दिवाळी आली की लग्नसमारंभासाठी जशी तयारी करतो अगदी तशीच असते ना ! मुहूर्त साधायचा तो अभ्यंग स्नानाचा, लक्ष्मीपूजनाचा. भाऊबीज आणि पाडव्याची वाट पहायची ती भेटवस्तू कशी असेल याची ! दिवाळी आली की प्रत्येकाच्या मनात लहानपणी अनुभवलेली दिवाळी आठवते. डोळ्यांनी साठवून ठेवलेली असते ना ! त्या दिवाळीचे रूपच वेगळे होते. मातीच्या अंगणातली ठिपक्यांची रांगोळी. त्या रांगोळीची किती ती तयारी. बाजारातून रांगोळी आणि वेगवेगळे रंग आणून ठेवायचे. रांगोळीच्या पुस्तकातील कोणती रांगोळी कोणत्या दिवशी काढायची, त्यात रंगसंगती कशी ठेवायची याचे वेध लागतात. रांगोळी काढताना बहिणीला विचारायचे कोणता रंग चांगला दिसेल ग या रंगासोबत? पहाटे पहाटे मधूमामा यायचा आमच्या घरी. आईने बजावलेले असायचे उद्या लवकर उठा बर का मुलींनो ! थंडीत लवकर उठताना दार थोडे जरी किलकिले असले की कुडकुडायला व्हायचे. आई पहाटे ३ लाच उठायची. उटणे तयार करायची. सुंगंधी वासाचे तेल, उटणे, पाट, पाटाभोवती रांगोळी. बोलावायची एकेकाला उटणे लावून घ्यायला. या सुगंधी तेलाचा रंग लाल किंवा हिरवा असायचा. मोती साबणाला आलटून पालटून निरखून पहाणे व्हायचे. सगळ्यांच्या अंघोळी काळ्याकुट्ट पहाटेच्या अंधारात व्हायच्या. बंबातले कडकडीत पाणी अंगावर घेताना खूप छान वाटायचे ! आमच्या दोघींचे केस लांब. त्यामुळे शिकेकाई उकळलेली असायची. प्रत्येकाच्या अंघोळीत त्याला फुलबाजी ओवाळली की घराला एखाद्या राजदरबारासारखे रूप यायचे. सकाळी उजाडायच्या सुमारास आई अंघोळीला गेली की ती आम्हाला सांगायची की सगळा फराळ ताटामध्ये काढून ठेवा. आईची अंघोळ झाल्या झाल्या आई साजूक तूपातला गोडाचा शिरा करायची. सोबत बटाट्याची भाजी. देवाची पूजा करून निरांजन लावायची व नैवेद्य दाखवायची. तोपर्यंत आम्ही दोघी बहिणी नवीन फ्रॉक घालून, कानातले गळ्यातले घालून तयार झालेले असायचो. पहाटेच्या अंधारात पणत्यांनी घर लखलख चंदेरी व्हायचे.फराळ झाला की सगळ्यांच्या डोळ्यावर पेंग यायची. बाहेर फटाक्यांचे धुमधडाके!
फटाक्यात मला लवंगी फटाका खूप आवडायचा. त्यावर लाल आणि हिरवे वेष्णट असायचे. भुईनळे तर फारच सुंदर दिसायचे. त्यातही त्रिकोणी आकाराचा आणि वाटाण्यासारखा गोल होता. वाटाण्यासारखा गोल भुईनळा खूप वेळ उडायचा. याची शोभा काही न्यारीच ! टिकल्या वाजवायला आम्ही दोघी हातोडा वापरायचो. टिकली वाजल्याने पण खूप दचकायला व्हायचे. फुलबाजीमध्ये तडतडी मला नाही आवडायची. साधी खूपच प्रिय होती. संध्याकाळी फटाके उडवायचो तेव्हा फटाक्यांचा उडवलेला पसारा साऱ्या अंगणभर पसरायचा. लक्ष्मीपूजनासाठी करकरीत कोऱ्या नोटा खूप छान दिसायच्या ! या कोऱ्या नोटा बाबा अतिशय जपून ठेवायचे दरवर्षी पुजण्याकरता. भाऊबीज तर खूप दणक्यात व्हायची आमच्या घरी ! आईचे ८ भाऊ, ८ वहिन्या, त्यांची मुले म्हणजे आमचे मामे भाऊ आणि बहिणी. असे सर्व जण आमच्या घरी जमायचे! त्यावेळेला भाऊबीजेत मिळालेले ४, ८ आणे असायचे. खूप किंमत होती या आण्यांना ! सर्व जमून जितकी भाऊबीज होईल त्यात आम्ही बहिणी खूपच खुश व्हायचो ! आई फराळाचे करायची ते अगदी मुबलक प्रमाणात. मोठे पत्र्याचे डबे होते. काही गोल तर काही चौकोनी. यात सर्व फराळ असायचा. येता जाता डब्याचे झाकण उघड आणि चकल्या खा, कडबोळ्या खा. चिवडा घेताना त्यात खवलेला ओला नारळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असली की चिवड्याची लज्जत अजूनच खूप वाढायची. लाडू बिचारे कोपऱ्यात बसलेले. त्यांना विशेष कोणी विचारत नसे. कोरड्या खोबऱ्याचे सारण असलेली करंजी तर सर्वांचीच लाडकी होती.
त्यावेळी शेजारीपाजारी फराळाचे ताट देण्याची पद्धत होती. त्यात घरी केलेला सर्व फराळ असे. घरोघरी केलेला फराळ सर्वत्र पोहोचायचा. दिवाळी संपल्यावर काही दिवसांनी उरलेला फराळ असायचा. त्याकरता आई ग्रुप ग्रुपने बोलवायची. फराळासोबत दही मिसळ किंवा रगडा पॅटीस असायचा. चमचमीत खाल्यावर थंडाव्याला दही भात ! अश्या रितीने खरी दिवाळी संपायची. पुढल्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत कोणतेच पदार्थ कुठेही दिसायचे नाहीत आणि त्यामुळे दिवाळीचे अप्रुप होते. अशी ही दिवाळी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली आहे. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ! Rohini Gore