Friday, July 02, 2021

इंगल्स मार्केट ... (९)

 

गेले २-३ दिवस मला इंगल्स मधल्या दिवसांची खूप आठवण येत आहे. 🙁 त्यामुळे पुढचे भाग लिहिले गेले. अजूनही काही भाग लिहून होतील.मग ही मालिका संपेल.
 
 
 
मी पक्की शाकाहारी असल्याने तिथले पदार्थ मला खाता यायचे नाहीत. पण ज्या मध्ये मांस नाही असे पदार्थ मी बनवायचे. म्हणजे ते जणु माझेच होऊन गेले होते.आणि ते विकी आणि कार्मेनलाही माहित होते. पोर्क पुलींग मी कधी केले नाही की हॅम सलाड कधी केले नाही. मला ते बनवताना ड्चमळायला लागायचे आणि मी सांगितले की हे २ पदार्थ मी बनवू शकत नाही. एक वेळ हॅम सलाड मी कालवू शकते आणि प्लॅस्टिक डब्यात भरु शकते पण पोर्क पुलींग अजिबातच नाही.सलाड मध्ये चिकन कापायला मला काही त्रास झाला नाही. इथे चिकन सलाडचा खप तडाखेबंद असतो ! आणि ही जी काही सलाड बनतात त्यात मेयोनिज घालतात. त्यामुळे मेयोनिजचे मोठे च्या मोठे डबे आम्हाला खूप लागायचे. आणि ही सलाड मोठमोठाल्या घमेल्यात आम्ही बनवायचो. एग सलाड बनवायचे असेल तर आम्हाला कमीत कमी ५० अंडी किसून घ्यायला लागायची. कापलेले हॅम फूड प्रोसेसर मधून किसुन घ्यायला लागायचे. पिमंटो चिझ बनवायलाही २ ते ४पिशव्या मध्ये असलेले सर्व लागायचे. हे जे पदार्थ आम्ही बनवायचो त्याकरता आम्हाला फ्रीजर रूम मध्ये जावे लागायचे. हे फ्रिजर खोली एवढे मोठे असतात. तिथे सर्व कच्चा माल ठेवलेला असतो. हा माल सर्व ट्रक मधून येतो. या ट्रक मधून माल उतरवून घेण्याकरता डेली मॅनेजर जातात. अवाढव्य खोकी की जी खोली एवढी ढिगाने असतात ती पॅलेट वरून उतरवली जातात. फ्रीजर मध्ये ठेवली जातात. हे सर्व काम डेली मॅनेजर आणि त्याला त्याची मदतनीस करते. विक्रिकरता ठेवलेले आणायचे नसते. आणि इथे काम करताना तुमच्या हातात कुणी साहित्य आणुन देत नाही ते सर्व आपले आपल्यालाच करायला लागते आणि त्याकरता चकरा खुप होतात. अर्थात यादी बनवली की आम्ही ते ते सर्व आणत असु. पण तरीही ते एकाच वेळेला सर्व आणले जायचे नाही.
 
 
 
मला हळूहळू कळाले की मांस असलेले पदार्थ जरी आपल्याला खाता येत नसतील तरी बाकीचे बरेच काही खाता येईल आणि मी ते खायचे. काम करताना खाणे अलाउड आहे पण लपत छपत खायचे, किंवा कोल्ड रूम मध्ये जाउन खायचे. बनाना पुडींग बनवताना त्यात केळ्यांच्या चकत्या आणि कुकीज घालायला लागतात त्यामुळे केळी खाता यायची. काही सलाड मध्ये बेबी टोमॅटो, काकड्या, स्ट्रऍबेरी, दाक्षे घालायचे असल्याने मला ते पण खाता याायचे. सब मध्ये मी काही वेळेला लंच साठी माझा मीच सब बनवून घ्यायचे. त्यात मी भरपूर काकड्या, टोमॅटो, चिरलेले लेट्युस घालून घ्यायचे. शिवाय थोडे किसलेले चीझ पण टाकायचे. टोमॅटो सँस घालायचे. काही वेळेला मी लिहून द्यायचे मग मला तिथल्या सब मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणी बनवून द्यायच्या. जेव्हा तिथे छोटे पिझ्झे order ्नुसार बनवून द्यायचे तेव्हा पण मी एखाद वेळेला पिझ्झा घ्यायचे. आणि एशियन बार सुरु झाला तेव्हा मला व्हेजी नुडल्स खाता यायचे. हे छान असायचे. आठवड्यातून एक दिवस मी डबा न आणता हे असे खात असे.फ्रुट बार करता फळे कापली जायची ती कापताना आम्ही आशाळभुत नजरेने बघायचो. 😃 कूकींगच्या शेजारीच आमच्या मागेच जेव्हा फळे कापायच्या तेव्हाआम्हाला पण त्यातल्या काही फोडी खाता यायच्या. त्यात अननस, कलिंगड, टरबूज असे. मग त्यातल्या काही फोडी एका बाउल मध्ये ठेवून काम करता करता मी खायचे. त्यामुळे फ्रेश वाटायचे. काही वेळा तर असे वाटायचे की तू कापत रहा मी आयत्या फोडी खात रहाते, असे मी म्हणायचे काही वेळेला. 😃 लंच मध्ये कस्टमर लोकांना २ व्हेजी आणि एक चिकन वडा असे ५ dollar ला असते. त्यात मॅक and चिझ, mashed पोटॅटो असायचे किंवा ब्रोकोली भात, उकडलेले बीन्स, यात सुद्धा लंच शिवाय कस्टमर नुसते चिकन वडे खूप घ्यायचे. चिकन सलाड सारखाच चिकन वड्यांचा तडाखे बंद खप व्हायचा. अरे बापरे. ही लोक किती फॅट खातात असे मनात म्हणायचे मी. 
 
 
 
आम्ही तिघी म्हणजे मी विकी आणि कार्मेन उद्पादन विभागात असल्याने आम्ही सर्व कोरडे पदार्थ बनवायचो. कुकींग व फ्रुट बार सेक्शन आमच्या अगदी मागेच होता. hot बार, सब बार, एशियन बार आमच्या पुढे होते. कूकींग आणि फ्रुट बार साठी घासायला भांडी खूपच व्हायची. आमची भांडी कमी व्हायची. सलाड बनवण्यासाठी आम्हाला फक्त घमेली लागायची. ती आम्ही सिंक मध्ये विसळून ठेवायचो. तिथे डिश washer जरी असले तरी कुकींग सेक्शन आणी फ्रुट बार साठी खूपच भांडी व्हायची, इतकी की डिश वाशर ला लावून सुद्धा प्रत्यक्ष हाताने बरीच भांडी त्यांना घासावी लागत ! लंच टाईम १२ ते २ खुप गर्दी असायची. त्यामुळे आम्हाला तिथे मदतीला जावेच लागायचे. लोकांना लंच box मध्ये पदार्थ घालून, लिस्ट मधे पाहून त्याप्रमाणे कोड घालून लेबल प्रिंट करून लावायचे आणि द्यायचे. तिथे नेमून दिलेल्या बायकांना आम्ही मदत करायचो. इथे बरेच आले आणि गेलेले पाहिले. दुसरी नोकरी मिळाली की इथली नोकरी सोडून गेलेले, कुणाला फायर केले म्हणून सोडून गेलेले. त्यामुळे इथे नेहमी माणसांची कमतरता असे.
अश्या वेळेला डेली मॅनेजर उपलब्ध असलेल्या माणसांमध्ये फिरवा फिरवी करायची. आज तू सब मध्ये काम कर, तर तु कुकींग साठी जा. काही वेळेला मांसकापणाऱ्या लोकांना ती डेली सेक्शन ला टाकायची. आम्हाला तिघींना उद्पादन सोडुन जेमिने दुसऱ्या विभागात टाकले नाही. कारण तिला माहिती होते की इथे खूप काम असते. आमच्या मदतीसाठी ती नेमणूक करायची पण नंतर तिची रवानगी दुसऱ्या सेक्शन मध्ये व्हायची कारण की माणसांची कमतरता खूप असायची. आम्ही तिघी अजिबात दांड्या मारायचो नाहीत. अगदी क्वचित खूप बरे वाटत नसेल तर मी जायचे नाही. कारण गेले नाही की त्यांच्यावर खूप भार पडायचा.अश्या वेळेला डेली मॅनेजरची पण खुप कसरत होते. डेली मॅनेजर पण ३ ते ४ झाले. त्यांच्यावर पण खूप प्रेशर असते. डिस्ट्रिक्ट मॅनेजर आला किंवा फूड इन्स्पेक्टर आला की आमची खूप धावपळ व्हायची. फ्लोअर भरलेला असला पाहिजे. जर शिलकीत डबे शिल्लक नसतील तर ते आधी बनवून प्लोअर वर ठेवावे लागत. फूड इन्स्पेक्टर रेटींग देवून जाई. Rohini Gore 
 
 
क्रमश : ...
 

















 


1 comment:

Aishwarya Kokatay said...

नमस्कार, आमच्या येत्या दिवाळी अंकासाठी काही लिखाण पाठवता येईल का ? अभिप्राय कळवावा
नियमावली ची लिंक खालील प्रमाणे आहे :
https://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2021
माझा इमेल : kokatayash@gmail.com