Monday, June 28, 2021

इंगल्स मार्केट ... (८)

 

विल्मिंग्टन सोडून आम्ही जेव्हा हॅंडरसनविल ला आलो तेव्हा मला बदल मिळाला. अपार्टमेंट शोधात खूप त्रास झाला. जेव्हा राहायला सुरवात केली तेव्हा विनायक सकाळी ८ ते रात्री ७ नोकरी करू लागला. त्याला ये-जा करण्यासाठी कारने ९० मिनिटे लागायची. जेवायचा डबा घेउन जायचा. मला खूप एकटेपणा आला. पुढे काय? हा प्रश्न सतावायला लागला. हजारोंच्या संख्येने फोटो काढून झाले होते. जवळ जवळ सर्व प्रकारच्या रेसिपीज लिहून झाल्या होत्या आणि इथे येणारे अनुभव पण बरेच लिहून झाले होते. अर्थात अनुभव कधीच संपणार नाहीत. तसेही विल्मिंग्टन मध्ये २००५ ते २०१५ मित्रमंडळ नव्हतेच. मनोगताने खूपच साथ दिली होती. ती साथ २००५ ते २०१० पर्यंत होती. तिथे मिळालेले मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी बिझी झाले होते. याहू वरच्या अमर्याद गप्पा पण संपल्या. मनोगतावरच्या चर्चा संपल्या.
 
 
 
त्यानंतरही बरेच काही छोटे छोटे उद्योग केले. ते सर्व उद्योग मी माझ्या blog्वर लिहिलेले आहेत. नविन शहर आणि आलेला एकटेपणा. एकटेपणा जाण्यासाठी बाहेर पडा. चाला. काही ना काही मिळते. आमच्या घरापासून फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स पर्यंत जातो. एकदा विनायक या फुटपाथ वरून चालून आला आणि म्हणाला एकदम सुरक्षित फुटपाथ आहे. तू पण आठवड्यातून एकदा इंगल्स पर्यंतजात जा. एकदा गेले इंगल्स मध्ये. माझ्या चालीने हा रस्ता ये-जा करण्यासाठी ६० मिनिटांचा आहे. दर आठवड्याचा माझा चालण्याचा कार्यक्रम ठरून गेला. दर आठवड्यात १ ते २ वेळा इंगल्स पर्यंत ये-जा करायचे. त्यामुळे वेळही जायचा. चालणेही व्हायचे. एकटेपणा कमी व्हायला मदतही झाली. इंगल्स मध्ये जायचे. तिथे स्टारबक्स आहे. तिथे coffee प्यायची. भूक लागली असेल तर एखाद डोनट खायचा आणि परत यायचे. एकदा अशीच इंगल्स मध्ये गेले असताना एका टेबलावर बसले होते. तिथे एक बाई ब्रेडचे गठ्ठे लावत होती. मनात म्हणाले अशी नोकरी हवी. किती छान ना ! त्या बाईला विचारले की इथे नोकरीचे चान्सेस आहेत का? ती म्हणाली थांब. तिने मला सांगितले तो तुला पांढऱ्या शर्ट मधला माणुस दिसतोय का? तर त्याला जाऊन विचार, तो तुला सांगेल. त्याला जाउन विचारले. मला कुठे माहिती होते की ज्या माणसाला मी नोकरी संदर्भात विचारले तो स्टोअर मॅनेजर होता. त्याने सांगितले की तू online अर्ज कर. अर्ज कर आणि मला येऊन भेट. मी म्हणाले की तुझे नाव काय? तर त्याने एक इंगल्स चे कार्ड दिले आणि त्याच्यावर त्याचे नाव लिहिले रिचर्ड. मला खुप आनंद झाला. ज्या अर्थी अर्ज करून मला भेटायला ये असे म्हणत आहे त्याअर्थी इथे नक्कि नोकरी आहे.
मी अर्ज भरला. त्यामध्ये तुमची उपलब्धता विचारतात. 
 
 
तिथे मी माझी उपलब्धतासोमवार ते रविवार ७ दिवस आणि वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी लिहिली. नंतर जाऊन रिचर्ड ला भेटले. आणि सांगितले की मी अर्ज केला आहे. तर तो जरा थांब असे म्हणाला. मी तुझ्या अर्जाची प्रिंट घेउन येतो. अर्जाची प्रिंट घेउन आला आणि म्हणाला की तू सही केली नाहीस. मी म्हणाले की मी इथेच सही करते. तर तो म्हणाला electronic सही पाहिजे. परत घरी जाउन सही केली आणि परत इंगल्स मध्ये त्याला भेटायला गेले. मला म्हणाला की अमुक एका दिवशी ये. त्या दिवशी गेले तर म्हणाला की डेली मॅनेजर आज आली नाहीये. आणि तुला कोणत्या सेक्शन मध्ये घ्यायचे हे पण अजून ठरले नाही. विचार चालु आहे. अर्जामध्ये मी सर्व सेक्शन ला टिक मार्क केली होती. तर म्हणाला उद्या येशील का? मी म्हणले २ दिवसांनी आले तर चालेल का? तर म्हणाला चालेल. त्याने हे पण विचारले की तु सेकंड शिफ्ट साठी येशील का? दुपारी २ ते ११. मी ठामपणे नकार दिला. दोन दिवसांनी गेले. मनात विचार आला ही नुसती टोलवा टोलवी चालू आहे का? नोकरी दिसत नाहीये. पण विचार केला की अजुन एक चान्स घेऊ.त्या दिवशी डेली मॅनेजर होती. तिच्याशी हस्तांदोलन केले. 
 
 
तिने मला जुजबीप्रश्न विचारले ते असे की तु या आधी असे काम केलेस का? तुला पर आवर ९ dollar मिळतील आणि शिफ्ट कोणती हवी ८ ते ४ की ९ ते ५. मी म्हणाले की मला या आधी असे काम केले नाहीये. पण शिकवले तर मी नक्कीच चांगले काम करीन. मला पगार मान्य आहे आणि ८ ते ४ शिफ्ट चालेल. शिवाय तिने हे पण विचारले की नोकरी करायची झाली तर तुझा कोणत्या प्रकारचा विसा आहे. तर मी म्हणाले की माझ्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. हे सांगितल्यावर ती खुषच झाली. म्हणाली की मी तुला offer इमेल ने पाठवते. ते तुला मान्य असेल तर
offer accept कर. मग तुझी background चेक केली जाईल. तुला ड्र्ग टेस्ट द्यावी लागेल. नोकरी करण्याकरता जे जे सोप्सकार लागतात ते ते सर्व झाले. विनायक मला आधीपासुनच सांगत होता की तु अश्या प्रकारची नोकरी कधी केली नाहीस. ८ तास उभे राहुन ही नोकरी आहे. आणी नुसते ८ तास उभे राहयचे नाही तर कामही करायचे आहे. तुला ही नोकरी झेपणार नाही. मी त्याला सांगितले की मी ८ तास काय २४ तास उभी राहायला तयार आहे इतका मला कंटाळा आला आहे. इथे अमेरिकेत घरी बसले की वेड लागते. डिपेंडंट विसावर नोकरी करता येत नाही. बऱ्याच बायका इथे डिपेंडंट विसावर बेकायदेशीर नोकरी करतात पण आम्हाला ते पटत नव्हते. म्हणून केली नाही.
गरजेसाठी नोकरी करावी लागते पण सततची टांगती तलवार असते. आम्हाला पैशाची गरज नव्हती पण मला वेळ कसा घालवावा याची गरज इथे हॅंडरसन्विललाआल्यावर जास्त भासली. 
 
 
तोपर्यंत विल्मिंग्टनला माझा वेळ मी छान घालवला. एक संपले की दुसरे असे करत करत बरेच काही उद्योग केले. मी इंगल्स मध्ये २०१५ ते २०१९ पर्यंत डेली मध्ये उत्पादन विभागात नोकरी केली. इथे बरेच विभाग आहेत. सब बार, हऍट बार, सुशी, फ्रुट बार, कुकींग आणि उद्पादन. मला उद्पादन विभाग खूप आवडतो. काम खूप असते पण एकसुरी नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविचेस, सलाड आणि बरेच काही प्रकार करावे लागतात. उद्पादन विभागात कामाची विविधता खूप आहे. मी तिथे नोकरी करत असताना निरिक्षण करायचे आणि मला अमुक अमुक सेक्शनला नोकरी दिली असती तर? पण नको रे बाबा. उद्पादन विभाग छान आहे. इथे काम तर जास्त आहेच. हालचाल खूप आहे. चालणे खूप आहे. तसे तर इतरांना पण आहेच. उद्पादन विभागात काम करायला कोणीही तयार होत नाहीत. इथे आम्ही तिघी होतो. मी कार्मेन आणि विकी. माझे दोघांशी छान जमून गेले होते. काम करता करता गप्पाही होत होत्या. मी विचार केला की बेकरीमध्ये मला टाकले असते तर पण नाही टाकले तेच बरे झाले तिथे ब्रेड, कुकीज, आणि केक्स बनतात. तिथे कस्टमर लोकही विचारपूस करत नाहीत. डेली सेक्शन्ला आम्ही hot बार, सब बार, एशियन बारला मदत करायचो. म्हणजेकस्टमर आले की त्यांना सर्व्ह करायला मदत करायचो. लंच टाईम मध्ये त्यांना मदत करावी लागायची इतकी गर्दी असायची. शिवाय डेली सेक्शनला कॅशियरची पण एक वेगळी पोस्ट निर्माण केली होती. तिथे पण मदतीसाठी जायला लागायचे. तिथे वेगळी कॅशियर असायची. पण ती आली नाही तर आम्हाला जायला लागायचे. 
 
 
 
प्रोड्युस डिपार्टमेंटला मला टाकले असते तर? नको रे बाबा, तिथे दिवस भर मोठमोठाली फळे कापत रहायचे ! म्हणजे उजवा हातावर किती भार पडत असेल? कॅशियर पण नको तिथेही उजव्या हातावर खूप भार पडतो. फ्रुट बार नको, कुकींग तर नकोच नको ! मी हॅंडरसनविलला गेले तर मला अजूनही तिथे नोकरी मिळेल. पण शेवटी शेवटी उत्पादन विभागातले काम इतके काही वाढले होते की मला नोकरी सोडून द्याविशी वाटत होती. मी आठवड्यातले ४ दिवस कामाला जायचे. ते मी ३ दिवस करून घेतले होते तरी मला खूप दमायला व्हायचे. पण नोकरी सोडून घरी बसायचे म्हणजे पुढे काय हा प्रश्न आहेच. अर्थात हा प्रश्न सुटला आणि विनायकच्या नोकरी बदलामुळे आम्ही न्यु जर्सीला आलो. Rohini gore
क्रमश : .....

No comments: