आम्ही दोघी बहिणी, आमच्या दोन मावस-आत्येबहिणी आणि एक छोटी आत्या असे सर्व मिळून आम्ही नाशिकच्या मावस आत्याकडे राहायला गेलो होतो मे महिन्याच्या सुट्टीत ! आम्हां दोघी बहिणींना आईबाबांना सोडून
नातेवाईकांकडे रहायची सवय नव्हती. मी त्यावेळेला ९ वी मध्ये होते आणि माझी
बहिण ७ वीत होती. शाळेत असताना आम्ही दोघी बहिणी पुण्यामध्ये म्हणजेच
गावात राहणाऱ्या २ मामांकडे एक दोन वेळेलाच रहायला गेलो होतो. पण पुणे
सोडून दुसऱ्या गावाला रहायला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. खरे तर आम्ही
नको नको म्हणत होतो. पण छोटी आत्या म्हणाली चला की !
आमची एक दुसरी
मावस-आत्येबहिण ती पण तिच्या मावशीकडे पहिल्यांदाच रहायला जात होती. तिचे
नाव राणी. राणी आणि आम्ही दोघी म्हणजे मी आणि रंजना, आमच्या तिघींच्या
चेहऱ्यावर टेंशन होते. नाशीकच्या आत्याकडे गेलो पण तिथे पटकन रुळलो नाही.
आम्ही तिघी बाथरूम मध्ये जायचो आणि खूप रडायचो. आम्ही बाहेर आलो की सगळे
विचारायचे "काय गं काय झाले? डोळे एवढे लाल का दिसत आहेत? " आम्ही म्हणायचो काही नाही. मग आमच्या दोघींच्या (म्हणजे मी आणि माझी बहीण रंजना ) लक्षात आले की राणी पण बाथरूम मध्ये जाउन रडते. आम्ही तिला विचारले तू का रडतेस? तर म्हणाली मला आईची आठवण येते.आम्ही दोघी पण आईबाबांची आठवण येऊन रडायचो. मग एके दिवशी उजू आत्या (छोटी आत्या) तिने विचारले काय गं, इतके डोळे लाल का तुमचे? एवढे काय झाले रडायला, आईबाबांची आठवण येते का? आम्ही तीला तसे सांगितले. मग एकूण सगळ्यांच्याच लक्षात आले आणि आत्या, तिचे यजमान आणि बाकी दोघी बहीणी आणि छोटी आत्या यांनी आम्हा तिघींना सामावून घेतले. मग आम्ही पण गप्पा गोष्टीत रमू लागलो. त्या घरी काकांची एक छोटी लायब्ररी
होती. एका भिंतीमध्ये कोनाडे करून पुस्तके लावून ठेवली होती. ते बघून मला
आणि रंजनाला खूप आनंद झाला. मग रोज एकेक करत आम्ही दोघी पुस्तके वाचायला
लागलो. छोटी आत्या म्हणायची काय गं तुम्ही दोघी सारख्या वाचत असता? डोळे
नाही का दुखत तुमचे? चला बाहेर या अंगणात. आत्याचा मोठा बंगला होता.
आजुबाजूला आवार आणि मोठे अंगण. तिथे काका सकाळच्या अंघोळीचे पाणी तापवायचे.
८ दिवस राहिलो आम्ही. मजा येत होती. एके दिवशी आत्याने सगळ्यांसाठी
उत्तपे बनवले. एके दिवशी नाशिक दर्शनाला जायचे होते पण मला खूप ताप आला
होता. म्हणून घरी कोणीतरी थांबले होते माझ्या सोबतीला. पण मी दिवसभर झोपून
होते. एके दिवशी रात्री जेवणे झाल्यावर आमची एक मावस-आत्यबहीण म्हणाली की
चला आपण भेंड्या खेळू या. अंगणात भेंड्यांची मैफील खूपच रंगली. रात्री ९
वाजता भेंड्या सुरू झाल्या त्या पहाटे ४ वाजेपर्यंत. कुणावरही एकही
भेंडी चढली नाही. म्हणजे भेंडी जरी चढली तरी ती लगेच उतरवली जायची. या
भेंड्यांच्या कार्यक्रमात आमची एक मावस-आत्येबहीण म्हणाली की मी एकटी
विरूद्ध तुम्ही सर्व जण. ती आमच्या सर्वांच्यात मोठी होती. ती गायची,
त्यामुळे तिला गाणी पण बरीच माहीती होती. ती म्हणाली एक अट आहे गाणी सगळी
मराठी पाहिजेत. हिंदी अजिबात नकोत. आणि मला आणि रंजनाला तर हिंदी गाणी
जास्त माहीती होती. मग आम्ही म्हणालो ठीक आहे. मराठी गाण्यांची अट मान्य !
मग आमचा सामना अगदी अटीतटीचा झाला. आम्ही मराठी मध्ये लावण्याही म्हणल्या आणि आरत्याही !
आम्ही जरी रुळले होतो तरी पण आता उद्या आपण आपल्या घरी जाणार याचा आनंदही
होत होता. ८ दिवस खरच खूप मजेत गेले. निघण्या आधी अगोदरच्या रात्री आम्ही
काही बहिणी बाहेर फिरायला गेलो. त्यात थोडे गॉसिपही झाले. काय ते आठवत नाही
आता. घरी आल्यावर आम्ही दोघी खूप उत्साहात होतो. आणि आमच्या स्वयंपाकघरात
एक पाहुणा आला होता. तो पाहुणा म्हणजे हिंडालियमचा ओटा आणि त्याला जोडून
ताटाळे आणि कपबशाळे. आम्ही दोघींनी त्याचे खूपच कौतुक केले. आई म्हणाली काय
करू खायला? तर मी म्हणाले तिखटामिठाचा शिरा कर. मग आईने त्या ओट्यावरच तो
केला. मी त्या ओट्याच्या शेजारीच स्टुलावर बसले होते.
...........रोहिणी गोरे
का कोणजाणे पण ही आठवण इतक्या वर्षांनी गेले ४ दिवस माझ्या मनात घोळतेय. आज लिहून काढावेच म्हणले !