तब्बल १० वर्षानंतर आम्ही आमचे राहते घर सोडले आणि विनायकच्या नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात आलो. ज्या जागेत आलो ती आम्हाला घ्यावीच लागली. अपार्टमेंटच्या शोधकार्यात चांगला अनुभव आला नाही. शिवाय जे अपार्टमेंट उपलब्ध होते ते मागच्या बाजूला की जिथून फक्त आणि फक्त झाडेच दिसायची. आम्हाला दोघांनाही चालायला खूप आवडते. एके दिवशी विनायक बाहेर फिरायला म्हणून पडला आणि मला येऊन सांगितले की "आपल्या अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स ग्रोसरी स्टोअर्स पर्यंत पोहोचतो. तू पण फिरून ये एकदा"
नवीन शहरी विनायक ऑफीसला जायला लागला पण ऑफीसला जाताना पाऊण तास आणि येताना पाऊण तास वेळ. त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. सकाळी ८ ला निघायचा ते रात्री ७ ला यायचा. दिवसभर मी एकटीच ! आधी ज्या शहरात आम्ही राहत होतो तेव्हा विनायक दुपारच्या जेवणाला घरी यायचा. त्यामुळे मला थोडीका होईना त्याची सोबत मिळायची व बाकीचा वेळ मी एकेक उद्योग करत रहायचे. दहा वर्षे करत राहिले. रेसिपी लेखन, इतर लेखन, फोटोग्राफी,बदकांना तळ्यावर जाऊन
ब्रेड घालणे, पब्लिक लायबरी मध्ये जाऊन काम करणे, कॉलेजला जाणे. इ. इ. इ. बरेच काही केले. प्रत्येकाला कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो. तेच तेच करण्यातकुठेतरी खूप कंटाळवाणे होऊन जाते आणि नंतर दुसरे काही उद्योग शोधून त्यात मग्न होऊन जातो.
या फूटपाथने मला दुसरे काही शोधण्यात मदत केली. मी खूप ऋणी आहे या फूटपाथाची ! यावरून चालताना मला आधार तर वाटायचाच पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चालताना अनुभव व आनंद मिळाला. चालायला ५० मिनिटे लागायची. या फूटपाथवरून चालत जाऊन इंगल्स मध्ये थोडा वेळ घालवल्यामुळे एकदा नोकरीबद्दलचे विचारले असता मला इथे इंगल्स मध्ये नोकरी लागली. सुरवातीला मी वेळ जाण्याकरता या फूटपाथावरून चालत जायचे आणि यायचे. जाताना, येताना व इंगल्स्मध्ये थोडा वेळ बसून, तिथली स्टार बक्स मधली कॉफी पिऊन यायचे. सर्व मिळून माझा तीन तासांचा वेळ जायचा. छान वाटायचे. सकाळी आवरून १० ला निघायचे ते १ पर्यंत जेवायच्या वेळेला घरी यायचे. डोंगराळ भाग असल्याने रस्त उंचसखल आहेत. कधी चढण तर कधी उतरण. एके ठिकाणी थांबायचे थोडे. सिमंटचे दोन कट्टे आहेत समोरासमोर थोडे उंचीला लहान सहज बसता येण्याजोगे. त्यावर बसून थोडा दम खायचे आणि मग निघायचे.
जेव्हा मला इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा कामावरून येताना फूटपाथवरून चालत यायचे. कामावरून
निघण्याची वेळ ४ होती. निघण्यापूर्वी मी कॉफी आणि थोडेसे काही खाऊन निघायचे. कामाला जाताना जी बॅग होती त्यामध्ये जय्यत तयारी असायची. इथे पाऊस केव्हाही पडतो. कामावर सकाळी जाताना वेदर चॅनलवरचे हवामान पाहायचे. शिवाय हवामानाच्या वेबसाईटवर तासातासाचे हवामान पण नोंदवलेले असते. ते पाहून ४ वाजता नक्की कोणत्या प्रकारचे हवामान आहे हे बघावेच लागायचे. पाऊस असेल तर छत्री आठवणीने न्यावी लागायची. नुसता झिमझिम पाऊस असेल तरी सुद्धा !
थंडीमध्ये कोट, टोपी, मफलर, हातमोजे ठेवायचे. पाणी पिण्याची बाटली, शिवाय थोडीफार कुकीज असायचे. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ दिवस, त्यातले २ दिवस सोमवार ते शुक्रवार मधले असायचे. प्रत्येक दिवस वेगळा असायचा. कधी झिमझिमणारा पाऊस तर कधी विजा चमकून कोसळणारा. थंडी मध्ये कधी झोंबणारे वारे तर कधी वारे अजिबात नसून
फक्त गोठवणारी थंडी असायची. कधी खूप ढगाळलेले वातावरण तर कधी उनसावलीचा खेळ ! उन्हाळ्यात प्रखर उन. या दिवसात कोट छत्रीचे ओझे नसायचे. पण उन्हाचे चटके खूप बसायचे. जसे थंडी मध्ये खूप थंडी लागू नये म्हणून झपाझप चालणे तसेच उन्हाळ्यात चटके
बसू नयेत म्हणून
पाऊले पटापट उचलायला लागायची. जेव्हा ढगाळलेले वातावरण असायचे तेव्हा रमतगमत छान वाटायचे चालायला.
एक ना अनेक वेगवेगळ्या तऱ्हा. स्नो पडून गेल्यावर व पडत असताना मजा काही वेगळीच. जेव्हा थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याची भर असायची तेव्हा मफलर खूपच उपयोगी पडायचा. चालताना समोरून वारे यायचे ते अडवण्याकरता नाकापाशी मफलर धरायचे.
क्रमश : .....