Showing posts with label व्यक्तिमत्त्व. Show all posts
Showing posts with label व्यक्तिमत्त्व. Show all posts

Saturday, March 07, 2020

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने......८ मार्च २०२०

आई कुठे काय करते? तस म्हणायला गेले तर घरी राहून आई बरेच काय काय करते. फक्त ती ते सर्व घरी राहून करते त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. नोकरी करणारी आई घरातली कामे पटापट आवरून बाहेर नोकरीवर जाते आणि आल्यावर पण घरातली कामे करताना दिसते. तर नोकरी करणारी आई हा वेगळा विषय झाला. घरातली आई फक्त झोपा काढत नाही तर बरीच कामेही करते. माझी आई आणि सासुबाई मला नेहमी म्हणतात की "ह्यांनी" मला नोकरी करू दिली नाही. मी आईला म्हणते की हो बरोबर आहे तुझे म्हणणे. पण तू घरात होतीस त्यामुळे आमच्या सहवासात जास्त राहिलीस. नोकरी केली असतीस तर तुझा आम्हाला सहवास कितीसा मिळाला असता?



पूर्वीच्या बायका घर, संसार आणि मुले यातच असायच्या. घरी असणाऱ्या प्रत्येक आईने बरेच काही केले आहे. त्यामुळे तिचा आदर करा.अजूनही काही आया घरच सांभाळताना दिसतात. पण त्या बरेच काही करत असतात. आता मी माझ्या आईबद्दल लिहिते. आईचा दिवस पहाटे ५ वाजताच सुरू व्हायचा. आम्ही घरात ५ जणे होतो. आईबाबा, मी , रंजना, आणि आमचे आजोबा. आमच्या सकाळच्या शाळा असायच्या त्यावेळे पासून नंतर आम्ही कॉलेज आणि नोकरीवर जाण्यापर्यंत आईने कुटुंबासाठी खूप काही केले. आमच्या दोघींची लग्ने छान करून दिली. लग्नानंतर वर्षभराचे सण आनंदाने केले. शिवाय रंजनाचे बाळंतपण केले. सकाळचा आलं घालून केलेला चहा ती आम्हां सर्वांचाच करायची. नंतर एकेकाचे स्टोव्ह वर पाणी तापवत ठेवायची. सर्वात आधी २ स्टोव्ह होते. एक वाजणारा आणि दुसरा वातीचा. नंतर गॅस आणि शेगड्या जरी आल्या तरी पाणी तापवणे स्टोव्हवरतीच असायचे. थंडीच्या दिवसात आम्हाला दात घासून चुळ भरण्यासाठी पण तापवलेले पाणी द्यायची. थंडीच्या दिवसात कधी सुंठ घालून तर कधी आलं घालून चहा करायची. पावसाळ्यात गवती चहा ठरलेला असायचा. पावसाळ्यात काढा करायला ती कधी चुकली नाही. गरम गरम काढा घेतल्यावर आमचे सर्दी पडसे दूर दूर पळायचे.



कोणाचे डोके ठणकत असेल तर कपाळावर सुंठीचा लेप लावायची. खोकला झाला तर हळद-गूळ-सुंठ-साजूक तूप एकत्र करून गोळ्या तयार असायच्या. आम्ही सर्व सकाळी मऊ भात खाऊन जायचो. मऊ भातावर घरचे लोणकढे तूप आणि त्यावर घरी बनवलेले मेतकूट असायचे. शिवाय प्रत्येकाला दूध प्यायला लावायची. मऊ भात खाल्य्याने आम्हाला जेवणापर्यंत कधी कळकळायचे नाही. पोट शांत असायचे. पित्त व्हायचे नाही. शाळा कॉलेजातून घरी आलो की रोजच्या रोज पोहे उपमे करायची. आम्हालाही सणसणून भूक लागलेली असायची. रात्री जेवणात मुगाच्या डाळीची खिचडी किंवा गरम गरम आमटी भात.



दुपारची शाळा कॉलेज असेल तर जेवणात तव्यावरून पानात रोज गरम पोळी असायची. आमचे सर्वांचे करून ती सकाळी बरोबर ८ वाजता अंघोळ पूजा केरवारे करून शिकवण्या घेण्यासाठी बसायची. ८ ते १० शिकवण्या घ्यायची. पहिली ते सातवी सर्व विषय शिकवायची. शिकवण्या होत आल्या की आम्हाला साडेदहाला जेवायला वाढायची. शिकवणीला बसायच्या आधी ती स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवायची. भाजी चिरून ठेवायची, कणीक भिजवून व कूकरही लावायची. आमच्या जेवणानंतर १ ते दीड पर्यंत बाबा घरी जेवायला यायचे. मग ती दोघे एकत्र जेवायला बसायचे. मग थोडी विश्रांती घेऊन परत उठायची ते ३ ते ५ शिकवणी घ्यायची. नंतर आमच्या मधवेळेचे खाणे, आणि मग रात्रीचा स्वयंपाक. बाबांचे ऑफीस २ शिफ्ट मध्ये होते. ते सकाळी ७ ला निघायचे आणि १ वाजता दुपारी घरी जेवायला यायचे. नंतर परत ३ ला जायचे ते ६ ला यायचे. ६ ला आल्यावर मधवेळचे खाणे खाऊन ते शिकवणी घ्यायला बसायचे. ६ ते ९ शिकवण्या झाल्या की आम्ही सगळेच एकत्र रात्रीचे जेवायला बसायचो.





ही झाली दैनंदिनीची कामे. एप्रिल मे महिन्यात शिकवण्या बंद असायच्या. या दोन महिन्यात ती आमच्या दोघींचे ड्रेस घरी शिवायची. लहानपणी फ्रॉक, कॉलेजमध्ये गेल्यावर सलवार, चुणीदार, त्यावरचे टॉप. सर्व प्रकारच्या फॅशनचे फ्रॉक आणि चुडीदार तिने शिवलेले आहेत. उडत्या बाह्या, फुग्याच्या बाह्या, कोपऱ्यापर्यंतच्या बाह्या, चौकोनी, पंचकोनी, व्ही गळे असायचे. आजोबांच्या बंड्याही ती घरीच शिवायची. माझे आजोबा जेव्हा नोकरी करायचे तेव्हा आणि आम्ही दोघी नोकरीवर लागलो तेव्हाही आईचा डबा खूप छान असायचा. पोळी भाजी, चटणी, एका पोळीला तूप साखर लावलेली असायची. आणि मुख्य म्हणजे एका बाटलीत ती ताक भरून द्यायची. मे महिन्याच्या सुट्टीत आम्हाला कूकर लावायला सांगायची. दुपारचा चहा करायला सांगायची. आई पोळ्या करायची आणि आमच्या दोघींसाठी २-२ लाटायलाही द्यायची. अशा प्रकारे तिने आम्हाला कामाच्या सवयी लावल्या. नोकरी करत असताना वर खर्चालाही पैसे द्यायची. शाळा कॉलेज मध्ये असतानाही तिने वरखर्चासाठी पैसे दिले आहेत.



आजीच्या (आईची आई) चोळ्याही शिवायची. आईचे ब्लाऊज तिचे तीच शिवायची. आम्ही टेलरकडे कधीच गेलो नाही. म्हणजे शिलायची कितीतरी पैसे आईने वाचवले आहेत. फ्रॉक शिवल्यावर उरलेल्या कापडातून तिने अगणित बाळंतविडे शिवलेले आहेत. बाळंतविड्याचे पैसेही तिने वाचवले आहेत. पैसे वाचवले काय नि कमावले काय सारखेच ना ? पैसे वाचवून व शिकवण्याचे पैसे मिळवून तिथे संसाराला खूप हातभार लावलेला आहे.
आईने कधीही लोणी व तूप विकत आणले नाही. दूधदुभतं तर तिने इतके काही जपले आहे की दूधापासून होणारे सर्व प्रकार करायची. अदमुरं दही, सायीचे दही, ताक, लोणी, तूप हे सर्व तिने निगुतीने केले आहे. घरी कोणताही कार्यक्रम असो तिने जास्तीचे लागणारे दही, लोणी तूप कधीच विकत आणले नाही. दूध जास्तीचे घ्यायची म्हणजे मग त्यात सर्व काही व्हायचे. आमच्या लग्नकार्यात पण तिने कधी तूप विकत आणले नाही. आमच्या घरी तिनी त्रिकाळ शिकवण्या असायच्या. आईचे पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आणि बाबांचे ८वी ते १०वी पर्यंततचे सर्व विद्यार्थी मिळून सर्वांचे वार्षिक परीक्षेनंतर छोटे स्नेहसंमेलन करायची. या संमेलनात असणारे सर्व पदार्थ आई घरी करायची. यामध्ये बटाटेवडे तिखटामिठीच्या पुऱ्या, गोडाचा शिरा, इडली सांबार असे पदार्थ असायचे. सर्व विद्यार्थी नटून थटून आमच्या घरी यायचे. प्रत्येक जण काही ना काही करून दाखवायचे. कुणी गाणे म्हणायचे तर कुणी नाच करायचे, तर कुणी नकला करून दाखवायचे.


आई खूप धार्मिक आहे. श्रावणात ती संध्याकाळी वडे घारगे करायची. ब्राह्मण जेवायला घालाची. जिवतीची पूजा करून आम्हाला दोघींना पुरणाचा दिवा करून ओवाळायची. कोजागिरी पौर्णिमेलाही ती आम्हां दोघी बहिणींना ओवाळायची. दोघींना पांढरे कानातले गळ्यातले किंवा फ्रॉक, सलवार कुडता घ्यायची. आजोबा जेव्हा गेले तेव्हा तिने १३ दिवसात गरूड अख्यान ठेवले होते. ३० तीने सवाष्णी घातल्या होत्या. गणेश याग केला होता. दिवाळी झाल्यावर ती नातेवाईकांचे ग्रुप करून दही मिसळ करायची. सोबत उरलेले फराळाचे असायचे. प्रत्येक सणाच्या दिवशी कामवाली बाईला जेवायला बोलवायची आणि शिवाय ताट भरून तिच्या घरी द्यायची. कलई वाली ठरलेली होती. शिवाय फणी, सुई ती एका म्हातारी बाई कडून विकत घेत असे. बोहारीण पण ठरलेली होती. तिच्याकडून तर तिने चहाच्या कपबशांचे सेट घेतले आहेत. ते कधीच तिने विकत नाही घेतले. चिनीमातीच्या खोलगट डीशा, बरण्या, तिने बोहारणीकडूनच विकत घेतल्या आहेत. कल्हई करणाऱ्या बाईच्या मुलांना आण कामवाली बाईच्या मुलांना शिकवले आहे. त्यांच्याकडून तिने कधीच पैसे घेतले नाहीत. काहीजणांकडून शिकवणीचे पैसे त्यांना परवडत नाही म्हणून हप्त्याहप्त्याने घेतले आहेत. माझ्या आईला माणसे जोडण्याचा छंद आहे. ती कोणालाही
दुखवत नाही. अन्याय पण सहन करत नाही. स्वयंपाक करताना आधी काय करायचे आणि नंतर काय करायचे की वेळ वाचतो ते शिकवले. आहे. गजानन महाराजांच्या पोथीची अगणित पारायणे केली आहेत. दसऱ्याला आमच्या घरी संध्याकाळी विद्यार्थी आपट्याची पाने द्यायला अजूनही येतात. शिवाय संक्रांतीलाही ती भरपूर तीळगूळ करते. कारण संध्याकाळी तिचे व बाबांचे विद्द्यार्थी तीळगूळ घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी येतात.




दरवर्षी आई आमच्या अंगणात भोंडला करायची. दोन गोल व्हायचे ऐलमा पैलमा म्हणायला. एक गोल आतला छोट्या मुलींचा, दुसरा गोल बाहेरचा. आम्ही बहिणी आणि आमच्या मैत्रिणींचा. चैत्रातल्या हळदीकुंकवाला १०० एक बायका असायच्या. सर्व नातेवाईक, आमच्या मैत्रिणी, आईच्या मैत्रिणी मिळून सर्वजणी यायच्या. त्यांना अनुक्रमे आधी हळदी कुंकू, नंतर काकडीच्या जाड चकत्या, नंतर बत्तासे असायचे. नंतर स्टीलच्या वाटीतून आंबेडाळ आणि नंतर गारेगार कैरीचे पन्हे. ते झाले की आई प्रत्येकीची हरबऱ्याने ओटी भरायची. नंतर मोगऱ्याचा गजरा द्यायची. चैत्रातल्या हळदीकुंकवाप्रमाणेच संक्रांतीचे हळदी कुंकू पण खुप दणक्यात व्हायचे. कैरीचे लोणचे ५ किलो कैरीचे घालायची. तसेच कैरीचे पन्हे पण बरणीतून घालून ठेवायची. येताजाता पन्हे प्यायचो आम्ही. पन्ह्यात पण साखरेचे वेगळे, गुळाचे वेगळे करायची. हिवाळ्यात तर खुपच प्रकार करायची. १०० लिंबे आणायची. त्यात लिंबाचे सरबत बाटल्यातून भरून ठेवायची. लिंबाचे गोड लोणचे, तिखट लोणचे, लिंबे पिळून खाऱ्यातल्या मिरच्या, करायची. शिवाय आवळ्याचे लोणचे, मुरंबे, गुळांबेही करायची. कोकमचे सरबत करायचीच. शिवाय छुंदा करायची. इतके प्रकार करायची ना की आम्ही बाहेरचे कोणतेही काहीही विकत आणले नाही कधीही. उन्हाळ्यात सर्व प्रकारची वाळवणं करायची ते सुद्धा मोठाले डबे भरभरून. त्यात बटाट्याचे पापड, पोह्याचे पापड, कुरडया, साबुदाण्याच्या चकल्या, चिकवड्या, १० किलोचा बटाट्याचा कीस, मिरगुंड, उडुदाचे पापड, एक ना अनेक पदार्थ करायची. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींना सर्व प्रकारच्या चवा माहिती झाल्या.



आईने ४० बायकांना शिवण शिकवले आहे. आईने आमच्या दोघींचेच फक्त केले असे नाही तर तिच्या सर्व भाचवंडांचे केले. अगदी त्यांचे लग्न ठरल्यापासून केळवणे, त्यांच्या मुलांना घरचे बाळंतविडे केले. आजोबांची सर्व भाचवंडे. बाबांची सर्व भाचवंडे यांचेही केले. आईचा हात अगदी सढळ आहे. आईने आम्हां दोघी बहिणींना चांगले वळण लावले. शिवाय चांगले संस्कारही केले. त्यामुळेच आम्ही दोघी बहिणी आमच्या संसारात यशस्वी झालो आहोत. आईचे सासरे म्हणजे जणू तिचे वडीलच होते. आईने सासऱ्यांचे मनापासून केले. दीराचे केले. बाबांचीही ती आईच बनली. बाबांनीही तिला मनापासून साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीत अडवणूक केली नाही. संसारत आलेल्या अडचणींवर आईने मात केली. आईचा चेहरा सतत हासतमुख असतो. नीटनेटकी अजूनही राहते. (वय वर्ष ८४) घरही नीटनेटके ठेवते. बाबा वय वर्ष ८८ यांचा उत्साहही वाढवते. अशा माझ्या आईला सलाम !



प्रतिकूल परिस्थिती मध्ये झगडून वर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा सलाम ! अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या , नोकरी करून घरही तितकेच छान रितीने सांभाळणाऱ्या सर्व स्त्रियांना सलाम ! आणि हो, ज्या पुरूषांनी स्त्रीचा मान राखला, तिचा आदर केला, मग ती बायको असो , आई / बहीण असो किंवा ऑफीसमध्ये काम करणारी स्त्री कर्मचारी असो अशा पुरूष वर्गालाही सलाम. स्त्रीही स्त्रीचीच कधीही शत्रू होता कामा नये. @ Rohini Gore ,,सर्व महिलांना महिला दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! स्त्रीशक्ती वाढवत रहा. Wishing All International Women's Day !!





Tuesday, May 21, 2013

माझे बाबा




"विसर प्रीत, विसर गीत, विसर भेट आपुली, यापुढे न चांदरात यापुढे न सावली" संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गाणे,, बाबा आम्हाला सांगतात, "मी हे गाणे ऐकले, गायक संगीतकार कोण हे सर्व जाणून घेतले" आणि बाबांनी रेडिओ घरी आणला आमच्या लहानपणीच. बाबांचा आवाज "सेम टु सेम" सुधीर फडके यांच्यासारखा आहे. बाबा पेटी खूप छान वाजवतात. त्यावर त्यांचे ३३ राग शिकून झाले आहेत. बाबा नेहमी म्हणतात की गाणे असावे तर ते सुधीर फडक्यांसारखे, जसे काही ते गाणे हवेतून तरंगत तरंगत येऊन आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. गाण्याप्रमाणेच बाबा उत्तम गोष्टी सांगतात. आम्ही दोघी बहिणी लहानपणी बाबांकडून गोष्टी ऐकायचो. रात्रीची जेवणे झाली की ते आम्हाला गोष्टी सांगायचे. बाबांना गोष्ट सांगायचा कंटाळा आला तरी सुद्धा बाबांना आम्ही म्हणायचो, बाबा एक तरी गोष्ट सांगा ना? मग आमच्या आग्रहाखातर ते एक गोष्ट सांगायचे आणि आम्ही झोपायचो. सर्व गोष्टींमध्ये आम्हा दोघी बहिणींना एक गोष्ट खूप आवडायची आणि ती म्हणजे रंजा रोह्याच्या बाहुल्या मंडईत जातात! पूर्वी सांगली मिरजेला त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या भाच्यांची लग्ने झाली त्यामध्ये त्यांच्या एका भाचीच्या लग्नात ती सासरी जाताना बाबांनी "लाडकी शकुंतला" हे गाणे गायले होते. त्या वेळेला आम्ही दोघी बहिणी शाळेत जात होतो. बाबांचे हे गाणे ऐकताना तर मला खूप रडू फुटते.  दुसरे एक गाणे म्हणजे गीतरामायणातले "बोलले इतुके मज श्रीराम" हे गाणे बाबा इतके काही छान गातात की ऐकताना अश्रुंच्या धारा वाहतात.







गाणी गाणे आणि गोष्टी सांगणे याप्रमाणेच बाबांमध्ये अजून एक छान कला आहे ती म्हणजे बाबा उत्तम रांगोळ्या काढतात. आईबाबांच्या भाचवंडांची लग्नाची केळवणे आमच्या घरी झाली होती तेव्हा बाबांनी त्यांच्या ताटापुढे खूप सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. ताटाभोवती सुंदर महिरप बाबा खूप छान काढतात. त्यांच्या एका भाच्याच्या लग्नात त्यांनी नवरा नवरीची जी खास पंगत असते त्यांच्या प्रत्येक ताटाभोवती सुरेख महिरप काढली होती. पूर्वी कार्यालयात लग्नाच्या पंगती खाली बसत असत. पाटावर बसून पंगती जेवत असत. दिवाळीत आमच्या घरी सकाळी सडा घालून बाबा व आम्ही दोघी खूप रांगोळ्या काढायचो. बाब निसर्गाची चित्रे काढायचे व आम्ही दोघी बहिणी ठिपक्यांच्या रांगोळ्या दारासमोर अंगणात काढत असू.







बाबा मला पहिलीत असताना शाळेत सायकलवरून सोडायचे. आमच्या घरी बाग असल्याने मी शाळेत जाताना माझ्या बाईंना द्यायला एक गुलाबाचे फूल घेऊन जायचे. ते मी माझ्या डाव्या हातात अलगद धरायचे. बाल शिक्षण मंदीर या शाळेमध्ये बाबा मला सायकलवरून सोडायचे. बाबांना मी सांगायचे. बाबा माझी शाळा सुटेपर्यंत नक्की शाळेमध्ये थांबाल ना? बाबा म्हणायचे "हो हो मी नक्की थांबणार. तू काळजी करू नकोस" माझी शाळा सुटेपर्यंत बाबा शाळेतच थांबले आहेत या भरवशावर मी शाळेत जायचे. एकदा काय झाले मधल्या सुट्टीत पाणी प्यायला मी खाली आले आणि बाबा आहेत का हे बघावे म्हणून शाळेच्या ऑफीसमध्ये पाहिले तर तिथे बाबा नव्हते. मी नंतर बाबांना तसे सांगितले की बाबा तुम्ही शाळेमध्ये नव्हता. तुम्ही मला खोटे सांगता तुम्ही शाळेच्या ऑफीसमध्ये बसलेले असता म्हणून. मग बाबा म्हणाले केव्हा पाहिलेस तू मला? त्यावर मी सांगितले की पाणी प्यायला आले होते तेव्हा मला तुम्ही कुठे दिसला नाहीत. तेव्हा म्हणाले हा तेव्हा होय? अग मला थोडे ऑफीसमध्ये काम होते म्हणून तेवढयापुरते मी गेलो होते. एकदा शाळेची सवय झाली तेव्हा नंतर मग मला कळाले की बाबा मला शाळेमध्ये सोडून तसेच ऑफीसमध्ये जात होते.






आमच्या घरापासून कमलानेहरू पार्क जवळ होती. आम्ही त्या बागेत खिंड ओलांडून चालत चालत चौघे जायचो. मी आईबाबा, रंजना व मी. तिथे आई बसायची हिरवळीवर व बाबा आमच्या दोघींबरोबर शिवाशिवी, लपंडाव खेळायचे. नंतर बाबांचा एक भेळवालाही ठरलेला होता. खेळून झाल्यावर मग घसरगुंडी, झोपाळा यावरही खूप खेळायचो आणि नंतर भरपूर भेळ खायचो. अजून मोठ्या झाल्यावर मग पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस असे सर्व खायचो. हा कार्यक्रम आमच्या दोघींच्या लग्नानंतरही खूप चालला. मी डोंबिवलीवरून आले की मग आम्ही चौघे कमलानेहरू पार्क मध्ये जायचो, पण त्यावेळी चित्र वेगळे असायचे. आमच्या दोघींचे लग्न झाले होते. बाबा पार्कला एक मोठी चक्कर मारून यायचे. तोवर आम्ही तिघी, म्हणजे मी आई व माझी बहिण हिरवळीवर बसून खूप गप्पा मारायचो. नंतर ठरलेली खादाडी. नंतर आमच्यामध्ये एक मेंबर वाढला तो म्हणजे माझी भाची सई. चित्र परत पालटले. बाबा सईबरोबर बागेत खूप खेळायचे, आम्ही तिघी गप्पा मारायचो. नंतर खादाडी ठरलेली. जाता येताना मात्र सई आजी आजोबांबरोबर रिक्शाने जायची. आम्ही दोघी चालत जायचो. त्यावेळच्या आमच्या दोघींच्या छान गप्पा व्हायच्या. रिक्शात बसताना आई आम्हाला बजावायची. रेंगाळत बसू नका हं. लवकर या घरी. आम्ही दोघी पण हो गं आई! असे म्हणायचो. आम्ही निवांतपणे गप्पा छाटत घरी यायचो.






रेडिओप्रमाणेच आमच्या घरी टेपरेकॉरर्डर आणि टेलिव्हिजन अचानक आले. बाबा खूप हौशी आहेत. टेपरेकॉरर्डर तर आम्ही अगदी खेळण्यासारखा वापरला. त्यावर गाण्याच्या भेंड्या, जाहिराती आम्हीच म्हणलेल्या, शिवाय गोष्टी, भांडणे, सर्व टेप केली. उन्हाळ्यात आमच्याकडे आईची भाचवंडे आली की बाबा आम्हाला सर्वांना अंगणात सतरंज्या अंथरून गोष्टी सांगायचे. भूताच्या गोष्टी सांगायचे. मग आम्ही जाम टरकायचो. कोणाला तहान लागली की त्याला अंगणातून स्वयंपाकघरात जाताना जाम भीती वाटायची. आमी दोघी बहिणी जेव्हा सज्ञान झालो तेव्हा आम्हाला आमच्या नावाने बाबांनी बँकेत खाते उघडून दिले होते. बाबांना फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पूर्वी बॉक्स कॅमेरा होता. त्यांनी २/४ पेट्या भरतील इतके फोटो काढले होते. त्यातले पुरात खूप वाहून गेले. बाबांनी १९५१ ते १९६१ पर्यंत लोकांना इंग्रजी व गणित फुकट शिकवले. पूरानंतर आईबाबांनी दोघानीही शिकवण्या सुरू केल्या.







माझे बाबा स्वभावानी खूप तापट आहेत पण तितकेच ते प्रेमळही आहेत. त्यांचा वाढदिवस मे महिन्यातला. त्यामुळे आमरस पुरीचा बेत ठरलेला असतो. २६ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यावर्षी ते ८२ वर्षाचे पूर्ण होतील. त्यांना रोहिणीविनायक कडून वाढदिवसाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा !



Thursday, July 28, 2011

माझे आजोबा





माझ्या आजोबांचे नाव "बाळकृष्ण" त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय, बाळकृष्ण दत्तात्रय घाटे. घाटे नावालाच, मूळ आडनाव काळे. माझ्या खापर पणजोबांनि एका घाटाचा जीर्णोद्धार केला त्यावरून आमचे आडनाव घाटे पडले.







माझे आजोबा उंच, धिप्पाड, घारेगोरे होते. माझ्या आजोबांना भरपूर भाचवंडे त्यामुळे ते सर्वांचे लाडके "मामा" होते. सर्वजण मामा म्हणत त्यामुळे माझे बाबा, काका, आई व आम्ही दोघी बहिणी त्यांना "मामा" म्हणत. माझी आई त्यांची थोरली सून. सून नावालाच मुलगी जास्त. सासऱ्यांनी सुनेवर मुलीप्रमाणे प्रेम केले. जेव्हा माझ्या बाबांसाठी आईचा मुलगी म्हणून दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा म्हणाले "निळू हीच तुझी बायको. मला हिच्यात आपली बेबी दिसली. बेबी मामांची मुलगी. अल्पायुषी ठरली. मामांनीच सुनेचे नामकरण केले. "निर्मला" घाट्यांच्या घरात आली. रेवतीची निर्मला झाली. आईला जेव्हा माझ्या वेळेस दिवस गेले तेव्हा मामांना खूप आनंद झाला होता. दवाखान्यात मला ते रोज बघायला येत. मला दुपट्यात गुंडाळलेली बघून त्यांना खूप आनंद झाला होता. मामा माझ्या आईला म्हणाले "निर्मला हिचे नाव "रोहिणी" ठेवायचे. दवाखान्यात मला बघायला येत असत तेव्हा बाहेरून ते कॉफी मागवत त्यांना पिण्यासाठी, तेव्हा ते खूप छोट्या चमच्याने मला कॉफी पाजायचे. मला दुपट्यात असतानाच कॉफीची चव कळाली होती. जशी मी रांगायला लागले, चालायला लागले तेव्हा तर मी एक कपभर कॉफी पिऊ लागले. तेव्हापासून आईने मामांसाठी दोन कप कॉफी करायला सुरवात केली. मी पहिली मुलगी म्हणून माझे मामांनी खूप लाड केले. मामा मला गोष्टी सांगत. त्यांच्या पोटावर बसून मी गोष्टी ऐकत असे. त्यांच्या पोटावर एक उशी व त्यावर मी बसून गोष्टी ऐकत असे. काही दिवसांनी माझी बहिण आली. तिचे नाव आईने रंजना ठेवले. तिचेही मामांनी भरपूर लाड केले. आम्हाला दोघींनाही ते गोष्टी सांगू लागले.




काही काही गोष्टी अशा असत की आम्ही दोघीही म्हणायचो थांबा मामा "लगेच त्या गोष्टीमधल्या हत्तीची नक्कल करायचो. जसे हत्ती चिखलात पडतो मग त्याला वर कसे काढायचे? थांबा मामा " आमच्या दोघीॅन्ही ऍक्शन सुरू व्हायची. हत्तीला दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या दोऱ्या आम्ही ओढतोय अशी ऍक्शन" मग हत्ती डुलत डुलत त्याच्या घरी जातो. लगचे आमची ऍक्शन सुरू. आमचे उजवे हात म्हणजे हत्तीची सोंड! उजवा हात हलवून हत्ती डुलण्याची ऍक्शन! माझी आई जेव्हा मंडईत भाजी आणायला जायची तेव्हा मामा आम्हाला दोघींना दाण्याचे कूट व त्यात साखर घालून खायला द्यायचे. शाळेत जायला लागलो तेव्हा आम्ही दोघी व मामा पत्ते खेळायचो. पत्यांमध्ये हात कमी झाले की त्यांना खूप राग यायचा. सगळी चांगली पाने तुमच्याकडे कशी जातात असे म्हणून ते आमच्यावर रागवायचे. मामा आमच्याशी कॅरमही खेळायचे. आम्ही शाळेमध्ये असतानाच मामा खूप थकले होते. त्यांना जेवणासाठी स्वयंपाकघरात हात धरून न्यावे लागायचे. पाटावर बसल्यावर ताटात कुठे काय वाढले आहे हेही दाखवायला लागायचे. आम्ही तिघे सकाळी १० वाजता जेवायला बसायचो. आई आम्हाला तिघांना गरम पोळ्या वाढायची. शाळेत निघाल्यावर आम्हाला बजावून सांगायचे. सावकाश जा. वेळेवर बस पकडा. रस्ता क्रॉस नीट करा. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही बसने घरी यायचो. बसला खूप गर्दी असायची त्यामुळे शाळेतून घरी यायला आम्हाला उशीर होत असे. संध्याकाळ झाली की त्यांचे घड्याळ बघ्णे चालू व्हायचे. आईला विचारायचे का गं अजून आल्या नाहीत मुली घरी? दारात जाऊन वाट बघायचे. आई म्हणायची अहो मामा येतील इतक्यात. काळजी करू नका. बसला गर्दी असते खूप म्हणून उशीर होतो त्यांना. आम्ही जेव्हा घरी येत तेव्हा मामांच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा. बाबाही ऑफीसमधून घरी यायचे. मग आम्ही सर्व खायला बसायचो. सर्वांनाच खूप भूक लागलेली असायची. मग कधी पोहे, कधी तिखटामिठाचा शिरा तर कधी भाजणीचे थालिपीठे असे आई करायची. नंतर गरम गरम चहा प्यायचो. रात्री जेवायला गरम आमटी भात असायचा.







आई जेव्हा मंडईत जायची तेव्हा आधी आम्हाला मामा दाण्याचे कूट व त्यात साखर घालून द्यायचे. नंतर नंतर आम्ही आधी कुट खायचो व नंतर तेल तिखट मीठ पोहे खायला लागलो. एकदा मामांनी आम्हाला विचारले काय गं खाता दोघीजणी. आम्ही म्हणायचो की आम्ही तेल तिखट मीठ पोहे खात आहोत तुम्हाला पाहिजे आहेत का? त्यांना थोडे पोहे खायला दिले तर त्यांना ते खूपच आवडले! तिखट पदार्थ त्यांना खूप आवडत असत. नंतर मग जेव्हा आई बाहेर जात असे तेव्हा तेच आम्हाला तेल तिखट मीठ पोह्यांची आठवण करून द्यायला लागले. आई बाहेर गेली आणि थोडा वेळ गेला की लगेच म्हणायचे ते ते काय.. तुम्ही करता ते केले का? आम्हाला माहीत असायचे त्यांना काय हवे आहे ते. मग आम्ही उगीचच म्हणायचो, कि उप्पीठ का? भजी का? मग म्हणायचे नाही गं ते तुम्ही काय करता ते कांदा घालून. त्यांना पटकन आठवायचे नाही. मग आम्ही म्हणायचो पोहे का? हां हां तेच तेच. करा लवकर खायला. जरा जास्त तिखट घाला. एकदम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. आम्ही तिघेही मोट्या वाडग्यातून पोहे खायचो. कच्चे पोहे, तिखटमीठ, कच्चा कांदा व कच्चे दाणे असे एकत्र करून पोहे करायचो.





एकदा आमच्या दोघींची खूप भांडणे झाली कामावरून. जेवण झाल्यावर उष्टी खरकटी भांडी कोणी गोळा करायची त्यावरून. आईबाबा दोघेही चिडले. कामांच्या वाटण्या कशाला करता तुम्ही? आणि त्यावरून भांडता कसल्या? बाबा तर खूप चिडले आणि म्हणाले की कामाच्या वाटण्या आणि त्यावरून जर भांडणे करणार असाल तर या घरात राहायचे नाही. बाहेर निघून जा, म्हणून आम्हाला घराबाहेरील अंगणात उन्हात उभे केले. आम्ही दोघी खूप रडत होतो, तेव्हा मामा सारखे पायरीवर उभे राहायच, परत आत जायचे. असे सारखे त्यांचे चालू होते. शेवटी ते म्हणाले "निळू घरी घे आता त्यांना. बाहेर खूप उन आहे" तेव्हा बाबा म्हणाले की तुम्ही म्हणता म्हणून नाही तर दोघींनीही कबूल केले पाहिजे आम्ही यापुढे कधीही भांडणार नाही. तेव्हा मग आम्ही दोघीनी. बाबांची माफी मागितली आणि सांगितले की आम्ही कधीही कामाच्या वाटण्या करणार नाही व भांडणार नाही. तेव्हा मग बाबांनी आम्हाला घरात घेतले. माझ्या बाबांना ते निळू म्हणून हाक मारत. निळकंठ नाव म्हणून निळू.





हळूहळू मामा बरेच थकत चालले होते. जेवण कमी झाले होते. दृष्टी कमी झाली होती. एकदा असेच झाले आई जेव्हा मला ओरडली तेव्हा माझी बाजू घेऊन मामा तिला म्हणाले अगं ओरडू नको तिला. नाही असे करणार ती पुन्हा. रंजनाची म्हणजे माझ्या बहिणीची बाजू त्यांनी कधी घेतली नाही जेव्हा आई रंजनाला ओरडायची तेव्हा. एकदा रंजना जाम चिडली. मामांना म्हणाली की तुमचे ताईवरच जास्त प्रेम आहे, माझ्यावर नाही. आई माझ्यावर ओरडली की तुम्ही कधीही माझी बाजू घेत नाही. तेव्हा तिला म्हणाले अंग असे नाही रंजे, तुम्ही दोघीही मला सारख्याच आहात. तेव्हापासून त्यांना काहीही लागले तरी रंजे म्हणून हाक मारत असत ते अगदी शेवटपर्यंत! रंजनाचे म्हणणे त्यांना अगदी मनोमन पटले होते.







एकदा आईला म्हणाले की मला तुझ्याशी बोलायचे आहे, तर आई म्हणाली बोला ना मामा. काय पाहिजे तुम्हाला. तर म्हणाले "अगं निर्मला मला असे वाटते आहे की मी लवकर मरेन, जास्त दिवस नाही जगणार मी आता. त्यांचा हातातली अंगठी आईला दिली आणि आईला म्हणाले की ही अंगठी दोघींना अर्धी अर्धी करून दे" तशी आई म्हणाली की मामा, असे काय म्हणता तुम्ही. तुम्हाला काहीही झाले नाहीये. तुम्ही अजून बरेच दिवस जगणार आहात. इतक्यात मरून कसे चालेल? नात जावई बघायचा आहे ना तुम्हाला अजून! मग! मामा हसले आणि म्हणाले हो हो. तर! अगं मी काही इतक्यात मरत नाही. आपल्याला अजून नातजावई बघायचा आहे या जाणिवेने त्यांना एकदम आनंद झाला आणि हुरूपही आला.






त्यांना तिखट पदार्थ खूप आवडायचे. भजी व चिवडा हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते. पाऊस पडायला लागला की आईला भजी तळायला सांगायचे. मामांना भरपूर भाचवंडे होती. भाचवंडांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. आजी लवकर गेली. त्यामुळे ते भाचवंडांमध्ये खूप रमायचे. सर्वांना ते डोंगरावर फिरायला नेत असत. डोंगरावर फिरून आल्यावर सगळ्यांना भेळ व आईस्क्रीम खाय्ला घालायचे. त्यात माझे बाबा व काकाही असत. मामांच्यासारखीच आईलाही भरपूर भाचवंडे त्यामुळे त्यांच्या सर्वांचीच ते आवर्जून चौकशी करायचे. कुणाचे लग्न ठरले की त्याला म्हणत की "मी तुझ्या लग्नाला येणार आहे बरं का? " खूप हौशी आणि प्रेमळ होते मामा! आईबाबांच्या संसारात येणाऱ्या प्रत्येक संकटात मामा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.







आम्ही कॉलेजमध्ये जायच्या आधीच मामा खूपच थकले होते आणि काही दिवसांनी तर त्यांनी पूर्णपणे अंथरूण धरले होते. जेवण कमी झाले. माझ्या आईने त्यांची मनापासून न कंटाळता सेवा केली. डॉक्टर रोज घरी त्यांना बघायल यायचे. हळुहळू त्यांनी अन्न सोडले. त्यांना फक्त दूध, पाणी, फळांचे रस एवढेच जात होते. नंतर तेही कमी कमी होत गेले. एखादा पाण्याचा घोट, १-२ चमचे कॉफी, तर काही वेळेला अगदी थोडा फळांचा रस, इतकाच आहार झाला. एके दिवशी ते खूप घोरत होते. आईला त्यांचे घोरणे विचित्र वाटले. लगेच तिने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी सांगितले की हे घोरणे नाही, तर शेवटची घर्घर आहे. आता ते कधी जातील काही सांगता येत नाही. आम्हाला मामा जाणार या कल्पनेनेच कसेसे होत होते. मामा आपल्यात नाहीत ही कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटची घर्घर लागण्या आधी ते काही वेळेस अर्धवट डोळे उघडत तर काही वेळेस अगदी थोडे ज्युस घेत. एके दिवशी त्यांनी खुणेनेच सर्वांना जवळ बोलावले व सर्वांकडे डोळे भरून पाहिले. काहीतरी हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.






त्या दिवशी रात्री बाबांनी अगदी हळू आवाजात टेपवर गीतरामायण लावले होते. गाद्या घातल्या होत्या झोपण्यासाठी पण कोणालाही झोप लागत नव्हती. डॉक्टर एकदा येऊन बघून गेले. मामांची घर्घर चालूच होती. एक मंद दिवा चालू होता. आम्ही दोघी या कुशीवरून त्या कुशीवर होत होतो. एकीकडे रडत होतो. आईबाबा डोळ्यात तेल घालून जागे होते. जरा कुठे डोळा लागेल असे वाटले तर दचकायला होत होते. आई बाबांना म्हणाली तुम्ही झोपा जरा वेळ मी आहे जागी. रात्रीचे बारा वाजून गेले होते. अई अधून मधून उठून पाणी पीत होती. आई अंथरूणावर फक्त पाठ टेकण्याकरता आडवी झाली होती. आम्ही दोघी डोक्यावर पांघरूण घेऊन आत रडत होतो. काळ व वेळ जवळ येत चालली होती. पहाटे चारच्या सुमारास अगदी काही क्षण आईला डुलकी लागली आणि त्याच वेळेस घर्घर बंद झाली. काही क्षण असेच स्तब्धतेत गेले. आम्हाला सर्वांना झोपवून मामा हळूच दार उघडून निघून गेले होते.......






आईला जाग आली. घर्घर बंद झाली होती हे आईला कळलेच. आईने दिवा लावला. मामांचे हातपाय बघितले. हातपाय थंड पडत चालले होते. आईने बाबांना उठवले "बरं का हो, मामा गेलेत बहुतेक" बाबांनीही उठून बघितले. बाबा डॉक्टरांना बोलवायला गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले की मामा गेले आहेत. आम्हाला दोघीनाही जाग आली आणि कळून चुकले की मामा नाहीत. तो क्षण खूप मोठी पोकळी निर्माण करणारा होता. आम्ही दोघी खूप जोरजोरात रडायला लागलो. आईबाबाही खूप रडत होते. कोणालाही अश्रू आवरता येत नव्हते. हळूहळू करत सर्व नातेवाईक आले आणि दुपारच्या २ च्या सुमारास मामांचा पार्थिव देह बानांनी व काकाने उचलला. मामा शांतपणे पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले होते. खूप समाधानाने जणू काही आम्हा सर्वांना ते सांगत होते..... "आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा.... "



निधन : २० जुलै १९८०..... वय वर्षे ८३