Monday, October 08, 2012

वास्तू (६)

"आज आपण आपल्या घरी 'नटसम्राट' हे नाटक पाहणार आहोत" बाबा म्हणाले, बाबा सकाळी पूजा करत होते. त्या दिवशी रविवार होता. आम्ही दोघी बहिणी उशिराने उठून चहा पीत होतो. बाबांचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही दोघी म्हणालो " म्हणजे काय बाबा? " बाबा म्हणाले माझे वाक्य परत एकदा नीट ऐका. आज संध्याकाळी टीव्हीवर नटसम्राट आहे ना? आम्ही म्हणालो 'हो' तर मग ते आपण आपल्या घरी पाहणार आहोत. आम्ही दोघी एकदम "म्हणजे आपण टीव्ही घेणार आहोत का? " बाबांनी हसूनच मान डोलाव्वली. आम्हा दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला.








त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरी टेलिव्हिस्टा टीव्ही आला. खूप छान होता. आम्हा दोघी बहिणींना क्राऊन टीव्ही आवडायचा नाही, याचे कारण या टीव्ही वर सारख्या मुंग्या यायच्या. मुंग्या म्हणजे चित्र धुरकट होऊन अजिबात दिसेनासे व्हायचे आणि नुसते बारीक बारीक अनेक ठिपके दिसायचे. याला आम्ही मुंग्या म्हणायचो. आमच्या दोघींच्या मैत्रिणींकडे क्राऊन टिव्ही होते. आमचा टिव्ही येण्या आधी आम्ही आम्ही आमच्या मैत्रिणींकडे जायचो. अंटीनाला काठीनेच जरा हलवले की टीव्ही परत दिसायला लागायचा.  टेलिव्हीस्टाला सरकते दार होते. या टीव्हीवर घरी विणलेले कापड घालायचो. कृष्ण धवल टीव्ही वर रविवारी संध्याकाळी नाटक सिनेमे असायचे. रविवारी संध्याकाळी आम्ही सर्व जण जय्यत तयारीने टीव्ही पहायला बसायचो. बाबा म्हणायचे मी बाल्कनीत बसणार. बाल्कनी म्हणजे कॉट. कॉटवर आईबाबा बसायचे व आम्ही दोघी फोल्डिंगच्या खुर्च्यांवर बसायचो. या फोल्डिंगच्या खुर्च्या आरामदाय होत्या. नायलॉनच्या कपड्यांनी बांधलेल्या होत्या. त्याच्या पाठी खूप उंच होत्या त्यामुळे टेकून आरामात बसता यायचे. एक आरामखुर्ची होती. ज्यांना कोणाला सिनेमा बघण्यात स्वारस्य नसेल तो आरामखुर्चीवर बसायच व डोळे मिटून सिनेमा ऐकायचा. रविवारी संध्याकाळी सर्व घर आवरून केर काढायचो. खिडक्यांचे पडदे लावून घ्यायचो. दार लावायचो व अंधार करून सिनेमा बघायचो. त्या दिवशी दडपे पोहे ठरलेले असायचे. खुर्चीवर बसून दडपे पोहे खायला सुरवात केली की सिनेमाच्या टायटल्स सुरू व्हायच्या. साप्ताहिकी न चुकता बघायचो. साप्ताहिकीमध्ये पुढील आठवड्याचे कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जायची. रविवारी जर फालतू सिनेमा दाखवणार असतील तर मग आम्ही घरी थांबायचो नाही. बाहेर कुठेतरी फिरायला जायचो. रविवार सकाळची रंगोली आरामात सकाळी उठताना गादीवर झोपूनच पहायची. रंगोलीमध्ये गाणी छान लागायची. अंगावर पांघरूण व डोक्याखाली दोन दोन उश्या घेऊन रंगोली पहायचो. नंतर उठून चहा व बाकीचे आवरणे सुरू व्हायचे.








माझ्या माहेरी सर्व गोष्टी अचानकच आलेल्या आहेत. जसा टीव्ही अचानक घरी आला तसाच रेडिओ आमच्या घरी मी लहान असतानाच आलेला आहे. बाबांनी एकदा बाहेर चहा पिताना सुधीर फडके यांचे विसर गीत विसर प्रीत, विसर भेट आपुली हे गाणे ऐकले. हे गाणे बाबांना इतके काही आवडले की त्या दिवशीच बाबा रेडिओ विकत घेऊन आले. पूर्वी रेडिओ भेले मोठे असायचे. रेडिओच्या डाव्या बाजूला वर एक छोटा आयताकृती डोळा होता. तिथून हिरवा लाईट लागायचा व रेडिओ सुरू व्हायचा. स्टेशने बदलायला छोट्या बरण्यांची झाकणे असायची तशीच गोल चक्रासारखी बटणे असायची. ही बटणे फिरवली की आवाज लहान मोठा व्हायचा. एक बटण स्टेशन फिरवायला होते तर एक बटण बँड बदलायला होते. रेडिओच्या मध्यभागी एका आयताकृती चौकोनात काही अंतरावर आकडे लिहिलेले होते. या आयताकृती चौकोनात एक लाल उभा बारीक दांड्यासारखा एक काटा होता. स्टेशन बदलायचे बटण डावीकडे किंवा उजवीकडे फिरवले ही हा लाल काटा डावीउजवीकडे सरकायचा व स्टेशने लागायची. मुंबई, पुणे, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ अशी सर्व स्टेशने लागायची. आईला मुंबई स्टेशन आवडायचे. त्यावर मराठी गाणी, श्रुतिका लागत असत. मुंबई अ, मुंबई ब, अशी काहीतरी स्टेशने होती. आम्हा दोघी बहिणींना विविध भारती खूपच आवडायचे. मला तर खूपच प्रिय होते. आईने मुंबई लावले असेल तर मी ते लगेच बदलून विविध भारती लावत असे. मग आमच्या दोघींची भांडणे व्हायची. दिवसभर रेडिओ सुरू असायचा.






आईलाही हिंदी गाणी आवडायची पण सारखी नाही. ती म्हणायची इतर स्टेशनांवरही चांगले कार्यक्रम असतात तेही ऐकले पाहिजेत. आईचे हे म्हणणे पटायचे पण हिंदी गाण्यांची इतकी आवड होती की सारखे विविध भारतीच लावले जायचे.  बाबांना रेडिओवर सुधीर फडके यांचे गाणे लागले असेल तर बाबा ओरडायचे "हे गाणे संपले की तुम्हाला हवे तिथे जा" रेडिओवरचा लाल काटा सतत इकडे तिकडे हालत असायचा. शेवटी तो एकदाचा तुटला. तोही दमत असेल. सिलोन, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई, पुणे अशी बरीच स्टेशने लागायची. रात्री सगळ्यात शेवटी बेलाले फूल लागायचे, ते ऐकूनच मग आमचा रेडिओ बंद व्हायचा. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ६ वाजता भक्तीगीते व भावगीते या गाण्यांई सुरू व्हायचा. सकाळची शाळा होती तेव्हा ही भक्तीगीतेच आम्हाला जागी करायची. पाऊस पडत असेल, थंडीचे दिवस असतील तर असे वाटायचे की पांघरूणात तयार झालेल्या उबेतून बाहेर येऊच नये. गाणी ऐकत असेच पडून राहावेसे वाटायचे.







एका दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बाबा असाच अचानक टेप रेकॉर्डर घेऊन आले. हा टेप रेकॉर्डर आयताकृती होता व त्याची बटणे आयताकृती चौकोनी आकाराची होती. पियानो वाजवायची बटने कशी दिसतात तशीच होती. त्याला एक माईकही होता. माईकला वायर होती. हा माईक गॅस पेटवायचा लायटर कसा दिसतो तसाच दिसायचा. त्या दिवशी आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. पहिल्याप्रथम आजोबांनि काही श्लोक म्हणले. नंतर आम्ही सर्वांनीच आमच्या आवडीची गाणी म्हणली. गाणे टेप करायचे. नंतर रिव्हाईंड करायचे व ऐकायचे. आवाज कमी जास्त करायचे एक छोटे बटण होते. ते एका फटीत बसवले होते. ते मागे पुढे फिरवून आवाज कमी जास्ती करता यायचा. कॅसेटवर आम्ही काहीही टेप करायचो. बाळाचे जोरजोरात रडणे, कोणी झोपले असेल तर त्याचे घोरणे, शिंका कुणाला येत असतील तर त्या टेप करायचो. काही वेळा गप्पा मारताना त्या खुप रंगात आल्या की त्या टेप करून मग ऐकायचो. नंतर ऐकायला खूप मजा यायची. गप्पा मारताना आपण जसे काही वेळा खूप जोशात बोलतो ते नंतर ऐकताना मजा वाटायची. एकदा तर खडाजंगी भांडणे टेप केली होती.





आमच्याकडे मामा मामी, व आमची काही मामे व मावस भांवंडे जमलो होतो. गप्पा मारताना काही मुंद्यांवरून वादावादी सुरू होती आणि त्यातच मामा मामीची भांडणे जुंपली. त्या दोघांचेच तावातावाने बोलणारे आवाज आम्ही गुपचुप टेप केले. नंतर भांडणे निवळली. झोपण्याचया आधी गादीवर बसून मामीला लाडात येऊन म्हणालो बघ ना मामी आमचा टेप रेकॉर्डर, कसा आहे? त्यावर मामी म्हणाली ऐकवा ना काहीतरी. मग लगेच टेप ऑन केला आणि भांडणाचा आवाज सुरू झाला. मामी डोळे विस्फारून हे काय गो! आम्हाला वाटले चिडली. पण नंतर तीच हासायला लागली म्हणाली डांबरट्ट आहात हो अगदी. नंतर मग काही दिवसांनी आम्ही भावंडे एकत्र जमलो की ती भांडणाची कॅसेट लावायचो व भरपूर हासायचो.

क्रमशः