Tuesday, November 30, 2021

आठवणी खिडकीच्या (१)

 

खिडकी म्हणलं की खिडकीतून बाहेर बघणं आलचं. तर अश्याच या खिडक्यांच्या आठवणी. मी आता जिथे रहाते तिथे स्वयंपाकघराला लागूनच एक खिडकी आहे. खिडकीला लागूनच डायनिंग टेबल आहे त्यामुळे काही खाताना किंवा जेवताना घरबसल्या खिडकीबाहेरील करमणूक पहाता येते. खिडकीबाहेर एक मोठे पटांगण आहे जिथे मुले खेळत असतात. उन्हाळ्यात संध्याकाळी पटांगण भरलेले असते. मोठी माणसे, छोटी मुले/मुली दिसतात. कोणी क्रिकेट खेळत असते तर कुणी चेंडू. बाकड्यांवर काही बायका/माणसे बसलेली दिसतात. घसरगुंडी/झोपाळ्यावर मुले खेळतात. खारी इकडून तिकडे धावताना दिसतात. उंच मानेच्या बदकांचा थवा येतो सकाळी सकाळीच. या बदकांना इथे राहणारी माणसे भात/ब्रेड घालतात. या बदकांना हिवाळ्यात अन्न कमी पडते. तेव्हा मी पण त्यांना ब्रेड खायला घालते. पाऊस पडला की मात्र कोणीही या पटांगणात फिरकत नाही. पक्षी मात्र गवतात मान घालून काही ना काही वेचून निवांतपणे खात बसतात. स्नो पडला की पटांगण पूर्णपणे पांढरे शुभ्र होऊन जाते. इथे झाडेही आहेत त्यामुळे स्नो पर्णहीन फांद्यांवर लटकताना दिसतो. बाकड्यांवर स्नोचा मोठाच्या मोठा थर जमा होतो. स्नो मध्ये बरीच माणसे/बायका/लहान मुले चालतात आणि एकमेकांवर स्नो उडवतात. चालल्यामुळे अनेक बुटांचे वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईनचे छाप स्नो वर उमटतात. इथे जेव्हा प्रचंड थंडी सुरू होते तेव्हा मात्र कोणीही दिसत नाही. मोकळे पटांगण बघताना मन निराश होते.