा महिन्यांनंतर पर्यटकांचा एक जथ्था आला. तो त्यांच्यासोबत निघाला.  "या पायऱ्या पहा... आतापर्यंत कोणी त्यांची अचूक संख्या सांगू शकला नाही...मला वाटतं की ही मुमताजची गोरी सावली आहे... मुमताजने ७ जून १६३१ या दिवशी शेवटचा श्वास घेतला.. . ही बघा कबर... आग्र्याच्या पहिल्या पावसाचा पहिला थेंब... " त्या जथ्थ्यातला लोकांना कुत्सितपणे हसताना बघून तो गप्प झाला. त्यातला एक जण दोन आणे काढून त्याला देत म्हणाला "हे दोन आणे तुझ्या मेहनतीचे आहेत. पण आम्ही मूर्ख बनणार नाही. " "अरे त्याला एक आणा आणखी दे. बाकी काही असो, त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. " "तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? " त्याने विचारले. " आमच्या बोलण्याचा अर्थ असा की तू या पुस्तकातून माहिती पाठ केली आहेस आणि त्याचीच पोपटपंची आमच्यासमोर करतोयस. म्हणूनच आम्ही तुला तीन आणे देत आहोत. " त्यातला एक उत्तरला. "कोणते पुस्तक? कसले पुस्तक? " त्याने गोंधळून विचारले. दुसऱ्याने पुस्तक काढून त्याला दाखवले. त्याने पाहिले. तो जे सांगत होता ती सर्व माहिती त्या पुस्तकात होती. "हे पुस्तक कोणी लिहिले हे जर तुला जाणून घ्यायचे असेल तर लेखिकेचा फोटोही त्यात आहे. " त्या मुलाने पाने उलटून लेखिकेचा फोटो त्याला दाखवला.  फोटो पाहून त्याच्या ओठांवर रक्त, कपाळावर घाम आणि डोळ्यांमध्ये संताप दाटून आला. जिने त्याला सहा महिन्यांपूर्वी दहा रूपये दिले होते तिचाच तो फोटो होता. हे पुस्तक ताजमहालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हातोहात विकले जात होते.

तो संगमरवरी बाकड्यावर जाऊन बसला.  त्याचे दोघे मित्र कुत्सितपणे म्हणाले " अजून सांग खोट्या गोष्टी नव्याने रचून लोकांना ! " त्याला त्या मुलीने आपल्या पोटावर लाथ मारल्यासारखे वाटते होते. त्याला वाईट या गोष्टीचे वाटत होते की लोकांच्या मनोरंजनासाठी ज्या कल्पित कथा तो सांगत असे त्या सर्व या मुलीच्या पुस्तकामुळे सत्य घटना झाल्या होत्या.  तो काय करावे याचा विचार करत होता. एका मित्राने नोकरी सुचवली, पण त्याने ती नाकारली, म्हणाला "जोपर्यंत ताजमहालाच्या भिंती कायम आहेत तोपर्यंत मी दुसरी नोकरी करणार नाही."

आणखी दोन पर्यटक आले. मोठ्या हिंमतीने तो त्यांच्याबरोबर चालायला लागला. त्यांच्यातल्या एकाने त्याला देण्यासाठी एक रुपया काढताच त्याचे दोन मित्र तिथे आले.  ते पुस्तक पर्यटकांच्या हातात ठेवत ते म्हणाले "किंमत फक्त सहा आणे. याने याच पुस्तकातून पाठ करून तुम्हाला गोष्टी ऐकवल्या आहेत. " त्याने विचार केला आता इथे दिवसा येण्यात अर्थ नाही. आता फक्त रात्री यावे, तेही फक्त चांदण्या रात्री. त्यावेळी त्याचे गुपित उघड करणारे त्याचे शत्रू तिथे नसतील.

ताजमहालावर चांदण्याच्या अभ्रकाचा वर्षाव होत होता. त्या रात्री तोही अनेक पर्यटकांपैकी एक होता. त्याही वेळी एक गृहस्थ तिथे धंदा करत होते. ते घुमटाकडे पाहत म्हणत "ते बघा " आणि दोन आण्यांच्या मोबदल्यात घुमटावर चमकणारी एक तेजस्वी वस्तू दाखवीत. एका पर्यटकाने विचारले "हे काय आहे? " त्यावर ते म्हणाले "ही आहे मुमताजमहलची इयरिंग. शहाजहानने घुमटावर चांदीचा खिळा ठोकून त्याला अडकवली होती.  " त्यानेही ती इयरिंग पाहिली. त्याला हा धंदा जास्त आवडला. त्याला त्याच्या पत्नीची आठवण झाली. तिच्यासाठी त्याने एका मोठया सराफाच्या  पेढीवरून इयरिंग बनवून घेतली होती. पत्नी फार कंजूष होती. तिने ती एका पेटीत बंद करून ठेवली होती.  पुढे गर्दी वाढली. तो घरी परतला.

दुसऱ्या रात्री पौर्णिमा होती. लोण्यासारख्या ताजमहालावर दुधासारखे चांदणे बरसत होते. ते गृहस्थ मुमताजमहलची इयरिंग लोकांना दाखवत होते. तितक्यात तो जोरात ओरडला "ती बघा पडली. " लोक धावले. त्याच्या हातात वस्तू होती. तो लोकांना सांगू लागला "जी इयरिंग तीनशे वर्षे घुमटावर अडकवली होती ती खाली पडली आहे. ही पहा, मुमताजमहलची इयरिंग. मोठे मोती जडवलेली. बघा कशी चमकते आहे. तिचीच चमक घुमटावर दिसत होती. " तो लोकांकडून प्रत्येकी चार आणे वसूल करू लागला.. ते गृहस्थ दूर जाऊन झोपले होते. रात्री उशीरापर्यंत तो लोकांना ती इयरिंग दाखवत होता.

घरी परतत असताना पाठीमागून आवाज आला" मिस्टर!", त्याने थांबून मागे पाहिले. ते गृहस्थ त्याच्याजवळ येऊन म्हणाले " ती इयरिंग घुमटावरून खाली कशी पडली याचेच मला आश्चर्य वाटते आहे." तो म्हणाला " यात आश्चर्य कसले? इयरिंग वरूनच पडली आहे आणि माझी खात्री आहे की ती मुमताजमहलचीच आहे. " गृहस्थाचा चेहरा आक्रसला. "तुम्ही माझ्या पोटावर पाय लाथ मारताहात. चला हे इयरिंग पोलिसांकडे जमा करू. ताजमहाल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पोलिसांना कळलं तर ते तुम्हाला अटक करतील. "तो  त्या धमकीला   बधला नाही, तेव्हा ते गृहस्थ म्हणाले "ठीक आहे, मी आताच पोलिसांत तक्रार करतो. " इतके बोलून ते गृहस्थ पोलिस ठाण्याकडे निघाले. तो घाबरला. स्वतःशीच म्हणाला "हा मनुष्य पोटावर लाथ सहन करणार नाही. काय धंदा आहे हा? प्रत्येकाला दुसरा आपल्या पोटावर लाथ मारतो आहे असे वाटते." त्याने त्या गृहस्थाला आवाज दिला "बाबूजी! " पहिल्या हाकेतच तो गृहस्थ मागे फिरला. तो म्हणाला "इतक्या छोट्या गोष्टीकरता कशाला पोलिसात जायच्या गोष्टी करता? ही मुमताजमहलची नाही, माझ्या बायकोची इयरिंग आहे. जरा विचार करा. घुमटावरून खाली पडण्यासाठी ती मुळात तिथे असायला हवी ना? " त्यावर ते गृहस्थांचा चेहरा खुलला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले" हे मात्र खरं बोललात तुम्ही ! ताजमहालावर चांदीचा खिळा ठोकून त्यावर मुमताजमहलची इयरिंग अडकवायला शहाजहानला काय वेड लागलं होतं?" 

संगीतकार रोशन - विविध गीतकार

 मनोगतावर प्रकाशित झालेला लेख विनायक गोरे (माझा नवरा)  माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.

संगीतकार रोशनच्या काही गाण्यांचे दुवे असलेला लेख याबरोबरच प्रसिद्ध होत आहे. पण ४२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नुसती गाण्यांची जंत्री न देता लेखही लिहावा असे काही मित्रांनी सुचवल्याने हा लेख लिहीत आहे.

रोशनलाल नागरथ ऊर्फ "रोशन" चा जन्म १४ जुलै १९१७ मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या गुजरानवाला शहरात झाला. लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. 

पुढे बडोदा रेडिओस्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागला. १९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने  रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशनला दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन बडोद्याला परत जायला निघाला. त्यावेळी केदार शर्मांनी त्याला समजावले "आपण अजून एक चित्रपट करू, तो अयशस्वी झाला तर मग तू परत जा. " त्यानंतर राज कपूर आणि गीताबाली यांचा प्रसिद्ध "बावरे नैन" चित्रपट आला, चित्रपट आणि गाणी कमालीची यशस्वी झाली. मृत्यूच्या काही महिने आधी रेकॉर्ड झालेल्या "जयमाला" कार्यक्रमात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख करून म्हटले आहे "चित्रपटसंगीत हे ऐकण्याचे तसेच बघण्याचे माध्यम आहे. त्यामुळे जी गाणी ऐकताना चांगली वाटतील ती बघताना वाटतीलच असे नाही. हे माहिती नसल्याने "नेकी और बदी" ची गाणी यशस्वी झाली नाहीत. पुढे "बावरे नैन" मध्ये मी ही चूक सुधारली आणि ती गाणी गाजली. "

रोशनकडे सतत नवीन शिकायची वृत्ती होती. त्यामुळे अनिल बिस्वास, गुलाम हैदर, सचिनदेव बर्मन, यांच्याकडून जमेल त्या गोष्टी शिकतानाच संगीतकार खुर्शीद अन्वर यांच्याकडे सहाय्यक म्हणून उमेदवारी पण केली आहे.  

रोशन यांच्या १९४९ ते १९६८ अश्या सुमारे वीस वर्षांच्या कारकीर्दीचे दोन भाग आहेत. पहिला भाग १९४९ ते १९६० आणि दुसरा १९६० ते १९६८. पहिल्या भागात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. त्यात विविधता आणि टवटवीतपणा माझ्यामते जास्त आहे. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. मात्र १९६० ते १९६८ या काळातले संगीत प्रचंड गाजले. इतके की रोशन म्हणजे "बरसात की रात" ते अनोखी रात" अशीच बऱ्याच लोकांची अजूनही समजूत आहे.

सुरूवातीला मी पण जसे शंकर - जयकिशनचे गीतकार शैलेंद्र - हसरत, सी. रामचंद्रांचा  राजेंद्र कृष्ण, नौशादचा शकील बदायुनी तसेच रोशनचे साहिर - मजरूह अशी समजूंत करून घेतली होती. मात्र लगेचच या समजुतीला धक्के बसायला लागले. "मैं दिल हूँ इक अरमान भरा" या "अनहोनी" च्या आणि "एरी मैं तो प्रेम दीवानी" या "नौबहार"मधल्या गाण्यांची गीतकार सत्येंद्र अथैय्या, "इस दिल की हालत क्या कहिये" या "अनहोनी" च्या गाण्याचे अली सरदार जाफ्री आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे "बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम" या "मल्हार"मधल्या सदाबहार गाण्याचे चक्क इंदीवर हे समजल्यावर संगीतकार - गीतकार  जोड्यांच्या आपल्या कल्पना निदान रोशनबद्दल तरी बदलल्या पाहिजेत असे लक्षात आहे.

१९४९ ते १९६० या काळात रोशनचे ३२ चित्रपट आले आणि त्यात ४४ गीतकारांनी गाणी लिहिली होती. नीरज यांच्या "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे" "देखती रहो आज दर्पन ना तुम" "आज की रात बडी शोख बडी नटखट है" अशा सुंदर गाण्यांनी नटलेला "नई उमर की नई फसल" हा चित्रपट १९६५ साली आला तरी त्याची गाणी १९६० मध्येच रेकॉर्ड झाली होती तसेच १९६२ साली आलेला "जिंदगी और हम" हा गाण्यांच्या शैलीवरून १९६० पूर्वीचा असावा, या गोष्टी लक्षात घेतल्या तर १९४९ ते १९६० मध्ये ३४ चित्रपटांकरत रोशनने ४८ गीतकारांबरोबर काम केले.

त्याकाळी नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे  तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे  गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात.  कदाचित त्यामुळेच १९४९ ते १९६० मधली गाणी टवटवीत वाटत असावीत.

इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "

पुढे १९६० मध्ये "बरसात की रात" आला आणि सगळेच बदलले. त्यानंतर रोशनच्या संगीतात फक्त साहिर, मजरूह, शैलेंद्र, आनंद बक्षी, प्रेम धवन, इंदीवर, शकील, कैफी आज़मी अश्या मोजक्याच प्रथितयश गीतकारांची गीते दिसायला लागली. संगीतावर गजला, नज्मे, कव्वाल्या अश्या मुसलमानी संगीताचा वरचष्मा जाणवायला लागला. संगीत आधीच्या मानाने थोडेसे एकसुरी वाटायला लागले.  कदाचित संगीत व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी रोशनची इच्छा असूनही निर्माते दिग्दर्शकांच्या दडपणामुळे रोशनला नवीन, होतकरू गीतकारांची गाणी घेता आली नसावीत असे वाटते.

या काळात गीतकार योगेश, ज्यांनी १९६२ मध्ये गीतलेखनाला सुरूवात केली, ते म्हणतात "रोशनजींबरोबर काम करायची इच्छा राहून गेली. तसा मी त्यांच्या नजरेत भरलो होतो. लवकरच तुझी गाणी चित्रपटात घेईन असे आश्वासनही त्यांनी मला दिले होते पण तो योग यायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला."

असा हा काव्यप्रधान संगीताचा बादशहा १६ नोव्हेंबर १९६७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला तरी आज असंख्य गाण्यांच्या रूपाने आजही आपल्यात आहे.

या १६ नोव्हेंबरला संगीतकार रोशनचे निधन झाल्याला ४२ वर्षे पूर्ण होतील. त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशनने ५२ गीतकारांबरोबर काम केले. त्यापैकी ३७ गीतकारांच्या गाण्यांचे दुवे मला जालावर मिळाले. ते इथे देत आहे.

पहिल्या दुव्यामध्ये गीतकार नीरज रोशनबद्दल बोलताना म्हणतात "चित्रपटसृष्टीत मोठेमोठे संगीतकार होऊन गेले. पण जिथे कवितेचा संबंध येतो तिथे रोशनपेक्षा चांगला कोणीही नाही. रोशन यांनी जितकी साहित्यिक गीते, शेरोशशायरी असलेली गीते दिली तितकी दुसऱ्या कोणी दिली नाहीत. " नीरज यांची ती मुलाखत या दुव्यावर बघा.

नीरज यांची ती मुलाखत

आता पाहूया गाण्यांचे दुवे. दुवे देताना योजना अशी केली आहे की अप्रसिद्ध गीतकारांच्या गाण्यांचे दुवे सुरूवातीला असून प्रसिद्ध गीतकारांची गाणी शेवटी घेतली आहेत. दुव्यावर कर्सर नेला असता गीतकाराचे नाव आणि त्यापुढे गाण्याचे बोल दिसतील.

गीतकार शैलेंद्र

 मनोगत या मराठी संकेतस्थळावर विनायक गोरे ( माझा नवरा) यांचा लेख प्रकाशित झाला होता. तो मी इथे माझ्या ब्लॉगवर सेव्ह केला आहे.

आज ३० ऑगस्ट. गीतकार शैलेंद्रची ८६वी जयंती. शैलेंद्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगला आणि या वर्षी १४ डिसेंबरला त्याचे निधन होऊन आणखी ४३ वर्षे होतील. त्यानिमित्ताने मला आवडलेल्या काही गाण्यांबद्दल अगदी थोडक्यात काही लिहावे असे वाटल्याने हा लेख. प्रा. माधव मोहोळकरांनी शैलेंद्रवर अप्रतिम लेख लिहिला आहेच. त्यामुळे त्यापेक्षा काही थोडेसे वेगळे सांगण्याचा प्रयत्न करेन.

"कवी होता कसा आनने?"अशी उत्सुकता सर्वांनाच असते. त्यासाठी चली कौनसे देश हे गीत ऐका आणि पहा. यामधला हाताने बुलबुलतरंग (की जलतरंग? ) वाजवीत तल्लीन होऊन गाणे म्हणणारा पुरूष म्हणजेच शैलेंद्र.

आता काही गाण्यांबद्दल लिहितो. राज कपूरच्या चित्रपटांसाठी शैलेंद्रने लिहिलेल्या गाण्यांबद्दल बरेच लिहिले गेले आहे त्यामानाने संगीतकार शंकर - जयकिशनबरोबरची इतर गाणी थोडीशी उपेक्षित राहिली. त्यापैकी मला सर्वात आवडणारी गाणी "बसंत बहार" चित्रपटातली. पहिले गाणे भयभंजना सुन हमारी . यातल्या "भयभंजना" शब्दाने लक्ष वेधून घेतले. दुसरे म्हणजे हे गाणे हे देवीची प्रार्थना आहे आणि त्याचे आपल्या "दुर्गे दुर्घट भारी" या देवीशी थोडेसे साम्य आहे. खासकरून दुसऱ्या कडव्यातल्या

"आजा मधुर स्वप्नसी मुस्कराती
मन के बुझे दीप हंसकर जलाती" या ओळींचे

"प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेषापासूनी तोडी तोडी भवपाशा" या ओळींशी साम्य वाटते.

याच "बसंत बहार"मधले दुसरे गाणे आहे बडी देर भई. बऱ्याच वेळा शैलेंद्रच्या गाण्यांचे मुखडे साधे असतात पण खऱ्या चमकदार ओळी अंतऱ्यात असतात, उदा. "मेरा जूता है जापानी"सारख्या साध्या मुखड्याने सुरूवात होऊन हे गाणे
मुखड्यात "चलना जीवनकी कहानी रुकना मौत की निशानी" असे तत्त्वज्ञान सांगते. तीच स्थिती "बडी देर भई" या गाण्याची आहे. कडव्यामधल्या या ओळी बघा


"कहते है तुम हो दया हे सागर फिर क्यूं मेरी गागर
झूमे झुके कभी ना बरसे कैसे हो तुम "घन" श्याम"

दुसऱ्या ओळीत घनश्याम शब्दाची "कधीही न बरसणारा घन असा श्याम" अशी फोड करून सुंदर श्लेष साधला आहे.

 शंकर - जयकिशन १९५० - ५५ या काळात अतिशय सुरेल गाणी द्यायचे त्याचा पुरावा म्हणजे "शिकस्त" चित्रपटातले कारे बदरा तू न जा हे लताने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या मला विशेष आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

"चौरस्तेपे जैसे मुसाफिर पथ पूछे घबराए
कौन देस  किस ओर जाऊँ मैं मन मेरा समझ न पाए"

खरे तर या लेखात राज कपूरच्या चित्रपटातली आणि अतिप्रसिद्ध गीते घ्यायची नाहीत असे ठरवले होते, तरीही ये रात भीगी भीगी या गाण्याचा अपवाद करावा लागला. कारण या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या पुढील ओळी

"जो दिन के उजाले में न मिला
दिल ढूंढे ऐसे सपने को
इक रात की जगमग में डूबी
मैं ढूंढ रही हूं अपनेको"

या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलजारचे शब्द आठवतात "गीतकार शैलेंद्र ही अमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली."

शंकर - जयकिशन यांच्यानंतर शैलेंद्रची जोडी जमली ती संगीतकार सलील चौधरींबरोबर. दोघांच्या शैलीत जमीन अस्मानाचा फरक होता. शंकर - जयकिशन गीताच्या नैसर्गिक चालीशी मिळतीजुळती, साधीसोपी चाल लावायचे. सलील चौधरी भारतीय संगीतावरोबरच अभिजात पाश्चात्य संगीताचे बेमालून मिश्रण करायचे. त्यांच्या बहुतेक सर्व चाली आधीच तयार असायच्या आणि त्यात त्यांनी (स्वतःच लिहिलेली) बंगाली गाणीही बांधलेली असायची. त्यामुळे अशा काटेकोर बांधलेल्या चालीत अक्षरश" "गाळलेल्या जागा भरा" प्रकारचे गाणे लिहायचे म्हणजे कमालीचे मुष्किल काम. त्यामुळे हे गाणे काव्य म्हणूनही सरस असावे अशी अपेक्षा करणे कठीण. अर्थात इतक्या मर्यादा पाळूनही शैलेंद्रने सुंदर गाणी लिहिली आहेत. त्यातले पहिले गाणे म्हणजे हरियाला सावन ढोल बजाता आया. यातल्या दुसऱ्या कडव्यात

"ऐसे बीज बिछो रे सुख चैन उगे दुख दर्द मिटे
नैनोंमें नाचे रे सपनोंका धान हरा"

अशा पसायदानाची आठवण करून देणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत.

दुसरे  "परख" चित्रपटातले  मिला है किसी का झुमका हे गीत स्वतंत्र लेखाचा विषय आहे. बागेत गेलेल्या मुलीला तिच्या मैत्रिणीचा झुमका मिळतो. मैत्रीण प्रियकराबरोबर निघून गेली आहे, मुलगी आणि झुमका दोघांनाही मागे सोडून. त्यामुळे मुलगी स्वतःच्या मनातले विचार झुमक्याच्या माध्यमातून "सुनो क्या कहता है झुमका" म्हणून व्यक्त करते ते अतिशय तरल आहे.

अर्थात गाण्याचे चित्रीकरण अर्थाशी पूर्णपणे विसंगत आहे. झुमक्याऐवजी जास्वंदीचे फूल आहे, साधना मैत्रिणीच्या आठवणीने व्याकुळ दिसायच्या ऐवजी आनंदी दिसते आहे आणि चित्रपट पाहिलेल्यांकडून समजले की त्यात साधनाच्या मैत्रिणीचे (जिचा झुमका हरवतो) पात्रच नाही.

शैलेंद्र - सलील चौधरी जोडीचे माझे आणखी एक आवडते गाणे म्हणजे "हनीमून" चित्रपटातले मेरे ख्वाबोंमें खयालों में छिपे हे गीत. यातल्या पुढील ओळी बघा

"मेरे गीतोंके मचलते हुए स्वर
उनके आंगन में उतर
उनको मेरे पास खींच लाएंगे"

संगीतकार रोशन म्हटल्यावर गीतकार शैलेंद्रचे नाव सहसा समोर येत नाही. साहिर - मजरूहची नावे येतात. पण संगीतकार रोशनबरोबर सर्वाधिक १२ चित्रपटात गाणी लिहिली आहेत शैलेंद्रने. साहिरने ८ तर मजरूहने ६. रोशनने आपल्या संगीताची शैली तीन वेळा बदलली. १९४९ ते १९५५ वर्षे अत्यंत अभिजात, दर्जेदार संगीत दिले, १९५६ ते १९५९ मध्ये हलके फुलके संगीत दिले तर १९६० ते १९६८ साधारण मुसलमानी छापाचे म्हणजे गझला, कव्वाल्या, मुजरे याप्रकारचे संगीत दिले. तिन्ही टप्प्यात रोशनबरोबर शैलेंद्रने गाणी लिहिली आहेत.

त्यातले पहिले गाणे  "चांदनी चौक" मधले दिल की शिकायत नजर के शिकवे. रोशनकडे अनेक वेळा "हेही आहे आणि तेही आहे" किंवा हेही कठीण तेही कठीण" अशा अर्थाची गाणी दिसतात. तीन गाणी सहज आठवतात. एक "अनहोनी" मधले "दिल शाद भी है नाशाद भी है" दुसरे "नौबहार" मधले शैलेंद्रनेच लिहिलेले "उनके बुलावेसे डोले मेरा दिले जाऊँ तो मुष्किल न जाऊँ तो मुष्किल" आणि तिसरे वर दिलेल शैलेंद्रचेच "दिल की शिकायत नजर के शिकवे एक जुबाँ और लाख बयाँ छिपा सकूं ना दिखा सकूं दिल के दर्द मेरे हुए जवां". यातल्या मला खास  आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

थोडे लिखे को बहुत समझना नये नहीं ये अफसाने
दिल मजबूर भरा आता है छलक उठे है पैमाने
खत में जहाँ आँसू टपका है लिहा है मैंने प्यार वहाँ

तसेच "संस्कार" चित्रपटातली हँसे टिम टिम टिम छोटे छोटे तारे ही लोरीही माझी फार आवडती आहे.

शैलेंद्रने अनेक लोकगीते आणि त्यांच्यावर आधारित गीते लिहिली. लोकगीतावर आधारित एक प्रसिद्ध गीत म्हणजे "बंदिनी" चित्रपटाले अब के बरस भेज भय्या को बाबुल. या गाण्याच्या बाबतीत एक किस्सा खूप वर्षांपूर्वी "कोहिनूर गीतगुंजार" या कार्यक्रमात अजित सेठ यांनी सांगितला होता. एका प्रेम नावाच्या माणसाकडून त्यांना समजला होता. प्रेम (धवन? ) म्हणाले "एक दिवस मी आणि गीतकार शैलेंद्र पोवई उद्यानात फिरायला गेलो. एका झाडाखाली बसलो आणि मी माझ्या भसाड्या आवाजात एक लोकगीत ऐकवले. ते ऐकून शैलेंद्रच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पुढे अनेक दिवसांनी शैलेंद्रच्या घरी गेलो तर त्याच्या टेबलावर त्या लोकगीतावर आधारित गीत लिहिलेले दिसले. त्यावेळी 'तीसरी कसम" ची तयारी जोरात चालू होती त्यामुळे ते "तीसरी कसम" साठी असावे असा माझा समज होता पण ते पुढे 'बंदिनी' चित्रपटात आले. "

१९६२ मध्ये पहिला भोजपुरी चित्रपट निघाला "गंगा मैया तोहे पियरी चढइबो" त्यातली गाणी शैलेंद्रने लिहिली होती आणि संगीतकार होते चित्रगुप्त. त्यातली दोन गाणी फार प्रसिद्ध झाली. पहिले हे गंगा मैया तोहे पियरी चढइबो. यामध्ये लग्नानंतर नवऱ्याला कसे सामोरे जायचे, आपल्याजवळ रूप, गुण, कर्तृत्व, दागिने काहीच नाही अशी खंत मुलीने व्यक्त केली आहे.

"ना मेरे गुण ढंग ना मेरे करनी ना मेरे एको गहनवा हो राम
खोले घुंघट जब पिया मोको देखी है कर बैनी कौनो बहनवा हो राम"

यातले "बहनवा" चा संबंध "बहन" शब्दाशी नसून "बहाना" शब्दाशी आहे हे समजायला थोडा वेळ लागला. अर्थात् हे गाणे मूळ शैलेंद्रचे आहे की नाही याबद्दल शंका आहे, कारण याच गाण्याची सोप्या हिंदीतली आवृत्ती  बेगम अख्तरच्या आवाजही ऐकली आहे आणि त्यावेळी तिचा उल्लेख "पारंपरिक रचना" असा केला होता. याच चित्रपटाले दुसरे बिदाईगीत सोनवा के पिंजरा में बंद भईल हाय राम हे ही अतिशय सुरेख आहे.

संगीतकार अनिल बिस्वास यांच्याबरोबर गीतकार शैलेंद्रने "सौतेला भाई" आणि अगदी शेवटचा "छोटी छोटी बाते" या दोनच चित्रपटात गीते लिहिली. त्यापैकी "छोटी छोटी बातें" मधले कुछ और जमाना कहता है हे माझे अतिशय आवडते.

"ये बस्ती है इन्सानोंकी इन्सान मगर भूले ना मिला
पत्थत की बुतों से क्या कीजे फरियाद भला टूटे दिल की"

या मला विशेष भावलेल्या ओळी. या गाण्याबाबत एक जाणावणारी गोष्ट म्हणजे कमालीचा कडवटपणा जो यापूर्वीच्या गाण्यांमध्ये कधीही दिसला नाही. "तीसरी कसम" तयार करताना झालेला मनस्ताप आणि या गाण्यातला कडवटपणा याचा काही संबंध आहे का समजत नाही.

गाण्यातून एखादी गोष्ट (कथा या अर्थाने) सांगणे हेही शैलेंद्रने अनेक वेळा केले आहे त्यातले दिल का हाल सुने दिलवाला हे विशेष. भुरट्या चोरासारखे दिसणाऱ्या तरूणाला पोलीस पकडून नेतात, तिथे दरोगासाहेब त्याला "ठानेदार का साला" असल्याचे ओळखून सोडून देतात अशी साधी गोष्ट पण बरीच खुलवून सांगितली आहेत.

 त्यातल्या स्वतःबद्दलच्या

"छोटेसे घर में गरीब का बेटा मैं भी हूं मां के नसीब का बेटा
रंजो गम बचपन के साथी आंधियों में जले जीवनबाती
भूख ने है बडे प्यार से पाला"

या ओळी तर आवडल्याच पण

"सुनो मगर ये किसी न कहना तिनके का लेके सहारा ना बहना
बेमौसम मल्हार ना गाना आधी रात को मत चिल्लाना
वरना पकड लेगा पुलिसवाला"

असा थोडासा मजेशीर समारोपही आवडला. 

लहान मुलांकरता गाणी लिहिणे सोपे नाही असे एकदा गुलजार म्हणाले होते. शैलेंद्रने लिहिलेले नानी तेरी मोरनी हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे. त्यातल्या या ओळी पहा.

"खाके पीके मोटे होके चोर बैठे रेलमें
चोरोंवाला डब्बा कटके सीधा पहुंचा जेल में"

आयुष्यात अनेक वेळा दुःखाचे, निराशेचे प्रसंग येतात. अनेक वेळा आपल्याला कोणी मित्र नाही आपण असहाय्य आहोत अशे भावना होते अशा वेळी शैलेंद्रच्या गाण्यांचा आधार वाटतो. उदा. मैं आशिक हूं बहारोंका या गाण्यातल्या

चला गर सफर को कोई बेसहारा
तो मैं हो लिया संग लिये एकतारा
गाता हुआ दुख भुलाता हुआ

या ओळी, किंवा दो दिन की जिंदगी में या गाण्यातल्या

मरनेको सौ बहाने जीनेको सिर्फ एक
उम्मीदके सुरोंमें बजते है दिल के तार

या ओळी. कमी शब्दात प्रभावीपणे विचार व्यक्त करण्याची शैलेंद्रची ताकद साधारण असाच विचार सांगणाऱ्या साहिरच्या

"मौत कभीभी मिल सकती है ये जीवन फिर न मिलेगा
मरनेवाले सोच समझ ले तुझ को ये पल फिर न मिलेगा"

या "रात भर का है मेहमां अंधेरा" या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळींशी केली तर लक्षात येते.

माझ्या यादीतले  गाणे वहाँ कौन है तेरा. बर्मनदादांच्या आवाजाच्या माध्यमातून शैलेंद्र अजूनही आपल्या संपर्कात आहे असे वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नाळू भास आहेत असेही कोणी म्हणेल.

गीतकार शैलेंद्रच्या ३२ कवितांचा संग्रह "न्यौता और चुनौती" १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातल्या १६ कविता हिंदी कविता जालावर (कविताकोश डॉट ऑर्ग) इथे वाचता येतात त्याही शैलेंद्रच्या कवित्वशक्तीची साक्ष देणाऱ्या आहेत.

विनायक

Sunday, August 30, 2020

Apple picking

 

अविस्मरणीय आठवणी चांगल्या असतातच पण काही त्रासदायकही असतात की ज्या कायम स्मरणात राहतात. अशीच एक आठवण ऍपल पिकींगची. काळ होता २००३ सालातला. आम्ही दोघे क्लेम्सनमध्ये राहत होतो. युनिव्हरसिटीमध्ये नामुष्किलीने एक जागा मिळाली होती आणि ती होती स्टुडिओ अपार्टमेंट. मी व उमा दोघीही डिपेंडंट विसावाल्या होतो. उमाचा नवरा पिएचडी करत होता आणि विनायक पोस्डॉक करत होता. आम्ही दोघी मिळून काही वेळेला बसने वीकडेज मध्ये ग्रोसरी आणण्याकरता जात असु. असेच एकदा तिने मला विचारले
कि आपण ऍपल पिकींगला जायचे का? मि उत्साहात लगेच "हो" सांगितले. एका मिनिबसमधून ५ डॉलर्स मध्ये ही ट्रीप निघणार होती. ट्रीप मध्ये काही भारतीय तर काही चिनी आणि अमेरिकन विद्दार्थी होते. मी नेहमीप्रमाणे पोळी भाजीचा डबा घेतला होता. आम्ही दोघी खूप उत्साहात होतो. मधल्या एका विश्रांती थांब्यावर जेवणाकरता बस थांबली. आम्ही दोघींनी जेवून घेतले. टाको बेलच्या आवारात ही बस थांबली होती. आम्ही दोघींनी तिथून एक कोक घेतला. त्यावेळेला आम्हाला अमेरिकन उपहारगृहातले तितकेसे माहीती नव्हते. पिझ्झा माहिती झाला होता. बाकी सर्वांनी टाको मधुनच काही मागवले होते. ते खाण्यात सर्व दंग होऊन गेली होती.आता पुढचा प्रवास सुरू झाला. काटकोनातली लांबच्या लांब वळणे चालू झाली. तिथे पोहोचेपर्यंत दुपारचे टळटळीत उन चमकत होते. 
 
 
तिथे गेल्या गेल्या सर्वांनीचसफरचंदाचा रस प्यायला. एक डॉलरला पूर्ण ग्लास भरून रस अतिशय चवदार लागत होता. आता सर्वांनी बास्केट घेतल्या ऍपल पिक साठी. सफरचंदाच्या शेतात शिरलो. सगळीकडे सफरचंदाची झाडे होती. प्रत्येक झाडावर सफरचंदे लटकत होती. काही झाडावर डार्क मरून रंगाची तर काही झाडांवर फिकट लालसर रंगाची तर काही झाडांवर हिरवी सफरचंदे होती. जिकडे पाहावे तिकडे हिरवे हिरवे गार गालिचे होते. त्या हिरव्या गालिच्यावर बसले. प्रत्येक झाडापाशी जाऊन आपल्याला हवे ते सफरचंद तोडून बास्केट मध्ये भरत होतो. तिथून हालावेसेवाटत नव्हते. त्यावेळेला साधा कॅमेरा होता माझ्याकडे पण नेला नव्हता. फोटोग्राफीला खूप जोमाने सुरवात झाली नव्हती. त्यावेळेला डिजिटल कॅम असता तर काय विचारता. सर्व अँगल्सने फोटू काढून झाले असते. 
 
 
सफरचंद तोडून झाली. हिरवळीवर बसून झाले. परत एकदा ताजा सफरचंदाचा रस प्यायलो. आता निघण्याची वेळ झाली. परतीचा प्रवास काटकोनातल्या वळणावळणाच्या वाटेने सुरू झाला. आता तर वळणावळच्या रस्त्यात उताराची भर पडली होती. वळण आले की हासत होतो आणि एकमेकींना धरत होतो. मला तर रस्त्याकडे बघवत नव्हते. मला उंच उंच वळणावळणाचे रस्त्यांची खूप भीती वाटते व गरगरते. माझे डोके प्रचंड दुखायला लागले. डचमळायला लागले. माझ्या शेजारी उमा बसली होती. तिला खुणेनेच मला उलटी होत्ये असे सांगितले. तिने त्वरीत बस थांबवायला सांगितली आणि आम्ही दोघी बाहेर पडून एका झाडाखाली मी उभी राहिले आणि मला खूप मोठी उलटी झाली. पाण्याने चूळ भरली. परत बस मध्ये बसले. असे ३ वेळा बस थांबवायला लागली. प्रत्येक वेळी उलटी आणि पोटामधली आतडी पिळवटून निघत आहेत ते जाणवत होते. बसमधल्या ड्राइव्हर बाईने मला एक गोळी दिली आणि थोडे बरे वाटायला लागले. दुसरा एक अमेरिकन मला म्हणाला आता बरे वाटतयं का? मी हासूनच हो म्हणाले. तो म्हणाला की काही जणांना वळणावळाच्या रस्त्याचा त्रास होतो. घरी आलो. माझा चेहरा आणि कोपऱ्यापर्यंतचे हात लालेलाल झाले होते. अंगात थोडा सुद्धा त्राण उरला नव्हता. उमाने पाणी प्यायला दिले. अगदी घोटभर प्यायले. ती म्हणाली काही करून देऊ का? मी म्हणाले नको. आता मला बरे वाटत आहे. 
 
 
विनायक लॅब मधून घरी आला. तो म्हणाला चहा पितेस का? बरे वाटेल. मला काहीही म्हणजे काहीही नको होते. तशीच निपचित पडून राहिले. अजूनही मला खूप गरगरत होते. डोके ठणठण करत ठणकत होते. हळूहळू करत सर्व शमत होते. रात्री जेवणाकरता कूकरमध्ये खिचडी टाकली. दही होतेच. अगदी बळे बळे २ घासच खिचडी खाल्ली. थोडे पाणी प्यायले. नुसते पडूनच खूप बरे वाटत होते. अजिबात बोलवत नव्हते. रात्री झोप मात्र छान लागली. सकाळी उठले तर फ्रेश वाटत होते. सकाळी विनायकला सगळा वृत्तांत सांगितला. सर्व आणलेली सफरचंदे लॅब मध्ये सर्वांना एकेक करत वाटून टाकली. आम्ही दोघेही सफरचंदप्रेमी नाही. रणरणत्या उन्हामुळे पित्त झाले असावे, किंवा झाडांची ऍलर्जी असावी किंवा कशाचेतरी इंन्फेक्शन झाले असावे. पण एक धडा शिकले की इथे बाहेर पडताना कधी काय होईल सांगता येत नाही. बाहेर पडताना पिशवीत इथल्या हवामानानुसार सर्व गोष्टी ठेवते. Rohini Gore


Friday, August 14, 2020

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

 






गणपती बापा २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१७, २०१८

 


 

2020 ganpati,, aani vinayak's birthday on 21st