मानसीचे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी ती बाळबोध वळणाची असते. तिचा भूताखेतांवर, भविष्यावर आणि अशा काही घटनांवर की ज्या घडलेल्या
आहेत, ज्यात विपरीत काहीतरी आहे, या सर्वांवर तिचा विश्वास असतो. मानसी मॉड
आहे. तिचा पेहराव म्हणजे स्कर्ट आणि टॉप. बॉयकट शिवाय तिला दुसरी कोणतीही केशभूषा पसंद नाही. दागदागिने, साड्या घालून मिरवावे असे तिला कधीच वाटत नाही.
एका
जीममध्ये अमित व तिची ओळख होते. अमित काही महिन्यांच्या प्रोजेक्टकरता
भारतात आलेला असतो. अमितलाही जीममधल्या वेगवेगळ्या मशीनवर जाऊन व्यायाम
करण्याची आवड असते. एक मुलगी जीममध्ये येऊन व्यायाम करते आहे याचे त्याला
खूप कौतुक वाटते आणि तो तिची ओळख काढतो. कुठे राहतेस, काय करतेस अशी
विचारणा करतो. तिला ही तो आवडतो. मग त्यांच्या व्यायामाविषयी चर्चा सुरू
होतात. त्या दोघांना गाण्याचीही आवड असते. त्याला मात्र वेस्टर्न म्युझिकच
आवडत असते. तिची आवड मात्र मराठमोळी. इतकी मॉड असूनही हिला मराठी गाण्याची
आवड कशी काय याचे त्याला आश्चर्यच वाटते. हळूहळू त्यांची मैत्री वाढते आणि
ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एके दिवशी तर अमित बाँबगोळाच टाकतो. त्याचे
असे होते. काही कारणानिमित्ताने जीम बंद असते आणि ते दोघे आता काय करायचे
अश्या विचारात असतात. तो म्हणतो
चल आपण या उपहारगृहात कॉफी घेऊ. ती म्हणते कॉफी नको. मला चहाच आवडतो. तो म्हणतो बरे चहा तर चहा.
आणि चहा पितानाच तो तिला लग्नाची मागणी घालतो. लग्नाची मागणी घातल्यावर ती खूपच सुखावून जाते. खरे तर त्याला जीममध्ये बघताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. दोघांच्या घरातून लग्नाला परवानगी मिळते आणि धुमधडाक्यात लग्न पार पडते. अमितची अमेरिकेत निघायची वेळ येते. मानसीलाही त्याच्याबरोबरच जायचे असते.
पण त्याच्या आग्रहाखातर ती तिच्या आईवडिलांकडे राहते. एका महिन्यानंतर
लगेचच ती अमेरिकेला जाण्याच्या तयारीला लागते. आईबाबा आणि सासूसासरे यांचा निरोप घेऊन ती मुंबईच्या विमानतळावर येते.
अमेरिकेतल्या एका मोठ्या विमानतळावर ती उतरते आणि तिची नजर अमितला शोधू
लागते. अमित तिला लांबूनच हाय! असा हात करतो आणि ती अमितच्या कारमध्ये येऊन
बसते. दोघेही घरी येतात. मोठ्या बंगल्यात अमितने तिच्या स्वागताची जोरदार
तयारी केलेली असते. बेडवरच्या चादरी स्वच्छ धुवून अंथरलेल्या असतात.
डायनिंगवर गरम गरम अन्न तयार असते. अर्थातच ते एका हॉटेलमधून मागावलेले
असते. मोठमोठ्या बॅगा घेऊन ते दोघे आत येतात. घरात शिरल्यावर मानसीला एकदम
रडायलाच येते. अमित म्हणतो काय गं झालं? अगं तू तर माझ्याबरोबरच यायला
उत्सुक होतीस ना? मग , आता काय झाले? "काही नाही रे. आईबाबांची आठवण आली मला. पण तू मला त्यांच्याकडे रहायला सांगितलेस ते किती बरोबर होते ते आता पटतयं मला. " अमित म्हणतो "हो ना? चल मग. पटापट आवरून जेवायला ये.
मानसी जागी होते तेव्हा सकाळ उलटून गेलेली असते. ती पटकन उठते. अरे बापरे!
आपण किती वेळ झोपलो आहोत? असे म्हणून अमितला हाक मारते. खाली येऊन बघते तर
खाली कुणीच नसते. अरेच्या अमित कुठे गेला? घड्याळात पाहते तर जवळजवळ ११
वाजत आलेले असतात. तेवढ्यात अमितचा फोन वाजतो. उठलीस का? " मानसी म्हणते "
हो अरे, किती वेळ झाला मी झोपेतून जागे होण्यासाठी ! आणि तू कुठे आहेस? "
अगं कुठे आहेस म्हणजे काय? ऑफिसमध्ये नाही का? चल, मी येतो संध्याकाळपर्यंत.
दिवसभर मानसी भारतातून आणलेल्या बॅगा खाली करते. खाण्याचे विविध प्रकार ती
कोणत्या ना कोणत्या डब्यात भरून ठेवते. नंतर छानसा स्वयंपाकही करते. अमित
घरी येतो आणि ते दोघे मिळून मस्त जेवण करतात. रात्री झोपताना अमित मानसी
खूप विषयांवर बोलतात. लग्नानंतर पहिल्यांच असा निवांतपणा त्यांना मिळालेला
असतो. विकेंडचे कार्यक्रम आखतात. कार्यक्रम आखताना मानसी अमितला म्हणते
"आपण समुद्रावर कधी जायचे? अमित म्हणतो अगं इथून समुद्र तसा दूर आहे.
चारपाच तास लागतात. आपण एखाद्या लॉंग विकेंडचा प्लॅन बनवून समुद्रावर जाऊ. मला माहीत आहे तुला समुद्र किती आवडतो ते. हो. रे मला खूप म्हणजे खूपच
आवडतो समुद्र आणि आता तर अमेरिकेतला समुद्र पाहण्याची खूपच उत्सुकता लागून
राहिली आहे मला ! ए. कधी जायचे सांग ना !
अगं हो हो. थोडा धीर धर. सध्या कामाचे वर्क लोड खूप आहे. पण मी तुला
सांगतो, येत्या ६ महिन्याच्या आत आपण नक्किच जाऊ. काय! सहा महिने ! मानसी
भुवया उंचावते. चला मॅडम, झोपा आता. किती वाजले पाहिलेत का? रात्रीचे ३ वाजत आले. तुझी झोप झाली आहे पण उद्या मला कामावर जायचे आहे. उद्यापरवा विकेंड आहे तेव्हा जवळच कुठेतरी फिरायला जाऊ. चल, गुडनाईट.
त्यादिवशी रात्रभर मानसी समुद्राचीच स्वप्ने पाहत असते. स्वप्नात तिला समुद्राच्या लाटा इकडून तिकडे धावताना दिसतात. खूप दूरदूरवर लाटांकडे बघताना काळोख होतो आणि ती घाबरून उठते. मानसीला जितका समुद्र आवडत असतो तितकीच त्याची भीतीही वाटते असते.
क्रमश : -----
Thursday, January 15, 2015
Wednesday, January 07, 2015
पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(3)
सकाळी
उठून पटापट आवरून व बॅगा घेऊन ८ च्या सुमारास हॉटेल लॉबीमध्ये आलो.
कॉफी व ब्रेड खाल्ला. नाही म्हणायला या हॉटेलमध्ये सकाळचा कॉफी ब्रेड तरी
छान होता. आता आमची उरलेली ट्रीप सुरू होणार होती. त्या आधी आम्हाला
सॅनफ्रॅन्सिसकोला जायचे होते. आजचा दिवस तसा आरामाचा होता. आजच्या प्रवासात
वळणावळणाचे घाट होते आणि आजुबाजूचे डोंगर खूपच सुंदर दिसत होते. डोंगरावर
पोपटी रंगाचे गवत होते. शिवाय हिरव्या रंगाच्या विविध छटाही दिसत होत्या.
डोंगराचे आकारही वेगवेगळे दिसत होते. डोंगरावरच निळे निळे आकाश
डोंगरावरच्या पोपटी रंगाच्या गवतावर खुलून दिसत होते. चालत्या बसमधून निसर्गाचे सुंदर रूप कॅमेरात साठवत होते. कितीतरी फोटोज
मिळाले. रस्त्यावरच्या आजुबाजूला बरीच शेते होती. बदामाची व सफरचंदाची
झाडेही दिसत होती. आज प्रवासात क्वचित थोडा पाऊस पडत होता.
मधल्या वाटेत २ ते ३ वेळा बस थांबली. चहापाण्याकरता व पोटपूजेसाठीही ! टाको बेलमध्ये एक बरीटो व कोक घेतला. संध्याकाळच्या सुमारास मोंटेरी बेवर जाणार असे गाईडने आम्हाला सांगितले. या प्रवासात आमच्या बसमधला ड्राइव्हर व गाईड दोघेही नवीन होते. आधीच्या प्रवासात मार्टी नावाचा गाईड होता तर या प्रवासात मिंग नावाचा ! मिंग खूपच साधा होता. प्रवासामध्ये इतर आजुबाजूची माहिती सांगायचा, कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत याची डिटेलवार माहिती सांगत होता. माँटेरी बे पहायला खाली उतरलो. तिथे एका कॅफेत गेलो. तिथूनच समुद्र दिसत होता. झिमझिम पाऊस पडत होता व गार वारेही सुटले होते. तिथल्या फूटपाथवर थोडे चालून घेतले. पावसात भिजायला झाले पण खूप अगदी ओलेचिंब नाही. काही चिनी लोकांनी प्रवासात बरोबर छत्रीही आणली होती. पाऊस पडला तर? त्यामुळे लगेच पावसात त्यांनी आणलेली छत्री उपयोगी पडली. समुद्राचे फोटो घेतले. फूटपाथवरील फुलांचेही फोटो घेतले व परत बसमध्ये येऊन बसलो. कॅफेमध्ये हॉट चाकलेट प्यायल्याने थोडी तरतरी आली. थोड्यावेळाने अंधार पडायला सुरवात झाली व सॅनफ्रॅन्सिसको बे पुलावरून जात होतो. आजुबाजूला दिसणाऱ्या शहरातले मिणमिणते पिवळे दिवे झगमग करू लागले. ६ वाजताच जेवण घ्यायला गाईडने एके ठिकाणी बस उभी केली. २४ तारखेला संध्याकाळी कुठेच काही बंद नव्हते. बरीच उपहारगृहे चालू होती. तिथे जेवायलाच हवे होते. खरे तर इतकी भूक नव्हती. दुपारच्या बरिटोने पोट जड झाले होते. पण काहीतरी पोटात टाकलेले बरे ! म्हणजे आधीचा अनुभव होताच गाठीशी. सबवे मध्ये सँड्विच घेतले. दोघांनी मिळून एक खाल्ले व एक बांधून घेतले. न जाणो रात्री भूक लागली तर? असलेले बरे. आता आमची बस सिलिकॉन व्हलीतून जायला लागली. मायक्रोसॉफ्ट व गुगलचे ऑफीस बघितले. बसमधून लांबूनच ऑफीसच्या पाट्या दिसत होत्या. गुगलची पाटी बघून खूप छान वाटले. शेराटॉन हॉटेलमध्ये आमच्या सगळ्यांची वरात येऊन पोहोचली. थंडी वाढली होती. सकाळी ७ वाजता सर्वांनी तयार राहा असे मिंगने आम्हाला सांगितले. वर हॉटेलच्या रूमवर गेलो मात्र ! आहाहा ! खूपच छान हॉटेल होते. आमच्या हॉटेलच्या खिडकीतून हायवे वरची गर्दी दिसत होती व हायवेला लागूनच रेल्वे लाईन दिसत होती. त्यामुळे कार व त्याच्या बाजूला आगगाडी जाताना खूपच छान दिसत होते. हायवे वर कार चालवताना कारचा वेग किती असतो हे चांगलेच जाणवले. आपणही कारमधून प्रवास करताना इतक्याच भरभक्कम वेगाने जात असओ हे पाहून मस्त वाटले. इथे हायवेवर हाय स्पीड ठेवायलाच लागतो. तसा ठेवला नाही तर अपघात होऊ शकतो. हॉटेल इतके चकाचक होते की असे वाटले इथेच उद्या संपूर्ण दिवस झोपून काढावा. इथे खरी विश्रांती मिळेल. उद्याचे जरूरीपुरते कपडे काढून ठेवले आणि चक्क खाली चक्कर मारायला उतरलो. हे हॉटेल एका शॉपिंग मॉलच्या आवारात होते. रात्र असल्याने शॉपिंगच्या आवारात शुकशुकाट होता. खूप मोठ्या आवारामध्ये चांगल्या ५ ते ६ फेऱ्या मारल्या. रोजच्या रोज बसप्रवासामध्ये बसून बसून चांगलेच वैतागायला झाले होते. चालणे कमी आणि बसणे जास्त हे तर आयोग्याला अजिबातच चांगले नाही की वो ! चालत असतानाच ५ लोकांची चिनी फॅमिली दिसली. हीच फॅमिली आमच्याबरोबर साऊथ रिमच्या बसमध्ये होती. साऊथ रिमला नाही म्हणता म्हणता बरीच लोकं आली होती. ही फॅमिली दिसल्यावर मी विनुला म्हणालेच की ही नक्कीच शॉपिंगसाठी बाहेर आली आहेत. आम्हाला पाहून त्यांनी विचारले कि मॉल चालू आहे का? आम्ही सांगितले की तुम्ही जाऊन पाहा आतमध्ये. आम्हाला तरी वाटतयं की आता बंद झाले असतील. कारण की आजची २४ ची रात्र आणि उद्या २५ म्हणजे सर्वांनाच सुट्टी असते त्यामुळे कोणी नसेल कदाचित. ही ५ जणांची फॅमिली कोणतेही दुकान उघडे दिसले रे दिसले की लगेच शॉपिंग्साठी घुसायची. त्यांना किती घेऊ न किती नाही असे झाले असावे बहुतेक. ही फॅमिली सिंगापूरची होती. आणि बिझिनेझमन होते त्यामुळे खरेदी ला काय तोटा? चालून परत हॉटेलवर आलो आणि आडवे झालो. प्रवासामध्ये हॉटलमध्ये उतरणे म्हणजे फक्त पाठ गादीला टेकणे इतकेच असते. झोप येत नाहीच कारण की उद्यासाठी लवकर उठून तयार व्हायचे असते. प्रत्येक हॉटेलवर वेक अप कॉल होते पण आमची झोप काही इतकी हुकमी नाही बाबा ! मला तर उद्या लवकर उठून कुठे जायचे असेल तर घरीपण अजिबात झोप लागत नाही. मग इथे कुठली लागायला? सततचा धसका ! जाग येईल ना! क्रमशः ---- |
Tuesday, January 06, 2015
Saturday, January 03, 2015
पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(2)
लास वेगासला निघालो तेव्हाच मधल्या वाटेत गाईडने आम्हाला सांगितले होते की उद्या ग्रँड कॅनियनकडे जायचे आहे. यामध्ये साऊथ रिम व वेस्ट रिम असे दोन भाग आहेत. ही सगळी बस उद्या वेस्ट रिमला जाणार आहे आणि आम्हाला तर साऊथ रिम बघायची होती. टूरचे बुकींग करतानाच ते विचारतात की साऊथ की वेस्ट? ट्रीपच्या आधीच बरेच गुगलिंग करून ठेवले होते. ग्रँड कनियनच्या वेबसाईटवर असे लिहिले आहे की ९०% प्रवासी साऊथ रिमला जातात. इथूनच दरीचा भाग जास्त छान दिसतो. त्याप्रमाणे गुगल इमेजमध्ये फोटोही पाहून ठेवले होते.
गाईड वेस्ट रिम कशी चांगली आहे ते सांगत होता. वेस्ट रिमचे फोटोही आम्ही गुगल इमेजमध्ये पाहिले होते. ते तितकेसे प्रभावी वाटले नाहीत. वेस्ट रिमला हेलिकॉप्टर राईड, स्काय वॉक, कोलोरॅडो नदीत बोटींग असे सर्व मिळून दोघांचे ६०० डॉलर्स जाणार होते. त्या गाईडला विचारले तर तो म्हणाला "ठीक आहे. तुमच्यासारखी अजून एक फॅमिली आहे साऊथ रिमला जाण्यासाठी. मी त्यांना सांगून ठेवतो. तुम्ही एकत्र भेटा" तरी तो आम्हाला पटवायला बघत होता की साउथ रीम ही जाऊन येऊन १२ तासांची आहे आणि एवढे करून तुम्हाला तिथे जास्तीत जास्त २ तासच मिळतील. पण तुम्ही वेस्ट रिमला आलात तर तिथे जाऊन येऊन ४ तासच आहेत म्हणजे उशीरा निघून चालेल आणि तिथेही ४ ते ५ तास घालवता येतील पण आम्ही त्याच्या म्हणण्याला बळी पडलो नाही. खरे तर टूर मध्ये त्यांनी तसे लिहायला हवे होते की साऊथ रिम व वेस्ट रिम ला जाण्यायेण्याचा वेळ , तिथे किती वेळ घालवणार आहोत असे सर्व काही. पण तसे लिहिले नव्हते.
लास वेगासच्या नाईट टूरवरून आल्यावर जेवण तर छानच झाले होते ! गरम गरम नान, नवरतन कुर्मा. पहाटे ५ ला निघायचे म्हणजे ४ लाच उठायला हवे होते. नीट झोप अशी लागलीच नाही. फक्त पाठ गादीवर टेकल्याने आराम मिळत होता इतकेच. पहाटे उठून सर्व आवरून हॉटेलवरची कॉफी व विकत घेतलेला थोडा केक खाऊन हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन थांबलो. ५ जणांची चिनी फॅमिली तिथे आम्हाला भेटली. नवरा बायको व त्यांची तीन मुले छान होती. मुख्य म्हणजे गपिष्ट होती. ते पण आमच्यासारखाच एक भला मोठा केक ५ जणात मिळून खात होते. कारण की ५ ला निघायचे तर न्याहरी कुठे करणार ? मग असेच काहीतरी तोंडात टाकून निघणार होतो. तितकाच पोटाला आधार. बरोबर पहाटे ५ वाजता आमचा ग्रँड कॅनियनकडे प्रवास सुरू झाला. बस मध्ये झोपलो. व्हुवर डॅम इथे आहे असे गाईडने आम्हाला सांगितले व दूरवर तो आहे पण येताना आपण तिथे जाऊ असे सांगितले. आता थोडे थोडे उजाडायला लागले होते. हवेत सुखद गारवा होता आणि लवकर उठलेलो असलो तरी थोडी तरतरी होती. सूर्योदय पाहिला मिळाला. प्रवासात आजुबाजूला कुठेही झाड नाही. सर्व प्रदेश वाळवंटी होता. अधून मधून डोंगर लागत होते पण तेही सर्व बोडकेच ! डोंगरावर एकावर एक दगड रचल्याप्रमाणे दिसत होते. ते प्रत्यक्षात रचले नसून निसर्गातूनच निर्माण झाले होते. हे एक वेगळेच दिसत होते. लांबच लांब रस्ता एकदाचा संपला. मधेवाटेत २० मिनिटे चहापाण्यासाठी बस थांबली. तिथे थोडे बटाटा चिप्स व कॉफी घेतली. साऊथ रिमला पोहोचायला जवळ जवळ ११ वाजले. तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदा आयमॅक्स थिएटर मध्ये ग्रँड कॅनियन माहिती संदर्भातला एक तासाभराचा मुव्ही पाहिला. नंतर व्हेज पिझ्झा व कोक असे जेवण केले व परत बसमध्ये बसलो. १० मिनिटांनी साउथ रिमपाशी बस थांबली. खाली उतरलो व गाईडने आम्हाला ट्रेलचा नकाशा दिला. तसेतर त्या नकाशावरून जाऊन येऊन ट्रेल ३ तासाचा होता पण आम्हाला एक तासच देण्यात आला होता. गाईडने सांगितले, वेळेवर या !
चालायला सुरवात केली. प्रचंड बोचरा वारा होता. साऊथ रिमवरच्या दऱ्याखोऱ्या खूपच खोलवर पसरलेल्या होत्या. दऱ्यांमधले खडक वेगवेगळ्या रंगांचे दिसत होते. गुलाबी, फिकट निळा, फिकट पिवळा, मधूनच एखादा मातकट किंवा पांढऱ्या रंगाचा ओबडधोबड खडक दिसत होता. दऱ्या ४ ते ५००० मैल तीक्ष्ण लांबीच्या आहेत. भीतीच वाटत होती बघताना. जाऊन येऊन तासभर चाललो. चांगलाच दम लागला होता. आमचे नशीब की तिथे त्यावेळेला बर्फ नव्हता. बर्फ आदल्या दिवशी पडून गेलेला दिसत होता. प्रत्येक पॉईंटला जाऊन खालची अवाढव्य विस्तारलेली दरी बघत होतो. फोटो काढताना कॅमेरा पडेल की काय, अशी भीती वाटत होती इतका प्रचंड गार बोचणारा वारा होता. तशी थंडी पण होतीच. वाऱ्याचा घों घों असा आवाज येत होता. ४० ते ५० फोटोज काढले. भराभर चालत येऊन बसमध्ये बसलो. आमची बस आता परत लासवेगासच्या मार्गावर परतायला लागली. व्हुवर डॅम काही पाहणे झाले नाही कारण की तिथे पोहोचे पर्यंत अंधार पडायला सुरवात झाली होती. खूपच दमायला झाले होते. १० ते १२ तासाचा प्रवास व तासाभराचे प्रचंड वाऱ्यामध्ये चालणे झाले होते. साऊथ रिम आवडली होती पण तरीही जितके कौतुक करतात तितके काही दिसले नाही. तशी थोडी निराशाच झाली. असे वाटले की वेस्ट रिमला गेलो असतो तर तिथे हेलिकॉप्टर राईड, कोरोरॅडो नदीत बोटींग व स्कॅय वॉक करता आले असते पण तरीही ६०० डॉलर्स म्हणजे जरा अतीच झाले, नाही का? पण एकूण ग्रँड कॅनियनने साफ निराशा केली. शिवाय टूरवाल्यांनीही प्लॅनिंग चांगले केले नाही. तिथे किमान एक दिवस राहिले असतो तर ट्रेल तरी पूर्ण करता आली असती आणि बाकीच्या सर्व अँगलने दऱ्याखोऱ्या पाहता आल्या असत्या. शिवाय तिथे राहिल्यावर थोडी विश्रांतीही झाली असती.
खूप दमायला झाले होते. भूक लागली होती आणि चहा प्यावासा वाटत होता. लास वेगासच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिथल्या भारतीय उपहारगृहात एक डोसा आणि चहा घेतला. हॉटेलवरच थोडी विश्रांती घेऊन डाऊन टाऊनला एक चक्कर मारण्याचा विचार होता कारण की थंडी अजिबात नव्हती. हवा छान होती आणि परत एकदा लास वेगासचा चकचकाट पाहून होईल. शिवाय थोडे चालणेही होईल या उद्देश्याने जाणार होतो. हे सर्व ठरवून थोडे आडवे होण्यासाठी म्हणून गादीवर पाठ टेकली मात्र ! ढाराढूर झोप लागून गेली. रात्रीचे जेवण नाही की चालणे नाही . शिवाय लासवेगासचा शेवटचा चकचकाटही बघणे नाही. पहाटे ४ ला जाग आली तीच मुळी प्रंचड भूक लागूनच. पटापट सर्व आवरून परत खाली भारतीय उपहारगृहात गेलो आणि डोसा आणि उत्तपा घेतला. वर एकेक गरम चाय ! लॉबीमधली सर्व उपहारगृहे पहाटे ५ ते १० न्याहरी साठी उघडी ठेवतात. आम्ही पहाटे ६ ला डोसा उत्तप्पा खात होतो ! एरव्ही करू का आपण असे काही. यालाच तर ट्रीपची मजा म्हणतात ना ! सोबतची चटणी व सांबारही खूप छान लागत होते. आत्मा तृप्त होत होता ! गाईडला फोन करून विचारले केंव्हा निघायचे आहे? तर म्हणाला बरोबर ८ वाजता तयार रहा. बॅगांची आवराअअवर केली. व्यायामही केला कारण की बसून बसून अंग पार आखडून गेले होते. ८ वाजता बॅगांसकट आम्ही लॉबीमध्ये हजर झालो. आमची बस आता परत लॉस ऍजलिसला जायला निघाली होती . तो दिवस तसा आरामाचा होता. मधेवाटेत दोन दोन तास २ वेळेला मॉल भटकंती होती. आम्ही कोणतीही खरेदी केली नाही. मॉलमध्ये भरपून चालून घेतले. चिनी लोकांनि मात्र बॅगा भरभरून खरेदी केली. पुर्ण बस खरेदीच्या बॅगंनी भरली होती. मधल्या वाटेत जेवणासाठी व्हेज पिझ्झा आणि डाएट कोक घेतला. आज चालण्याने जरा बरे वाटत होते. लॉस अँजलिसच्या चायना टाऊन भागात एका होटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती.
तिथले आजुबाजूचे वातावरण थोडे भकास होते. आणि रात्र झाल्यामुळे ते जास्तच वाटत होते. सर्व पाट्या चिनी भाषेत. हॉटेलही अजिबात चांगले नव्हते. हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेतली. पण बाहेर पडायलाच हवे होते जेवणासाठी! बाहेर पडून एका चौकातून चालायला सुरवात केली. काही उपहारगृहे दिसली पण सर्वांच्या पाट्या चिनी भाषेत.
एके ठिकाणी बाहेरच्या काचे च्या तावदानात पदार्थांची चित्रे व त्याखाली इंग्रजीमधून त्या डिशचे
नाव लिहिले होते. आत शिरलो तर एक चिनी बाई आली आणि चिनी भाषेतच बोलायला
लागली. नंतर एक बाई आली तर तिने तोडके मोडके इंग्रजीमधून आम्हाला विचारले
तर आम्ही तिला म्हणालो की बाहेरची व्हेज डिश मिळेल का? तर तिने तत्परतेने
उत्तर दिले की नाही, ही डिश आम्ही फक लंचलाच ठेवतो. थोडे चालल्यावर एक
हॉगकाँग मार्केट दिसले पण तिथेही निराशाच झाली. इथे काही फळे तरी मिळतील
अशी आशा होती. शेवटी तिथे वेलची केळी दिसली. ती घेतली व पिण्यासाठी पाणी
घेतले व हॉटेलमध्ये परत आलो. वेलची केळी, थोडासा घरून करून आणलेला चिवडा, एक
लाडू, कचोरि, चॉकलेट असे खाऊनच रात्रीच्या जेवणाची वेळ निभावून नेली. नशीब
इतकेच की दुपारी पिझ्झा झाल्याने थोडा तरी निभाव लागला. अपुऱ्या जेवणामुळे नीट अशी झोप लागलीच नाही.
क्रमशः ------
क्रमशः ------
Friday, January 02, 2015
Subscribe to:
Posts (Atom)