Showing posts with label रोजनिशी २०१२. Show all posts
Showing posts with label रोजनिशी २०१२. Show all posts

Thursday, February 02, 2012

२ फेब्रुवारी २०१२

काल लायब्ररीत जाऊन आल्यामुळे आज जायचे नव्हते, म्हणजे मी एक दिवसा आड बाहेर जाते, ते सुद्धा हवेवर व तब्येतीवर अवलंबून ठेवते, पण शक्यतोवर बाहेर पडते. काल सोनी चॅनलवर पाहिलेला पाकिजा व त्यातील गाणी आज मनात होती. झी मराठी आणि सोनीवर असलेल्या २-३ मालिका मी सध्या घरी असले तर दुपारच्या चहा घेताना पाहते. सकाळी मालिका पाहणे होत नाही. आज सारेगम असल्याने सकाळी ऑनलाईन झी मराठी पाहणे झाले. पूर्वी जी सारेगम झाली होती म्हणजे प्रसाद ओक, सुनील बर्वे आणि असेच काही कलाकार होते. त्यांची जास्त छान झाली होती सारेगम. आत्ताची जास्त छान वाटत नाहीये. ४० प्लस सारेगमचा शेवटचा सोहळा तर आम्ही चौघांनी मिळून खूपच एंजॉय केला होता. आम्ही दोघे व मित्रकुटुंबातील दोघेजण.









आज बिनसण्याचा वार होता बहुतेक. तसे खूप काही बिघडले नव्हते पण अगदी माझ्या मनासारखे झाले नाही की ते नेहमी बिघडल्यासारखेच असते. युट्युबवर गाणे रेकॉर्ड करताना मी नेहमी वेबकॅम मधून जे रेकॉरडिंग असते त्यातून करते. ते काही केल्या होत नव्हते. खरे तर पिसीवरच्या माईकमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. कदाचित युट्युबमध्येच असेल. दोन चार दिवसापासून काही गाणी मनात घोळत आहेत त्यापैकी एक डिजिटल कॅमवर रेकॉर्ड करून मग ते युट्युबवर अपलोड केले. हे खरे तर मी करत नाही. पूर्वी करायचे. अपलोडला खूप वेळ लागतो. २ ते ३ तास म्हणजे खूपच झाले. त्यात मी परवा बदामाची केलेली पावडर होती त्याच्या वड्या करायच्या ठरवल्या. त्यालाही वेळ लागला. एवढे करून वड्या पडल्याच नाहीत. परत तसाच गोळा एका डब्यात भरून ठेवला.









आज साबुदाणा भिजत घातला होता तो खिचडीसाठी. नेहमी नेहमी खिचडीच होते म्हणून आज साबुदाणे वडे केले पण तेही मनासारखे झाले नाहीत. या सर्वामध्ये दुपारचा चहा प्यायचा राहून गेला. तो नंतर केला तर तोही बिघडला. आज काय चालले आहे. काहिच धड होत नाही. आजकाल आमच्या अपार्टमेंटच्या मॅनेजर बाईंनी असा फतवा काढला आहे की बदकांना जर ब्रेड घालायचा असेल तर तो तळ्यावर जाऊनच घालायचा. अपार्टमेंटच्या समोर बदके दिसली तरी घालायचा नाही. बदकांना तर माझी इतकी सवय झाली आहे की दार उघडले आणि समोरच्या हिरवळीवर असतील तर लगेच चालत चालत येतात. पूर्वी तळ्यावर २ तास कसे निघून जायचे कळायचे नाही. सर्व बदकांमध्ये मला बसकी तपकिरी रंगाची बदके खूप आवडतात. तीच फक्त पूर्वी होती. आता तर खूपच झाली आहेत. ते पूर्वीचे दिवस खूप छान होते. आज थंडी अजिबात नसल्याने दार उघडे ठेवले होते. बदके सारखी येत होती. शेवटी न राहवून ब्रेड घेतला आणि तळ्यावर गेले. पण मला आवडणाऱ्या बदकांना ब्रेड जास्त मिळाला नाहीच. मला आवडणाऱ्या बदकांची संख्या कमी झाल्याने आता मी तळ्यावर ब्रेड घालायला जात नाही. अगदी क्वचित जाते.






अगदीच नाही म्हणायला त्यातल्या त्यात गाणे बऱ्यापैकी झाले आहे. प्रत्येक दिवस नाहीतरी वेगळाच असतो नाही का?

Wednesday, January 18, 2012

१८ जानेवारी २०१२

आज सकाळी उठल्यावर बाहेर पाहिले तर बराच पाऊस पडून गेलेला दिसत होता. रस्ते ओले होते. पावसाळी हवा होती. चहा झाल्यावर मागच्या बाल्कनीत जाऊन पाहिले तर तिथे बदके जमली होती. पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये चोची घालून काहीतरी वेचून खात होती. विचार केला आताच त्यांना ब्रेड खायला द्यावा. आजकाल मी तळ्यावर बदकांना ब्रेड घालण्यासाठी जात नाही. त्यांना आता माहिती झाले आहे मी ब्रेड घालते ते त्यामुळे बदके सकाळ संध्याकाळ अपार्टमेंटच्या समोर आलेली दिसतात. त्यात हिवाळा असल्याने सीगल्स पक्षी पण असतात. हे सीगल्स तर मला खूपच आवडतात. निष्पाप असतात. ब्रेड खाण्यापेक्षा ते उड्याच जास्त मारतात. गोंगाट करतात. त्यांचा गोंगाट ऐकायला खूप छान वाटते.







आज सकाळी जी पावसाळी हवा होती ती अगदी पुण्यात पाऊस पडून गेल्यावर कसे वाटते अगदी तसेच वाटत होते. पावसाळी हवा, ढगही होते, अधुनमधून पाउसही झिमझिमत होता. जास्त गारवा नाही की उकाडाही नाही. थंडी असली तरी सुद्धा काही वेळेला ती खूपच जास्त पडते नाहीतर झेपेल इतपतच पडते. आज ठरवले होते लायब्ररीत जायचे. रोज मी युट्युबवर गाणी बघतच असते, अगदी काही वेळेला बरे नसेल किंवा मूड नसेल तर बघत नाही. आज आणि अजून काही दिवस मीठे बोल बोले हे किनारा चित्रपटातले गाणे मनात घोळत राहणार. असेच होते माझे. काही वेळेला काही गाणी बघितली की काही दिवस खूप घोळत राहतात. मागच्या आठवड्यात आज कुणीतरी यावे हे गाणे घोळत होते. पूर्वी रेडिओवर ऐकले होते पण जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हा परत परत ऐकावेसे वाटले इतके अफलातून गाणे आहे. चित्रीकरण पण छान आहे. तसेच कालचे किनारा मधले गाणे "मीठे बोल" असेच आज दिवसभर मनात घोळत होते. या गाण्यात तर सर्व काही छान आहे. हेमामालिनीचा नाच, गाण्याची चाल, ती नाचते तो बंगला, बाहेर जो निसर्ग आहे तो तर लाजवाब आहे. हिरवीगार झाडे. एकूण काही वेळेला असे सगळे काही जमून आले की छान वाटते. गाणे बघताना असे वाटले असा छान बंगला असायला हवा. अशी मोकळी जागा नाचायला हवी. मला पण असे मनसोक्त नाचायला आवडेल. गाण्याप्रमाणे नाच शिकण्याची आवड अपूर्ण राहिली. माझी आई मला सांगते की मी लहानपणी रेडिओवर गाणे लागले की नाचायचे आणि जशी सूचेल तशी ऍक्शनही करायचे. मलाही आठवते. हा किनारा चित्रपट मी माझ्या शैला नावाच्या मैत्रिणीबरोबर पाहिला होता.







आज लायब्ररीतून येताना बसमध्ये चक्क गर्दी होती. आजचा दिवस छान गेला. संध्याकाळी क्लेम्सनमधल्या आठवणी आल्या. क्लेम्सनमध्ये मी मनसोक्त बसने जायचे. सुरवातीला असाच वेळ घालवण्यासाठी. नंतर नोकरीनिमित्ताने. ही नोकरी पण घरापासून चालत जाण्यासारखीच. पण मी बसने जायचे. शिवाय बुधवारी संध्याकाळी चर्चला जायचे नोकरीसाठी तेव्हाही बसने जायचे. येताना चालत यायचे. खूप छान होते ते दिवस. रविवारी सकाळी पण चर्चची नोकरी. क्लेम्सनचे दिवस खरच खूप छान होते. नोकरी केली की घरकाम करायलाही उत्साह येतो. अशी एखादी नोकरी हवी. अर्थात नोकरी नसली तरी लायब्ररीचे काम करायला जातेच. पण तरिही मुद्दामून उठून बाहेर जाणे आणि कामानिमित्ताने बाहेर जाणे यात फरक आहेच. नोकरी असली की टापटीप राहणे होते. घरातल्या कामाचेही प्लनिंग होते. उत्साह येतो. खरे तर ठरवले तर रोजच्या रोज लायब्ररीत जाता येईल, पण थंडी असल्याने बाहेर पडायला नको वाटते. एकदा का घरी बसण्याची सवय झाली की खूप आळस अंगात शिरतो. अगदी तसेच झाले आहे माझे!