सरळ सरळ रस्त्याने मार्गक्रमणा होती. खूप नाही तरी वाहतूक होती त्यामुळे अजिबात कंटाळा आला नाही. महामार्ग८१ नॉर्थवर दुनियाभरचे ट्रक दिसले. नुसते दिसले नाही तर त्यांनी उच्छाद मांडला होता. दोन्ही लेनमध्ये ट्रक आणि कार्स तुरळक. डाव्या लेनमध्ये ट्रक असतानाकार कशी काय वो हाकायची भरभर ! आजूबाजूला पाहिले तर पठारेच्या पठारे लागत होती. त्यावर निसर्गाने रंग भरले होते. हिरव्या रंगांच्यानानाविध छटा रेखाटल्या होत्या. त्यावर छत्रीसारखे निळेशार आकाश पांघरलेले दिसत होते. दृश्य नयनरम्य होते. सुरवातीला महामार्ग २६ होता पण तो इतका खतरनाक असेल असे वाटले नव्हते. टेनेसी मधून गेलेला हा रस्ता वळणे घेत जात होता.
आजूबाजूला मोठाल्या कडाकपाऱ्या. जरासे घाबरायलाच झाले. जिपिएस वर रस्ता नीटच दाखवत होते. शिवाय मोठ्या नकाशावरही पाहिलेहोते. मॅपही घेतला होताच पण तरीही गॅसची एक्झीट दिसायला तयार नाही. संध्याकाळ होत आलेली. रस्ता संपायलाच तयार नाही. ८० मैल गेल्यावर महामार्ग ८१ ची एक्झीट दाखवत होते. आणि जवळ जवळ सर्व प्रवास ८१ वरच होता. नंतर शेवटचे २ महामार्ग होते. पण त्यावर थोडासाच प्रवास. शेवटी एकदाचे महामार्ग ८१ वर लागलो आणि हायसे वाटले.
हॅरिसनबर्ग नावाच्या शहरात एका रात्रीपुरते होटेल बुक केले होते. होटेलमध्ये पोहोचेपर्यंत रात्र होऊन गेली. हॉटेल रूमचा ताबा घेतला.पोळी भाजी खाल्ली आणि झोपी गेलो. प्रचंड दमायला झाले होते. गुरूवारचा ६ तासाचा प्रवास करून शुक्रवारी पण ६ तासाचा प्रवास करायचा होता. बुधवार गुरूवारी तर युद्धपातळीवर कामे केली आणि गुरूवारी सकाळी उठून सज्ज झालो. तरीही बारीक सारिक राहिलेली कामेउरकावी लागली. मुव्हींग म्हणले की शेवटपर्यंत कामे करावीच लागतात. निरानिपटी कानाकोपऱ्यातून सर्व संसार गोळा करून तो बॉक्सेस मध्येआणि इंडियातून सुरवातीला आणलेल्या ४ बॅगात पद्धतशीरपणे मांडावा लागतो. मूव्हर्स आणि पॅकर्स बोलवतोच कारण सुरवातीला घेतलेलेफर्निचर इतके काही जड आहे की ते आमच्याने उचलणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
मुव्हर्स वाले अगदी वेळेत आले. त्यांचीच घाई चालली होती. ते म्हणाले आम्ही आत्ता निघतो आणि मध्यरात्रीत सामान टाकतो तुमच्या नव्याघरी. आम्ही म्हणालो अरे हो, आधी जागा तर ताब्यात मिळू द्या. ती आम्हाला शुक्रवारी मिळणार आहे आणि आम्ही रात्री होटेल मध्ये थांबूनदुसऱ्या दिवशी निघून दुपारपर्यंत पोहोचणार आहोत. नंतर हासायला लागले. तिघे होते. तीनही लोक्स अरेबिक. त्यांनी केलेली घाईआमच्या पथ्यावरच पडली. कारण आम्हाला सामान शनिवारी मिळेल असे सांगितले होते. मग आम्ही शुक्रवारचे एनवाय मधले होटेलचे
बुकींग रद्द केले. केबलचे मॉडेम विनायक देवून आला. निघताना अपार्टमेंटच्या ऑफीस मध्ये शेवटचे १ महिन्याचे अधिक भाडे भरून किल्ल्या देवून, जरूरीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि कार सुरू केली. जाताना टायर मध्ये हवा भरली. कारण की थंडीमध्ये टायर मधली हवा कमी होते. पेट्रोल भरले. आणि इंगल्सचे आणि आमच्या घराचे शेवटचे दर्शन घेऊन निघालो. प्रचंड थंडी होती.
क्रमश : ... Rohini Gore