आज मला रोजनिशीची आठवण झाली आणि म्हणूनच आजचा दिवस कसा गेला ते लिहीत आहे. काहीतरी वेगळे घडले की मी त्या दिवसाची आठवण म्हणून रोजनिशी लिहिते. आजचा दिवस असाच वेगळा आहे. खरे तर आज काहीच घडले नाही. आज माझ्या मनाची स्थिती स्थितप्रज्ञासारखी होती. सकाळी नेहमीप्रमाणे उठून रूटीन सुरू झाले.साधारण २०१५ सालापासून मी रात्रीचा स्वयंपाक आणि दुसऱ्या दिवशीचा विनायकचा डबा आणि माझे जेवण असाच करते. कालची भाजी न उरल्याने आज पिठले करायचे ठरवले व तसे केलेही. छान पळीवाढे पिठले झाले. त्यात लसूण, कांदा, मिरची, लाल तिखट व धनेजिरे पूड, कढिपत्ता असे नेहमीप्रमाणे घातले. चव तर छानच होती. पिठले झाल्यावर मी नेहमीच लगच्यालगेच पानात वाढून घेते आणि पोळीबरोबर खाते.
तिखट आणि गरम असे मिश्रण पोळीबरोबर खाल्ले की ताजेतवाने वाटते पण तसे आज झाले नाही. जेवल्यावर लॅपटॉपवर काही वाचत होते. वाचता वाचता खूप अंधारून आले. अंधारून आल्यावर मी काही ओळी लिहिल्या आणि त्या डिटीटही केल्या. एक लेख लिहायला सुरवातही केली. वाक्ये पण कशी छान जुळून आली होती मनात. अशी छान वाक्ये जुळून आल्याशिवाय मी कोणताही लेख लिहीत नाही. लिहायला सुरवात केली. थोडेफार लिहिले आणि परत तेही डिलीट केले.
आज जो लेख मी लिहिणार होते तो लेख मी पूर्वीच लिहिणार होते. पूर्वीच्या वहीत कदाचित थोडा लिहिला होता असे आठवतयं पण का कोण जाणे आज कशालाच मुहूर्त लागत नव्हता. मनाची स्थिती अशीच दिवसभर राहिली. दुपारी गुगल मध्ये जाऊन काही मराठी पिडिएफ फाईल्स वाचल्या. त्या छानच होत्या पण तरीही मन उत्साही झाले नाही. संध्याकाळी भूक पण लागली नाही. थोडेसे फरसाण खाल्ले. चहा बिस्किटे खाल्ली. दिवस संपतही आलाय. आता थोड्यावेळाने जेवण करू आम्ही दोघेजण.
थोडेसे उदास वाटतयं पण तरीही इतके नाही. काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीयेत. तसे म्हणायला गेले तर आजचा दिवस तसा वेगळाच म्हणायला हवा. ब्लॉगवर जेव्हा आजची रोजनिशी टंकायला गेले तर लेबल्स मध्ये पाहिले. २०११ सालापासून मी रोजनिशी लिहित आहे. प्रत्येक वर्षीच्या काही रोजनिश्या लिहिलेल्या दिसल्या. खंड मात्र एकाही वर्षाचा नाही. प्रत्येक वर्षी कधी २ दिवसांच्या रोजनिशा तर कधी ५ किंवा १० तर कधी एकच. यावर्षीचे आजचे पान पहिलेच रोजनिशीमधले.