Friday, July 17, 2020

कोर्सेस

मला मागचे काही मिळाले की माझे मन भूतकाळात जाते आणि हासू येते. ही प्रमाणपत्रे मला मिळाली आणि याचा तेव्हाही काही उपयोग झाला नाही आणि आता तर नाहीच नाही पण आठवणी मात्र पुसल्या जात नाहीत. त्यावेळचे दिवस डोळ्यासमोर येतात. तर पंचीग नावाचा कोर्स मी बारावी परीक्षेनंतरच्या सुट्टीत केला. हा कोर्स केला ती जागा होती पुण्याची तपकीर गल्ली . या गल्लीत गेल्यावर एका खबदाडात एक खोली होती आणि तिथे २ मशीन्स होती. एक आसीएलचे आणि दुसरे आयबीएमचे. मी आयसीएलच्या अगदी छोट्या मशीनपुढे बसायचे आणि कार्ड पंच करायचे. आणि ही कार्डे वाचायची असतात. परीक्षेत ती मी वाचली इतकेच आठवते आणि हे छोटे मशीन असते त्यावर हाताचे मधले बोट वापरून काही बटनांवर प्रेस करायचे असते. १० काळी बटने होती इतके पुसट आठवत आहे. हा या दोन्ही कोर्सेस साठी बरीच मागणी आहे असे मला कोणीतरी सांगितले आणि म्हणून हा कोर्स मी केला इतकेच ! परीक्षेनंतर जो निकाल लागला तेव्हा मला तिथल्या सरांनी तुम्ही इथे इन्स्ट्र्क्टर म्हणून काम कराल का? असे विचारले होते आणि अर्थातच मी नाही म्हणून सांगितले होते. हा कोर्स म्हणजे काय हे मला माहीती नाही. कोणाला माहिती असल्यास सांगा.


कंप्युटर प्रोग्रामिंगचा कोर्सही असाच मजेशीर. सीडॅकचा तर्फे या कोर्सची शाखा डोंबिवली मध्ये मोठ्या बॅनर मध्ये लावली होती. मी आणि अर्चना मिळून या क्लासला जायचो. १५,००० रूपये फी होती .१९९८ साली हा कोर्स केला. थोडे आठवत आहे. फॉक्सप्रो मध्ये आम्ही ४ जणींनी मिळून एक प्रोजेक्ट केला होता. दीपाली नावाची एक मुलगी आम्हाला "सी" नावाची मशीन भाषा शिकवायची आणि तिने आमच्याकडून ती चांगलीच घोटून घेतली होती. मला खूप उत्साह आला होता शिकण्याचा तेव्हा. डेव्हलपर २००० शिकवायला शिक्षक मिळत नव्हता. एक पोरगेला मुलगा आला शिकवायला आम्हाला. आम्ही म्हणले पण हा शिकवणार आम्हाला ! हा कोर्स संथ गतीने चालला होता. एक तर आम्ही क्लासला गेल्यावर बरेच वेळा लाईटी जायच्या आणि मग आम्ही परत घरी यायचो. दुपारचा १२ ते १ क्लास होता. उन्हात मी छत्री घेऊन जायचे. क्लास होत आला आणि आम्ही अंधेरीस राहायला आलो.





नंतरचा बराचसा उरलेला कोर्स मी अंधेरी -डोंबिवली- अंधेरी असा येऊन जाऊन केला. अजून एक प्रोजेक्ट बाकी होता. परीक्षेचे सेंटर दादरला होते. प्रोजेक्ट, अभ्यास आम्ही तिघींनी मिळून केला. आणि नंतर दादरला आम्ही तिघी मिळून परीक्षेसाठी गेलो होतो. मी ४ दिवस नेर्लेकर यांच्या घरी जाऊन राहिले होते. दादरला परीक्षेसाठी गेलो ती होती एका शाळेत. अजिबात चांगली व्यवस्था नव्हती. परीक्षा देऊन घरी आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मि घरी अंधेरीला गेले. हुश्य ! झाला एकदाचा कोर्स ! असे मनाशी म्हणाले. नंतर प्रमाणपत्र मिळाले आणि ठरवले होते की एक पीसी घेऊन जे शिकलो त्याचा सराव करू. सराव केल्यावर प्रोग्रॅमिंग जमतय का बघू. दीपाली मला म्हणाली होती की तुम्ही काही पुस्तके विकत घ्या आणि सुरवात करा. पण तसे काहीच झाले नाही. आपण ठरवतो एक आणि होते भलतेच ! Rohini Gore

Wednesday, July 15, 2020

बर्थ डे गर्ल - आई

आज बर्थ डे गर्ल आई होती. १५ जुलै आईचा वाढदिवस. आजचा दिवस स्मरणात राहील असा गेला. आईचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा झाला. आईची सर्व भाचवंडे आईवर खूप प्रेम करतात. आईलाही तिची भाचवंड खूप प्यारी आहेत. तर असा हा वाढदिवस झूमवर साजरा झाला. सर्व भाचवंडे, लेकी, सुना, जावई, नातवंडे पतवंडे हजर होती. त्यानिमित्ताने आम्ही भावंड पण एकत्र आलो आणि  प्रत्यक्षात भेटल्याचे समाधान झाले. किती छान छान शुभेच्छा होत्या सर्वांच्या ! वा ! केक, फुगे पण होते. आणि शब्द शुभेच्छाही
मस्तच होत्या.

झूमवर भेटलोच पण आई बाबा कोरोनामुळे रंजनाकडे रहायला गेले आहेत. तिथे त्या दोघांची ती खूप छान काळजी घेते. आणि आज तर आई खूप खुष आहे. सांगत होती रंजनाने काय काय केले ते ! ऐकून खूपच छान वाटले. 
विडिओ कॉलवर आईचा आनंदी चेहरा बघून खूप समाधान वाटत होते. रंजना, सुरेश व सईने आईला १४ तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच १५ तारीख सुरू होण्याच्या सुमाराला सरप्राईज दिले. आईबाबांच्या खोलीत गेले. दिवा लावला आणि टाळ्या वाजवून आईला भरभरून  शुभेच्छा दिल्या. आज रंजनाने आईला ओवाळले. तिला गरम गरम आयते खाऊ घातले. तिच्या आवडीच्या डाळिंब्या केल्या होत्या आज  रंजनाने जेवणात ! गरम गरम टम्म पुऱ्या वाढल्या. वेगळी म्हणून रव्याची खीर केली. दिवस भर आईला तिच्या भाचवंडांचे फोन येत होते. मला विडिओ कॉल वर हे सर्व तिने मला सांगितले. आईला विरंगुळा म्हणून रंजनाने तिला ट्रांझीस्टर गिफ्ट केला. नंतर आलो सगळे झूमवर. तिथेही गप्पा टप्पा झाल्या. 
आईने आज ८५ वर्षात पदार्पण केले आहे. आणि बाबांचा वाढदिवस मे महिन्यातला. त्यांनि ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्याने सुखकारक ठरो ही देवाजवळ प्रार्थना. सर्वांना धन्यवाद. हासऱ्या, आंनंदी आणि चिरतरूण असलेल्या माझ्या आईला परत एकदा वाढदिवसाच्या  आभाळभर हार्दिक शुभेच्छा ! आणि नमस्कार ! Love you Aai <3 :="" always="" as="" id="goog_1613518867" span="">


Wednesday, July 01, 2020

१ जुलै २०२०

आजचा दिवस छान गेला. आषाढी एकादशीचा मेनू ठरवला होता त्याप्रमाणे झाला. साबुदाण्याचे थालिपीठ, बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. संत्र्याच्या फोडी , दाक्षे, खजूर, सुकामेवा व दाणे यांचा लाडू, आयते श्रीखंड. आज अंताअक्षरी मध्ये विठ्ठलाची गाणी म्हणायची होती ती म्हणली. मला आशा भोसले यांनी गायलेले धागा धागा अखंड विणूया हे गाणे खूप आवडते. हे गाणे तर ऐकलेच पण इतरही गाणी ऐकली, म्हणली. देवाची पूजा करताना नमस्कार करून म्हणाले कोरोनाचे संकट दूर होऊ देत. सर्वांच्या मनासारखे होऊ देत. माझ्या एका मैत्रिणीने पण छान मेनू केला होता. ती व मी आम्ही एकमेकींना फोटोज पाठवतो त्यामुळे जरा बळ मिळते. आज माझ्या मामे भाचीचा कथ्थक नाच पाहिला. तिने युट्युबवर आणि आमच्या भावंडांच्या ग्रूप मध्येही टाकला होता. अवघा रंग एक झाला या गाण्यावर तिने व तिच्या २ मैत्रिणींनी छान कथ्थक केले आहे. आज वेगळे पणा म्हणजे एफबी वर अवतार जागृत झाले होते. ते पाहताना पण मजा येत होती. आज आईबाबांना, माझ्या बहिणीला, व भाचीला विडिओ कॉलवर पाहिले.