Monday, March 28, 2022

Kolhs ... (4)

 

कॅशिअरचे काम मला आवडले होते पण सलग ६ किंवा ८ तास एकाच जागी उभे राहून प्रचंड दमायला व्हायचे. नंतर मला वुमन्स सेक्शनला टाकले. स्टोअर १० वाजता उघडते त्यामुळे जर कॅशिअरचे काम असेल तर माझे वेळापत्रक १० ते ४ असायचे. काही वेळा कस्टमर लोक आयत्यावेळेस मला अमूक अमूक वस्तु/कपडे नकोत असे जेव्हा सांगायचे ते ते सर्व कॅशिअर टेबलाजवळ असलेल्या बास्केट मध्ये टाकायचे असतात. काम झाले की कस्टमरने परत केलेले कपडे घेऊन कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला जी खोली आहे तिथे त्या त्या सेक्शन मध्ये ठेवायचे असतात. जेव्हा मला वुमन्स सेक्शनला टाकले तेव्हा माझे वेळापत्रक ८ ते ४ होते. स्टोअरचे बाहेरचे दार उघडेच असते. ते उघडून आत गेल्यावर एका भिंतीवर एक बेल असते ती वाजवायची म्हणजे आतल्या बायका स्टोअरमध्ये जाण्याकरता जे दार असते ते उघडायला येतात. आत कुणीहि कस्टमर नसतात. जेव्हा मी गेले तेव्हा मला एक देशी बाई दिसली. ती गरोदर होती. ती व मी एकमेकींकडे पाहून हासलो. ती किड्स सेक्शनला नियमित काम करते. तिला तिथे काम करून २ वर्षे झाली होती. मी तिला म्हणले की सेक्शन मध्ये कोणीच नाही. काय काम करायचे. तर ती मला कस्टमर सर्विसच्या मागच्या खोलीत घेऊन गेली आणि समजावून सांगितले की हे सर्व रॅक आहेत सेक्शन प्रमाणे त्यानुसार कपडे घेऊन जायचे व त्या त्या जागेवर लावायचे. हेच काम करायचे दिवसभर !
काही वेळा कपडे सेक्शन नुसार नसतात तर ते दुसऱ्या रॅक मध्ये ठेवायचे. वुमन्स सेक्शनचा रॅक भरून वाहत होता. मला तर दडपणच आले. वुमन्स सेक्शन फिरून आले. कोणकोणते ब्रॅंड आहेत ते बघितले.
 

नंतर त्या सेक्शनची मुख्य बाई आली. ती अमेरिकन होती. तिने पण हासून माझे स्वागत केले. ती म्हणाली की तू नवीन आहेस. मी कपडे लावते. तू फक्त सेक्शन मध्ये जाऊन जे कपडे विस्कटले असतील ते घडी करून ठेव. या घड्या पण विशिष्ट पद्धतीने घालायच्या असतात. काम करता करता ती परत आलेले कपडे लावत होती व मला सांगत होती, इथे जा , तिथे जा, कपडे विस्कटलेले आहेत. पूर्वी मी जेव्हा वाल मार्टला जायचे आणि तिथे पहायचे की काही बायका कपड्यांच्या घड्या करत असायच्या. तेव्हा मी मनात म्हणायचेे असे काम मिळाले पाहिजे, किती सोपे आहे ना ! नथिंग इस इझी हे मला प्रत्यक्ष काम करताना कळाले. पार्किंग मध्ये ज्या कार्ट असतात. त्या सर्व कार्ट्स वाहून आणतात ते काम पण सोपे नाहीये. स्नो पडत असताना, हाडे गोठवणारी थंडी असताना, पाऊस पडत असताना, थंडीमध्ये प्रचंड बोचरे वारे असताना,या कार्ट्स गोळा करून आणायच्या, हे कामही वाटते तितके सोपे नाही !
 
 
जेवणाच्या सुट्टीत मला ती देशी बाई परत भेटली. ती म्हणाली की इथे प्रत्येक सेक्शनला २ ते ३ दिवस टाकतात. काही वेळेला रात्रपाळीला पण बोलावतात. मी तिला विचारले की रात्रपाळी करताना सेफ आहे ना इथे ! तर म्हणाली हो. काळजी करू नकोस. तुला आधी विचारतील. तू नाही म्हणू शकतेस. रात्रपाळी रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत असते. आणि पगार दुप्पट मिळतो. त्या देशी बाईचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिला पण किड्स सेक्शनला एक खूर्ची दिली होती अधुम मधून बसायला. पण तरीही ८ तास उभे राहून ही कशी काय काम करू शकते या दिवसात? ते पाहून मला आश्चर्यच वाटले. प्रत्येक सेक्शनला काही कपडे घड्या घालून ठेवायचे असतात तर काही कपडे हॅंगरला लटकवून ठेवायचे असतात. दुसऱ्या दिवशी वुमन्स सेक्शनला मी काम करत होते तेव्हा दुपारी १ ला दुसऱ्या शिफ्टला काम करणारी एक अमेरिकन बाई आली. तोपर्यंत मी अंधारात चाचपडल्या सारखे कपडे लावत होते. डोके खूपच गरगरत होते. वुमन्स सेक्शनही खूप मोठा आहे! त्या अमेरिकन बाईने पण हाय हॅलो केले. तिने ढिगच्या ढीग उचलून आणला परत आलेल्या कपड्यांचा आणि एका तासात तिने सर्व कपडे लावूनही टाकले ! अर्थातच खूप वर्षे झाली की कामात आपोआप सुलभता येतेच ! पण इथे ना मला ट्रेनिंग दिले नाही. फक्त तोंडी सांगितले. खरे तर त्या जेव्हा कपडे लावतात त्याबरोबर नवीन लोकांना पण आमच्याबरोबर या आणि बघा आम्ही कसे कपडे लावतो ते ! असे सांगायला हवे. पण इथे ट्रेनिंग नीट नाहीये. 

कॅशिअर मध्ये ट्रेनिंग जरी दिले ते सुद्धा १ दिवसच ! पण तरीही कितीतरी गोष्टी मला जेव्हा मी काम करायला लागले तेव्हाच कळाल्या किंवा सांगितल्या गेल्या. बऱ्याच गोष्टी कळल्या मला ! कपड्यांना सेक्युरिटि टॅग कसे लावायचे, टॅग कसे काढायचे, नोटा दिल्या की त्या खऱ्या आहेत की नाही ते कसे ओळखायचे? गिफ्ट रिसिट कश्या प्रिंट करायच्या. नुसते कार्ड पेमेंट असेल तर ते कसे करायचे? त्यातही काही लोक कॅश देतात तर काही चेक देतात. Transaction कॅन्सल कसे करायचे.कोल्स कार्ड हवे आहे का? आणि हवे असल्यास त्या करता काय करायचे? एकदा एका कस्टमरने मला विचारले की कार्ड काढायचे आहे. तेव्हा मला एका आफ्रिकन बाईने मदत केली. एकदा एकाने ४०० dollars ची खरेदी केली. आणि कॅश दिले. तेव्हा मागची कॅशियर आली आणि मला म्हणाली की कोल्स कार्ड असेल तर कॅश घ्यायची नाही. तू असे केलेस तर प्रोब्लेम मध्ये येशील. असे एक ना अनेक बरेच शिकायला मिळाले आणि कामही आवडले मला !
 
 
नंतर मला एक दिवस intimate सेक्शन मध्ये टाकले. हा सेक्शन मला आवडला कारण चालणे कमी होत होते. इथेही डोके गरगरायला लागलेच ! सापडता सापडत नव्हते. ब्रा आणि पॅंटीज मध्ये इतके प्रकार की ब्रॅंड, रंग, डिझाईन, खूप वेगवेगळे. एखादे काहीतरी सापडले की धन्यता वाटायची. किड्स सेक्शन मध्ये तर भूलभुलैयाच आहे ! मी आणि अजून एक माझ्यासारखीच सिझनल वर्कर होती. ती आणि मी. आम्ही दोघीच होतो. ती दुसऱ्या देशाची होती. ती म्हणाली मला काहीच सापडत नाहीये. मी म्हणाले मलाही ! सर्व कपडे एकसारखेच दिसत आहे. नंतर दुसऱ्या शिफ्टला देशी बाई आली आणि म्हणाली की असेच होते पहिल्यांदा. आणि तिने आम्हाला दोघिंनाही कपडे घड्या घालून दिले आणि जागाही सांगितली की ते कुठे ठेवायचे. आम्ही दोघींनी तिचे आभार मानले.

 
आम्हाला दोघींनाही हा किड्स सेक्शन आवडला नाही. मी म्हणाले आधी मला हेच समजत नाही की हा कपडा मुलीचा की मुलाचा? सगळे कपडे सारखेच दिसतात ! आणि बाळांच्या कपड्यामध्ये तर आणखीनच भूलभुलैया आहे. कधी एकदा या सेक्शन मधून बाहेर पडतोय असे आम्हाला दोघींनाही झाले होते. खेळणी पण इतकी. ती पण आम्हाला दोघींना सापडत नव्हती. आम्ही दोघीही गप्पा मारत होतो. किती मोठा सेक्शन आहे हा ! ती पण वुमन्स आणि ज्युनिअर सेक्शन फिरून आली होती. नंतर माझ्या असे लक्षात आले की सणांच्या सीझनला पहिल्या शिफ्टला सीझनल लोक ठेवतात आणि ज्या कायमस्वरूपी बायका आहेत सेक्शनच्या त्यांना दुसरी शिफ्ट देतात. सीझनला तर खरेदी करून परत केलेले कपडे इतके असतात की रॅक ओसंडून वाहत असतात. आणि कस्टमर सर्विस वाले पण इतके वैतागलेले असतात की ते परत आलेले कपडे कुठेल्याही रॅक मध्ये टाकतात. स्पेशल प्रोजेक्ट आणि अजून काही अनुभव पुढील भागात Rohini Gore
क्रमश: ....

No comments: