Monday, June 27, 2016

२७ जून २०१६

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची बरीच भर घालायला लागेल. कालच्या दिवसामुळेच आजचा दिवस जास्त छान गेला. मागच्या आठवड्यात कामाचे बरेच हेक्टीक वेळापत्रक होते आणि कधी नव्हे ते मला रविवारी सुट्टी मिळाली.


गव्हाचे पीठ संपत आले होते म्हणून आम्ही इंडियन स्टोअर्स आणि उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. उपाहारगृहात जेवण छान होते. वडा सांबार, मसूराची उसळ, पाव भाजी, समोसा चाट, बटाटा मेथी मिक्स भाजी.. जेवल्यानंतार स्टोअर्स मध्ये भाज्याही छान मिळून गेल्या. अळुही मिळाले चक्क. मी तर थक्कच झाले ! कैरी मिळाली!  शिवाय मुळा पालासकट होता तो ही घेतला. सटर फटर  तोंडात टाकायला फरसाण , खारी, बिस्किटे, मुरमुरे, घेतले. शिवाय चक्क मला तिथे चितळ्यांचे गुलाबजामचे इंस्टट पाकीट दिसले त्यामुळे ते आणि खमणचेही घेतले. घरी आल्यावर चहा बिस्किट खाऊन झोप काढली.

नंतर बरीच आवरा आवर केली. इथे आल्यापासून काही खोकी आवरायची राहूनच गेली होती असे म्हणण्यापेक्षा मूड लागत नव्हता आणि नंतर नोकरीमुळे वेळही मिळत नव्हता. माझ्या अंगात आवरा आवरीचे वारे शिरले की मग ते थांबत नाही. रात्रीचे जेवण बाहेरच करू असे वि ला सांगितले आणि बाहेर पिझ्झा खाऊन आलो. बाकीचे सामानही बाहेरून आणले. दुधे ज्युस तर लागतातच. आज सकाळी आवडीची गवार केली.

सकाळीच पोळी भाजी झाल्याने कालचा आलेला उत्साह कामी लावला.  नंतर आवरा आवरी करून जेवण करून थोडी पडले. उठून पाहते तर अंधारलेले होते. दणादण वीज आणि वाऱ्यासह पाऊस कोसळला. पाऊस तर मला प्रचंड आवडतो. कैरीचे काय करावे बरे, असा विचार करता करता गुळांबा केला. बरीच वर्षे झाली.

गुळांब्याला पाहून! अर्थात पूर्वीची आईच्या हातची गुळांब्याची चव आलेली नाही. इथे तर असे पदार्थ केलेच जात नाहीत. एक तर  इंडियन स्टोअर्स मी जिथे राहते तिथे तिथे कायमच दूर असते. त्यातल्या त्यात नवीन ठिकाणी राहिल्या आल्यावर निदान एका तासाच्या अंतरावर तरी आहे त्यामुळे इथे आल्यापासून ते तरी एक सुखच मानावे लागेल. पाऊस पडल्याने कधी नव्हे ते कांदा भजी केली संध्याकाळी.





आता चहा बरोबर कांदा भजी आणि रात्रीला पोळीशी गुळांबा आहेच. उद्या बहुतेक तोंडल्याच्या काचऱ्या करीन म्हणते.  आजपासून इंडियन भाज्यांचा सप्ताह चालू झाला आहे. मुळ्याचा चटका आणि अळूची भाजीही करायची आहे.
इथे आल्यापासून हे दोन्ही पदार्थ करायची मिळाली आहे तर करते आणि रेसिपी लिहिते. गुळांब्याची रेसिपी पण लिहिणार आहे. तशी सोपी आहे. दुसऱ्या कैरीचे पन्हे नाहीतर  गोड लोणचे करण्याचा विचार आहे.

 खमण आणि गुलाबजामला कधी मुहूर्त मिळतो ते पहायचे. पुढच्या इंडियन स्टोअर्सच्या ट्रीप मध्ये फ्रोजन समोसे आणणार आहे म्हणजे समोसा चाट करता येईल.

कालचा आजचा दिवस तर खूप छान गेला. वेगळाच !!