Friday, October 21, 2022

मी अनुभवलेली अमेरिका (9)

 

मुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता
भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बाकीचे किरकोळ काही आणायचे झाल्यास इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.
 
 
 
आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा. हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा. तसेच चिरलेला लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.
 
 
 
मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले. स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने ाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, ेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव आवडली नाही. आणि भारतीय उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबातच चांगली नाहीत.
 
 
शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणि फक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत.

Friday, October 14, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (3)

 

आमच्या दोघांच्या आयुष्यात मोठा बदल खूप पूर्वीच झालेला आहे. विनायक नोकरी निमित्ताने मुंबईत आला आणि मी लग्न होउन मुंबईत आले. हवामानाचा मोठा बदल झाला. मुंबईत येणारा सततचा घाम मला अजिबात आवडत नाही. अर्थात मुंबईत कोणतेही तीव्र हवामान नाही. थंडी नाही. मला पुण्यातल्या थंडीचा खूप त्रास व्हायचा तो मुंबईत आल्यावर बंद झाला. विनायक आधी नोकरीसाठी बोरिवली वरून मुलुंडला यायचा. म्हणजे दोन टोके. नंतर डोंबिवली वरून अंधेरीला नोकरीसाठी जात असे. ही पण दोन टोके. चढण्या उतरण्यासाठी डोंबिवली हे स्टेशन म्हणजे रोज युद्धासारखे सज्ज व्हायचे. नंतर ते सवयीचे होऊन जाते असे म्हणले तरी ती सवय होत नाही. विनायक डोंबिवली वरून ७.१२ ची लोकल पकडायचा आणि यायला त्याला रात्रीचे ८ ते ९ वाजायचे. म्हणजे डोंबिवलीचे घर हे फक्त जेवण आणि झोपण्यापुरतेच होते त्याच्याकरता. गर्दीतून आल्या आल्या मोज्यांसकट सर्व कपडे धुवायला टाकायला लागायचे आणि रोज आल्यानंतर अंघोळ करायलाच लागायची. कारण गर्दीतून येताना घाम, धूर , धूळ. शनिवारी अर्धा दिवस काम असले तरी ४ तास प्रवासात जायचेच. नोकरीवर जाण्यासाठी रोज ४ तास प्रवास. अशी १० वर्षे. 
 
 
मी मुंबईत नोकरी करण्याच्या फंदात पडले नाही कारण रोजच्या रोज धक्का बुक्की मला सहन झाली नसती पण गरज असती तर नोकरी करावीच लागली असती. मी डोंबिवलीत ४ वर्षे नोकरी केली. त्यामुळे घरातले स्वयंपाक पाणी सांभाळून गावातल्या गावात नोकरी ठीक होती. अत्यंत गरज होती पैशाची म्हणूनच ही नोकरी मी केली. मी दादर, ठाणे, बोरिवलीला ट्रेन ने गेलेली आहे काही कामानिमित्ताने पण जेव्हा गर्दी नसेल तेव्हा. डोंबिवलीवरून दादरला जायचे असेल तर दुपार नंतर जावे. गर्दी लागत नाही आणि दादर वरून डोंबिवलीला यायचे असेल तर सकाळी ८ नंतर यायचे. ऑफीसची गर्दी टाळून जायचे. उलट्या दिशेने गर्दी केव्हा असते कोणत्या स्टेशनला असते त्याप्रमाणे. आधी मला पत्ताच लागायचा नाही ईस्ट कोणते, वेस्ट कोणते, रेल्वे फलाटावर येते तेव्हा जी घोषणा होते ती पण डोक्यावरून जायची. विनायकने मला सर्व सांगितले. जेव्हा विनायक आणि मी रेल्वेने प्रवास करायचो तेव्हा मी लेडीज डब्या मध्ये शिरायचे. फर्स्ट क्लासचा डबा कुठे येतो, लेडीज डबा कुठे येतो हे माहीत झाले होते. तिकिट काढताना पण खूप मोठ्या रांगा असायच्या. तेव्हा दोघांनी वेगवेगळ्या रांगेत उभे रहायचे आणि ज्याचा नंबर आधी लागेल त्याने तिकिटे काढायची. कोणत्या फलाटावर कोणती गाडी येणार त्या पाट्यांकडे लक्श ठेवायचे असते. 
 
 
मुंबईत नोकरी करणाऱ्या बायकांचे मला खूप कौतुक वाटते. रोजच्या रोज गर्दीतून येताना घरी आल्यावर पण स्वयंपाक, आला गेला, सणवार करणे हे जिकीरीचे आहे. त्यातून खुद्द मुंबईत राहाणाऱ्या बायकांना शाळा कॉलेज करताना ट्रेन ने येण्याची सवय असते पण ज्या बायका लग्न होऊन मुंबईत येतात त्या बायका हा बदल आत्मसात करतात त्यांचे विशेष कौतुक वाटते. लोकल मध्ये जाताना स्टेशन ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे बायका एका पाठोपाठ उतरण्यासाठी उभ्या राहतात म्हणजे पटकन उतरणे सोपे होते. चोथी सीट बसायला देतात. लोकल मध्ये हळदी कुंकू, डोहाळेजेवण असे कार्यक्रमही करतात. इतकी प्रचंड धावपळ, गडबड करून थकतात पण चेहरे आनंदी असतात. घाम येत असला तरी फुल मेक अप मध्ये असतात. टापटीप राहतात. पावसाळ्यात तर लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांचे खूपच हाल होतात. रूळांवर पाणी साठते त्यामुळे लोकल बंद पडतात. आणि कामावर गेल्यावर लोकल बंद पडल्या तर जास्तच हाल. विनायक एक दोन वेळा अंधेरी ते घाटकोपर कमरे इतक्या पाण्यातून चालत आला होता. पूर्वी मोबाईल फोन कुठे होते? आमच्याकडे लॅंडलाईन फोन पण नव्हता. मी बाहेर पिसीओ मध्ये जाऊन फोन करायचे. मुंबईचे लोक एकमेकांना सामावून घेतात. मदत करतात. इथे अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंबाबोंब आहे. फक्त काही ठिकाणी लोकल्स आहेत. पुण्यातही हीच कथा. त्यामुळे नोकरीला जाताना वाहन असणे अत्यावश्यक आहे. क्लेम्सन आणी विल्मिंग्टन इथे मी बसने बरीच हिंडली आहे ती केवळ वेळ जाण्याकरता आणि घरात बसून बसून बोअर होते म्हणून. न्यु जर्सीला रहाणारी लोकं न्युयॉर्कला ट्रेन ने नोकरी वर जातात. जस्ट लाईक डोंबिवली व्हिटी.
 
 
पूर्वी आम्हाला एकजण भेटले होते तेव्हा ते म्हणाले की न्यु जर्सी म्हणजे दुसरी डोंबिवली. त्यांचे आडनाव शेवडे. ते पण डोंबिवलीचे होते. ते असे का म्हणतात ते इथे आल्यावर कळाले. आम्ही अजूनही इथल्या लोकल ट्रेनचा अनुभव घेतला नाहीये. बघू कधी जमते ते.Rohini Gore
क्रमश : ...

Saturday, October 08, 2022

FB memory October 9 2020

 

photo 1989-90 (me and friend's daughter) IIT - powai - Tulsi blocks 🙂

माझ्या कडेवर असलेली धनश्री, आशाची मुलगी. एक आठवण आहे आशाची आणि माझी. आशा आयायटी मध्ये पिएचडी करत होती. ती तिच्या मुलीला एकीकडे सांभाळायला ठेवायची. त्या सांभाळणाऱ्या बाई कुठेतरी गावाला जाणार होत्या त्यामुळे आशाने मला विचारले की रोहिणी तु काही दिवसांसाठी धनुला सांभाळशील का? मी म्हणाले काही हरकत नाही पण मला अजिबात अनुभव नाहीये. तू जसे सांगशील तसे मी करीन. तर त्याप्रमाणे धनश्रीला ती माझ्याकडे ९ वाजता सोडायची आणि डिपार्टमेंटला जायची. जेवणाकरता सगळेच घरी यायचे. आशा जेवून परत तिला माझ्याकडे ठेऊन जायची. आणि ५ ला ती किंवा जय धनश्रीला न्यायला याायचे. धनश्रीचा काहीच त्रास झाला नाही उलट तिच्याशी खेळायला मजा यायची. ती बरेच वेळा झोपलेलीच असायची. उठली की अजिबात रडणे नाही तर खेळणे सुरू.

माझ्याकडे स्वरदा आणि भैरवी आल्या गप्पा मारायला की त्याही तिच्याशी खेळत बसायच्या. धनश्रीला गालाला हात लावला की हासायची. एकदा मात्र माझी त्रेधातिरपीट उडाली. धनश्री वेळेच्या आधी उठली आणि रडायला लागली. मी तिला कडेवर घेतले की थांबायची. पण मला स्वयंपाक करायचा होता. विनू घरी जेवायला येत असे त्यामुळे मी एकीकडे स्वयंपाक करत होते आणि एकीकडे तिला कडेवर घेत होते. मला पोळ्या करायच्या होत्या त्यामुळे मी तिला खाली दुपट्यावर ठेवले. मग ती परत रडायला लागली. तिला भूक लागली होती की तिला बरे वाटत नव्हते हे मला काहीच कळत नव्हते. मग मी तिला सांगितले रडू नको हं आई येईलच इतक्यात. तिच्या रडण्याने मलाच रडू फूटायला आले होते. तितक्यात आशा आलीच तिला घरी न्यायला आणि मला हलके वाटले. काही वेळा दुपारी भैरवी आणि मी तिच्याशी खेळायचो.

या फोटोची पण मजा आहे. मी तिला कडेवर घेतले होते आणि धनश्री खूप चुळबुळ करत होती. धनश्रीला सांगत होते कॅमेराकडे बघ. आणि सांगता सांगता जय (आशाचा नवरा) म्हणाला की तू पण कॅमेरा कडे बघ आणि त्यामुळेच माझा असा मान वाकडी असलेला फोटो आला आहे. 😃 😃
हे मला त्यावेळीच जाणवले होते. हाहा. धन्यवाद आशा फोटो पाठवल्याबद्दल. मागच्या आठवणी आल्या आणि आयायटीतले दिवस पुन्हा एकदा नव्याने जागे झाले. मी नेसलेली काळी साडी मला सासूबाईनी पहिल्या संक्रांतीची घेतली होती. मला खूप आवडली होती. ही साडी मी खूपच पादडली होती. आणि माझ्या आईने संक्रांतीचा माझ्या पसंतीने पंजाबी ड्रेस घेतला होता त्याची पण प्रखरतेने आठवण झाली. काळा टॉप , सलवार आणि दुपट्टा नारिंगी रंगाचा होता. हा ड्रेस पण मी खूप पादडला होता. जिथे तिथे तोच ड्रेस मी घालायचे.



Friday, October 07, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (2)

 

अमेरिकेत येताना स्टीलचा देव्हारा, त्यावर छत्री असलेला घेऊन आले. सहाण खोड गंध उगाळायला आणले होते. सुरवातीला मी गंध उगाळत असे. पण आता फक्त हळदी कुंकू लावते. इथे सुवासिक फुले मिळत नाही. इंडियन स्टोअर मध्ये सर्व काही मिळते पण आम्हाला इंडियन स्टोअर खूपच दुरवर असल्याने काही गोष्टींसाठी इथल्या अमेरिकन स्टोअर मध्ये हिंडले. त्यात मला कापूस आणि काडेपेटी या गोष्टी Dollar General मध्ये मिळाल्या. कापूस वात करण्यासाठी व काडेपेटी निरांजन लावण्यासाठी. इंडियन स्टोअर दूरवर असल्याने काही गोष्टी आठवणीने आणायला लागायच्या. त्यात मी कुंकू आणले होते म्हणजे हळदी कुंकवातले कुंकू. इथे आल्यावर सुरवातीला मी डाळी ठेवायला जे डबे केले होते प्लॅस्टीकचे ते अजूनही आहेत. प्रोटीन पावडर आम्ही दोघे दुधातून घेतो. प्रोटीन पावडर संपली की तो प्लॅस्टीकचा डबा धुवून पुसून वाळवून त्यात मी चार प्रकारच्या डाळी ठेवायला लागले.


भारतात स्टीलचे तसेच हिंडालियमचे डबे होते. त्यात मी गहू, तांदूळ, डाळी ठेवायचे. महिन्यातून एकदा हे सर्व डबे धुवायचे. पालथे घालून वाळवायचे. अर्थात हे काम कामवाली बाईच करायची. मी तिला मदत करायचे. इथे आल्यावर चहा साखरेचे स्टीलचे डबे मी आणले नव्हते. फक्त मिसळणाचा डबा आणला होता. चहा साखर मी डॅननचे दही संपले की ते डबे घासून व वाळवून त्यात ठेवायचे. नंतर प्लॅस्टीकचे डबे आणले. एका मैत्रिणीने तिचे घर इतके काही छान सजवले होते. तिने काहीही प्लॅस्टीकचे विकत आणले नव्हते. इथे आईस्क्रिमच्या बादल्या मिळतात, त्या तिने धुवुन वाळवल्या व त्यात डाळी आणि पिठे ठेवली. इथे भाजके दाणे मिळतात मीठ लावलेले व न लावलेले. सुरवातीला मी इंडियन स्टोअर मधून दाणे आणले. ते भाजले, त्याची साले काढली व कूट केले इंडियन स्टाईल. नंतर मी भाजके दाणे आणून त्याचे कूट करायचे. त्या भाजलेल्या दाण्याच्या डब्यात मी लाल तिखट, हळद, व मीठ ठेवले होते सुरवातीच्या काळात.


तिकडे भारतात राहत असताना दळणाचे डबे असायचे. गहू, ज्वारी , बाजरी, तांदुळ, हरबरा डाळ, अंबोळी, थालिपीठाची भाजणी. ही सगळी पिठे मी ताजी ताजी दळून आणायचे. त्यामुळे थोडे थोडे जसे की १ किलो, बाकीचे सर्व आणि गहू पीठ ५ किलो. इथे आल्यावर सर्व पीठे तयार. ती कधी आणि किती दिवसाची असतील याबद्दल माहिती नाही. भाकरी करण्याचे प्रयोग केले. पण भाकरी थापायला गेले की तुटायची, तव्यावर टाकली तरी तुटायची. त्यामुळे फक्त आणि फक्त पोळ्या. इथे फ्रोजन फूड भरपूर मिळते पण सततचे चांगले नाही.


विल्मिंग्टनला असताना मी रोजच्या रोज दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक करायचे कारण की विनायकचे ऑफीस जवळ असल्याने तो दुपारी जेवायला येत असे. १० वर्षे बऱ्याच रेसिपी केल्याने भांडी खूपच पडायची. ब्लॉगवर लिहिण्याकरता मी आठवड्यातून २ वेळा वेगवेगळ्या रेसिपी करायचे. मी भारतात असताना काही वर्षे भांडी घासली. धुणे पण धुतले. पण नंतर कामवाली असल्याने साधा चमचाही विसळला नाही. इथे सर्वजण हातानेच भांडी घासतात डीश वॉशर असला तरीही. एक तर आपल्या स्वयंपाकात फोडणी असते. पोळ्यांनाही थोडे का होईना तेल लावतो. त्यामुळे भांडी नुसती विसळून ती डीश वॉशर मध्ये ठेवून चालत नाही. वास राहतो. आम्ही भांडी हाताने घासतो आणि डिश वॉशर मध्ये पटापट विसळून ठेवतो. वाळून पण निघतात. त्यामुळे डिश वॉशर वापर ताटाळ्यासारखा पण होतो.


दोघच्या दोघं असली तरी भांडी ही पडतातच. २ जणांकरताही भाजीसाठी कढई आणि ४ जणांकरताही. म्हणते ती घासावी तर लागतेच ना ! दिवसातून सकाळ, संध्याकाळ दोघांचा चहा म्हणजे ४ कप, कूकर लावला २ भांडी, सूप सार केले तर ते एक भांड. कणिक मळली, पोलपाट लाटणे. पाणी जरी प्यायचे म्हणले आणि ते भांडे जरी विसळते तरी दिवसातून एकदा घासावे तर लागतेच ना ! अगदी सुरवातीच्या दिवसात प्रत्यक्षातले मित्रमंडळ जमले होते तेव्हा जेवणावळी खूप व्हायच्या. तेव्हा तर खूप भांडी पडायची. तिकडे भारतात कसे दूध, पेपर, वाणसामान सर्व काही घरपोच. शिवाय तिथे धुणे भांडी करायच्या बायका येतात, वरकामाला बाई, स्वयंपाकाची बाई. केराची टोपली घराच्या बाहेर ठेवला की केरवाला येऊन जातो. इथे वन मॅन शो असतो. तुलना ही केली जाते. इकडची आणि तिकडची. गोळा बेरीज सारखीच. इथे आणि तिथे फायदे तोटे आहेतच. Rohini Gore
क्रमश : ...

Monday, October 03, 2022

बदल, तुलना, आणि बरच काही.... (१)

 

बदल हा प्रत्येक गोष्टीत होतो. शहर बदलले की, देश बदलला की. माहेराहून सासरी आल्यावर सुद्धा ! आपण जिथे काम करतो ते ऑफिस बदलले की ! कितीतरी गोष्टी आहेत. तर हा बदल माझ्या बाबतीत कसा होत गेला त्याचे हे पुराण ! तुमचे पुराण पण वाचायला आवडेल की ! तर पहिल्याप्रथम मला विळीवर चिरायला खूपच आवडते. खाली फरशीवर बसून विळीवर कोणतीही भाजी मला बारीक चिरायला आवडते. अगदी धारदार विळी असली तरीही ! विळीकडे न बघता एकीकडे टीव्ही बघत बघत काकडी चोचवत असे. जेव्हा अमेरिकेला जायची वेळ आली तर तिथे कशी काय विळी न्यायची बुवा ! तर अंजली आली की धावत माझ्या मदतीला. अंजली चॉपरचा बॉक्सही होता. त्यासकट भरला की वो सामानात मी ! आन काय सांगू अंजलीच्या ल ई म्हंजी ल ई च प्रेमात पडले मी. एकदा मोठे कलिंगड कापताना अंजली चॉपर तुटला. १०/१२ वर्षाची साथ होती तिची नि माझी. मग काय आता सुरीने कापणे आले. सुरीची पण छान सवय झाली ती आजतागायत. सुऱ्या पण २ - ४ प्रकारच्या आणल्या. एक भाजी चिरायला, कलिंगड, टरबूज कापायला धारदार सुरी. ब्रेडचे सॅंडविच कापायला छोटी सुरी. दरम्यान एक फूड प्रोसेसर आणला भाज्या चिरायला. त्यात कांदा, बीन्स, सिमला मिरची असे काही कापून बघितले. त्यात कणिक पण मळता यायची. पण रोजच्या रोज कोण धुणार याला. कणिक तर इतकी काही म उ म उ व्हायची की त्याच्या पोळ्या कच्च्या व्हायच्या. आणि एक दिवस मोडला की वो ! त्यात इडलीसाठी पीठ बारीक करायला घेतले आणि संपल की वो सगळं. इतक काही बी वाईट वाटलं न्हाई मला.
 
 
मला दुध दुभतं जपायच भारी वेड होतं. वारणा - गोकुळ चे दूध. त्यावर येणारी जाड साय. घुसळलेलं ताक, पांढरे शुभ्र लोणी, आणि कणिदार तूप ! अमेरिकेत येताना मी रवि आणली होती बरोबर ताक घुसळायला. पहिल्यांदा कॅन मधले दूध पातेल्यात तापवलं. सायीचा पत्ताच नाही की वो ! इंडियन स्टोअर जवळ नाही देशी तूप आणायला. मग एका मैत्रिणीने इथल्या बटरचे तूप बनते असे सांगितले आणी तेव्हापासून तूप बनवण्याचा प्रश्न मिटला. आणि खरे सांगू का मी इंडियातल्या सारखे खाली रहाणाऱ्या एका तेलगू मैत्रिणीकडून विरजण लावायला दही आणले होते. ती माझ्या सारखीच. तिच्याकडे दही पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी घरी विरजण लावून दही बनवायचे अगदी इंडिया सारखेच ! बरेच वर्ष असे घरचे दही लावले. नंतर मात्र विकत आणायला लागले. इथे दह्याचे बरेच प्रकार मिळतात. मला डॅननचे दही आवडले. आणि आता नॉन फॅट दही आणायला लागलो. मला दही खायला इतके काही आवडत नाही. कोशिंबीरीसाठी जास्त वापरते. 
 
 
नंतर काही वर्षांनी मला दूध पचेनासे झाले आणि मी लॅक्टोज free दूध प्यायला लागले. चहाचेही तसेच झाले. आधी इंडियन स्टोअर जवळ नसल्याने डिप डिप चा चहा प्यायचो. नंतर त्यातली भुकटी काढून ती पाण्यात घालून चहा उकळायचे. इलेक्ट्रिक शेगडीवर चहा व्हायला खूपच वेळ लागायचा. एका मैत्रिणीने सांगितले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा होतो. तेव्हापासून आजतागत मी मायक्रोवेव्ह मध्येच चहा बनवते. आधी डिप डिपचा आणि आता चहाची पूड घालून !
 
क्रमश : ...