Thursday, November 26, 2015

२६ नोव्हेंबर २०१५

आजचा दिवस हवेसाठी खूपच छान होता. कमी थंडी, स्वच्छ सूर्यप्रकाश होता आणि म्हणूनच आम्ही ग्रीनवीलला जायचे ठरवले. जातायेता प्रवास सुखाचा झाला. रस्ते ओसाड होते कारण की आज Thanksgiving अमेरिकन लोकांचा सण. black friday करता संध्याकाळपासून गर्दी सुरू होणार.  इंडियन गोसरी आणि इंडियन जेवण असे ठरवल्याप्रमाणे झाले. आरामात उठलो. उठून व्यायाम केला. हल्ली गुरवारचा दिवस डोक्यावरून अंघोळीचा ठेवला आहे. याला कारण म्हणजे मला सध्या नोकरी लागली आहे. आणि दर आठवड्याचे कामावरचे दिवस बदलत रहातात.



आज दोघांनाही सुट्टी आहे आणि हवाही चांगली आहे म्हणून लगेचच बाहेर जायचा निर्णय घेतला. त्यात मला आजच सुट्टी आहे. विनायकला मात्र चार दिवस लागून सुट्टी आहे. नवीन नोकरीचा वेगळाच अनुभव आहे. तो मी लिहिणार आहेच. आज त्यातल्या त्यात निवांत वेळ मिळाला म्हणून रोजनिशी लिहीत आहे. काल खूपच थंडी होती. नोकरीवरून येताना चालत येते. खूप दमायला झाले होते. काल भाजणीची थालिपीठे जेवायला केली. आज रात्रीही कालच्या पिठाची उरलेली थालिपीठे आणि पटकन होणारी फ्रोजन बीन्सची उसळ करणार आहे. हल्ली आमच्या दोघांचा डबा मी रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे रात्रीचे जेवण व उद्याचा जेवणाचा डबा असा एकच मेनू असतो.


आज इंडियन उपहारगृहात छान पदार्थ होते. वडा सांबार, खेकडा भजी, मसूराची उसळ, कांदे वांग परतलेली भाजी आणि बिर्याणी छान होती‌. शिवाय नेहमीच्या ठरलेल्या इंडियन भाज्या इंडियन स्टोअर्स मधून घेतल्या. खारी, खोबरे, काजुकतली, बिस्कीटे, फरसाण हेही आवडीचे घेणे झालेच. नवीन शहरात आल्याने आम्हाला इंडियन भाज्या खायला मिळतात त्यामुळे चांगले वाटते. साधारण महिन्यातून एकदा जाणे होते, हेही नसे थोडके !

इंडियन मिरच्या आणि कढिपत्ता आणता येतो त्यामुळे पोहे आणि उपमे जास्त चवदार बनतात ! आज आलेही आणले आहे. तेही चांगलेच असेल. इंडियन चविष्ट भाज्या खाताना खूप छान वाटाते. गवार, तोंडली, कारली, घेवडा, भरल्या वांग्याला वापरता येणारी छोटी वांगी त्यामुळे पुढचा आठवडा भारतीय भाज्यांचा !