Showing posts with label social. Show all posts
Showing posts with label social. Show all posts

Saturday, January 13, 2024

आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

 आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

संजनाची बहीण गौरी अमेरिकेतून भारतात येते. देशमुखांच्या समोरच्या इमारतीत ती भाड्याने जागा घेते आणि रहायला लागते. समोर कुणीतरी रहायला आले आहे ते यशच्या लक्शात येते. हळूहळू त्या दोघांची मैत्री होते आणि गौरी देशमुखांच्या घरातली एक सदस्यच होऊन जाते. गौरीला अमेरिका पसंत नाही. तिला भारतातली नातीगोती पसंत आहेत. भारतात येऊन ती फॅशन डिझाईनचा कोर्स करते. तिला तशी कामेही मिळू लागतात. यशचे क्षेत्र हे पण वेगळेच आहे. त्याला संगीतात करीयर करायचे आहे. तसे त्याचे प्रयत्न चालू असतात. आता यश आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. इतके की दोघेही आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही. देशमुखांच्या घरात गौरी लाडाची होऊन जाते. अरूंधती तिचे खूप लाड करते. अनिरूद्धला गौरी आवडत नसते. यश हा अनिरूद्धचा दोडका मुलगा असतो. त्यानंतर एक दिवस गौरी तिचे गुपित यशला सांगते. तिचा पूर्वी एक अपघात होतो आणि त्यातच तिचे गर्भाशय काढून टाकण्यात येते. यश तिला खूप समजून घेतो. नंतर देशमुखांकडचे सर्वच तिला समजून घेतात. आता आजी म्हणते इतके दिवस नुसते तुम्ही फिरत आहात तर साखरपुडा करा. यश आणि गौरी एकमेकांना अंगठ्या घालतात. देशमुखांच्या घरात गौरी इतकी रूळते की देशमुखांच्या घरातले तिला सर्व प्रसंग माहिती होतात. आणि एकदम अचानक गौरीला वाटु लागते की परत अमेरिकेत जावे, तिथे करीयर करावे. यश ला ती समजावते की आपण इथे किती दिवस रहाणार. बाहेरच्या जगात जाऊ आणि अनुभव घेऊ. यशला हे अजिबात मान्य नसते. तो गौरीला सांगतो की माझ्या कुटुंबाला सोडून कुठेच जाणार नाही. यशही आता त्याच्या संगीत क्षेत्रात धडपड करून चांगले पैसे कमावत असतो. त्याकरता तो मध्ये इंग्लडलाही जाऊन येतो. 
 
 
गौरीला म्हणे एक ऑफर आलेली असते. ती यशला त्याच्या सोबत यायला भाग पाडत असते. यशचे मत ठाम असते की मी येणार नाही. शेवटी गौरी म्हणते की मी ही संधी सोडणार नाही. मी जाणार. यश चालाख असतो. तो म्हणतो की आता ही काही परत येणार नाही. तो म्हणतो मी तुझ्या करियरच्या आड येणार नाही. ती म्हणते आपण एकमेकांच्या संपर्कात राहू की ! विडिओ कॉल करू, मेसेज करू. यश म्हणतो ठीक आहे. या दोघांच्या मतभेदात यशने तिला घातलेली अंगठी की रागारागात देते आणि म्हणते की जाते आता. साखरपुडा का करतात? नंतर लग्न होणार असते म्हणून ना? जास्तीत जास्त एक वर्ष लग्न लांबणीवर टाकू शकतो ना ? गौरी अंगठी जेव्हा परत करते तेव्हा यश समजून चुकतो की आता आपले आणि गौरीचे संबंध संपल्यातच जमा आहेत. अमेरिकेत गौरी जाते. नंतर ती त्याचे फोन उचलत नाही. की मेसेजला उत्तर देत नाही. गौरी लग्न करत आहे असे इशाकडून यशला कळते. 
 
 
यशला खूप नैराश्य येते. त्यातून तो बाहेरही येतो. आता त्याच्या आयुष्यात आरोही आलेली आहे आणि ती दोघे आता एकमेकांना अंगठ्या घालणार आहेत. आता ही उपटसुंभी गौरी परत भारतात आली आहे ती केवळ तिचे करियर सोडून ?! बरं का? आणि तिने आता तिचा जीव संपण्याचा प्रयत्नही केला आहे म्हणे ! माणसाने किती स्वार्थी असावे? जेव्हा ती अमेरिकेला जाते तेव्हा पण ती म्हणते की आता म्हणे तिला तिच्या आई वडिलांकडे पहायला हवे. या आधी तिला तिच्या आई वडिलांची कधीच आठवण आली नाही. तिची आई तर खूप मोठ्या पोस्ट वर असते आणि सतत फिरतीवर असते. आणि आता सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. गौरी आल्यामुळे त्याचेही मन दोलायमान झाले आहे. अरूंधती यशला सांगते की आता गौरी हा विषय मागे पडला आहे. तू जर गौरीला भेटायला गेलास तर आरोहीवर अन्याय होईल. संजनाला गौरीचा पुळका कधीपासून यायला लागला. तिचे आणि गौरीचे तर कधी पटायचे नाही. मूर्ख अभिषेक, अति लाडावलेली आणि स्वार्थी ईशा आणि आजी हे सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. अरूंधतीने यशचे कान भरवले आहेत ही पण बोंब ठोकत आहेत.
 
 
यश आणि गौरीच्या प्रेमात यश मनापासून गौरीवर प्रेम करत आहे. गौरी स्वार्थी आणि व्यवहारी आहे. यश भावनाप्रधान आहे याचा गौरीने पुरेपुर फायदा घेतला आहे. व्यवहारी मन कधीच प्रेम करत नाही. गौरीला वाटले असेल की देशमुखांच्या घरात काही ना काही घडतच असते. ती म्हणते आता आपण आपल्या करियरवर फोकस करायला पाहिजे. आता अजून किती फोकस करायचा? त्या दोघांचे काम व्यवस्थित चालू आहे. जेव्हा ती यशच्या प्रेमात पडली? तेव्हा तिला सर्व माहित होते की! आणि तिलाही एकत्र कुटुंब आवडत होते की! गौरी एक नंबरची दुटप्पी आहे. यश तसा नाही. तो अगदी पहिल्यापासूनच म्हणत आहे की मी माझ्या कुटुंबाला सोडून कधीच कुठे येणार नाही. आणि गौरी तिचे अमेरिकेतले करियर सोडून परत आली? साफ खोटे ! तिथे तिचे काहीच जमलेले नाहीये म्हणून ती परत आलेली आहे.
गौरीने साखरपुडा कशासाठी केला? या आधी तिला सांगता येत होते ना यश ला की मला परदेशात करीयर करायचे आहे ते ! म्हणजे काय साखरपुडा करून ठेवायचा. अमेरिकेत जायचे. तिथे मुलाच्या प्रेमात पडायचे, लग्न करायचे आणि यशला डच्चू द्यायचा हाच तिचा इरादा होता. 
 
मुली मुलांना गृहीत धरतात. त्याला प्रेम हे लेबल देतात. अशी काही उदाहरणे मी प्रत्यक्षात पाहिली आहेत.
 
१. दोघांचे प्रेम होते. मुलगी अमेरिकेत गेली. मग मुलगा गेला. मुलगा तिथे गेल्यावर मुलगी म्हणते आता मला विसरून जा. तो भारतात परत येतो आणि निराशेत जातो.
२. दोघांचे प्रेम, लग्नाचे रूपांतर प्रेमात, नंतर काही वर्षांनी ती अमेरिकेत येते आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करते आणि प्रियकर (लग्न झालेल्या नवऱ्याला) घटस्फोट देते.
३. इथे २ विद्दार्थिनी अशा होत्या. बरेच वर्ष एकत्र राहिलेले दोघे. सांगताना सांगितले की तो माझ मित्र आहे. मुलीचा एम. एस नंतरचा ओपिटी काळ संपला आणि तिने लगेच त्या मुलाशी लग्न केले. ओपिटी काळ संपला आणि नोकरी मिळाली नाही की देश सोडावा लागतो. मग लगेच या मुली लग्नानंतर डिपेंडंट विसावर (Dependent Visa )जातात.
 
४. एक जण लग्न होऊन इथे आले. ती भारताचे खूप कौतुक करायची. तिच्या नवऱ्याने भारतात नोकरी घेतली आणि भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. नंतर तिचा मूड पूर्णपणे गेला आणि नंतर भारतात गेल्यावर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आणि ती आता इथे अमेरिकेत येण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. घटस्फोट घेतला याचा तिला आता पश्चाताप होत आहे.
 
५. लग्न होते. आणि नवऱ्यामुळे तिलाही ग्रीन कार्ड मिळते आणि घटस्फोट होतो. लगेच दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडून लग्नही होते.
rohini gore

Monday, July 01, 2019

बिग बॉस मराठी सीझन नं २

बिग बॉस मराठी सीझन नं २- टाळ्यांचा कडकडाट करावा अशा अफलातून कलाकारांचा शो. वावा किती छान शिविगाळ, आरडाओरडा. आणि मारामारी. पहिल्याप्रथम शिवानीचे कौतुक करू. काहीही कारण नसताना आग पाखड. नेहाही तसलीच. तिचा किरकिरा आवाज. वैशाली तर खेळायला आली नसून फक्त झोपा काढायला आल्यासारखी वाटते. सुरेखा तर एकेठिकाणी बसायचा कंटाळा आला की दुसरीकडे जाऊन बसते. रूपालीचा स्वर जास्त वेळा लागत नाही पण एकदा लागला की सारेगपम च्याही वरचा स्वर लागतो तिचा. अर्थात बिचुकल्याला याच स्वरांनीच तर त्याला जागचे हालवले. ततपप झाली त्याची. रूपाली चांगली वाटली मला. वीणाही आधी चांगली वाटली पण प्राध्यापक मांजरेकरांनी तिच्या डोक्यात इतकी हवा भरली की तिला वाटले पराग कोण? कुठला? शिव बद्दल आकर्षण पण मी नाही बाई त्यातली असा फुकटचा आव आणणारी.
केळकर महाराज दुसऱ्याची मदत घेऊन खेळणारा. हिम्मत असेल तर डोक लावून खेळ. बाप्पा म्हणजे कुणीतरी फुकटचा आग्रह केला म्हणून आला. दिगंबर आधी नीट खेळत नव्हता पण वर्गशिक्षक म्हणून त्याने लोकनाट्याबद्दल चांगले शिकवले. ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला बिगबॉसने घरात येण्याची परवानगी कशी काय दिली बुवा? ज्याने आईबहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या, इतक्या की त्या म्युट कराव्या लागल्या आणि त्याबद्दल प्राध्यापक मांजरेकर काहीच बोलले नाहीत? तर इज्जत का फालुदा झाल्याने घरातल्या पुरूषांवर आरडाओरड केली. की तुम्ही बिचुकल्यावर का नाही रागावलात? का नाही त्याच्या मुस्कटात लगावून दिलीत. भिचुकल्याला भितात का ते?



किशोरी बऱ्यापैकी खेळत होती. सगळ्यांना सांभाळून घेत होती. बिगबॉस मधले टास्क ज्याला कळले आहेत असा एकमेव माणूस म्हणजे पराग. आणि मुख्य म्हणजे त्याला माणसे ओळखता येतात. तो शेफ आहे. त्याला टक्कल आहे. त्यावरून पहिल्यापासूनच घरातल्या सर्वांचा त्याच्यावर इतका राग का? त्यावरून त्याची किती टिंगल उडवत होते? परागचे फक्त एक खटकले की त्याने ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुप मध्ये जायला नको होते. केळकर महाराजांनी शिवचे कान भरले आणि त्यानुसार तो वागला आणि त्यात नेहा पडली. तिचे ढोपरे फुटले. तरी तिला पुढे सारून तो कंफेशन रूम मध्ये गेला. तसाच तो टास्क होता. शिव बलाढ्य आहे त्यामुळे त्याने जोर लावला. त्या ढकलाढकलीत नेहा पडली. माधव तर नेहमी सगळ्यांबरोबरच असतो. म्हणजे काय चालू आहे, कोण काय बोलतयं हे पाहण्याकरता. तिथे ते दोघे काय करत होते? नेहा पडल्यावर केळकर महाराजांनी तिची माफी लगेच मागितली नाहीच. शनिवारच्या शाळेमध्ये माफी मागितली. हीना फक्त सगळ्यांना तिचा नाच दाखवायला आली आहे. बरं जेव्हा नेहा पडली तेव्हा लगेचच परागने तिची बाजू समजून घेतली. ते सर्व विसरून नेहाने शिवला
आणि केळकर महाराजांना स्वर्गात टाकले आणि परागला नरकात. स्वर्ग नरक या टास्क मध्ये.



घरातले इतर सर्व सदस्य परागला पाण्यात पाहतात. आणि जाणून बुजून एका टास्कमध्ये परागला इतका त्रास दिला नेहाने आणि वैशालीने आणि इतर सर्वांनी मिळून त्याला शेवटी खाली पाडले. खरे तर खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्क मध्ये तो सर्व त्रास सहन करून अगदी जिंकायलाच आला होता पण शेवटी त्याला ढकलून देवून खाली पाडले. एकावर एक झालेली टिंगल टवाळकी आणि टास्क मध्ये झालेला सर्व त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्याने नेहाच्या थोबाडीत मारली आणि त्याला बिग बॉसने घरातून त्या क्षणी घालवून दिले. त्याची चूक आहे मान्य पण त्याला दिलेला त्रास प्रेक्षकांनी पाहिला आहे. तो त्रास पाहून कोणीही हेच म्हणेल आणि सर्व सोशल मिडियावर हेच म्हणले आहे की परागच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यातून त्याची चूक घडली. खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्कमध्ये किशोरीला खूप त्रास दिला नाही. शिवलाही नाही. शिवच्या मांडीवर तर हीना जाऊन बसली. तो कशाला उठेल?



घरातून गेल्यावर फक्त परागचा अपमान करण्यासाठीच त्याला घरात आणले होते. आणि त्याचा प्राध्यापक मांजरेकर आणि घरातल्या सर्व सदस्यांनी (त्याच्याबरोबर असणाऱ्या वीणा, किशोरी आणि रूपालीनेही) फक्त आणि फक्त त्याचा अपमानच केला. परागने किडनी डोनेट केली आहे. खुर्चीवर उठून जाण्याच्या टास्कमध्ये त्याला वैशालीने नखे टोचली. तिथे वजने ठेवली होती त्यामुळे वजनावर बसणे शक्य नव्हते. त्यामुळे तो तिरका बसला होता. नेहा तर परागला राग येईल असेच वाट्टील ते बोलत होती. या सर्वाचा त्याला खूप त्रास झाला आणि त्याने सांगितले की त्याच्या पोटात अजूनही दुखत आहे. त्याला झालेल्या त्रासाबद्दल एकानेही एक चकार शब्दही काढला नाही. त्रास देणाऱ्या सदस्यांचे तर प्राध्यापकांनी कौतुक केले.



परागला नक्कीच या सगळ्याचा त्रास झाला असेल. पण त्याला घरात राहू दिले नाही हे एका अर्थी बरेच झाले. सुटला बिचारा सगळ्यांच्या तावडीतून ! बिग बॉस, प्राध्यापक मांजरेकर आणि इतर सदस्य यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. असो. या आधीचे बिग बॉस बघितले होते ते चांगले वाटले म्हणून सीझन नं २ बघायला गेलो तर निराशा झाली असे म्हणण्यापेक्षा लोकांचे खरे रंग कळाले.

पहिल्यादिवसापासून शिव्या आणि भांडणेच बघितली. वाटले होते पराग, किशोरी, वीणा आणि रूपाली यांचा चांगला ग्रुप झालाय. काहीतरी चांगले बघायला मिळेल. आता बिग बॉस वर कायमची काट.....Rohini Gore

Saturday, July 07, 2018

आपला मराठी बिग बॉस

आपला मराठी बिग बॉस बद्दल थोडेसे ....


सई, पुष्कर, मेघा यांचे त्रिकुट मोडले. मेघाने आयत्या वेळेस आस्तादला कॅप्टन पदाबद्दल तिचे मत दिले आणि ती म्हणाली की मला आता कॅप्टन पद नको आहे. बिग बॉसने सांगितले असताना की तुम्ही वेळ घ्या, चर्चा करा आणि मग तुमचा उमेदवार ठरवा. तरी तिने अचानक बाँब गोळा टाकला. हे तिचे वर्तन बघून सई आणि पुष्कर खूपच चिडले. सईचे म्हणणे इतकेच होते की मेघाने आधी त्याबद्दल त्या दोघांशी बोलायला हवे होते. नंतर मेघाने माफी मागितली आणि मी त्याबद्दल आधी तसा विचारच केला नव्हता. मला त्यावेळेला एकदम डोक्यात आले ते मी बोलून दाखवले हे स्पष्टीकरण अजिबातच पटणारे नव्हते. ज्या बाईच्या डोक्यात फक्त टास्क करण्याबाबतच विचार घोळत असतात ती असे एकदम करणे शक्यच नाही. दुसऱ्या टीम बद्दल सहानुभूती दाखवून त्यांच्या टीम मधून मते तिला मिळवायची होती.



आस्ताद साठी कॅप्टन पदासाठी मेघाने तिचे मत दिले. त्यावर आस्ताद आणि रेशला आनंदही झाला. पण त्यावर पुष्करने माती खाल्ली. मेघा आस्तादच्या एका गेम मध्ये त्याच्याविरुद्ध खेळत होती हे त्याने सर्वांसमोर जाहीर केले. त्यामुळे मेघा खूपच दुखावली. त्यामुळे झाले काय की आस्ताद आणि रेशम यांना कोलीतच मिळाले. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा नंतरच्या बऱ्याच टास्क नंतर परत कॅप्टन पदासाठी निवडीची वेळ आली तेव्हा मेघा म्हणाली मला पुष्करने सासू - जावई या गेम मध्ये खूप छळले आहे आणि त्यामुळे मी या पदासाठी योग्य आहे हे सांगितले. आणि एकूणच चर्चा सत्र आधीच्या विजयी टीमचे चालू होते. त्यांचा निर्णय होत नव्हता. आवाज खूप वाढत होते. नंतर सगळेच एकत्र झाले आणि मेघावर सगळ्यांनी मिळून तोफा झाडायला सुरवात केली. यात दुसऱ्या टीम मध्ये जाऊन सईने आणि पुष्कर ने चक्क माती खाल्ली आहे. आस्ताद आणि रेशम ही विरूद्ध टीम मेघा आणि सईला नेहमीच पाण्यात बघतात. पण सई आणि पुष्करने गप्प बसावे ना? काहीही झाले तरी मेघाविरूद्ध विरूद्ध टीम मध्ये जाऊन आरडा ओरडा करणे कितपत योग्य आहे? असे केल्याने सई आणि पुष्कर बद्दलचे मत चांगले होत नाहीये हे त्यांना कळायला हवे. पेक्षक बघत आहे. यात काय होणार आहे की मेघालाच जास्त मते मिळणार आहेत. सई बद्दल जितकी आरडाओरड होत आहे तितकी ती नक्कीच वाईट नाहिये.




मेघाने सासू-सून सासू - जावई या टास्क मध्ये मेघाने आधी पुष्करला खुप त्रास दिला. आणि त्याचा बदला म्हणून नंतर पुष्करने ही मेघाला खूप त्रास दिला. अर्थात त्रास देणे असाच टास्क होता आणि त्या त्रासाला कंटाळून गेम मधून बाहेर पडायचे होते. जश्याच तसेच झाले हे निर्विवाद. पण म्हणून लगेच पुढे जाऊन दुसऱ्या टीम मध्ये घुसून त्यांच्या आवाजात आपलाही आवाज मिळवणे हे सई ने आणि पुषकरने अजिबात चांगले केले नाहीये. त्यातूनही सई आणि पुष्करची चांगली फ्रेंडशिप आहे हे चांगलेच आहे पण म्हणून सईने फक्त पुष्करची बाजू घेऊन मेघाला बोलायला नको होते. तिने दोघांनाही समजावून सांगायला हवे होते की जे शर्मिष्ठाने केले. आस्दात तर एक नंबरचा डबल ढोलकी आहे. रेशम तर अजिबात कशात भाग घेत नाही. जशी मेघा टास्क कसा जिंकू याचा विचार करते तसेच सई कडून प्रेक्षकांची छान करमणूकही होते. सई पण सगळ्यांच्या ४० - ५० पोळ्या करते हे उषा नाडकर्णी यांनीच सांगितले आहे.. सई टास्क मध्ये डोकेही लढवते त्याचप्रमाणे ती करमणूकही करते. मेघाकडून करमणूक अजिबातच होत नाही. पुष्करने विचार करून थोडा संयम राखायला हवा होता हे अगदी मनापासून वाटते.
Rohini Gore