Thursday, April 23, 2020

२३ एप्रिल २०२०

सर्वांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा ! मी वाचनात खूप कच्ची आहे. 2019 साली मी किंडल विकत घेतले आणि मला खऱ्या अर्थाने वाचनाची गोडी लागली. वाचनाचा बराच पल्ला अजून मला गाठायचा आहे. पुस्तके आपले खरेखुरे सोबती. अमेझॉनकडून मराठी पुस्तके विकत घेतली आणि वाचली.


१. हेमांगी (दिवाळी अंक)
२. तीन चित्रकथा - ग. दि. माडगुळकर
३. गुजगोष्टी - दीपा देशमुख
४. वाटेवरल्या सावल्या - ग. दि. माडगुळकर
५. तीसरी घंटा - विजया वाड
६. डॉलर बहू - सुधा मूर्ती - अनुवाद - लीना सोहोनी
७. नाथ हा माझा - कांचन घाणेकर
८. रेशीमगाठी - कांचन घाणेकर
९. थोरली पाती - ग. दि. माडगुळकर
१०. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
११. फॉर हियर ऑर टु गो - अपर्णा वेलणकर
१२. तीन हजार टाके - सुधा मूर्ती - अनुवाद - लीना सोहोनी
१३. मध्य - मंगला गोडबोले
१४. कामेरू - श्री. ना पेंडसे
१५. टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट - अनुवाद लीना सोहोनी
१६. सोहळा - जयवंत दळवी
१७. हरवलेल्या वाटा - माधवी देसाई
१८. कांचनगंगा - माधवी देसाई
१९. भोकरवाडीच्या गोष्टी - द. मा. मिरासदार
२०. नॉट विदाऊट माय डॉटर - अनुवाद - लीना सोहोनी
२१. सोने आणि माती - ग. दि. माडगुळकर
२२. नीले उदास दीन - रॉय
२३. घर कौलारू - जयवंत दळवी
२४. चंदनी उदबती - ग. दि. माडगुळकर
२५. अंर्तबाह्य - रत्नाकर मतकरी
२६. हमसफर एव्हरेस्ट - नीरज मुसाफीर
२७. जावईबापूंच्या गोष्टी - द. मा. मिरासदार
२८. हसणावळ - द. मा. मिरासदार
२९. गुदगुल्या - द. मा. मिरासदार
३०. गोष्टीच गोष्टी - द. मा. मिरासदार


Monday, April 20, 2020

Clemson United Methodist Church

Clemson memory - 2003-2004 Clemson United Methodist church
क्लेम्सन युनायटेड मेथॉडिस्ट चर्च मध्ये मला अमेरिकेतली पहिली नोकरी J २ डिपेंडंट विसावर लागली. या व्हिसावर वर्क पर्मिट काढता येते. वर्क पर्मिट असल्याने चर्च मध्ये मला सकाळी ८ ते १२ अशी नोकरी मिळाली. चर्चमध्ये अमेरिकन्स प्रार्थनेसाठी येतात. काहीजण त्यांच्या मुलांना घेऊन येतात. त्या मुलांना सांभाळण्यासाठी चर्च मध्ये सोय केलेली असते. त्यावेळी आमच्याकडे कार नव्हती. इथेच नोकरी करणाऱ्या दोन इराणी बायका त्यांच्या कार मधून मला न्यायला आणि पोहोचवायला यायच्या. त्यांची नावे आठवत नाहीत. एकीकडे कार होती. तिच्या मैत्रिणीकडे कार नव्हती. तसे तर अर्धा तास चालण्याच्या अंतरावर हे चर्च होते. केम्सन या छोट्या शहरात विद्यापीठ होते आणि बस सेवाही चांगली होती. रविवारी बस सेवा नसल्याने मला चर्चमध्ये चालत जायला आणि यायलाही लागायचे. अर्थात नंतर कार घेतल्यावर विनायक मला सोडायला आणि आणायलाही यायचा. नंतर त्या दोघी इराणी बायका दुसऱ्या शहरात निघून गेल्या. नंतर मी जाता येता चालत जायचे. ही नोकरी खूपच छान होती. कधी कधी १ /२ मुलेच सांभाळायला असायची तर कधी कधी १० / १२ यायची. दोन खोल्यांमधून ही मुले सांभाळायला असायची. चर्चची मुख्य पदावर असलेली बाई अधून मधून चकरा मारायची आणि सर्व व्यवस्थीत आहे ना? असेही विचारायची. मुलांबरोबर आम्ही बायका पण तिथे ठेवलेल्या कुकीज आणि केक खायचो. 



मुलांबरोबर आम्ही पण त्यांच्यात सामील होऊन खेळायचो. हे डे केअर नव्हे. मुलांना सांभाळायची चर्चने केलेली ही एक सोय होती. नंतर बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सुरू झाली आणि मी बुधवारी संध्याकाळी ६ ते ८ जायला लागले. बुधवारी बस सेवा असल्याने मी बसने जा - ये करायचे. ८ ते १२ मध्ये थोडा थोडा वेळ मुले यायची. काहीजण ठराविक अंतराने यायचे. काम काहीच नाही. मुलांच्या सोबत त्यांना काही खायला द्यायचे असेल तर त्यांचे पालक आमच्याकडे त्यांच्या खाण्यापिण्याच्या पिशव्या देऊन जायचे. या नोकरी नंतर मला डे - केअर मध्ये नोकरी लागली. ही नोकरी सोमवार ते शुक्रवार १० ते ४ असायची. बॅप्तिस्त चर्च मध्ये डे केअर चालवायला दिले होते. चर्चमधल्य्य एका खोलीत एक बाई इंग्रजीचा वर्ग चालवायची. तिथे कोरियन, चिनी देशातल्या आया इंग्रजी शिकायला यायच्या. वर्क पर्मिट असल्याने त्यांच्या मुलांना सांभाळायला पण एक खोली ठेवली होती. तिथे आम्ही काही देशातल्या बायका होतो. मेथॉडिस्ट चर्च मध्ये मुलांना सांभाळायला इराणी, कोरियन ,चिनी तर काही युरोपियन बायका होत्या. अर्थात वर्क पर्मिट असलेल्या Rohini Gore








Sunday, April 19, 2020

Bonfire of Destiny (2)

मार्कची नोकराणी ऍड्रीनला सांगते की तुम्हाला तुमच्या नवऱ्याने बोलावले आहे. ऍड्रीन नवऱ्याच्या खोलीत जाते आणि विचारते काय मार्क?कशाला बोलावलेस? मार्क उठतो आणि एक सणसणीत तिच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो काय गं तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय का? मिळणार नाही ! ऍड्रीन म्हणते हो, मला तुझा कंटाळा आला आहे. तू अत्याचार करत आहेस माझ्यावर, आता मी सहन करणार नाही. मार्क म्हणतो तुझे नक्कीच कुठेतरी प्रेमप्रकरण चालू आहे, कोण आहे तो? तुला मी अजिबात घटस्फोट देणार नाहीये मी. कळलं तुला? हे संभाषण चालू असताना बाहेर ओरडण्याचा आवाज येतो म्हणून ती खिडकीतून बाहेर जाते तर तिची नोकराणी तिच्या मुलीला एका बग्गीमध्ये जबरदस्तीने बसवत असते. आणि कॅमलिन तिच्या ममाला हाका मारत असते. काय केलेस तू हे? मार्क, हा. तू मूलीला कोठे पाठवत आहेस? मार्क परत तिच्यावर जबरदस्ती करतो. केस ओढतो आणि सांगतो नीट ऐक. तुला चॅरिटी बाजारला जायचे आहेस. हे घे पैसे. तुला लागतील तेव्हढे पैसे खर्च कर आणि माझ्या बद्दल प्रचार कर. मला अध्यक्षपदी निवडणूकीला उभे रहायचे आहे. तयार हो आणि बाहेर ये. बग्गीवाला आपली वाट पाहत आहे. ती दोघे बाहेर येतात. बग्गीमध्ये बसतात आणि चॅरिटी बाजार भरलेला असतो त्या ठिकाणी येतात. त्याच वेळेला एका बग्गीतून रोझ आणि ऍलीस उतरतात. रोझ ही ऍलीसची नोकर असते. ऍलीस बाजार मध्ये जाते आणि रोझलातिचा नवरा म्हणजेच बग्गीवाला बोलावतो आणि म्हणतो बघ माझ्या हातात काय आहे? आणि तो तिला न्युयॉर्कची तिकिटे दाखवतो आणिम्हणतो तू ऍलीसला न्युयॉर्कला जाण्याविषयी सांग. ती म्हणते हो नक्की सांगेन आणि बाजार मध्ये प्रवेश करते.


बाजार मध्ये निरनिरळी माणसे बाया आणि मुले जमा झालेली असतात. तिथे जादुचे खेळ दाखवले जातात. शिवाय फोटो काढणे चालू असते.निरनिराळ्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. आणि मुख्य म्हणजे तिथे छोट्या पडद्यावर सिनेमा दाखवत असतात. तिथे छोटीमुले जमा होतात. या बाजार मध्ये ऍलिस, रोझ, ओडिट आणि तिचा मुलगाही असतो. त्याच वेळेला तिथे ऍड्रीन पण आलेली असते. रोझ, ऍलीस, ओडिट आणि तिचा मुलगा थॉमस हे सर्व एकत्र येऊन एकमेकींचे विचारपूस करत असतात. ओडिटच्या हातातली महागडी अंगठी ऍलीसला खूप आवडते. तितक्यात ओडिटचा मुलगा थॉमस हट्ट करायला लागतो, आई मला सिनेमा पहायचा आहे. मी रांगेत उभा राहू का? तर ऍलीस म्हणते तुला सिनेमा बघायचा आहे का थॉमस? चल ये माझ्याबरोबर. माझ्या वडिलांनी या सिनेमाचे सर्व सेटींग लावलेले आहे. रोझ आजुबाजूच्या वस्तू बघत असते आणि तिला एक जहाज खूपच आवडून जाते. तिला जहाज आवडलेले आहे ते ऍलीसच्या लक्षात येते आणि ती लगेचच तिच्याकरता ती जहाज विकत घेते.

ऍड्रीयन बऱ्याच वस्तू विकत घेते आणि ऍलीस ला म्हणते की चल मी जरा बाहेर जाऊन येते. ऍड्रीन ऍलीसची मावशी असते. आता रोझ ऍलीस आणि थॉमस एका छोट्या खोलीत सिनेमा पहायला येतात. थॉमस सिनेमा पाहून खूप खुश होतो. रोझ त्याला तिच्या मांडीवर बसून त्याचे लाड करते. विकत घेतलेले जहाज पण त्याच्या हातात देते. विचारते तुला आवडले का? ऍलीसचा बॉयफ्रेंड आता त्या सिनमागृहात येतो. ऍलीसला पाहिल्यावर म्हणतो मला वाटलेच होते तु इथे असशील. रोझ म्हणते तुम्ही दोघे बाहेर जाऊन गप्पा मारा. मी इथे थॉमसला घेऊन बसली आहे. सिनेमा पाहता पाहता एकदम कसलातरी आवाज येतो. बाजारमध्ये जमा झालेली सर्व माणसे एकमेकांकडे बघतात काय झाले? काय माहिती? आवाज आला ना कुठलातरी? हो ना. अश्या प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघतात. रोझला थोडा वेगळाच संशय येतो. जिथे प्रोजेक्टर असतो तिथे तिला थोडी आग लागली आहे का असे जाणवते. इकडे तिकडे बघते आणि थॉमसला घेऊनती विचारपूस करते. तिथली माणसे म्हणतात. काळजी करू नका. छोटी आग आहे. विझेलच. आमचे प्रयत्न चालू आहेत. प्रोजेक्टरच्याखोलीतले आजुबाजूचे पडदे लावतात.


रोझ एकाला विचारते ही कसली धावपळ आहे? काहीतरी घडत आहे हे तिला नक्की कळते. एक माणूस म्हणतो आग लागली आहे तुम्हीलवकर बाहेर पडा. हे ऐकल्यावर ती थॉमसला घेऊन बाहेर जाते आणि एका बाईकडे थॉमसला सोडते आणि म्हणते प्लीज या मुलाची काळजी घ्या हं. बाई म्हणते ठीक आहे ना सगळे? हो हो असे म्हणून रोझ भराभर बाजामध्ये जाते आणि ओडिट कुठे आहे का ते शोधते. तिला ओडिट दिसते. रोझ ओडिटला सांगते तुझा मुलाला मी आताच बाहेर एका बाईकडे सोडून आले. तो तिथे सुरक्षित आहे. तिला सांगते आग लागली आहे. विचारते ऍलीस कुठे आहे. आणि लगेचच ती रोझ ऍलीसला शोधायला जाते. ऍलीस दिसताक्षणी तीला सांगते. ऍलीस चल पटकन इथे आग लागली आहे. कर्णोपकर्णी आगेची बातमी सगळीकडे पसरते. आणि एकाच वेळी सगळ्यांची एकच धांदल उडते. जो तो बाहेर कसे पडता येईल या विचारात असतो. आग लागते. हळूहळू सर्व पेटत जाते. धक्काबुक्की, आपला जीव मुठीत घेऊन सर्व एकमेकांना रेटत पुढे जात असतात.


ओडिट थॉमसचे नाव घेऊन घाबरून जात असताना धक्काबुक्की होते. धक्काबुक्कीत ओडिट पडते आणि तिच्यावर पाय देऊन सर्व पळत असतात. तिथेच ती बेशुद्ध पडते.बाहेर जायला जो दरवाजा असतो तो पण रोलींग असतो. प्रत्येक जण एकमेकांवर आदळत असतात. आता तर आगीचा भडकाच उडतो. रोझ, ऍलीस, आणि तिचा प्रियकर (ज्युलिएन) एकमेकांना धरून जीव मुठीत घेऊन पुढे पुढे सरकत असतात. तितक्यात ऍलीस पडते. रोझ मागे वळून बघते आणि ज्युलिएनला म्हणते ऍलीस खाली पडलेली आहे. चल आपण जाऊन तिला घेऊन येऊ. ज्युलिएन रोझला ढकलतो आणि ती आगीत कोसळते. ऍलीस आधीच कोसळलेली असते. आजुबाजूला आगच आग ! ज्युलिएनने रोझला ढकललेले ऍलिस पाहते आणि बेशुद्ध पडते. ऍलीसला आगीतून व्हिक्टर वाचवतो. आग लागल्याची बातमी आतापर्यंत ऍलीसच्या आईवडिलांना समजते. जेव्हा ऍड्रियन बाजारच्या बाहेर जाते तेव्हा एक बग्गीवाला येऊन तिला पाहून ओरडतो मॅडम थांबा आणि आत बसा. आत तिचा प्रियकर (पत्रकार) बसलेला असतो. ती त्याला सांगते मी माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे. माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली आहे. हे माझ्या नवऱ्याचेच कारस्थान आहे. मला परत घरी जायचे नाही.बग्गीतून उतरून ऍड्रीयन बघते तर सगळीकडे हलकल्लोळ माजलेला असतो. आग बघून तिचे सर्व त्राण गळून जातात. ती एका फूटपाथ वर येऊन बसते. आग बरीचशी विझवली जाते. पत्रकार बघतो तर ऍड्रियन अशी फूटपाथवर का बसली आहे. तो तिला सांगतो की तू घरी जा. नवरा तुझी वाट पाहत असेल. तर ती त्याला सांगते की मी घरी जाणार नाही. तो राक्षस आहे. मला घटस्फोट घ्यायचा आहे. आणि माझ्या मुलीचा शोधही घ्यायचा आहे. तो तिला मदतीचे आश्वासन देतो आणि तिला त्याच्या घरी आणतो. Rohini Gore

क्रमशः ....

Tuesday, April 14, 2020

Bonfire of Destiny

Le Bazar de la Charité मूळ फ्रेंच सिरीज आहे. त्याचे इंग्रजी नामकरण केले आहे The Bonfire of Destiny.(Netflix) पॅरीस १८९७ मध्ये एक भीषण आग लागते. या सत्यघटनेला अनुसरून लिहिलेली कथा. एके ठिकाणी चॅरिटी बाजार भरलेला असतो आणि तिथे एका सिनेमाटोग्राफला आग लागते. ती सर्वत्र पसरते. त्यात बरेच जण मृत्युमुखी पडतात तर अनेक घायाळ होतात. यात बऱ्याच प्रमाणात जास्त बायकाच असतात. यातल्या ३ बायकांवर लिहिलेली ही कथा आहे.खूप सुंदर कथा आणि दिग्दर्शन. पहिल्या एपिसोड मध्ये आग लागलेली दाखवली आहे तिचे चित्रिकरण आणि त्या आगीत सापडलेली माणसे, बायका, त्यांची धडपड, अगतिकता दाखवलेली आहे.


८ एपिसोड मध्ये ३ बायकांच्या जीवनात कसे चढ उतार होतात, २ प्रेमी जिवांची कशी ताटातूट होते आणि शेवटी ते कसे एकत्र येतात हे दाखवले आहे. खूनी नवऱ्यापासून सुटका आणि प्रेमाचा विश्वासघात दाखवला आहे. आगीतून वाचवणाऱ्या माणसाला कसा बळीचा बकरा बनवतात आणि नंतर त्याची फाशी कशी रद्द होते ते दाखवले आहे.यामध्ये इमोशन्स, रोमान्स, खोटारडेपणा इ. इ. दाखवले आहे. याचे थोडक्यात कथानक


Bonfire of Destiny - French series on Netflix - story telling - review, narration -
cast
Adrienne - wife of senator
Camille - daughter of Adrienne
Rose - maid of Alice
Alice - daughter of cinematographer
odette - Rich woman in Paris
other cast introduction i will write in next chapter.


जेंव्हा ओडिटची आई प्रेतागारात येते तेव्हा तिची नजर असते ती तिच्या मुलीच्या शोधासाठी ! आपली मुलगी इथे असू शकेल ही कल्पनाच तिला सहन होत नसते. प्रेतागारामध्ये जाण्याआधी ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ओडिटचा शोध घेत असते. त्या हॉस्पिटल मध्ये रोझ एका कॉटवर पडून कण्हत असते. ओडिटच्या आईला रोझ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. रोझला पाहिल्यावर ओडिटची आई पटकन तिच्याजवळ जातेही पण तिला समजून चुकते की ही आपली मुलगी नाही! रोझचे निळे डोळे मात्र अगदी हुबेहूब तिच्या मुलीच्या डोळ्यासारखे असतात. निळे डोळे!



रोझचा चेहरा तिचे डोळे सोडून पूर्णपणे झाकलेला असतो. चेहऱ्याला सर्व बाजूने बँडेज बांधलेले असते. फक्त तिचे डोळे वाचलेले असतात. हातपाय, छातीचा काही भाग तीव्र प्रमाणात भाजलेला असतो. चेहऱ्याचा डावा भाग पूर्णपणे जळून चेहरा विद्रुप झालेला असतो. रोझच्या हातात न्युयॉर्कला जाण्यासाठी २ विमानाची तिकीटे असतात. रोझ ओडिटच्या आईला हेच सांगत असते, माझा नवरा कुठे दिसतो का? त्याला ही तिकीटे नेऊन दाखवा म्हणजे त्याला मी जिवंत आहे हे कळेल. ती ओडिटचा हात धरते आणि सांगत असते खरी, पण ही आपली मुलगी नाही हे कळल्यावर तिचा हात रोझच्या हातातून मोठ्या मुष्किलीने सोडवून घेते.


ओडिटची आई प्रेतागरामध्ये येते. इथेच कुठे आपली मुलगी दिसली की तिचे अंत्यदर्शन घ्यायचे असे मनात ठरवून सर्व प्रेतांपाशी जाउन बघते काही जण अर्धवट जळालेले तर तर काही जण पूर्ण जळून काळी ठिक्कर पडलेली असतात. काळीकुट्ट विद्रुप झालेली प्रेते बघून तिला आपण येथे बेशुद्ध पडू की काय असे वाटताच तिला दूरवर कुठेतरी एक हात लांब झालेला दिसतो. तिथे जाते आणि तिची खात्री पटते हीच आपली मुलगी! तिच्या हातात अंगठी असल्याने ती लगेचच ओळखते. ओक्साबोक्शी रडायला लागते. आपली मुलगी आता या जगात राहिलेली नाही हे सत्य पचवायलाच हवे हे तिला कळून चुकते. खूप रडल्यावर ती स्वतःला साव्वरते आणि आता पुढे काय? अश्या विचारात असताना तीला प्रश्नाचे उत्तर सापडते. घाईघाईने ओडिटच्या हातातली अंगठी काढून ती आपल्या ड्रेसच्या खिशात घालते. आजुबाजूला कोणी आपल्याला पाहत तर नाही याची खात्री करून ती लगोलग निघते आणि रोझ असते त्या ठिकाणी येऊन पोहोचते. रोझ बेशुद्ध अवस्थेत असते.



आजूबाजूला पाहते तर सर्वांची एकच धावपळ चाललेली असते. नर्सेस, डॉक्टर्स, हातात चार्ट घेऊन जखमी लोकांना तपासत असतात. काही जखमी लोकांचे नातेवाईक आपले इथे कोणी आहे का नाही ते बघायला आलेले असतात. तिथे एक पत्रकारही आलेला असतो. जितक्या शिताफीने ती ओडिटच्या हातातली अंगठी काढते तितक्याच शिताफीने ती अंगठी, आजूबाजूला कोणी बघत नाहीना ते पाहून रोझ च्या हातात घालते. तिच्या मनगटातले ब्रेसलेटही पटकन काढून ते खिशात घालते. ओडिट म्हणून धाय मोकलून रडायला लागते. तितक्यात तिथे नर्स येते आणि म्हणते रडू नका. आताच या बाईची शुद्ध हरपलेली आहे. ही तुमची कोण लागते असे नर्सने विचारताच ही माझी मुलगी असे सांगते. मी हिला माझ्या घरी घेऊन जाऊ का? असे नर्सला विनवल्यावर नर्स म्हणते हरकत नाही. नाहीतरी आम्हाला इथे एक कॉट रिकामी झालेली हवीच आहे. बरेच पेशंट आहेत. ओडिटची आई नर्सला सांगते मी पॅरीसमधली एक खूप मोठी श्रीमंत बाई आहे. मी माझ्या मुलीची काळजी घेईन आणि तिला आपल्या घरी घेऊन जाते. नर्स कडून मुलीला पेनकीलरचा डोस किती द्यायचा हे पण ती विचारून घेते.
रोझ आता ओडिटच्या आलिशान बंगल्यात येऊन पडलेली आहे. एका बेडरूम मध्ये रोझ बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ पडून राहिल्यावर एका क्षणी तिला शुद्ध येते. हळूहळू डोळे उघडून पाहते आणि तिला कळून चुकते की आपण आपल्या घरी नाही. आपण एका दुसऱ्याच घरी आलो आहोत. आपल्याला आणले गेले आहे. खूप धडपड करत ती उठायचा प्रयत्न करते मात्र पण अतिवेदनेने ती परत भोवळ येऊन पडते. Rohini Gore
क्रमश : ....

Thursday, April 09, 2020

Old is gold














Wednesday, April 08, 2020

कॅसेट

पूर्वी रेडिओवर जी हिंदी मराठी गाणी लागायची तेव्हाच फक्त ती आपल्याला ऐकायला मिळायची. रेडिओ मध्ये तर खूप प्रकारची विविधता होती आणि अजूनही आहे. अजूनही विविधभारती आपल्याला ऑनलाईन म्हणजेच लॅपटॉप वर ऐकता येते. आपल्याला जर एखादे आवडते गाणे परत परत आणि आपल्या सोयीच्या पाहिजे त्यावेळी ऐकायचे असेल तर पूवी कॅसेट वर गाणी ऐकायचो. तर या गाण्याच्या कॅसेट आपल्याला टेप रेकॉर्डर किंवा रेडिओ कम कॅसेट रेकॉर्डर ऐकता यायच्या. आमच्या कडे म्हणजे आईबाबांकडे बाबांनी एक टेप रेकॉर्डर खरेदी करून आणला होता. जपानची कंपनी होती. बाबांच्या मित्राचा व्यवसाय होता. मित्र म्हणाला निळू तू घे टेप रेकॉर्डर. पैसे हप्त्याने दे. हा पीस एकदम चांगला आहे. बाबांनी अशी अचानक खरेदी दिवाळीच्या दिवशी केली आणि आमच्या आनंदात भर पडली. आम्हा दोघींना खूप आनंद झाला होता. तो रेकॉर्डर एखाद्या आयताकृती पर्स सारखा होता. पियानो सारखी बटणे होती. प्ले , स्टॉप , रेकार्डचे बटण, शिवाय त्यामध्ये कॅसेट मधले गाणे पुढे मागे करून ऐकता यायचे अशी ही बटने होती. माईक होता. आवाज कमी जास्त करायचे एक सरकत बटण होते.



सुरवातीला आम्ही सर्व आत्यमामे भावडांनी मिळून खूपच धमाल केली होती या कॅसेट रेकॉर्डरवर ! आमची गाणी तर आम्ही टेप करायचोच, पण आमच्या कडे कोणी बाळाला घेऊन आले की त्याचे रडणे, नाहीतर तावातावानी झालेली मामा मामीची भांडणे पण आम्ही टेप केली होती आणि नंतर त्यांना ऐकवली होती. बाबांनी त्यांच्या आवाजात लहान मुलांच्या गोष्टीही टेप केल्या होत्या. गाणे म्हणताना पातेल्यावर चमच्याने म्युझिक पण वाजवले होते. पूर्वी सोनी कंपनीच्या कॅसेट मिळायच्या. साध्या टेप रेकॉर्डर नंतर टु इन वन यायला लागले. त्यामध्ये रेडिओ पण ऐकता यायचा आणि कॅसेट घालून गाणीही ऐकता यायची. मुख्य म्हणजे आतल्या आत रेकॉर्डिंगची सोय यात होती. लग्न झाल्यावर आम्हाला दोघांनाही गाण्याची आवड असल्याने टु - इन वनची खरेदी केली होती. लग्न झाल्यावर ही खरेदी आम्ही ६ महिन्यानंतर केली स्कॉलरशिप वाढल्यावर ! त्या आधी विनायकच्या बॅचलर जीवनातला ट्रान्स्झीस्टर होता तो आम्हाला पुरेसा होता. मला आठवतयं आम्ही दोघे घाटकोपरला टु-इन-वन खरेदी करण्यासाठी गेलो होतो. आयायटी ते घाटकोपर अशी एक बससेवा सुरू झाली होती. खरेदीमध्ये एक कॅसेट आम्हाला फ्री मिळाली. ती आम्ही आँधी - मोसमची घेतली. कॅसेटला दोन बाजू होत्या. ए आणि बी. एका साईडला एका चित्रपटाची आणि दुसऱ्या साईडला एका चित्रपटाची गाणी रेकॉर्ड केलेली होती. या कॅसेट मधली गाणी आम्ही अगणित वेळा ऐकली. नंतर मी अनेक गाणी आतल्या आत रेकॉर्ड केली. रिकामी कॅसेट टेप रेकॉर्डमध्ये घालून सेट करून ठेवायचे. नंतर रेडिओ वर आवडीचे गाणे लागले रे लागले की लगेच प्ले आणि रेकॉर्ड बटन एकाच वेळी दाबायचे आणि रेकॉर्डिंग सुरू व्हायचे. आतल्या आत रेकॉर्डिंग असल्यामुळे बोललेले चालायचे. गाणे संपले की स्टॉप बटन दाबायचे. नंतर ते गाणे व्यवस्थित रेकॉर्ड झाले की नाही तेही बघायचे. अश्या रितीने मी २ ते ३ कॅसेट मध्ये गाण्यांचे रेकॉर्डिंग केले होते. काही वेळेला रेकॉर्डिंग नीट व्हायचे नाही किंवा व्हायचेच नाही. मग ती जागा किती मिनिटांची आहे ते पहायचे आणि तितक्या मिनिटांचे गाणे परत त्या जागेवर टेप करायचे.



रेडिओ तर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ पर्यंत वाजतच असायचा. पण काही वेळा आपल्या आवडीची गाणी परत परत ऐकाविशी वाटायची तेव्हा या कॅसेट म्हणजे जीव की प्राण होत्या. डेकवाला मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला तेव्हा गाण्यातली सर्व वाद्यवृंदे अगदी स्पष्ट ऐकायला यायची. खूपच मजा यायची. डोंबिवलीमध्ये एक दुकान होते तिथे गाणी कॅसेट वर रेकॉर्ड करून मिळायची. शिवाय तिथे रेकॉर्ड केलेल्या गाण्याच्या कॅसेटही खूप होत्या. त्यातल्या काही कॅसेट आम्ही विकत घेतल्या होत्या. त्यातल्या त्यात दोन्ही साईडला आमच्या आवडत्या चित्रपटाची आहेत का ते बघायचो. कॅसेट मध्ये. काही कॅसेट अशा होत्या की नुसत्या चित्रपटाची गाणी नसून एखाद्या संगीतकाराची किंवा एखाद्या गायकाची फेमस झालेली गाणी असायची. तर अशाही काही कॅसेट आम्ही खरेदी केल्या होत्या. त्या दुकानामध्ये अजून एक सोय होती की आपण आपल्या आवडत्या गाण्यांची यादी करून त्या दुकानदाराला द्यायची. शिवाय एक रिकामी कॅसेटही द्यायची. मग तो आपल्याला तशी सर्व गाणी त्या कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून द्यायचा. अमेरिकेला येताना आम्ही सर्व कॅसेट घेऊन आलो. आम्ही जेव्हा टेक्साज राज्यातल्या डेंटन या छोट्या शहरात राहिला आलो तेव्हा आम्हाला कळले की डॅलस वरून २४ तास हिंदी गाण्यांचे प्रसारण होते म्हणून आम्ही लगेचच वाल मार्ट मधून टु इन वन विकत आणला आणि अमेरिकेतही आम्ही रेडिओवर डॅलस वरून प्रसारित होणारी हिंदी गाणी ऐकायला लागलो. मला तर खूपच आनंद झाला होता. डेंटनला आम्हाला एक संगीत प्रेमी भेटला. त्याला हिंदी गाणी आवडायची. त्याच्याकडून जुनी हिंदी गाणी आम्ही रेकॉर्ड करून घेतली. त्याकरता इथल्या एका स्टोअर मध्ये आम्हाला कॅसेटही मिळून गेल्या.



डेंटन वरून दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या शहरी आलो. तिथे आम्ही डेस्क टॉप विकत घेतला आणि आम्हाला एक वेबसाईट कळाली ती होती म्युझिक इंडिया ऑनलाईन. अगदी पाहिजे ती हिंदी मराठी गाणी ऐका. नंतर सीडी, व्हिसीडीज आल्या आणि हळूहळू कॅसेट मागे पडल्या. का कोणजाणे पण मला आज कॅसेटची प्रखरतेने आठवण झाली आणि अडगळीत ठेवलेल्या कॅसेट बाहेर काढून आठवणीत रमून गेले. शेवटी काय गेले ते दिन गेले !! परतून येणे नाही ! मी रोहिणी गोरे एक कॅसेटप्रेमी <3 br="">
<3 br="">






tape recorder photo credit - google download,, we had this type of tape recorder at our home.

Thursday, April 02, 2020

टेलीव्हिजनचे दिवस

कृष्ण धवलचे टिव्ही क्राऊन आणि टेलिव्हिस्टा कंपनीचेच फक्त मला माहिती आहेत. आमच्याकडे म्हणजे आईबाबांकडचा जो टिव्ही होता तो होता टेलिव्हिस्टाचा आणि त्याला मुंग्या क्वचितच येत. मुंग्या आल्या की पत्र्यावर कोणाला तरी जायला लागायचे आणि अँटीनाला दोन तीन थपडा दिल्या की टिव्हीतल्या मुंग्या पळायच्या. पत्र्यावर जायचे काम रंजनाचे होते. हे काम ती खूप आवडीने करायची. रविवारी सकाळी जेव्हा रंगोली लागायची तेव्हा आई उठवायची आम्हाला उठा गं तुमची आवडती गाणी लागली आहेत रंगोली मध्ये. आम्ही दोघी बहिणी उठायचो म्हणजे काय तर झोपण्याच्या मूळपदावरून अंग वळवून आमचे मुखडे टिव्हीच्या समोर येतील असे करायचो. डोक्या खाली २ उश्या घेऊन रंगोलीचा आनंद घ्यायचो. रंगोली संपली की मग दात घासून चाय चाय गरम चाय !


साप्ताहिकी कधीही चुकवायचो नाही कारण की पुढील आठवड्याची रूपरेषा असायची. मुख्य म्हणजे रविवारचा पिक्चर कोणता आहे त्यानुसार मग रविवारी संध्याकाळी घरीच थांबायचे की डोंगरावर फिरायला जायचे हे ठरवता यायचे. चांगला पिक्चर असेल तर मग अगदी जय्यत तयारी. केरवारे काढून दडपे पोहे करायचो. दारे लावून आणि खिडक्यांचे पडदे मिटवून घ्यायचो.. पाठीला टेकता येतील अशा दोन खुर्च्या आमच्या घरी होत्या त्यावर आम्ही दोघी बसायचो. आईबाबांची जागा ठरलेली होती. ती दोघे कॉटवर बसायची. चांगल्या सिनेमाची आम्ही टायटल पण कधी चुकवली नाही. चारूशिला पटवर्धन जेव्हा बातम्या सांगायची तेव्हा तिच्याकडे टक लावून बातम्या पहायचो इतकी ती आम्हाला आवडायची. तिचे डोळे म्हणजे एखाद्या गोटीसारखे चकाकणारे होते. बातम्या संपल्या की ती म्हणायची याबरोबरच हे बातमी पत्र संपले, नमस्कार आणि इतकी गोड हासायची. ते हासणे पण आम्ही दोघी बहिणींनी कधी चुकवले नाही. काही मालिका आवडायच्या त्या म्हणजे करमचंद, सर्कस, श्वेतांबरा.


माझे लग्न जेव्हा झाले तेव्हा आम्ही दोघे आयायटी पवई मध्ये वसतिगृहात राहिलो. तेव्हा एका हॉलमध्ये टिव्ही होता. तिथे रामायण बघायला गर्दी व्हायची. तिथे रात्रीचे काही सिनेमे आम्ही दोघांनी मिळून पाहिले आहेत. जुने कृष्ण धवल सिनेमे. मिर्झा गालीब आठवत आहे. नंतर आम्ही आयायटीच्या आवारातच तुलसी ब्लॉक्स मध्ये गेलो. हे ब्लॉक्स लग्न झालेल्या जोडप्यांसाठी बांधले होते. तिथे गेल्यावर काही जणांनी टिव्ही घेतले. त्या ब्लॉक्स मध्ये राहताना माझी मैत्रिण आशा आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये रहायची. महाभारत सुरू झाले की ती मला हाक मारायची रोहिणी ये गं महाभारत सुरू झाले. मग आम्ही दोघे सकाळचा चहा घेऊन तिच्याकडे जायचो. आणि महाभारत संपल्यावर तिच्या हातचे गरमागरम पोहे खाऊनच घरी यायचो.


जेव्हा डोंबिवलीला रहायला गेलो तेव्हा काही वर्षानंतर म्हणजे १९९६ साली. आमच्या घरी टिव्ही आला. टिव्ही घ्यायचा तो ओनिडाच असे ठरवले होते मनाशी. काहिजणांकडे ओनिडा रंगीत टिव्हीची क्वालिटी पाहिली होती तेव्हाच ठरवले होते ओनिडाच ! आमच्या घरी जेव्हा टिव्ही आला तेव्हा शोकेस नव्हतीच. एका खूप छोट्या आयताकृती स्टुलावर टिव्ही ठेवला होता. त्यावेळी मी सकाळच्या क्लासवरून आले की एक मालिका बघायचे ती म्हणजे सैलाब. त्यावेळेला सोनू निगमचे सारेगप पण खूपच आवडायचे. तो निवेदन छानच करायचा. आमच्याकडे टिव्ही आल्यावर मी धडाधड सिनेमे पहायला सुरवात केली.



सोनी टिव्ही वर तेव्हा खूप छान जुने रंगीत सिनेमे दाखवायचे. मला मालिका बघण्याचे वेड त्यावेळेला अजिबातच नव्हते. सोनी चॅनल माझा आवडता चॅनल होता. अंधेरीत गेल्यावर रात्रीच्या जेवणाच्या वेळी आभाळमाया पहायचो. ते सुद्धा आम्हाला त्याचे शीर्षक गीत जास्त आवडायचे. महाश्वेता मालिका आवडायची. २००१ ला जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा एक १३ इंची टिल्लू टिव्ही घेतला. पण त्यावर सर्व इंग्रजी मालिका होत्या.मालिका
बघण्यात आम्हला दोघांनाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे सिनेमेच खूप बघितले. काही कूकींग शोज बघायचो. एक इंग्रजी मालिका गोल्डन गर्ल्स बघायचो. ही मालिका खूपच छान होती.



विल्मिंग्टनला आल्यावर मोठा टिव्ही घेतला तेव्हा डिश घेतली आणि त्यामध्ये ३ हिंदी चॅनल घेतले. सहारा वन, झी सिनेमा आणि सोनी. झी सिनेमावर आमच्या दोघांचे परत धडाधड सिनेमे पाहणे सुरू झाले. अर्थात नंतर ते रिपीट होत गेले. सहारा वन आणि सोनीवर काही मालिका मात्र खूप आवडून गेल्या. नंतर मालिका संपल्या आणि डिश काढून टाकली. केबल चॅनलही काढून टाकले. फक्त काही बेसिक चॅनल ठेवले. २००८ साली आम्हाला एक मराठी वेबसाईट कळाली ती म्हणजे आपलीमराठी डॉट कॉम. इथे झी मराठीच्या मालिका होत्या. ही साईट फ्री आहे.सोनी आणि सहारा वन वर कोणत्या हिंदी मालिका बघितल्या आणि मराठी मालिका बघण्याकडे आम्ही दोघे कसे वळलो ते सर्व पुढील भागात. Rohini Gore
क्रमश : ...