Sunday, August 28, 2022

28 August FB Memory

 

मनोगत या संकेतस्थळाची माहिती आम्हाला एका गाण्यांच्या समूहामध्ये कळाली तेव्हा आम्ही टेक्साज राज्यातून साऊथ कॅरोलायना राज्यात आलो तेव्हा. २००३ साली आम्ही डेस्क्टॉप घेतला आणि मनोगतावर गेलो. नंतर २००५ साली आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यात आलो. त्यावेळी मनोगतावर कविता, चर्चा, गद्यलेखन वाचायला मिळायचे. माझा वेळ जाण्यासाठी मनोगत हे एक चांगले साधन होते. तिथे एका चर्चेत पाककृती विभाग सुरू करावा असे वाचले आणि नंतर काही दिवसांनी तिथे पाककृती विभाग सूरूही झाला. आधी मी मनोगतावर फक्त वाचन करायचे आणि प्रतिसाद द्यायचे. २००५ च्या सुरवातीपासून मी तिथे पाककृती लिहायला सुरवात केली आणि नंतर माझ्या ब्लॉगवरही.
नंतर पाककृती बरोबर त्याचे फोटोही काढत गेले. एकदा इंडीयन स्टोअर मध्ये मला रांगोळी दिसली. मला खूपच आनंद झाला होता त्यावेळी. इथे अपार्टमेंटमध्ये फरश्या नसतात. सगळीकडे कार्पेट असते, तर रांगोळी काढणार कुठे? तर मी ती लाकडी खुर्चीवर काढली. नंतर असे सुचले की सणांचे सजवलेले ताट असते त्याभोवती रांगोळी काढू आणि तसे केलेही. पण ते फक्त एकदाच झाले. कारण की उभे राहून रांगोळी नीट काढता येत नव्हती पण त्याची आठवण मात्र कायम राहिली. रेसिपींचे फोटो काढण्यासाठी मात्र एक जागा निश्चित झाली ती म्हणजे आरामदायी खुर्ची. या खुर्चीची आठवणही मनात कायम कोरली गेली. या खुर्चीवर मी मॅट ठेवायचे आणि त्यावर तयार केलेली रेसिपी डीश मध्ये ठेवून मी फोटो काढायचे. या खूर्चीवर बाहेरचा सूर्यप्रकाश इतका छान यायचा की एका क्लिक मध्ये फोटो छान येत असत. त्यामुळे ही जागा रेसिपी फोटोंसाठी निश्चीत केली गेली.आत्तापर्यंतचे रेसिपींचे सर्व फोटो मी या खुर्चीवरच काढले आहेत. आता ही खुर्चीही गेली आणि रेसिपी लेखनही संपले. आठवणी मात्र कायम राहिल्या आहेत. 
२००५ सालापासून मी रेसिपी लिहित गेले. माझी शेवटची रेसिपी २०१५ सालातली. Rohini Gore🙂