Showing posts with label रोजनिशी २०२०. Show all posts
Showing posts with label रोजनिशी २०२०. Show all posts

Wednesday, July 01, 2020

१ जुलै २०२०

आजचा दिवस छान गेला. आषाढी एकादशीचा मेनू ठरवला होता त्याप्रमाणे झाला. साबुदाण्याचे थालिपीठ, बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. संत्र्याच्या फोडी , दाक्षे, खजूर, सुकामेवा व दाणे यांचा लाडू, आयते श्रीखंड. आज अंताअक्षरी मध्ये विठ्ठलाची गाणी म्हणायची होती ती म्हणली. मला आशा भोसले यांनी गायलेले धागा धागा अखंड विणूया हे गाणे खूप आवडते. हे गाणे तर ऐकलेच पण इतरही गाणी ऐकली, म्हणली. देवाची पूजा करताना नमस्कार करून म्हणाले कोरोनाचे संकट दूर होऊ देत. सर्वांच्या मनासारखे होऊ देत. माझ्या एका मैत्रिणीने पण छान मेनू केला होता. ती व मी आम्ही एकमेकींना फोटोज पाठवतो त्यामुळे जरा बळ मिळते. आज माझ्या मामे भाचीचा कथ्थक नाच पाहिला. तिने युट्युबवर आणि आमच्या भावंडांच्या ग्रूप मध्येही टाकला होता. अवघा रंग एक झाला या गाण्यावर तिने व तिच्या २ मैत्रिणींनी छान कथ्थक केले आहे. आज वेगळे पणा म्हणजे एफबी वर अवतार जागृत झाले होते. ते पाहताना पण मजा येत होती. आज आईबाबांना, माझ्या बहिणीला, व भाचीला विडिओ कॉलवर पाहिले.

Saturday, May 09, 2020

९ मे २०२०

ठरवलं एक आणि झालं भलतच. साजूक तूप संपवण्याकरता गोडाचा शिरा केला. कोबीची भजी ठरवली होती पण बटाट्याची पटकन होतात म्हणून ती केली. काकडी संपवायची होती म्हणून खमंग काकडी केली. ठरवले होते वांग्याची भाजी (ती केली) मुग डाळीची खिचडी , कढी आणि भाजलेला पापड









 
रात्रीचा मेनु.


आजचा दिवस वेगळाच होता. एफबीच्या छंद समूहात गाणे गायची थीम होती. तिथे वेगवेगळ्या वयानुसार गट केले होते. त्यात मी दोन गाणी
आधीच रेकॉर्ड केलेली दिली. एक होते धुंदी कळ्यांना आणि दुसरे ओ सजना बरखा बहार आई. ओ सजना हे गाणे
२०१९ सालच्या भारत ट्रीप मधले होते. आज खूप टाईम पास केला. सेल्फी काढत बसले त्यात फोटोत बरेच इफेक्टस दिले. कृष्ण धवल असे काही काही.  आज ग्रोसरी  केली नाही, ती आता उद्या करू. आज खूप थंडी होती. अजूनही अमेरिकेतली थंडी पूर्णपणे गेलेली नाही.
 त्यात हा कोरोना आला. कालच आजचा सकाळचाही स्वयंपाक करून ठेवला होता त्यामुळे आजचा दिवस रिलॅक्स गेला.

Sunday, March 22, 2020

२२ मार्च २०२०

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची भर घालायला लागेल. कालचा दिवस पुर्णपणे कामाचाच होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामेच कामे. शुक्रवारी रात्रीच शनिवारच्या दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक करून ठेवला होता. उठल्यावर एके ठिकाणी एक काम होते म्हणून गेलो. कारमध्ये बसलो आणि जिपीएस साथ देईना म्हणजे ते बंद पडले होते. मी कागदावर मार्गक्रमणा लिहून घेतली होती तरीही आम्ही जिपिएस लावतो कारण काही वेळा गुगल मॅप्स नीट रस्ता दाखवत नाहीत. कार मधून बाहेर पडले आणि घरी जाऊन जुने
जिपीएस आणले. त्यावर पण पत्ता नीट उमटेना.


शेवटी कार सुरू केली आणि निघालो. बोटाने टाईप करण्याऐवजी त्यावर नखाने टाईप करायला लागले तेव्हा कुठे पत्ता उमटला. खरे तर दोनच रस्ते आहेत पण गुगल मॅप ने एकदा डावी एकदा
उजवी असे करत रस्ता सांगितला होता. जिथे जायचे होते ते काम उरकल्यावर घरी येऊन आधी जेवलो. मग मी द. मा. मिरासदारांचे "जावईबापुंच्या गोष्टी" हे पुस्तक वाचले. खूप धमाल विनोदी पुस्तक आहे. दुपारचा चहा घेतला आणि इंडियन ग्रोसरी उरकून आलो. सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा उपलब्द
असल्या तरी त्याचे टाअमिंग कमी केले आहे. गोसरी आणल्यानंतर धुणे धूवून आणले. यावेळी नेहमीचे कपडे तर होतेच, शिवाय दुलया आणि बेडशीटे पण होती. मला लॉड्रीमध्ये सोडून विनायक घरी आला.

धुणे धुतल्यावर परत विनायक कार घेऊन आला आणि दोन जड पिशव्या  उचलून (सर्व धुण्याच्या) कार मध्ये टाकून घरी आलो. घरी आल्यावर खूप भूक लागली होती पण काही करून
 खाण्याचे बळ नव्हते.  

एक पोळी उरली होती तीच तूप साखर लावून खाल्ली. कालच्या दिवशी ईटली मध्ये ८०० माणसे कोरोनात वारली. न्युयॉर्क मध्येही बरीच वारली आणि काही दवाखान्यात दाखल झाली आहेत. भारतात आज रविवारी कोणीही बाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते आणि त्याला प्रदिसादही मिळाला. कोणी कोणी टाळ्या वाजवून तर कोणी शंख फूंकून तर कोणी थाळ्या वाजवून सर्वजण घराच्या गॅलरीत येत होते त्याचे विडिओज पाहिले. मला तर ही एक प्रकारची प्रार्थनाच वाटली. कालची उसळ जास्त केल्याने आज जेवणाला
फक्त पोळ्या केल्या. जेवणानंतर युट्युबवर एक कोरिअन ऑस्कर विनर चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच छान आहे. कोणत्यातरी नवीन विश्वात गेल्यासारखे वाटते. सिनेमा संपल्यानंतर मन सून्न होऊन जाते. आज दुपारी खूप दिवसांनी साबुदाणा खिचडी करून खाल्ली.


आता रात्री नेहमीप्रमाणेच आज रात्रीचा आणि उद्या दुपाररचा स्वयंपाक करून झोपणार. आज मी एका वहीत एक मेन्यू लिहून ठेवला आहे. हा जेवणाचा मेन्यू मी गुढीपाडव्यासाठी करणार आहे. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करणार आहे. जेणेकरून हा दिवस लक्षात राहील.


Thursday, March 12, 2020

१२ मार्च २०२०

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालच्या दिवसाचीही भर घालावी लागेल. काल सकाळी विनायक ऑफीसच्या कामानिमित्ताने न्युयॉर्कला जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि माझा एकटीचा दिवस सुरू झाला. एकटीने काय काय करायचे याची रूपरेषा मनात आखून ठेवली होतीच. चहा आणि न्याहरी झाल्यावर स्मार्ट टिव्हीवर क्रॉमकास्ट च्या मदतीने युट्युबवरचा परिचय सिनेमा पहायला सुरवात केली. अधून मधून ब्रेक घेत होते. सिनेमाची प्रिंट अजिबातच चांगली नव्हती त्यामुळे बंद केला. नंतर नेहमीप्रमाणेच एफबी वर चकरा मारल्या. युट्युबवर वर चक्कर मारली. गुगलींग केले. जेवणासाठी भाजणीचे थालिपीठ करून खाल्ले. मग थोडी पडले. नंतर घरातली साफसफाई केली. दुपारचा चहा झाल्यावर मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले. टाईमपास साठी एक दोन मालिका पाहिल्या. नंतर २ मैत्रिणींशी फोनवर मनसोक्त गप्पा मारल्या. विनायकशी २ वेळा फोनवर बोलणे झाले.



संध्याकाळी नेटफ्लिक्सवर डोक्याला अजिबात ताप न होणारा सिनेमा लावून बसले. तो सिनेमा म्हणजे अमर अकबर अँथनी. अधून मधून ब्रेक घेत होते. रात्रीच्या जेवणासाठी काय करायचे तेही ठरवले होते. नंतर माझ्या एका जिवलग मैत्रिणीशी (मोनिकाशी) खूप मनसोक्त बोलले. तीही बोलली. रात्रीच्या जेवणात शेवयाची खीर केली आणि सोबत पोळी खाल्ली. झोपण्याच्या आधी परत विनायक ला फोन केला. त्याचाही दिवस कामा मध्ये खूप हेक्टिक गेला होता. होटेल मधून बाहेर पडून त्याने फूटपाथ वरून पाऊण तास चालून आला. तो म्हणाला इथे मुंबईत फिरल्यासारखेच वाटत आहे. बरेच लोक फूटपाथ वरून चालताना दिसतात. त्याला फोन वरून माझा दिवस कसा गेला ते सांगितले.



प्रिय मैत्रिण शुभदाला विडिओ कॉल केला व तिचे घर बघितले. मला खूप आवडले तिचे घर. तिने पोहे केले होते सकाळच्या न्याहरीसाठी. तिच्याशी बोलते मी बरेच वेळा फोन करून पण आज मात्र न बोलता तिचे घर बघितले आणि नंतर तिला बाय केले. रात्रीचे ११ वाजले आणि खऱ्या अर्थाने माझा दिवस सुरू झाला. ऑनलाईन अंताक्षरी मध्ये मनसोक्त खेळले दिड दोन तास. आज मोहिनीने अंताक्षरीची थीमही छान दिली. होती. शब्दभेंड्या आधीची थीम थोडा बदल करून दिली होती. अंताक्षरी खेळताना मध्ये भांडी घासण्यासाठी ब्रेक घेतला. अंताक्षरीमुळे कालचा आणि आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या. धन्यवाद मोहिनी !



शब्दभेंड्या आणि मुखडा अंतरा या दोन्हीही थीमा मी पूर्वी ऑर्कुटवर एका ग्रुप मध्ये टाकली होती त्याची आज खूप आठवण येत होती. आणि या ग्रुप मध्ये दर बुधवारी याहू मेसेंजर वर अंताक्षरी खेळायचो तेही आठवत होते. अंताक्षरीमुळे मित्रमंडळ तयार होते हे मी अनुभवलयं. पूर्वी मनोगत या मराठी संकेत स्थळावर सुद्धा मी अंताक्षरी टाकली होती. ती तर खूपच रंगली होती. पण आम्ही त्यामध्ये लिहून गाणी टाकायचो. अमेरिकेतले झोपायचे तेव्हा भारतातले मनोगती भेंड्या खेळायचे आणि भारतातले मनोगती झोपले की अमेरिकेतले खेळायचे. तसेच ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंड मधलेही असायचे.अंताक्षरी खेळून झाल्यावर झोप येईना म्हणून परत गुगलींग केले. परत झोपायचा प्रयत्न केला. सरतेशेवटी मला पहाटे ३ ला झोप लागली. उठायला ८ वाजले. पण आज आराम होता. आजच्या जेवणाच्या २ पोळ्या आदल्या दिवशी रात्रीच लाटून ठेवल्या आहेत. घट्ट झणझणीत पिठले आणि पोळी होती दुपारच्या जेवणाला.



उठल्यावर चहा, न्याहरी झाल्यावर परत थोडी अंताक्षरी खेळले. आज संध्याकाळी आदल्या दिवशी उरलेल्या साबुदाणा वड्यासाठी तयार करून ठेवलेल्या मिश्रणाचे थालिपीठ करून खाल्ले. दुपारी नेहमीच्या २ मराठी मालिका बघून थोडी गादीवर आडवी झाले. दुपारनंतर मात्र मला खूपच कंटाळा आला. केव्हा एकदा विनायक घरी येतो असे झाले होते.  विनायक घरी आल्यावर जसे ऑफीस मधून घरी आल्यावर रूटीन असते त्याप्रमाणे चहा, थोडे काहीतरी खायला केले. आणि नंतर जेवण करून झोप. हे दोन दिवस लक्षात राहावेत आणि नंतर कधी वाचताना मग छान वाटते म्ह्णून रोजनिशीत लिहिले इतकेच.

Saturday, February 29, 2020

२९ फेब्रुवारी २०२०

आजचा दिवस स्पेशल आहे ना? ४ वर्षातून एकदा येणारा २९ फेब्रुवारी ! तर आजची रोजनिशी लिहायला मला कालची थोडी भर घालायला लागेल. काल आमच्या अंताक्षरी ग्रूपची थीम होती फ अक्षराने सुरू होणारी गाणी गायची. २९ भारतात उजाडला आणि इथे २८ ची रात्र होती. मोहिनी रोज वेगवेगळ्या थीम देते अंताक्षरीच्या त्यामुळे मजा येते. फ म्हणजे फेब्रुवारीचा आणि २९ म्हणजे लीप वर्ष दिवस त्यामुळे अशी थीम


ठेवली होती. मी काही गाणी म्हणली आणि झोपले. २८ ला दुपारी मी जी मुगाच्या डाळीची खिचडी केली होती
 ती चविला खूपच छान झाली होती आणि काल मला का कोणजाणे पिठाची गिरणी आठवली त्यामुळे मी त्या आठवणीबद्दल लिहिले. आज २९ तारीख लीप वर्षाचा अमेरिकेतला दिवस म्हणून आज काहीतरी वेगळे करूया दुपारच्या जेवणात असे मनात आले आणि तसे केलेही.


मुगमटकीचण्याची उसळ, गाजर टोमॅटो कांदा अशी मिक्स कोशिंबीर आणि कढी केली. डाळीचे धिरडे केले.   फोडी घेतल्या. सोबत घरी केलेले लिंबाचे गोड लोणचे होते. संत्र्याच्या फोडी होत्याच.

आज काहीतरी वेगळे केल्याने  जेवणात मजा आली. तोंडाल चवही आली. आज थोडी रेंगाळलेली कामे करून आलो. आजचा लीप वर्षदिवस वेगळाच गेला आणि लक्षातही राहील. आज माझ्या एका मैत्रिणीने संत्र आणि केळे घालून गोडाचा शिरा माझ्या पद्धतीने केला त्यामुळेही छान वाटले.



Wish you All a very happy Leap Year 2020 !

Monday, January 06, 2020

६ जानेवारी २०२०

आजचा दिवस लक्षात राहण्यासारखा गेला. स्नोचे भाकीत नव्हते. सकाळी उठून पाहतो तर काय सगळीकडे स्नो पडलेला. अर्थात तो भुरभुरला होता फक्त. तापमान बऱ्यापैकी वर होते त्यामुळे जमीन तापलेलीच होती. आणि म्हणूनच रस्त्यावर स्नो साठलेला नव्हता.

आमच्या अपार्टमेंटला मुख्य दरवाजाला कुलूप असते त्यामुळे लक्षात ठेवून किल्ली घेऊन जावे लागते. विनायकने कामावर जाण्यासाठी निघाला. थंडीमध्ये रोजच्या रोज कार गरम करावी लागते त्यामुळे तो खाली गेला. पण वर येताना त्याच्या लक्षात आले की मुख्य दरवाज्याची चावी घेतली नाहीये. आणि फोन पण नेला नव्हता त्यामुळे मला फोन करून आतून दार उघड असे सांगता पण येईना. नशिबाने एकजण विनायक सारखाच खाली आला होता कार गरम करण्यासाठी आणि अर्थात विनायकने आणि त्यानेही कारवरचा बर्फही साफ केला होता.
त्याच्यामुळे त्याला मुख्य दरवाजातून वर अपार्टमेंट मध्ये येता आले.

आज मी ग्रंथालयात जायचे ठरवले होते. पडलेला बर्फ लवकर वितळणार हे माहीती होते. म्हणून मी ग्रंथालयात जाऊन आले. सर्व तयारीनिशी गेले होते. थंडी होतीच पण झेपण्याइतपत होती. जाताना रात्रीच्या पोळ्याही करून ठेवल्या होत्या. जाऊन येऊन तासभर लागला. मला वाटले होते तितके दूर नाहीये ग्रंथालय.

एक वाजेपर्यंत घरी आले आणि जेवले. दमल्यामुळे थोडी विश्रांती घेतली. दुपारी चहा घेऊन संध्याकाळचे खायला पण केले. आज धुणे धुवायचे होते म्हणून अंधार पडायच्या आत ते धूउन येवू असा विचार केला आणि गेले. आमच्या अपार्टमेंट मध्ये वॉशर आणि ड्रायर नाहीयेत. अपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर तळघरात ते आहेत. तिथे गेले तर सर्व मशिन्स बंद होती. तिथे एक बाई होती. ती म्हणाली फक्त एकच मशीन चालू आहे त्यात मी माझे धुणे लावले आहे. तिला तर खूप वैताग आला होता. तिचे धुणे एका मशीन मध्ये
अडकले होते. त्यात पाणीही होते.


तिने त्या मशीनचा प्लग काढला आणि मशीन मध्ये असलेले सर्व कपडे पिळून दुसऱ्या मशीन मध्ये टाकले. मी तिला म्हणाले मी माझी धुण्याची पिशवी इथेच ठेवते.

तुझे कपडे धूवून झाले की मग मी येते. कारण की एकच मशीन चालू होते आणि तिचे कपडे त्यामध्ये
धुतल्यानंतर मग ती तिचे कपडे काढून ड्रायरमध्ये टाकणार त्यामध्ये वेळ जाईल म्हणून मी परत घरी आले. विनायक घरी येऊन चहा पीत होता. तो म्हणाला की तो त्याचा फोन कामावरच्या जागेवरच विसरून आलाय.  मग थोड्यावेळाने मी लाँड्री मध्ये गेले आणि त्या एकाच चालू असलेल्य मशीनमध्ये टाकले.

या लाँड्रीरूम मध्ये बसायला खुर्च्या नाहीत. थंडी असल्याने बाहेर पण जाता येत नाही त्यामुळे परत जिना चढून घरात यावे लागते. आणि आठवणीने मुख्य दाराची किल्ली आणि फोनही घेऊन जावा लागतो.
मशीन मध्ये कपडे टाकून मी मैत्रिणीला फोन लावला. थोडावेळ थंडी असली तरी बाहेर थांबले. घरी परत गेले नाही कारण की आधीच मी सकाळी तासभर म्हणजे दोन मैल चालून आले होते. कोणतेही मशीन चालू नाही आणि फक्त एकच मशीन चालू होते म्हणून माझी एक खेप जिना चढण्या उतरण्याची झाली होती. म्हणून मी विचार केला की अर्धा तास खालीच थांबून धुतलेले कपडे ड्रायर मध्ये टाकून मग जिना चढून घरी जावे. भाजी चिरलेली होतीच. ड्रायरमध्ये कपडे वाळायला ४५ मिनिटे लागतात. त्यावेळात भाजी करावी असा विचार केला होता.   

बाहेर थंडी होती म्हणून लाँड्रीरूम मध्ये येऊन मैत्रिणीला फोन लावला तितक्यात मला कसला तरी आवाज आला. बघते तर मी कपडे लावलेले मशीन आऊट ऑफ ऑर्डर झालेले. अरे देवा ! तिथे असलेल्या फोन नंबर वर फोन केला तर तिथे नेहमीचेच ऑप्शन्स अमूक करता १ दाबा याव आणि टँव . तिथे मेसज दिला आणि परत वैतागून वर आले. विनायक ला म्हणाले की तुझ्या फोनवरून फोन लाव परत. फोन लावला कोणीही बोलायला आले नाही. आता अर्धवट (खरे तर नीट धुतले न गेलेले कपडे) लाँड्र्रिच्या पिशवीत टाकले आम्ही दोघांनी मिळून.
 नशीब मशीनचे झाकण उघडता  
आले. ओले कपडे पिशवीत घालून खालच्या खाली आम्ही कारमध्ये बसून कॉईन लाँड्रीमध्ये गेलो. तिने तासभर बसून चालणार नव्हते. तिथे एका मशिनमध्ये कपडे धुवायला टाकले आणि घरी आलो. डोके भणभणायला तर लागलेच होते. शिवाय पाय खूप दुखत होते. चहा घेतला आणि परत जाऊन कपडे ड्रायर मध्ये टाकून आलो. घरी आल्यावर पोळी भाजी केली. आणि परत वाळलेले कपडे घेऊन घरी आलो आणि जेवलो.  

आज मी ७ ते ८ वेळा जिन्याची चढ उतार केली. त्यामुळे प्रचंड पाय दुखत आहेत. कपडे धूवून आल्यानंतर
 लाँड्रीच्या कस्टमर सर्व्हीसचा फोन आला. त्यांना सांगितले की आमचे कपडे आम्ही दुसरीकडून धुवून आणले. आजपासून कानाला खडा. अपार्टमेंटच्या लाँड्रीमध्ये कधीच कपडे धुवायचे नाहीत. सरळ कॉईन लाँड्रीमध्ये जायचे. अपार्टमेंटच्या लाँड्रीकरता जे पैसे भरून आणले होते ते बरेचसे संपले होते म्हणून ठीक.




Wednesday, January 01, 2020

नव-वर्षारंभ २०२०

आज पहाटे मला खूप सुंदर स्वप्न पडले. मला गणपतीची मूर्ती दिसली. ती मूर्ती भव्य आणि विटकरी रंगाची होती. मूर्ती एका गोलाकारामध्ये विसावली होती आणि त्यावर कोरीव काम केले होते. हे सर्व एका रथात होते आणि तो रथ एका तलावात होता. त्या तळ्यातली बदके वेगळीच दिसत होती. नंतर आम्ही दोघांनी हेलिकॉप्टर राईड केली. हेलीकॉप्टर मधून आम्हांला हिरवेगार डोंगर दिसत होते. त्या डोंगरावर हिरव्या रंगांच्या निरनिराळ्या छटाही दिसत होत्या. जाग आली तेव्हा असे स्वप्न आपल्याला नवीन वर्षाच्या सुरवातीलाच का पडावे याचे नवल वाटले. पुढे काहीतरी याचा संकेत असेल. कारण की मला स्वप्नातून किंवा असे काही भास होतात किंवा अस्वस्थता
जाणवते आणि ते पुढे खरे होते. 


आज नवीन वर्षाच्या सुरवातीला मी जेवणासाठी बरेच काही वेगवेगळे करणार होते पण केले नाही.
खूप भांडी पडतात घासायला. आता होत नाही. मग फक्त  गोड म्हणून गोडाचा शिरा केला. सुकामेवा होताच. सॅम्स क्लब मधून मला मीठविरहीत भाजलेला सुकामेवा
मिळाला होता. या सुक्यामेव्याचे डेकोरेशन केले शिऱ्याभोवती. काहीतरी वेगळे करायचे म्हणून केले.  

संध्याकाळी इथल्य्य मॉल मध्ये एक चक्कर मारली. इथले टार्गेट स्टोअर खूप चकाचक आहे. कोल दुकानामध्येही पर्सेसच्या बऱ्याच व्हरायटी पहायला मिळाल्या. एकंदरीत आजचा दिवस चांगला गेला.  



सर्व वाचक आणि ब्लॉगलेखकांना माझ्या तर्फे नवीन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा !!