Thursday, March 19, 2015

डेंटनचे दिवस (३)

कौनसी सब्जी बना रहे है आप? माधवीने विचारले. एगप्लॉंंट असे उच्चारल्यावर ती नि मी दोघीही हसायला लागलो. मला माधवी १४ वर्षानंतर फेबुवर सापडली. खूप बोललो आणि बऱ्याच आठवणी निघाल्या की ज्या विसरणे शक्य नाही. आम्ही दोघींनी मिळून घालवलेला वेळ खूप सुंदर होता. डेंटन टेक्साज मध्ये तिची नि माझी ओळख झाली. आमच्यातला एक कॉमन फक्टर म्हणजे आम्हाला दोघीनाही बोलायला हवे असते आणि ते सुद्धा रोजच्या रोज आणि म्हणूनच ती मला म्हणायची अगर आप नही होते तो मेरा क्या हो जाता था ! आणि मी पण तिला हेच म्हणायचे. आमचे दोघींचे संभाषण हिंदीतून व्हायचे. ती तेलगू आहे. ती भारतात आहे तरीही फोन केल्यावर मागच्या पानावरून पुढे असे आमचे संभाषण चालू होते. मध्ये इतक्या वर्षांची गॅप गेली आहे हे जाणवतही नाही.




युनिव्हरसिटीची लायब्ररी, तिथले पोस्ट ऑफीस, सॅक अँड सेव्ह, जॉब हंटिंग, मॉल्स आणि फोटोज काढणे अशा एकेक करून वर्षभरातल्या इतक्या काही आठवणी आहेत की त्या अजूनही आठवतात. डेंटनमध्ये लोकल कॉल्स फुकट होते ते म्हणजे लँड लाईनवर म्हणून आम्ही दोघीही केव्हाही आणि कधीही एकमेकींना फोन करायचो. अर्थात हा लँडलाईनचा जमाना खूपच मागे पडला आहे. पण त्यावेळी लँडलाईनचे महत्त्व आणि ते सुद्धा अमेरिकेत लोकल कॉल्स फ्री असतात आणि ते किती उपयुक्त असतात आणि त्याचा किती आधार असतो हे ज्याचे त्यालाच माहीत. आणि ज्यांना बोलण्याची आवड आहे त्यांना अमेरिकेत आल्यावर कुणीही बोलायला नाही आणि त्यात भर म्हणजे इथली भयाण शांतता ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच या लँडलाईनवरून बोलण्याची मजा कळेल.




एगप्लाँट म्हणल्यावर ती नि मी हसायला लागलो आणि आम्हाला हसू आवरेना. ठराविक भाज्याच इथल्या अमेरिकन टोअर्समधे मिळतात. इंडियन स्टोअर्स मध्ये बाकीच्या खास भारतीय भाज्या म्हणजे तोंडली, कार्ली, गवार या भाज्या मिळतात आणि हे स्टोअर खूप लांब म्हणजे कमीतकमी तासाभराच्या अंतरावर असते आणि तिथे जायचे म्हणजे कार हवी आणि कार असली तरी नुसत्या भाज्या आणण्याकरता इतक्या लांबवर वरचेवर जाणे होत नाही. कॅप्सिकम, एगप्लाँट, कॅबेज अशा ठराविक भाज्या मिळतात म्हणल्यावर त्याच त्याच भाज्या बघून आम्हाला दोघींना खूप बोअर झाले होते त्यावेळेला आणि जेव्हा आम्ही फोन करायचो तेव्हा एकमेकींना विचारायचो कोनसी सब्जी है आज? "वोही बोअर" असे म्हणायचो आणि हासायला लागायचो.  अगदी तसेच हासणे आज झाले आणि मन भूतकाळात गेले.  तिला सांगितले मी की मी डेंटनच्या दिवसांबद्दल लिहायला घेतले आहे पण आता वेळ होत नाही म्हणून लिखाण मागे पडले आहे.







सॅक अँड सेव्ह हे अमेरिकेत पाहिलेले पहिले स्टोअर म्हणून याबद्दल जरा जास्तच आपुलकी आहे. तिचे घर या दुकानापासून लांब होते आणि आमच्या घरापासून खूप जवळ त्यामुळे मी सॅक अँड सेव्हला बरेच वेळा जायचे. सॅक अँड सेव्हच्या बाजूला एक बांगला देशी दुकान होते. एके दिवशी तिथे पॉकेट ट्रान्सिस्टरचा सेल होता. ९९ सेंट ! तो माधवीला हवा होता आणि तिचे घर खूप लांब होते म्हणून तिने मला तो रांग लावून घ्यायला सांगितला होता.  मी सकाळी ७ ला तिथे गेले आणि तो घेतला. ती माझ्या घरी तो न्यायला आली तर मी तिच्याकडून पैसे घेतले नाहीत. तिला म्हणाले हा माझ्याकडून तुला भेट ! तिला खूप आनंद झाला. ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेले होते. माधवीने याबद्दल मला फोनवरून सांगितल्यावर मला खूप आनंद झाला. अजूनही तो ट्राँझिस्टर तिने जपून ठेवला आहे ! डेंटन मधल्या आठवणी एकेक करून सविस्तर लिहीनच वेळ मिळेल तसा पण तूर्तास इतकेच. कारण की मी माज माधवीला फोन केल्यावर बोलले आणि मला राहवेना. मनातले उतरवले.

 

Saturday, March 14, 2015

१४ मार्च २०१५


आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला हवी. काल सकाळी उठले तेव्हाच जरा डोके जड झाले होते. याचे कारण हवा. ढगाळी हवा, शिवाय अधून मधून उन्हे. स्प्रिंग सुरू झाला आहे याची चाहूल लागली होती. झाडांवर पांढरा शुभ्र बहर दिसत होता . काल वालमार्टला जायचे ठरवले. सकाळी स्वयंपाक असा काही नव्हताच. आदल्यादिवशीची भाजी उरली होती. दोनच पोळ्या होतील इतकी कणीक उरली होती म्हणून फक्त मुडाखी केली. जेवल्यानंतर वालमार्ट ला गेले. डोके दुखतच होते. पण मला हेअर कट करायलाच झाला होता. शिवाय विचार केला तिथेच जात आहोत तर ग्रोसरी पण करू. कट केला. आणि दुकानात इकडे तिकडे जरा फिरले. सपाता दिसल्या. वेगवेगळ्या रंगांच्या छान दिसत होत्या. शिवाय मला एक टॉप खूपच आवडून गेला. त्याचा रंग फिकट पिवळा आणि त्याला उडत्या बाह्या होत्या. सपाता आणि तो टॉप मनात भरून राहिले आहेत. घेतले नाहीत पण आता उद्या मुद्दामहून दुकानात जाऊन दोन्ही घेणार असे ठरवले आहे इतके मनात भरले आहेत. हेअर कट पण छान झाला. घरी आले आणि परत डोके खूप दुखायला लागले. हवा चांगली नव्हतीच. मग रात्री जेवायला बाहेर गेलो तेव्हा जरा परत मूड बदलला.





कालच ठरवल्याप्रमाणे आज वडा सांबार आणि गाजर हलवा केला. सकाळी उठल्या उठल्या सुरवात केली. सबंध दिवस आज तेच खाणे झाले. रात्री डिनरलाही तेच. असे मी पूर्वी दर पंधरा दिवसांनी करायचे. काहीतरी वेगळे. आजही ढगाळ हवा आणि बराच पाऊस. पण आज हवेत गारवा अजिबातच नाहीये. संध्याकाळी नेहमीच्या तळ्यावर चालायला गेलो आणि एकदम मूडच बदलून गेला. उत्साह आला. तळ्यावर फिरताना आज छान वाटत होते. तळ्यावर झाडी खूप आहेत. ढगाळ हवा होती आणि पाऊस पडून गेला होता. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार झाले होते. चालायचा रस्ताही ओलाचिंब होता. वेलींवर पावसाचे थेंब अलगद बसले होते. या तळ्यावर अनेक प्रकारची झाडे व झुडुपे आहेत. शिवाय अनेक वेलीही आहेत. हिरव्या रंगाच्या कितीतरी छट इथे बघायला मिळतात. शिवय वाळलेली झाडे, वेली, गवताच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या रंगाच्या, पिवळ्या, चाकलेटी झालेल्या असे बरेच काही वेगवेगळे सीझन प्रमाणे बघायला मिळते. तळ्याभोवती अशी एक गोल चक्कर, साधारण दीड मैलाची होते. थोडी उंच सखल चाल होते. त्यामुळे थोडा व्यायाम पण होतो. आजचे चालणे खूप सुख देऊन गेले. आज एक जमिनीवरच जे गवत उगवले होते त्याची पाने एखाद्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे उगवली होती. त्याचा फोटो घेतला आहे. निसर्ग किती सुंदर आहे ना ! तर एकूणच आजचा दिवस वेगळ्या पदार्थांमुळे व फिरण्यामुळे छान गेला. रंगीबेरंगी बघितलेल्या सपाता आणि लिंबू कलरचा उडत्या बाह्यांचा टॉप अजूनही डोळ्यांसमोरून हालत नाही . उद्या घेणारच !

Sunday, March 08, 2015

८ मार्च २०१५

 
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे ३ दिवसांची मिळून लिहायला पाहिजे. कारण की मला उत्साहाचे उधाण काहीवेळा येते. आजचा दिवस तर खूपच वेगळा गेला याचे कारण की आज आम्ही आजचा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहिले. झडझडून खूप चाललो. रोजनिशी लिहायला खरे तर अजिबात त्राण नाहीये पण ती लिहल्याशिवाय माझा उत्साहाची पूर्तता होणार नाही म्हणून लिहित आहे.




हल्ली इतर चमचमीत खाणे किंवा सण सुद्धा अगदी होतोच असे नाही. वेळ मिळाला , उत्साह असला, तरच असे काही केले जाते. पुर्वी मी दर १५ दिवसांनी इडली सांबार करायचे. बाकी इतर रगडा पॅटीस , भेळ , समोसे सुद्धा केले जात. पण आता होत नाही आणि वेळही नाही. काही कारणास्तव मी खूप बिझी झाली आहे. तर शुक्रवार पासून उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी संध्याकाळी खायला बरेच महिन्यानंतर ओली भेळ केली होती. चविष्ट भेळ खाऊन समाधान झाले. होळीची पुरणपोळी शनिवारी केली. सणाचे ताट सजवले व पुरण्पोळी पण चविने खाल्ली. त्यामुळे शनिवारही छान गेला. मुख्य म्हणजे दोन दिवस हवा खूपच छान आहे. हवा छान असली की चला, बाहेर पडा आणि पाहिजे तितके हिंडून घ्या असे होते. नाहीतर थंडीने चालणे बंदच होऊन जाते. चालणे बंद की कोणत्याही कामाला उत्साहच येत नाही.




आज सकाळचा सूर्योदय पहायचा असे काल रात्रीच ठरवले होते. जाग आली आणि समुद्रकिनारी जाऊन पोहोचलो. सूर्योदय पाहताना इतके काही छान वाटते ना की ते शब्दात नाही सांगता येणार. प्रत्येक वेळी सूर्योदयाचा अनुभव वेगळा असतो. आज सूर्याची किरणे फोटोत खूपच छान आली आहेत. घरी आलो. चहा घेतला. आज कलर करायला पण मुहूर्त मिळाला. बाहेर जेवायला गेलो. संध्याकाळी नदीवर जाण्याचे ठरवले. नदीवर पण बरेच महिन्यांनी गेलो आणि अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चालायचे ठरवले. स्वच्छ सुंदर हवा होती. सूर्यास्त पाहिला आणि घरी आलो. २ दिवसात बरेच चालणे झाले.



एकूणच काय ३ दिवस लागोपाट बरेच काही ना काही झाले. वीकेंड हवेमुळे आणि अंगात शिरलेल्या उत्साहामुळे सार्थकी लागला असे म्हणता येईल. हा उत्साह का आला बरे ? ते फक्त माझे मलाच माहीत आहे !



आजच्या सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची किरणे छान आली आहेत. दुसर म्हणजे आज आमच्या सावल्याचे फोटोही छान मिळाले. ली रंगरला मी सुर्योदयाचा फोटो पाठवीन. बघू तो केव्हा दाखवतो ते ! आजचा दिवसाचा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहण्याचा योग आला आणि म्हणूनच तर आजचा दिवस वेगळा आणि लक्षात राहील असा गेला. आमच्या गावी सूर्योदय समुद्रकिनारी होतो आणि सूर्यास्त नदीवर होतो.