आपण बाळाला कसे दुपट्यात गुंडाळतो ना अगदी तसेच मुव्हर्सवाल्यांनी
आमच्या सर्व लाकडी सामानाला गुंडाळले आणि वरून कॅरीबॅग सारख्या
लांबीरुंदीने असणाऱ्या चिकटपट्या लपेटल्या. प्रत्येक लाकडी सामानावर जाडीने
कमी असलेल्या दुलया गुंडाळून चिकटपट्याही त्यानी सर्व बाजून गुंडाळून
लावल्या. त्याकरता त्यांनी प्रत्येक लाकडी सामानाच्या बाजूने अनेक
प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालता घालता एका हातात काळ्या
चिकटप्ट्यांची भलीमोठी गुंडाळी होती आणि अश्या तऱ्हेनेच ते चिकटपट्या
चोहोबाजूंनी गुंडाळत होते. एक तसूभरही जागा त्यांनी गुंडाळताना सोडली नाही
इतके घट्ट गुंडाळले. बरोबर ९ वाजता तीन माणसे आली आणि ट्रक मध्ये सामान
भरण्यासाठीची आधीची तयारी केली. त्यात एक जण कागदपत्रांचे सोपस्कार करत
होता. तर एक जण मी तयार केलेल्या बॉक्सेस वर स्टीकर चिकटवत होता. एक जण
लाकडी सामानाला गुंडाळायला लागणाऱ्या चादरी, चिकटपट्या वर आणून देत होता.
मी २२ बॉक्सेस जय्यत तयार करून ठेवले होते जेणेकरून सामान नेणाऱ्या
माणसांचा खोळंबा व्हायला नको. काही बॉक्सेस मी जिथे नोकरी करते तिथून
आणल्या होत्या
तर काही वालमार्ट मधून आणल्या होत्या. बॉक्सेस काही लहान, तर काही मध्यम आणि मोठ्या आकाराच्या होत्या.
सर्वात आधी मी माझ्या आठवणींची बॉक्स बनवली. त्यात स्मृती ब्लॉग मधले आधी
वहीत लिहिलेले लिखाण होते. अश्या बऱ्याच वह्या, मी कॉलेजमध्ये असताना २
सेमेस्टर केल्या होत्या त्याच्या उत्तरपत्रिका आणि गृहपाठ, साध्या कॅमेराने
काढलेल्या सर्व फोटोंच्या प्रती, काही शुभेच्छापत्रे आणि बरेच काही होते.
एकेक करत बॉक्सेस बनवत होते. प्रत्येक बॉक्स मी काही जड आणि काही हलक्या
सामानाने भरत होते. सर्व बॉक्सेस मी नुसते भरून ठेवले होते तर काही भरून
त्यावर दणकट चिकटपट्या लावून त्यावर शार्पी पेनाने बॉक्स नंबर लिहिला आणि
त्यात अगदी काही महत्त्वाचे असेल तर त्यांची नावे लिहिली आणि शिवाय बॉक्स
क्रमांक आणि त्यामध्ये काय आहे याची एक वेगळी यादी वहीत उतरवत होते. काही
बॉक्सेसची दारे मुद्दामहूनच उघडी ठेवली होती म्हणजे नेमके अगदी त्यातलेच
काही आयत्यावेळेला लागले तर परत सर्व चिकटपट्या उचकटायला नकोत. तसे तर अगदी
शेवटी शेवटी झालेही. मला कूट करायला दाणे हवे होते ते नेमके एका बॉक्स मध्ये बांधले गेले होते.
सर्व बॉक्सेस तयार होण्या आधी जे सामान आमच्याबरोबर बाळगायचे होते
त्याच्या बॅगा तयार करून ठेवल्या. त्यात सर्व महत्त्वाची कागदपत्रे काही
कॅश, पेन, गुगल मॅप, जिपीएस, दुसऱ्या जागेत गेल्यावर घरात घालायचे ४ कपडे,
टुथब्रश, टूथपेस्ट, कंगवा, गरम जाकीट, मफलर, डेबिट क्रेडीट कार्डे, चेकबुके
इ. इ. औषधे, अपार्टमेंटची किल्ली की जी जाताना द्यावी लागते. किल्ली दिसेल
अश्या जागी ठेवली. तरी निघताना थोडा गोंधळ झालाच. सरतेशेवटी ट्रक गेल्यावर
आम्ही आमचे सामान कारमध्ये ठेवायला लागलो. नेमकी मी अपार्टमेंटची किल्ली
जाकीटाच्या बाजूच्या खिशात ठेवली आणि ती कारपाशी पडली. किल्लीने दार बंद
करू म्हणून जाकीट मध्ये हात घातला तर किल्लिच नाही. जिन्यातून किल्ली
शोधण्यासाठी २ फेऱ्या झाल्या. रिकाम्या घरात पण घरभर नजर फिरवली. कामात काम
वाढले म्हणून भयंकर चिडचिड झाली आणि थोडे घाबरायला झाले. तोंडातून शब्द
निघाले आता ही किल्ली कुठे गायब झाली?
:D
बॉक्सेस मध्ये प्रिंटर्स, उशा, दुलया, तांदुळाचे पोते की जे नुकतेच घेतले
होते. चपला बुटे, स्वयंपाकाची भांडी, किराणामाल, कपडेही. जास्तीत जास्त
कपडे मी इंडियातल्या बॅगांमध्ये ठासून भरले होते.
:D
इंडियावरून आणलेली एक बॅग मोडली होती. पण बाजूचे खटके जिवंत होते. सामान
भरण्यासाठी मला ती दोन वेळेच्या स्थलांतरात उपयोगी पडली. यावेळेला
फेकाफेकीचे काम खूपच कमी होते कारण विल्मिंग्टनवरून दुसऱ्या शहरात जाताना
आम्ही बरीच फेकाफेकी केली होती.मूव्हींगच्या तयारीला एकेक दिवस थोडे थोडे करत आवरते घेतले तरी शेवटच्या २ दिवसात तर सगळे घेतले ना? म्हणून कपाटे उघडून तपासावीत तरी त्यात काही ना काही राहिलेलेच होते.. आता हे कुठे ठेवायचे ?
उरलेले सर्वच कुठल्यातरी जागा असेल त्या बॉक्स मध्ये ढकलून द्यायला लागते.
तरीही नुसती जागा रिकामी असून चालत नाही. ते तिथे नीट बसवायलाही लागते.
जागेचा अंदाज घेऊन काही उभे तर काही आडवे ठेवायला लागते. अगदी निघायच्या
दिवशी काही काही फेकूनच द्यावे लागते. कोण घेणार ते? निघायच्या आधीच्या
आठवड्यात जे आणले होते ते एकेक करत संपवत होतो. पोळी भाजीचा डबा घेतला
त्यात मिक्स भाजी केली. त्यात फ्लॉवर, टोमॅटो, फ्रोजन मटार, कांदा, सिमला
मिरची अशी मिक्स भाजी केली तरी सुद्धा उरलेल्या भाज्या फेकल्या. काही बटाटे
फेकले. ज्युस, पाणी, दुध जितके पिता येईल तितके प्यायले. शेवटी उरलेले टाकून दिले. उरलेल पाणी मात्र बरोबर घेतले. Rohini Gore क्रमश : .....