आज फादर्स डे च्या निमित्ताने बाबांनी लिहिलेले सर्व मी माझ्या ब्लॉगवर टंकणार आहे. बाबा लहान मुलांना व मोठ्या माणसांना गोष्टी सांगत. गोष्ट सांगण्याची कला बाबांना अवगत होती. गोष्टी सांगणे, गायन, कुंडली बघून भविष्य सांगणे, पेटी वाजवणे, चित्रकला, रांगोळ्या काढणे, फोटोग्राफी अशा एक ना अनेक कला बाबांच्याकडे होत्या. बाबांनी डबलरोल फोटो काढण्याचे पण प्रयत्न केले. खूप प्रेमळ होते बाबा. त्यांना अनेक कविता तोंडपाठ होत्या. वर्तमानपत्रात किंवा मासिकात जे जे काही चांगले असेल त्याची कात्रणे कापून ती त्यांनी वहीत चिकटवून ठेवली आहेत. बाबांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात आमच्या लहानपणी सांगितलेल्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. बाबा जेव्हा गोष्ट सांगत तेव्हा लहान मुले व मोठी माणसेही अगदी तल्लीन होउन जात. बाबा तुम्ही आज या जगात नाही, पण आमच्या आठवणीत क्षणोक्षणी आहात. तुमचे आशीर्वाद आणि संस्कार आमच्या उर्वरीत आयुष्यात आम्हाला साथ करतील हे नक्कीच ! Miss you baba