Friday, March 04, 2022

Kohl's .... (3)

 

Juniors सेक्शन मधे गेले तेव्हा तिथे एक देशी बाई आणि एक आफ्रिकन बाई होती. देशी बाई मला म्हणाली की तु सेक्शन फिरून ये म्हणजे तुला कोणकोणते Brand आहेत ते कळेल आणि परत आलेले कपडे परत त्या त्या जागेवर लावायचे असतात. काही कपडे विशिष्ट पद्धतीने फोल्ड करून टेबलवर ठेवायचे असतात तर काही हॅंगरला लटकवायचे असतात. मी सेक्शन फिरून आले. हा सेक्शन खूप मोठा नाही त्यामुळे चालणे कमी. कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला एक खोली आहे त्यात कप्पे असलेले मोठ्या उंचीचे रॅक असतात तिथून (Returns from customers ) कपडे आणायचे आणि ते जागेवर लावायचे. या रॅकवर पण डिपार्टमेंटची नावे लिहिलेली असतात. इथल्या सणांच्या दिवसात खूप गर्दी असते आणि अमेरिकन/देशी लोक कपडे/वस्तू विकत घेतात आणि परत करतात. जितकी खरेदीला रांग असते तितकीच रांग कपडे/वस्तू परत करण्यासाठीही असते. परत करायचे तर घेतात कशाला कपडे/वस्तू? 
 

 
मला हा सेक्शन आवडला. चालण्यासाठी जागा कमी. आधी कपडे आणून ते क्रमवार लावायचे आणि जागच्या जागी लावायचे. तरी सुद्धा पहिल्यांदा हे काम अवघड असतेच. कपड्यांचे इतके प्रकार असतात की पटकन नाही सापडत ! बारीक नजर ठेवून कोणत्या जागी कोणते कपडे ठेवायचे ते बघायला लागते. डोके गरगरायला लागते. मी गोंधळलेली पाहून तिथे असलेल्या आफ्रीकन बाईने मला मदत केली. ती म्हणाली सुरवातीला असेच होते. बरेच महिने गेले आणि तेच तेच काम केले की तुम्ही त्या कामात तरबेज होता. ही बाई मी स्टोअर मधे आले की नेहमी हासायची माझ्याकडे पाहून ! मलाही बरे वाटायचे.

 
मी जेवणाच्या सुट्टीत जेवायला गेले. तिथे सर्व कामगारांचे आणि मॅनेजर लोकांचे वेळापत्रक बनवणारी बाई बसली होती. तिने मला विचारले की तुला कॅशिअरचे (Bank Register) काम करायला आवडेल असे बोलली होतीस. मी हो म्हणाले. कॅशिअर सेक्शनची प्रमूख मॅनेजर मला काम करता करता एकदा भेटली आणि तिने मला विचारले की तुला हे काम आवडेल का? थोडे दिवस करशील का? तर मी तिला हो म्हणाले होते. तसे तर पहिल्या दिवशीची मॅनेजर होती तिला पण मी हेच सांगितले होते की तुम्हाला पाहिजे असेल तर मी कॅशिअरचे काम करायला तयार आहे. मला मुलाखतीमध्ये सांगितले होते आणि नेमणूक पत्रात पण असे लिहिले होते की तुम्हाला आम्ही कोणत्याही सेक्शन मध्ये गरजेनुसार टाकू. कामाच्या वेळा, दिवस आणि तासही बदलते राहतील. जेवणाच्या सुट्टीत एक देशी बाई पण जेवायला होती. मॅनेजरने सांगितले की तु जेवण झाल्यावर कॅशियरचे (Bank Register) काम कर आणि तिलाही सांगितले की काम समजावून सांग. 

 
आम्ही दोघींनी हिंदी मध्ये एकमेकींची विचारपूस केली. तिने काम करता करता मला कामाचे स्वरूप सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस मला एका अमेरिकन बाईबरोबर कॅशिअरचे काम दिले. मला काम समजले आणि स्वारस्यही वाटले. देशी बाई हे काम गेले १५ वर्षे करत आहे असे तिने मला सांगितले. नंतर माझी मी कॅशिअरच्या टेबलवर उभी राहून कामाला सुरवात केली. इथे स्टोअर मधे काम उभे राहूनच असते. ६ तासाची शिफ्ट असेल तर २० मिनिटे जेवणाचा ब्रेक असतो. ७ तासाची शिफ्ट असेल तर ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक आणि १५ मिनिटांचा एक ब्रेक. ८ तासांची शिफ्ट असेल तर ३० मिनिटे जेवणाचा ब्रेक आणि २ ब्रेक प्रत्येकी १५ मिनिटांचे असतात.
माझी शिफ्ट वेगवेगळी असायची. जेव्हा ६ तासाची शिफ्ट असते तेव्हा २० मिनिटांच्या ब्रेक मध्ये घड्याळाच्या काट्याकडे बघूनच जेवायला लागायचे. तिथल्या देशी/विदेशी बायका ज्यांना बरीच वर्षे झालेली आहेत त्यांचा नवीन आलेल्या कामगारांना धाक असतो. दटावतातही. अनुभवले आहे. काही चांगल्या आहेत.


 मी जेव्हा माझी मी कामाला उभी राहिले तरी काही वेळा विचारावे लागते. इतके वर्षे काम करणारे त्यांनाही पहिल्याप्रथम शंका आल्याच असणार ना. काम जितके तुमच्या हाता खालून जाईल तितके तुम्ही तरबेज होता. मी कामाला उभी होते. कस्टमर लोकांची रांग लागलेलीच असते. ते येतातच की रांगेतून. तरी सुद्धा देशी बाई देखो कस्ट्मर है. मनात (माहीत आहे की) मला शंका आली की मी तिला विचारायचे. काही वेळा मॅनेजरलाच बोलवावे लागते. त्याप्रमाणे स्क्रीन वर तसे टॅब असतात ते प्रेस करायचे. मी एखाद वेळेस शंका विचारली की मी विचारायचे. मैने तुझको बताया था ना? अरे हो ना ! पण मी परत विचारू शकते ना एखादवेळेस. तर मला म्हणाली मॅनेजरला बोलाव.

 
कॅशिअर सेक्शनची प्रमुख किंवा इतर मॅनेजरही येतात लगेच. त्यांना यावेच लागते. कारण की समोर कस्टमर उभा असतो. तर कॅशिअर सेक्शनची प्रमुख मॅनेजर आली आणि तिने देशी बाईला सांगितले की तू हिला मदत कर. तिच्या देखतच ही मला म्हणते की तिला बोलावू नकोस. मी सांगीन काही अडले तर !रेस्ट रूम मध्ये जाण्यासाठी पण एकमेकींना सांगून जावे लागते. तर एकदा मी गेले दुसऱ्या एका देशी बाईला सांगून. म्हणाली लवकर ये. तिला हो म्हणाले. मनात म्हणाले (रेस्ट रूम/wash room मध्ये बसायला मला हौस नाहीये) मी आले आणि ती म्हणाली की मी हा एक ड्रेस ठेवून येते. अर्धा तास झाला तरी ही आली नाही. मग मी जिने मला काम समजावून सांगितले त्या देशी बाईला सांगितले की ही मला म्हणाली लवकर ये आणि अर्धा तास झाला तरी ही आली नाही अजून. ड्रेस ठेवायला इतका वेळ लागतो ? मला म्हणाली असे म्हणाली तूला लवकर ये? तिला तिने विचारले किधर गयी थी? तर म्हणाली की रेस्ट रूम मधे. तर म्हणाली इतनी देर क्या कर रही थी उधर? मग त्या दोघी त्यांच्या भाषेत जोरजोरात भांडायला लागल्या. तिथे एक बाई आली आणि म्हणाली आम्हाला दोघींना की आपण इथे काम करायला येतो. कोण कुठे जातय आपल्याला काय करायचे आहे? मी मनातल्य मनात (मला इतर कोणाशी देणे घेणे नाही, पण जर का कुणी मला सांगितले की लवकर ये आणि ते सुद्धा रेस्ट रूम मधे जाण्याकरता तर तिने पण तसेच वागले पाहिजे.) मी बघितले ही बाई तिचे टेबल सोडून जायची आणि काय हवे ते घेऊन यायची आणि किंमत बघण्यासाठी स्कॅन करायची आणि कपडे टेबला खाली लपवून ठेवायची. मला दुसरी म्हणाली ही अशीच करते. कधी कामावर वेळेवर येत नाही.

 
मला ज्या दिवशी तिने काम समजाऊन सांगितले त्या दिवशी काही वेळाने तिला रेस्ट रूम/wash room ला जायचे होते. मी म्हणाले जा ना तू ! मी आहे. तर ती म्हणाली नको. तू नवीन आहेस. तुला एकटीला सोडून मी जाऊ शकत नाही ! आणि दुसऱ्या शिफ्टची बाई अजून यायची होती. बिचारी. मला खूप दया आली तिची. असाच प्रकार अमेरिकन बाईचा झाला. तिची पण अशीच अवस्था. जेवणाचा ब्रेक पण तिथे असणाऱ्या फोन वर मॅनेजरला विचारून जेवायला जायचे असते.मला कस्टमर लोकांचा चांगला अनुभव आला. काही वेळेला कॅरी बॅग मधे कपडे त्यांचे तेच भरून घेतात. मला कॅशियरचे काम आवडले होते. अर्थात एके जागी उभे राहून पाठीला चांगलीच रग लागते. पोटातही दुखते. फक्त एक जाणवले की कस्टमर लोकांची रांग असली की आपण त्यांच्याशी बोलण्यात, वस्तुंचे स्कॅनिग करण्यात गुंतून जातो आणि आपण इतके तास उभे आहोत ते जाणवत नाही. ज्या देशी बाईने मला काम समजावून सांगितले तिला बसण्यासाठी एक स्टुल दिले होते कारण की तिच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती (knee replacement) आणि Doctor's certificate दाखवल्या नंतर तिला स्टुल दिले होते. मी एकदा त्यावर बसले तर म्हणाली बसू नकोस. मॅनेजरने बघितले तर ती तुला ओरडेल. हे फक्त माझ्यासाठीच आहे. Rohini Gore
क्रमश:....

No comments: