Monday, September 25, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (4)

 भारतात तुमच्या घराच्या दरवाज्या जवळ फुलपुडी येते, वर्तमानपत्र आणि दुधाची पिशवी येते. हे सर्व आत घेउन आपण दाट दूध आणि आलं घालून चहा करतो आणि गरम चहाचा एकेक घोट घेत वर्तमानपत्र वाचतो. थोड्यावेळाने कामवाली बाई येते. ती सर्वच्या सर्व कामे उरकून दुसऱ्या घरातल्या कामासाठी बाहेर पडते. ती केर काढते, ओल्या फडक्याने फरशी पुसते. बादलीत भिजवलेले कपडे हाताने धुवून वाळत घालते. भांडी घासते, धुण्याचे यंत्र चालू करते, नंतर त्यातले कपडेही वाळत घालते. दळणाचे डबे गिरणीत नेते. कपड्याच्या घड्या घालणे, भाजी चिरून देणे, कणीक भिजवून देणे, केराचा डबा घराच्या बाहेर ठेवणे इत्यादी सर्व कामे करते. काही घरात पोळ्या करण्यासाठी बाई येते किंवा सर्व स्वयंपाक करणारी सुद्धा ! घरातल्या बाईला मग ती गृहिणी असो नाहीतर नोकरी करणारी असो इतरही बरीच कामे असतात. किराणामालाची यादी फोनवरून सांगणे, दाणे भाजून कूट करणे, नारळ खवणे, भाजी आणणे, दूध तापवून थंड झाल्यावर दह्यासाठी दुधाला विरजण लावणे, ४ दिवसाची जाड साय एकत्र करून परत त्याचे वेगळे विरजण लावणे, नंतर त्याचे ताक करून लोणी काढणे, तूप कढवणे, इत्यादी इत्यादी सर्व कामे असतात. भाजी आणून ती निवडून फ्रीज मध्ये ठेवणे, कोथिंबीर व इतर पालेभाज्या निवडणे. पूजाअर्चा, सणांची तयारीही असतेच.


भारतात असताना ही सर्व कामे मीही करायचे. इथे अमेरिकेत आल्यावर या कामाव्यतिरिक्त कामवाली बाईची पण कामे इथे करावी लागतात. वाण सामान, भाजी आणावी लागते. फर्निचरही पुसावे लागते. ओला व सुका कचरा अपार्टमेंटच्या आवरातल्या भल्या मोठ्या कचाकुंडीत टाकून द्यावा लागतो. भारतावरुन येताना मी पुजेचे साहित्यही आणले होते म्हणजे सहाण आणि खोड, स्टीलचा देव्हाराही आणला होता. सुरवातीला वाती कश्या करायच्या हा प्रश्णच होता. डॉलर जनरल या अमेरिकेन दुकानात मला कापूस व काडेपेटीही मिळून गेली. मला आठवतय ही काडेपेटी खूपच छोटी होती. त्यातल्या काड्याही खूप छोट्या आणि त्या पटकन पेटायच्याही नाहीत. भारतावरून येताना मी अंजली चॉपर आणला होता. त्याचा बॉक्सही होता त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. छोटुसा कूकरही घेतला म्हणजे त्यात वरण भाताबरोबर रस भाजी पण होईल. सवयीमुळे पहिल्यांदा मी कॅनमधले दूध पातेल्यात ओतून गरम केले होते. त्यावर खूपच पातळ साय धरली होती. ती चमच्याने काढली तर जेमतेम चमचा भरेल इतकीच साय आली. दुधाच्या एका कॅन मध्ये साधारण ३ ते ४ लिटर दूध असते. इथे दुधातले सर्व फॅट काढून घेतात. त्यामुळे १%, २%, 0% फॅट असलेले दूध खूपच पातळ असते. त्यातल्या त्यात whole milk (D vitamin) बऱ्यापैकी दाट म्हणायला हरकत नाही. मुंबईत असताना महानंदा, वारणा गोकूळ असे दाटसर दूध वापरायची सवय होती. इथल्या दुधाचा चहा प्यायला अजिबातच मजा यायची नाही. सुरवातीला सुटा चहा पण आम्हाला कधी मिळाला नाही कारण भारतीय दुकान जवळ नव्हते. इथला डीप डीप चहा पातेल्यात पाणी घालून उकळवायचे. लिप्टन आणि टेटली चहाच्या Tea bags आणायचो. पहिले ४ वर्ष मी घरीच विरजण लावायचे. दूधाला विरजण लावायला दही मी खाली रहात असलेल्या प्रविणाकडून आणले होते. इथे मिळणाऱ्या मीठविरहीत लोण्याचे मी घरी तूप बनवत होते. आम्ही जिथे जिथे राहिलो तिथे भारतीय वाणसामान दुकाने खूपच लांब होती. त्यामुळे टिपिकल भारतीय भाज्या आम्ही बरेच वर्षे खात नव्हतो. त्यामुळे एका भाजीच्या वेगवेगळ्या चवीच्या भाज्या मी बनवायचे. मला पाककृती लिहायलाही वाव मिळत होता. उदाहरण सिमला मिरचीचे मी अनेक प्रकार केले. सिमलामसाला, पीठ पेरून सिमला, कच्चा बटाटा घालून परतलेली सिमला याप्रमाणे. महिन्यातून एकदा भारतीय दुकानात जायचो तेव्हा तोंडली, कारली, दुधी भोपळा, गवार अशा भाज्या आणायचो. जिथे बरीच वर्षे राहिलो तिथे तर इंडियन स्टोअर मध्ये जायला आम्हाला कारने अडीच तास लागायचे. तिथून बाकीचे सामान आणायचो पण भाज्या जास्त आणल्या जायच्या नाहीत. मुंबईत रहात असताना बाजारात जायला मला खूपच आवडायचे. भाजी घेताना ठराविक बायकांकडून मी हमखास भाजी घ्यायचे. त्या बायकांशी बोलणे व्हायचे. जाताना ४-५ एकात एक अशा पिशव्या घेऊन जायचे. जाताना एके ठिकाणी ५०० रूपयाची नोट मोडून मी इतर भाज्या व फळे घ्यायचे. जाता-येता रिक्शेने जायचे. भाजी घ्यायच्या आधी वडापाव, भेळ, पाणीपुरी, उसाचा रस, मिल्क शेक असे काहीतरी खायचे.


इथल्या अमेरिकेन किंवा इतर काही म्हणजे थायी स्टोअर मध्ये मला काही भारतीय भाज्या मिळून जायच्या. हॅरिस्टीटर दुकानात मला भोपळ्यांचे काप व शेपू मिळायचा. एका थायी दुकानात मला छोटी कारली मिळाली होती. नारळही आणले होते पण चांगले निघाले नाहीत म्हणून मग ते आणणे सोडून दिले. नारळ घरात फोडता यायचा नाही. इथे अपार्टमेंट कॉप्लेक्स मध्ये भाड्याने रहायचे म्हणजे बरीच बंधने पाळावी लागतात. वरच्या मजल्यावर घर असेल तर नारळ आपटून तो घरात कसा फोडणार? कारण खालच्या घरात आवाज जातात आणि ते इथल्या लोकांना सहन होत नाही. म्हणून मग मी प्लॅस्टीकच्या पिशवीत नारळ घालून तो बाहेर येऊन फुटपाथवर फोडला होता. त्यातले पाणी काढायला बरोबर पेला नेला होता. गुळाच्या ढेपेचीही तीच गत होती. काही वर्षानंतर मी खवलेला नारळ व गुळाची पावडर भारतीय दुकानातून आणायला लागले. दाणे भाजून मी कूट करायचे. भाजलेल्या दाण्याची साले काढून एका ताटलीतच ते पाखडून त्याचे कुट करायचे. नंतर मला वाल मार्ट मध्ये भाजलेले खारे दाणे दिसले. मग तेच आणून मी त्याचे कूट करू लागले. खारे किंवा साधे असे दोन प्रकारचे दाणे इथे मिळतात. आम्हाला सकाळी नाश्त्याची सवय नाहीये. आम्ही दोघेही दूध पितो. मुंबईत असताना दुधातून इंस्टंट कॉफी नाहीतर बोर्नव्हिटा/सुकामेव्याची पूड घालून प्यायचो. नंतर कॉर्नफ्लेक्स दुधात घालून ते खायचो. इथे cerealचे बरेच प्रकार मिळतात. इथे आल्यावर आम्ही दुधातून प्रोटीन पावडर घेऊ लागलो. सुरवातीला "स्लिम फास्ट" नावाची पावडर मिळायची. आता मिळत नाही. नंतर आम्ही plant based protein पावडरी आणायला लागलो. अमेरिकेत काही (wholesale) घाऊक माल असलेली दुकाने आहेत. आम्ही सॅम्स क्लब नावाच्या दुकानाचे सदस्य झालो. ही सदस्य फी वर्षाला ५० डॉलर्स असते. तिथून आम्ही नेहमी लागणारा माल आणतो. टुथपेस्ट, धुणे व भांडी धुवायचे /घासायचे लिक्विड, तांदूळ, पेपर टावेल, टिश्यु पेपर, साबण, स्वयंपाक घरातली फरशी पुसण्यासाठी ओली फडकी, फर्निचर पुसण्यासाठीचीही ओली फडकी, कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या, दाणे, सुकामेवा, प्रोटीन पावडर,साखर, तेल, मीठ पाणी पिण्याच्या बाटल्या. याशिवाय काही वेळेला काकड्या, टोमॅटो, सिमला मिरची, फ्लॉवर, निवडलेला पालक (यात मी ३ वेळा पालक भाजी करायचे) पीठ पेरून, दही पालक, डाळ पालक केळी, सफरचंदे, संत्री, कांदे, ब्ल्युबेरी, अननसाच्या फोडी, कलिंगड (इथले कलिंगड भारतात मिळणाऱ्या कलिंगडापेक्षा ४ पटीने मोठे असते) वगैरे. पुण्यात आई व तिच्या काही मैत्रिणी गुलटेकडीवरून घा ऊक माल आणायच्या आणि आणलेले सामान वाटून घ्यायच्या. तांदुळ, गहू, डाळी, चहा, साखर, सुकामेवा, दाणे असे बरेच काही ! एका टेंपोतून हे सामान यायचे. असे केल्याने सहा महिने सामान भरायला लागत नाही आणि पैसेही वाचतात.


इथल्या अमेरिकन दुकानात सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात, जसे की सिमला मिरची, कोबी, वांगे, श्रावणघेवडा ,फ्लॉवर, कोबी, कांदे, बटाटे, आलं, लसूण, मिरची कोथिंबीर. भारतीय भाज्या मात्र मिळत नाहीत जसे की तोंडली, गवार, कारली, छोटी वांगी. त्याकरता भारतीय दुकानात (Indian store) जावे लागते. तसेच वाणसामान इथल्या अमेरिकन दुकानात मिळते जसे की साखर, मीठ, तेल, मैदा, पण भारतीय पिठे,इतरही बरीच पिठे, डाळी, पापड, साबण, भारतीय मसाले फक्त भारतीय दुकानातच मिळतात.गव्हाच्या पीठात सर्वात जास्त चांगले पीठ आशिर्वाद ब्रॅंडचे आहे. हे पीठ मला भारतात मिळणाऱ्या (गिरणीतून दळून आणलेले पीठ) पिठाच्या खूप जवळचे वाटते आणि त्याच्या पोळ्याही छान होतात. त्यामुळे इथल्या भारतीयांना दोन्ही दुकानातून फिरावे लागते. औषधे पण अमेरिकन दुकानात मिळतात पण भारतीय औषधे भारतीय दुकानातच मिळतात जसे की अमृतांजन, व्हिक्स, क्रोसीन. स्लॅम्स क्लब सारखी इतरही दुकाने आहेत. कॉस्टको दुकानात बरेच भारतीय जातात. इथली अमेरिकन दुकाने खूप मोठीच्या मोठी असतात. दुकानात वाणसामान, भाजी, फळे, ब्रेड, केक, कूकीज, ज्युसेस, दूध, पिण्याचे पाणी आणि इतरही म्हणजे औषधे, फुलांचे गुच्छ, वाढदिवस शुभेच्छापत्र आणि इतरही बरेच काही असते. दुकानातच काही खाण्यापिण्याची उपाहारगृहे असतात जसे की डोमिनोज पिझ्झा, स्टारबक्स कॉफी, सबवे सॅंडविच इद्यादी. काही जण दुकानातच सर्व खरेदी करून तिथेच खाऊनही घेतात.

आम्ही वाणसामान, भाजी आणण्यासाठी २/३ दुकानात जातो. वाल मार्ट, सॅम्स क्लब, भारतीय दुकान. इथल्या कॅशिअरचे काम सोपे असते. प्रत्येकावर इथे बारकोड असतात. ते स्कॅन करून तुमचे बिल तत्परतेने तयार होते. बारकोड स्कॅन झाला की कॅशिअरच्या समोरच असलेल्या स्क्रीन वर सर्व स्कॅन केलेले दिसते. गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी मशीनच करते. आपणही आपले सामान स्कॅन करून घेऊ शकतो. सुट्या भाज्या आणि फळांसाठी बार कोड नसतात म्हणून स्क्रीनवर बोटानेच स्पर्श करून शोधता येते. ए ते झेड पर्यंत भाज्या व फळे यांची अनुक्रमणिका तिथे असते. त्यांचे फोटोही प्रकारानुसार असतात. त्यावर बोटानेच स्पर्श करून ते ते उमटते. स्कॅन बार जिथे स्कॅन होतो तिथे तो सुटा माल ठेवला की त्याचे वजनही होते आणि हिशेब करून किती पैसे झाले तेही उमटते. बिल प्रिंट होऊन येते. समजा काही अडलेच तर तिथे जास्तीचे कामगार उभे असतात त्यांना विचारता येते. ते मदत करतात. इथे औंस आणि पौंडात मोजले जाते जसे की भारतात किलो आणि किलोग्रॅमवर मोजले जाते. इथल्या दुकानात वजन-काटे पण असतात. भाजी पण आपली आपण निवडून घ्यायची असते. इथे सामान आणायला घरून पिशव्या घेऊन जावे लागत नाही. सर्व दुकानात कॅरी बॅग मिळतात. सध्या न्युजर्सी मध्ये कॅरी बॅगेवर बॅन आहे म्हणून आम्ही घरून पिशव्या घेऊन जातो. काही दुकानात त्यांच्या दुकानाचे नाव असलेल्या पिशव्या विकत ठेवल्या आहेत. त्यातूनच काही पिशव्या आम्ही खरेदी केल्या. इथे नोटा व नाणी घेऊन जावे लागत नाही. सर्व व्यवहार डेबिट/क्रेडिट कार्डावर चालतात. अगदी मोजकेच लोक रोख पैसे देताना पाहिले आहेत. इथे प्रत्येक गोष्टींचे बरेच प्रकार एकाच दुकानात दिसतात. कांद्यात पांढरे, लाल, पिवळ्या सालाचे कांदे, बटाट्यात पण व्हाईट, गोल्डन, रसेट तर मिरच्यांचेही अनेक प्रकार. कांदे बटाटे तर इतके गलेलठ्ठ असता की एका बटाट्यात ४ जणांची भाजी होईल आणि एका कांद्यात ४ जणांची भजी ! तसेच फळांमध्येही बरेच प्रकार दिसतात. इथली दुकानेच इतकी मोठी असतात की चालून चालून पाय दुखायला लागतात. आणि हो दुकानातच वॉश रूमचीही सोय असते. मुख्य म्हणजे स्वच्छ असतात हे खूप महत्वाचे आहे.


प्रत्येक अपार्टमेंट मध्ये जरी डीश वॉशर असले तरी भांडी ही हातानेच घासावी लागतात. भारतीय स्वयंपाक हा फोडणी शिवाय होत नाही. त्यामुळे प्रत्येक भांडे- ताट -वाट्या- कढई घासावीच लागते. आमच्याकडे मी घरी असल्याने मी भांडी घासायचे. नंतर मला होईनाशी झाली म्हणून मग विनायक काही वेळा भांडी घासून द्यायचा. भांडी थोडी असली तर विनु घासून देतो मी विसळते. खूप असली तर मी पटापट पाण्याखालून एकेक भांडे विसळल्यासारखे करते आणि डिश वॉशरला लावते. डीश वॉशर मध्ये लावल्याने भांडी अधिक स्वच्छ होतात आणि ड्रायर असल्याने वाळूनही येतात. इथे धुण्याचे मशीन जरी असले तरी त्याचे पण वेगळे प्रकार आहेत. काही अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच वॉशर आणि ड्रायर असतात. तर काही ठिकाणी धुणे धुवायची मोठी दुकाने असतात. त्यात २० ते २५ निरनिराळ्या आकाराची वॉशर आणि ड्रायर असतात. खूप मोठी व्यावसायिक असल्याने त्यात खूप कपडे धूउन येतात. वॉशरला आणि ड्रायरला पैसे भरावे लागतात. वॉशर म्हणजे एका मोठ्या मशीन मध्ये कपडे टाकायचे, धुण्याची पावडर टाकायची, ठराविक नाणी टाकायची आणि मशीन सुरू करायचे. या मशीन मध्ये कपडे धुवून व पिळून निघतात. नंतर हे सर्व कपडे ड्रायर म्हणजेच कपडे वाळवण्याच्या मशीनमध्ये टाकायची. ठराविक नाणी टाकायची व मशीन सुरू करायचे. या मशीनमध्ये सर्व कपडे वाळून निघतात. ते इतके वाळून निघतात की जराही पाण्याचा अंश राहत नाही. कपडे खूप गरम होऊन येतात. थेट घड्या घालून कपाटात ठेवायचे.



१० क्वार्टर डॉलर्स वॉशिंगला आणि ४ त ५ क्वार्टर डॉलर्स ड्रायर साठी. १ क्वार्टर डॉलर म्हणजेच २५ सेंटचे एक नाणे जसे की २५ पैसे. भारतात वेगळा ड्रायर नसतो त्यामुळे वॉशिंग मशीन मधून धुतलेले कपडे वेगळे तारेवर वाळत घालायला लागतात. काही अपार्टमेंटमध्ये वॉशर-ड्रायरचे कनेक्शन असते. आपण आपली वॉशर आणि ड्रायर ची दोन मशीने विकत घ्यायची. इथल्या एका घरात आम्ही घेतली होती. साधारण ८०० डॉलर्स पडले. इथे कचरा रोजच्या रोज आपणच कचरापेटीत नेऊन टाकायला लागतो. कामावर जाताना सकाळी एका हातात ओल्या कचऱ्याची पिशवी घ्यायची. ती कचऱ्याच्या डब्यात टाकायची व कार सुरू करून कामाला जायचे. कोरडा कचरा एका मोठ्या पिशवीत भरून तोही टाकायला लागतो. कचरा भरून ठेवायच्या पिशव्या इथे मिळतात. त्या आम्ही घाऊक विकत घेतो कारण त्या सतत लागत असतात. कोरड्या कचऱ्यामध्ये दुधाचे व फळांच्या रसाचे रिकामे कॅन्स असतात. तेलाच्या बरणीतले तेल संपले की ते असते. शिवाय इथे आम्ही पिण्याचे व स्वयंपाका करता पाणी विकत घेतो त्याचे कॅन्स, किंवा बाटल्या जमा होतात. कोरडा कचऱ्याची मोठी पिशवी भरली की टाकतो. Rohini Gore

क्रमश : ....

 




 

Saturday, September 23, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (3)

 माझे लग्न झाले आणि मी मुंबईत रहायला आले. माझ्या माहेरी आणि सासरी मी तीन-चार महिन्यातून एकदा जायचे. सासर माहेरची मंडळी पण आमच्या घरी यायची. प्रत्यक्षात भेटून गप्पा झाल्या तरी सुद्धा मी आई बाबा, सासू सासरे यांना पत्र पाठवायचे. तसेच त्यांच्याकडूनही मला पत्रे आली आहेत. आईबाबांचे पत्र आले की एकदा वाचून भागत नसे. परत परत पारायण केल्यासारखे वाचायचे. पत्रातून आम्ही एकमेकांना भेटायचो. आम्ही लग्न झाल्यावर आयायटीच्या वसतिगृहात रहायचो तेव्हा मला आई-बाबांचे फोन यायचे. तिथे एक सार्वजनिक फोन होता. फोन आला की वसतिगृहाचा रखवालदार आमच्या खोल्यांचे नंबर जोरजोरात ओरडून सांगायचा. मग मी तिसऱ्या जिन्यावरून भरभर खाली उतरून फोन घ्यायचे. काहीवेळा उशीर झाला की फोन कट होत असे. त्यावेळेला आई बाबा मला टेलिफोन बूथवरून फोन करायचे. 

 
 
आई बाबांकडे जेव्हा फोन आला तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता. आम्ही डोंबिवलीत रहायला आलो होतो. मी टेलिफोन बूथ वर जाऊन आई-बाबा व रंजनाला फोन करून माझी खुशाली कळवायचे व त्यांची खुशालीही मला कळायची. फोन करण्यासाठी पैसे बाजूला थोडे काढून ठेवलेले असायचे. त्यातूनच खर्च करायचे. पत्रातून जरी माझी खुशाली त्यांना कळत होती तरी फोनवर त्यांचा आवाज ऐकून पण बरे वाटायचे. जेव्हा माणूस आपले जन्मस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतरीत होतो तेव्हा त्याला कुटुंबापासून दूर गेल्याची जाणीव खूपच तीव्र होते आणि मग तो त्यांच्याशी संपर्कात रहाण्यासाठी धडपड करतो.
अमेरिकेत रहायला आल्यावर सुरवातीला मी आई-बाबा, सासु-सासरे, रंजना, डोंबिवलीतले काही नातेवाईक व मित्रमंडळींना पत्रं लिहिलेली आहेत. शिवाय सई (भाची) आणि सायलीला (पुतणी) मी इथून वाढदिवसाची शुभेच्छापत्रे पोस्टाने पाठवली आहेत. इथल्या दुकानामध्ये सुंदर सुंदर शुभेच्छापत्रे असतात. त्यात जास्तीत जास्त सुंदर असणारी शुभेच्छा पत्रे मी निवडायचे. मला खूप आनंद व्हायचा आणि मग मी त्यांना फोन करून विचारायचे की कशी वाटली शुभेच्छापत्रे? आवडली का? त्या दोघी खूप खुश व्हायच्या. 
 
 
अमेरिकेतून आई-बाबा, सासूसासरे, बहीण यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी सुरवातीला कॉलिंग कार्ड वापरायला लागायचे. भारतात फोन करण्यासाठी आम्हाला आधी अमेरिकेतला लँडलाईन फोन घ्यावा लागला. व्हराईजन या टेलीफोन कंपनीत आम्ही आमचे नाव नोंदवले व फोन सुरू झाला. फोन सुरू झाल्या झाल्या लगेचच मी रंजनाला फोन लावला होता. मी अगदीच मोजकी २-ते ३ वाक्ये बोलली असेन. म्हणजे 1 की २ मिनिटेच. पटकन फोन खाली ठेवला, बील येण्याच्या भीतीने. बील आले १० डॉलर्स ! (१० डॉलर्स गुणिले ८० रूपये)नंतर आमच्या मित्रपरिवारातून आम्हाला काही वेबसाईटी कळाल्या. त्यावरून आम्ही दर महिन्याला ४० डॉलर्सची (40 डॉलर्स गुणिले 80 रूपये) ऑनलाईन कार्डे विकत घ्यायचो. एक सासरी एक माहेरी एक बहिणीकरता. १० डॉलर्स मध्ये २० मिनिटे मिळायची. या २० मिनिटात बोलणे जास्त व्हायचेच नाही. एका आठवड्याला एक 10 डॉलरचे कार्ड वापरायचो. एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करण्यातच २० मिनिटे निघून जायची.फोन लावण्यासाठी आधी १० आकडी ऍक्सेस नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १० आकडी पीन नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १५ आकडी ( इंटरनॅशनल कोड, भारताचा कोड, शहराचा कोड, आणि मुख्य टेलीफो नंबर( ८ आकडी लँडलाईन फोन ) नंबर फिरवायला लागायचे. हे सर्व मिळून ३५ डिजिटचे फोन नंबर फिरवल्यानंतर फोन लागायचा. फोन करण्यासाठी आम्हाला खालीलप्रमाणे नंबर फिरवायला लागायचे.
 
Access No. : 1-888-321-4086
Pin No. : 713-213-5562
International code : (011) Country code (91) Pune City Code (20) landline no. 24250370
011-91-20-24250370 
 
 
फोन लागल्यावर आवाजही काही वेळा नीट ऐकू यायचा नाही. फोन मध्येच तुटायचा. फोन तुटला की परत सर्व नंबर परत फिरवायला लागायचे. त्यात मग काही मिनिटे बोललेली/वापरलेली कट करून उरलेली मिनिटे शिल्लक रहायची. आणि बोलत असताना आईला/रंजनाला/सासूबाईंना सांगायला लागायचे की आता मिनिटे संपत आली आहेत. फोन आपोआप कट होईल बर का, नंतर बाय बाय टाटा करत फोन धाडकन बंद व्हायचा. बोलणे अपूर्ण राहिले असेच वाटायचे. तुरूंगात नाही का कैद्याला भेटायला जातात तेव्हा ठराविक मिनिटे दिलेली असतात. तिथे कैदी आणि नातेवाईक एकमेकांना दिसतात तरी. इथे फक्त आवाज ऐकू यायचा. व्यक्ति दिसायची नाही. नंतर ही ऑन लाईन कार्डे थोडी स्वस्त झाली.यात रिलायन्सची कार्डे जास्त चांगली होती. नंतर नंतर ५ डॉलर्सला ३० मिनिटे, आणि नंतर ६० मिनिटे दिली जायची. या फोनकार्डाबरोबर आम्हाला कस्टमर सर्विसचा नंबरही दिला जायचा. २००१ सालापासून ते २००८ सालापर्यंत प्रत्येक महिन्याला ४० डॉलर्सची कार्डे खरेदी करायचो. नंतर व्होनेज कंपनीचा फोन घेतला. यामध्ये ४० डॉलर्स महिन्याचे आणि अजूनही आहेत. व्होनेज कंपनीच्या फोन वरून १५ डिजिटचा फोन नंबर अजूनही फिरवावा लागतो आणि लगेच फोन लागतो. फक्त यामध्ये ऍक्सेस नंबर आणि पिन नंबर फिरवावे लागत नाहीत. 
 
 
हा फोन सुरू झाल्यावर भारतातल्या सर्वांचे आवाज ऐकताना खूप समाधान व्हायचे आणि अजूनही होते. यामध्ये समोरच्या व्यक्तीचा आवाज इतका काही स्पष्ट येतो की ती व्यक्ति तुमच्या समोर बसली आहे असे वाटते. कितीही मिनिटे बोला आणि कितीही वेळा फोन करा. अमेरिकेत कुणाला फोन करायचे असेल तर आणि भारतात कुणाला फोन करायचे असेल तर अगणित फोन करता येतात आणि अगणित बोलताही येते. हा फोन आल्यापासून मी आई बाबांशी आणि रंजनाशी खूप वेळा आणि अगणित बोलली आहे. आईशी तर कमीत कमी १ तास बोलते. त्यात आमच्या ओघवत्या गप्पा खूपच होतात. आम्ही दोघी पूर्वीच्या घराच्या आठवणी अनेकदा काढतो. शिवाय मी पदार्थ्यांच्या रेसिपीज पण विचारल्या आहेत.इथे मी वेळ जाण्याकरता सर्व पारंपारिक पाककृती लिहिल्या. त्यात मी काही रेसिपीज फोन वर विचारून वहीत लिहून घेतल्या आहेत. त्या वह्या अजूनही आहेत आणि मी त्या कधीच फेकणार नाही. या वह्यात कितीतरी जणांचे फोन नंबर तर आहेतच. शिवाय वेबसाईट वरून घेतलेल्या कॉलिंग कार्डाचे नंबरही आहेत.विनु त्याच्या आईशी खूप वेळा आणि अगणित बोलला आहे. शिवाय मी भारतातल्या काही नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना फोन केले आहेत. शिवाय इथे झालेल्या ओळखीतही खूप वेळा आणि अगणित काळासाठी बोललो. काही कुटुंब मित्र/मैत्रिणींशी मी अजूनही याच फोनवरून बोलते. जेव्हा हा फोन नव्हता तेव्हा कंप्युटर द्वारे याहू मेसेंजर आणि स्काईप मेसेंजर वरून अनेक मित्रमैत्रिणींशी बोललो आणि वेबकॅम लावून त्यांना बघितले देखील ! तेव्हा प्रत्यक्ष भेटल्यासारखे वाटले आणि एकाकीपणा बराच कमी झाला. 
 
 
१९९९ साली आम्हाला इंटरनेट माहीती झाले. जेव्हा विनु हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये होता तेव्हा त्याने रेडिफमेल वरून ईमेल खाते उघडले होते आणि ईमेलद्वारे त्याने विद्यापीठात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये संशोधन करण्यासाठी अर्ज केला होता. या ईमेलवरूनच त्याने बाळकृष्ण ला (विनुचा भा ऊ) ईमेल केली होती की आम्ही अमेरिकेत सुरक्षित पोहोचलो. त्याने त्याच्या ऑफीसमधून ईमेल वाचली.अमेरिकेत आल्यावर पहिली ३ वर्षे आमच्याकडे कार आणि संगणकही नव्हता. मी विद्यापिठाच्या ग्रंथालयात जाऊन ई-सकाळ वाचायचे. ग्रंथालयात बरेच डेस्क टॉप होते. २००३ साली मला प्राचीने याहू मेल वर माझे ईमेल खाते उघडून दिले. २००१ साली जेव्हा मला माधवी भेटली. ती तेलुगु होती. तिच्या घरी डेस्क टॉप होता आणि त्यावेळेला ती याहू मेसेंजर द्वारे तिच्या अमेरिकेत रहाण्याऱ्या बहिणींशी बोलायची. तिने मला एकदा याहू मेसेंजर वर ती कशी बोलते हे दाखवले होते. एक मात्र छान होते की इथे लोकल कॉल्स फुकट होते. त्यामुळे मी व माधवी फोनवर हिंदीतून खूप गप्पा मारायचो. शिवाय प्रत्यक्ष भेटीत खूप बोलायचो. Rohini gore 
 
क्रमश : ...


 

Friday, September 22, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (2)

 

मी भारतात लग्नाआधी पुण्यात व लग्नानंतर आयायटी, डोंबिवली व अंधेरी या ठिकाणी राहिले. विनु आयायटीत पिएचडी करत होता. लग्नानंतर वसतिगृहात जोडप्यासाठी प्रत्येकी २ खोल्या दिल्या होत्या. त्यामुळे मलाही तिथे रहाता आले. या सर्व ठिकाणी आम्हाला पाणी व वीजेची कमतरता कधीच भासली नाही. पुण्यात आईकडे रहात असताना म्युनिसिपाल्टीकडून दिवसातून दोन वेळा धो धो पाणी यायचे. पाणी आले की प्यायचे पाणी, अंघोळीकरता व स्वयंपाकाकरता पाणी भरून ठेवायचो. त्यामुळे तसे बघायला गेले तर २४ तास पाणी असायचे. पाणी आले की अंगणात आम्ही मनसोक्त पाण्याचा सडा घालायचो. झाडांना नळीने पाणी घालायचो. 
 
 
डोंबिवलीमध्ये आमच्या सोसायटीत जमिनी खालच्या टाकीत २ वेळा भरपूर पाणी यायचे. हे पाणी आम्ही वरच्या टाकीत पंपाद्वारे सोडायचो. सोसायटीत मोजून १०-१५ फ्लॅट होते. त्यामुळे आम्ही फक्त पिण्याचे पाणी भरून ठेवायचो. वापरायचे पाणी कधीच भरून ठेवले नाही. आयायटीत आणि अंधेरीत सुद्धा फक्त पिण्याचे पाणी भरून ठेवायला लागायचे. वीज व पाणी मुबलक होते. अंधेरीत २ वर्षे राहिलो तेव्हा कधीही वीज गेली नाही की पाणी गेले नाही. डोंबिवलीत दर शुक्रवारी वीज घालवायचे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत. तसा सूचनेचा फलकही लावला जायचा. त्यामुळे तयारीत असायचो. पाण्याच्या टाकीतही पाणी पूर्ण भरून ती वाहिली की चिंता नसायची. इथे अमेरिकेत आल्यावर २४ तास वीज पाणी असतेच. शिवाय पिण्याचे पाणीही भरून ठेवायची आवश्यकता नसते. नळाचे पाणी थेट प्यायले तरी चालायचे. जेव्हा नॉर्थ कॅरोलायना राज्यात विल्मिंग्टन शहरात आलो तेव्हा नळाचे पाणी प्यायला लागलो पण आमची पोटे बिघडायला लागली. नळाला फिल्टर लावूनही फायदा झाला नाही. तेव्हापासून आजतागयत आम्ही पिण्याचे पाणि विकत आणतो. गेली तीन वर्षे मी स्वयंपाकालाही पिण्याचेच पाणी वापरते.
डोंबिवलीत जेव्हा आलो तेव्हा नळाचे पाणी प्यायल्याने मला कावीळ झाली होती म्हणून पाणी ऊकळून प्यायला लागलो. पिण्याचे पाणी ऊकळून ठेवायचे एक काम वाढून गेले. नंतर चांगल्या क्वालिटीचा फिल्टर आणला आणि एकूणच तब्येत बिघडण्याच्या तक्रारी संपून गेल्या. 
 
 
इथे अमेरिकेत नळाला पाणी नाही असे कधीच झाले नाही. नळाला गरम आणि गार असे पाणी असते. गरम पाण्याचा उपयोग थंडीत भांडी विसळण्यासाठी होतो. अंघोळीलाही शॉवरला गरम/गार पाणी असते. भारतात गॅस/स्टोव्ह वर पाणी तापवून ते पाणी बादलीत ओतून ठराविक पाण्यात अंघोळ करायचे दिवसही आता संपले. काही ठिकाणी असे अजूनही करत असतील तर माहीत नाही. घराघरातून आता गीझर असतात. जसे भारतात पावसामुळे झाडांच्या पडझडीमुळे, लक्खन वीज चमकल्यामुळे वीज जाते तशी इथेही जाते. फरक इतकाच आहे की भारतात वीज गेली तरी गॅसच्या शेगडीवर मेणबत्तीच्या प्रकाशात चहा करता येतो, इतकेच नाही तर भजीही तळता येतात. इथे तसे नाही. वीज गेली की सगळे काही ठप्प होते. इथे स्वयंपाकघरात एलेक्ट्रिक शेगड्या असल्याने काहीही शिजवता येत नाही. मायक्रोवेव्ह बंद होतो. इतकेच नाही तर हीटर/कूलर बंद होतो. शॉवरला गरम पाणीही येत नाही. हे सर्व आम्ही अनुभवले आहे. साऊथ कॅरोलायना राज्यात क्लेम्सन शहरात अशीच एकदा पटकन वीज गेली. विनु लॅबमधून घरी आला होता. मी संध्याकाळी खायला म्हणून पोहे केले. ते खाल्यावर चहा प्यायला आणि वीज गेली ती दुसऱ्या दिवशी पहाटे ६ ला म्हणजे १२ तासांनी आली. मला पोळी भाजी करता आली नाही. सर्वत्र रस्त्यावरही गुडुप अंधार झाला. नशीबाने आमच्याकडे टॉर्च होता. रात्रभर भुकेने तळमळत होतो. झोपही लागली नाही. नशिबाने थंडी नव्हती. उन्हाळा असल्याने कुलर जरी चालू झाला नाही तरी दार किलकिले करून उघडे ठेवले आणि खिडकी थोडी उघडी ठेवली. फ्रीजर मध्ये आईस्क्रीम होते. ते वितळलेले आईस्क्रीम खाल्ले तेव्हा थोडी डुलकी लागली. एक झाड विजेच्या खांबावर जोराच्या वाऱ्याने आदळले होते म्हणून वीज गेली होती. असाच अनुभव नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या हेंडरसनविल शहरात आला. त्या दिवसाचे वीज गेल्याचे वेगळेपण होते म्हणून तशी रोजनिशी पण लिहिली.
 
 
२८ जून २०१८ रोजी वीज गेली. सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती.
आम्ही दोघे कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच विनुचा डबा करून ठेवला होता. मला कामावर ऑफ डे होता त्यामुळे मी घरीच होते. . विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते. सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने युट्युब वरचा गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर या वेबसाईटवर पहात असलेल्या मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स नावाच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये कळाले. 
 
 
रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले.नॉर्थ कॅरोलायना राज्यात विल्मिंग्टन शहरात वादळवारे होते म्हणून वीज गेली होती. आदल्या दिवशी दोन दिवसांचा स्वयंपाक करून ठेवला होता म्हणून काही अडले नाही. इथे जोरदार हिमवृष्टी होणार असेल तर वारंवार हवामान सांगणाऱ्या चॅनल वर सूचनांचा भडिमार करत असतात. वीज जाण्याची शक्यता आहे तेव्हा जास्तीत जास्त खाण्यापिण्याचे पदार्थ घरात आणून ठेवा. तेव्हा तर इथले लोक घाबरून जणू काही उद्या प्रलय होणार आहे या थाटात भरभरून सामान घेतात. मी इंगल्स या ग्रोसरी दुकानात डेली विभागात काम करत होते म्हणून मला जास्त कळाले होते. सर्वच्या सर्व नेतात. पाण्याचे/दुधाचे कॅन्स, ब्रेड ठेवायच्या रॅक मध्ये अनेक प्रकारचे ब्रेड असतात ते सर्वच्या सर्व संपतात. 
 
 
तसेच डोंबिवली पाणी येणार नाही किंवा पाईप लाईन तुटल्याने पाण्याचा पुरवठा खंडीत होईल असे जेव्हा लोकांना कळते तेव्हा घरी जे दिसेल त्यात पाणी भरून ठेवतात. पिण्याचे पाणी म्हणजे पिंप, कळशी लोट्या, भांडी, इतकेच नव्हे तर पातेल्यात आणि वाट्यातूनही पाणी भरले जाते. पाणी आले नाही तर? अन्न मिळाले नाही तर? मनुष्य स्वभाव सगळ्या जगात सारखाच, नाही का? भारतात तर घरोघरी सिंटेक्स टाक्या बसवलेल्या आहेत. सोसायटीत पाण्याच्या टाक्याही अगदी काठोकाठ भरतात. पण जेव्हा पाणी नसते ना तेव्हाच ते जास्ती लागते. Rohini Gore
क्रमश : ..

Thursday, September 21, 2023

मायदेश - परदेश (तुलनात्मक) ... (१)

 आम्ही दोघे अमेरिकेत २००१ साली आलो. आमच्या दोघांचेही विसाचे काम झाले होते म्हणून काही जणांनी सल्ला दिला की दोघेही एकदम जा. विनु भारतात असताना कंपनीतर्फे कामानिमित्ताने विमानात बसला होता. मी पहिल्यांदाच विमानात बसले होते. जेव्हा विमान डॅलसला खाली खाली उतरायला लागले तेव्हा मला विमानाच्या खिडकीतून रस्ता दिसला आणि त्यावर फक्त आणि फक्त कार धावत होत्या. हे दृश्य पाहून माझा मूडच गेला. इथूनच तुलना व्हायला सुरवात झाली. मला कारने प्रवास अजिबात आवडत नाही. रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने धावतात याची डोळ्यांना सवय होते आणि असा हा विरोधाभास पाहिल्यावर निराशा आली. बसेस, रिक्शा, टॅक्सी, रेल्वे अश्या वाहनातून प्रवास करायला मला खूपच आवडतो. मला तर रिक्शेची खूपच सवय होती. कुठेही बाहेर जाताना रिक्शा दिसली की तिला हात करायचा की ती इच्छीत स्थळी आपल्याला पोहोचवते. आम्ही दोघे बरोबर आलो ते एका अर्थी चांगलेच झाले. आमची ८ दिवस रहाण्याची व्यवस्था डॉक्टर मर्चंड यांनी केली होती. त्यांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात आम्ही रहात होतो. इथे आल्यावर हवेतला बदल चांगलाच जाणवत होता. प्रदुषण्मुक्त हवा छानच वाटत होती. त्यावेळेला अमेरिकेत स्प्रिंग (वसंत ऋतू) चालू होता. भारतात ३ ऋतु आहेत जसे की उन्हाळा, पावसाळा हिवाळा. इथे अमेरिकेत ४ ऋतु आहेत स्प्रिंग (वसंत) समर (उन्हाळा) फॉल (पानगळ) विंटर (हिवाळा) पाऊस वर्षातून कधीही पडतो. पावसाळा हा वेगळा ऋतु इथे नाही.

पहिले ८ दिवस आमचे खाण्यापिण्याचे चांगलेच हाल झाले. मर्चंड यांच्या घरी मॅकरोनीचीझ, उकडलेले अंडे, कणीस, बटाटा, ब्रेड, ज्युस, कॉफी, इतकेच काय ते जेवण. आमच्या अपार्टमेंटला जाण्याच्या आधी त्यांनी आम्हाला भारतीय उपाहारगृहात नेले होते. आमच्या अपार्टमेंटमध्ये रहायला सुरवात करण्यापूर्वी आमच्या शेजारी जे तमिळ कुटुंब होते तिने आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलावले तेव्हा घरचे जेवण जेवलो. इथे आम्हाला सगळेच नवीन होते. हळूहळू करत रूळत गेलो. इथे आल्यावर मी रोज रडायचे. कुणीही बोलायला नाही. ज्या काही तेलुगू, तमिळ मैत्रिणी भेटल्या त्यांच्याशी सुद्धा इंग्रजीतूनच संभाषण. इथे मला हैद्राबादची माधवी भेटली आणि मी तिच्याशी हिंदीतून घडाघडा बोलायला लागले. इथे आल्यावर फक्त अमेरिकन लोकांशीच इंग्रजी बोलणे होत नाही तर आपल्या देशातल्या इतर प्रांतीय लोकांशी इंग्रजीत बोलायला लागते. मी भारतात काही वर्षे नोकरी करत होते त्यामुळे मला हिंदी आणि थोड्याफार प्रमाणात इंग्रजीत बोलायची सवय होती. त्यामुळे खूप काही अडले नाही पण तरीही मराठीत बोलायला कुणी नाही याची जाणीवही होत होती. जशी मुंबई सर्व प्रातातल्या लोकांना सामावून घेते तसेच अमेरिका सर्व देशातल्या लोकांना सामावून घेते. चिनी, आफ्रीकन, श्रीलंकन, पाकिस्तानी, युरोपियन असे सर्व देशीय प्रांतीय लोक इथे असल्याने सर्वांनाच इंग्रजी बोलायला लागते. प्रत्येकाचे उच्चार वेगवेगळे असतात आणि त्यांच्या बोलण्यात त्यांच्या मातृभाषेचा बोलण्याचा ढंग लगेचच जाणवतो.
 
 
हवामानाचा फरक आणि त्रास प्रत्येक देशात असतो. मुंबईत पाऊस म्हणजे रूळावर पाणी साठणे, त्यामुळे लोकल्स बंद पडणे, हे तर नित्यनियमाचे आहे. पुण्यात थंडी जबरदस्त असते. मुंबईत ३ ऋतु पावसाळा, कमी उन्हाळा, जास्त उन्हाळा. पुण्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट अजिबात चांगले नाही म्हणून माणशी एक दुचाकी आहे तसेच अमेरिकेतही पब्लिक ट्रान्सपोर्ट अजिबातच चांगले नाही म्हणून माणशी एक कार आहे. तसे मुंबईचे नाही. मुंबईत टॅक्सी, लोकल रेल्वे, रिक्शा, बेस्ट बसेस सर्व काही आहे. इथे रेल्वेचे जाळे आहे पण ठराविक शरहांमध्ये. आमच्याकडे जेव्हा कार नव्हती तेव्हा आम्ही ग्रेहाऊंड कंपनीच्या बसने क्लेम्सन ते विल्मिंग्टनला एका मित्राकडे गेलो होतो. क्लेम्सन पासून विल्मिंग्टनला कार घेऊन गेले तर ६ तासांचा प्रवास आहे. आम्हाला बसने जाताना १२ तास तर येताना १६ तास लागले. प्रवासात २ ते ३ वेळा बसही बदलावी लागली.इथल्या विद्यापिठात बसची चांगली सोय असते. विद्यार्थ्यांकडे कार नसतात. त्यामुळे विद्यापीठ, काही अपार्टमेंट कॉप्लेक्स आणि वाण्याची दुकाने अश्या ठिकाणी ही बस फिरते. मी विल्मिंग्टन मध्ये असताना बसने ग्रंथालयात वोलंटरी वर्क करायला जायचे. 
 
 
विनु नोकरीनिमित्ताने व मी लग्नानंतर जेव्हा मुंबईला आलो तेव्हा लोकल ट्रेन मध्ये चढायला उतरायला शिकलो. मुंबईतली माणसे मदत करतात. कोणते स्टेशन केव्हा येईल तेही सांगतात. माणूस जेव्हा जन्मस्थान सोडून नोकरी निमित्ताने किंवा लग्न झाल्यावर दुसऱ्या शहरात जातो तेव्हा बदल आत्मसात करावे लागतात. ते इतके सहजासहजी सोपे नसतात. मी असे ऐकलेआहे की न्युयॉर्क मध्ये घराची भाडी अवाच्या सवा आहेत. माझी एक मैत्रिणि न्युयॉर्क मध्ये रहात होती तेव्हा ती सांगत होती की एका खोलीला (स्टुडिओ अपार्टमेंट) तिला १००० डॉलर्स भाडे द्यायला लागायचे. बरीचशी भारतीय मंडळी न्युजर्सी मधे रहातात आणि न्युयॉर्कला नोकरीवर जायला इथल्या लोकल ट्रेनने जातात असे ऐकले आहे. अनुभव नाही.
 
 
आम्ही अमेरिकेत आल्यावर ज्या राज्यात आणि शहरात राहिलो तिथे हवामान खूप तीव्र नव्हते. अर्थात मायनस ५ ते १० डिग्री सेल्सिअस थंडीत अनुभवले आहे. आणि उन्हाळ्यात साधारण ३० ते २५ अंश सेल्सिअस अनुभवले आहे. हिमवृष्टी आणि बोचरे वारेही अनुभवले आहे. इथे तापमान फॅरनहाईट मध्ये मोजतात. ३० अंश फॅरनहाईट म्हणजे शून्य डिग्री सेल्सिअस. Rohini Gore
क्रमश : ..
 

 

Wednesday, September 20, 2023

१,२,३,४ टुर Tour 2023 ..... (2)

पहिल्या दिवशी गुहेत होतो तर दुसऱ्या दिवशी ५००० फूटाची उंची गाठली होती. सर्व आवरून बॅगा पॅक करून बस मध्ये बसलो. थोड्यावेळात सर्वत्र डोंगर दिसू लागले. आमची बस धुक्यातून जात होती. काहीवेळाने आभाळाचा आकाशी रंग व डोंगरावरच्या झाडांचा हिरवा रंग एकत्र होऊ लागले. काही वेळ सूर्य आणि चंद्र समोरासमोर उभे होते. गॅटलीनबर्गला बस थोड्यावेळाकरता थांबली होती. रात्रीचे जेवण पॅक करून घ्या असे गाईड सांगत होता कारण की दुपारचे जेवण ४ ला होणार होते. जेवणामध्ये चिकन होते. मी युट्युबवर जिथे जाणार होतो तिथला विडिओ आधीच पाहून ठेवला होता. जेवणात बाकीचे काही शाकाहारी पदार्थही दिसले त्यामुळे खूप काही पंचाईत होणार नाही याची खात्री होती. आम्ही शाकाहारी जेवण मिळेल का असे गाईडला विचारले तर तो म्हणाला की मी विनंती करून पहातो. आम्ही एका छोट्या शोसाठी जाणार होतो आणि त्या शोमध्येच जेवणही होते.

गॅटलीनबर्गला उतरल्यावर फुटपाथवरून एक चक्कर मारली. विचार केला की ४ ला मिळणारे जेवण काही खरे नाही, आपण इथेच काही मिळते का ते बघू. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. तिथे आम्हाला मेलो मश्रूम उपाहारगृह दिसले आणि आम्ही तिथे निवांत बसून अवाकोडो होगी (Avocado Hoagie) घेतली. मला हा पदार्थ खूपच आवडतो. रस्त्यावर बरीच गर्दी होती. गॅटलीनबर्ग हे प्रवाशांचे खूप आवडते ठिकाण आहे. इथे कायम गर्दी असते. इथे आकर्षणे खूप आहेत. पूर्वी आम्ही ब्रायसन शहरातून निघून गॅटलीनबर्गला आलो होतो. रस्ता सर्व दऱ्याखोऱ्यांना छेदून जाणारा होता. तेव्हा पण अशीच गर्दी होती. गॅटलीनबर्गात फूटपाथवरून चालतानाही खूप मजा येते. दोन्ही बाजूने फूटपाथ, त्यावर चालणारे पादचारी, बाजूलाच सर्व प्रकारची दुकाने आहेत. कोणत्याही दुकानात शिरा. तिथे टंगळमंगळ करा, परत बाहेर या. उपाहारगृहे, आईस्क्रीम पार्लर, कानातले गळ्यातले, फुगेटुगे, सर्व प्रकारची मजा आहे. मेलो मश्रुम पाहिल्यावर परत आम्हाला आमच्या गावाची आठवण झाली. विल्मिंग्टनला रहात असताना या उपाहारगृहात आम्ही नेहमी (Avocado Hoagie) ऑर्डर करायचो. त्यावर चिली फ्लेक्स, मिरपूड आणि मीठ घातले की छान चव येते.


गॅटलीनबर्गातून आता आमची बस वळणदार वळणे घेत घेत पुढे जात होती. ही वळणे साधी सुधी नव्हती. नागमोडी होती. आजुबाजूचे डोंगर उंच उंच होते. सगळीकडे हिरवी घनदाट झाडीच झाडी. त्यातून जाणारे काळेभोर रस्ते. खूप उंचावर गेलो तर डोळे दिपवणारे दृश्य दिसले. बस पार्किंग लॉट मध्ये थांबली आणि आम्ही प्रवासी उतरून इकडे तिकडे पहात पहात भटकत होतो. दूर दूरवर पसरणारे डोंगर, त्यामधून जाणाऱ्या वाटा दिसत होत्या. इथे आम्हाळा स्टेट लाईनही दिसली. नॉर्थ कॅरोलायना व टेनिसी राज्याला जोडणारी रेषा. तिथे सर्वांचे फोटो काढणे चालू होते. एका चिनी बाईने आमचेही फोटो काढले. वर खूपच थंडगार होते. फोटो काढायला छान सावलीचे वातावरण तयार झाले होते.

 

 
सर्व दिशांनी फोटो काढले गेले. दरीच्या टोकावरच्या दगडावर उभे राहून तरूण मंडळी सेल्फी काढण्यात दंग होऊन गेली होती. केवळ फोटो काढण्यासाठीच इतक्या उंचीवर आलो होतो असे वाटून गेले. बस निघाली आणि उतरणीवर परत वळणदार रस्ते. पिजन फोर्ज (Pigeon Forge) या शहरात आमची बस येऊन थांबली जिथे आम्ही सर्व एक शो पहाणार होतो. हा शो आम्हाला खूपच आवडून गेला. विशेष म्हणजे तिथे काम करणारे प्रतिनिधी सर्वांचे छान स्वागत करत होते. अमूक सीटवर बसा असेही सांगत होते. नंतर काही वेळाने सर्वांच्या पुढे डिशा आल्या. पेले आले. त्यात कोकाकोला किंवा जे पेय असेल ते घालत घालत मंडळी जात होती. या सर्व प्रतिनिधींनी गणवेश घातला होता. हा शो म्हणजे लहान मुलांकरता आणि मोठ्या माणसांकरताही होता. छोटी सर्कसच म्हणा ना !

 
शो चालू असतानाच जेवणही वाढले. आम्हाला शाकाहारी भोजन मिळाले म्हणून आम्ही खुश होतो. जेवणात भात व उकडलेल्या भाज्या होत्या. भाज्यांमध्ये ब्रोकोली, कॉलीफ्लोवर, बटाटा, गाजर, श्रावणघेवड्याचे छोटे काप असे सर्व होते. आम्हाला अननसाच्या फोडी पण एका वाटीत दिल्या होत्या. उकडलेले कणीसही होते. नंतर गोड म्हणून ऍपल पाय व थोडी बिस्कीटेही दिली. दीड तासाचा शो मध्ये छान करमणूक होती. या शो नंतर आम्ही सर्व टायटॅनिक म्युझियम पहायला गेलो व तिथून होटेलला बस निघाली. जेवण उशीरा झाले तरीही थोडीफार भूक होती. झोपायच्या आधी आम्ही बांधून घेतलेला ऍपल पाय खाल्ला कारण पहाटे ६ ला न्याहरी होती आणि इतक्या पहाटे जास्त खाता येत नाही. फक्त कोरड्याबरोबर ओले खायचे. ब्रेड बटर, चहा इतकेच. तिसऱ्या दिवशी तीन आकर्षणे पहायची होती आणी ती खूपच सुंदर होती.Rohini Gore

क्रमश : ...


 

Monday, September 11, 2023

१,२,३,४ टुर Tour 2023 ..... (1)

 Luray Caverns is  National Natural Landmark in northern Virginia, USA

बसमध्ये बसलो आणि आमचा ४ दिवसाचा प्रवास सुरू झाला. पहिल्या दिवशी गुहा पाहायची होती. गुहेत जायच्या आधी आम्ही बसमधले सर्वजण एका उपाहारगृहात जेवलो. काहीही आणि कितीही खा या सदरात आमच्या सारख्या शाकाहारी लोकांची उपासमार झाली नाही. आम्ही दोघांनी जेवणात फ्राईड राईस, नूडल्स, उकडलेल्या भाज्या, स्प्रिंग रोल, परतलेले केळे घेतले. या शिवाय उकडलेले कणीस, टोमॅटो काकड्यांचे काप, भाजलेले वांग्याचे कापही घेतले. नंतर काही फळे घेतली. फळांमध्ये अननसाच्या, कलिंगडाच्या आणि टरबूजाच्या फोडी होत्या. केक व आईस्क्रीमही होते पण घेतले नाही. प्रवासात पोट तुडुंभ भरायला नको, नाहीतर सगळेच वांदे होतात. आमचे पोट व्यवस्थित भरले होते आणि जडही झाले नाही. जेवणासोबत मी कोकाकोला घेतला आणि विनुने गरम चहा (दुध आणि साखरे व्यतिरिक्त) महामार्ग ९५ नंतर काही वेळाने दुसऱ्या एका मार्गाने बस जात होती. महामार्ग ६६ आणि असेच अजून काही महामार्ग लागले. दूरदूरवर प्रवास करताना आम्हाला आमच्या गावाची आठवण येत होती. विल्मिंग्टन मध्ये रहाताना आम्ही शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्टीत बाहेर फिरायला जायचो. मधे वाटेत येणारे विश्रांती थांबे आठवत होते. इथे आम्ही कॉफी किंवा कोकाकोला घ्यायचो. तिथल्या आवारात जी फुले दिसायची त्याचे फोटो काढायचे.

महामार्गावर इथे आजुबाजूला जंगल आणि त्यामध्ये दिसणारी झाडी, यामध्ये गुळगुळीत असणारे रस्ते, असे सर्वच आठवत होते. टेकटूर नावाची चिनी लोकांची एक ट्रॅव्हल कंपनी आहे. या कंपनी बरोबर आम्ही २०१४ साली वेस्ट कोस्टची ट्रीप केली होती तर २०१६ साली ईस्ट कोस्टची ट्रीप केली होती. त्यानंतर ७ वर्षाने आम्ही अशा ट्रीप ला गेलो. यामध्ये होटेल व साईट सिंईंगचे पैसे घेतात. आकर्षणाचे पैसे व आपल्या जेवणाचे पैसे आपले आपण द्यायचे असतात. ट्रीप बरोबर गेले की उलटेसुलटे होतेच. रात्री झोप लागत नाही अलार्म लावला तरीही. गादीवर पाठ टेकता येते आणि आराम मिळतो त्यामुळे ट्रीप सुसह्य होते यात वाद नाही.
जेवणानंतर बरेच अंतर पुढे पुढे जात होतो आणि असे वाटले की कधी एकदा गुहा येते. असे म्हणता आली पण! गुहेत प्रवेश केला. येता-जाता हा "चालरस्ता" २ ते अडीच मैल होता. गुहेत थंडगार वाटत होते. रस्ता थोडासा नागमोडी उंचसखल आणि काही ठिकाणी घसरडा होता. खडक/दगड यांचे अनेक निसर्गनिर्मित आकार बघायला मिळाले. काही आकार असे होते की अनेक मासे एकामागून एक लटकवून ठेवलेत की काय? तर काही टोकदार निमुळते एकत्र खडक जसे काही झुंबर ! काही ठिकाणी निमुळती अनेक टोके, छोटी मोठी पसरलेली आणि त्याखाली पाणी असल्याने त्या सर्वांचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. काही ठिकाणी एकावर एक दगड घागरी सारख्या आकाराचे होते. निसर्गाची किमया नेहमीच अचंभित करणारी असते.


इथे उन्हाळा आहे त्यामुळे बाहेर उन होते आणि गुहेत थंडगार ! या चार दिवसात आम्हाला हवामान चांगले लाभले होते. उष्णतेची लाट नव्हती ते बरेच झाले ! सकाळी ९ वाजता निघून मधेवाटेत जेवण करून आणि गुहा बघून नंतर आम्हाला होटेल मध्ये पोहोचायला रात्रीचे ९ वाजले. हे होटेल महामार्गावरच होते. थोडे उंचावर होते. उंचावर खाली उतरून बाजूलाच एक मेक्सिकन उपाहारगृह होते. हे उपाहारगृह खूपच छान सजवले होते. तिथे आम्हाला आवडणारे जेवण घेतले. सोबत कोकाकोला. निवांतपणे जेवायला छान वाटत होते. ४ वर्षात आम्ही मेक्सिकन उपाहारगृहात गेलो नव्हतो. सुरवातीला खायला सालसा आणि चिप्स देतात. जेवण झाल्यावर चढावरून चालत होटेल रूम मध्ये प्रवेश केला. उद्या सकाळी ७ ला तयार रहा असे गाईड्ने सांगितले होते.  होटेल मध्ये गेल्यावर तिथल्या व्हेंडिंग मशीन मधून ३ पाणी पिण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. एक रात्री तहान लागली तर प्यायला तर दोन बाटल्या मधल्या प्रवासात. एका पिशवीत पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, चकल्या असे ठेवत होतो. ६ वाजता न्याहरी करून व सर्व आवरून आम्ही दुसऱ्या दिवशी होटेल लॉबीमध्ये हजर झालो. असाच कार्यक्रम तिनही दिवस होता. न्याहरीला कोरड्याबरोबर ओले खायचे इतकेच आमच्या बाबतीत असते. ब्रेड, चहा, कॉफी, ज्युस, ब्रेडवर लावायला फळांचा जाम होता. सकाळी ६ ही काय न्याहरीची वेळ आहे? पण प्रवासात असेच वेगवेगळे असते ना ! रात्री फोन चार्जिंगला लावले व फोटो फेबूला अपलोड केले व मी गादीवर पाठ टेकली.  प्रत्येक दिवशी कोणता टॉप घालायचा व कोणते लोंबते कानातले घालायचे हे आधीच ठरवून ठेवले होते. 

क्रमश: .....

 

Sunday, September 10, 2023

Tiainic Museum TN

 






























Rock city-Incline railway-Chatanooga-TN