वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले की आम्हाला वेध लागायचे ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे. एप्रिल-मे सुट्टीत आमच्या घरी सगळ्या भावंडांचा(चुलत-मामे-मावस) अड्डा असायचा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ दिवसभर चालू असायचे. कॅरम खेळताना एका डावात एक मार्क असे करत २९ मार्कांची गेम व्हायची. कुणी चांगले खेळत नसले की मग त्याला/तिला विचारायचे काय गं/रे हात तापला नाही का अजून?
बुद्धिबळ खेळताना आधीच ठरवले जायचे की "मारामारी करायची" का "शह असेल तर मारामारी नाही" रात्री अंगणात सतरंज्या टाकून भुताच्या गोष्टी रंगायच्या आणि मग तहान लागली की स्वैपाक घरात जाऊन पाणी प्यायला जाम टरकायचो व त्यातूनही लाइट गेले असतील तर मग कंदीलाच्या प्रकाशात आणखीनच भिती वाटायची. दाराला लागूनच पायऱ्या होत्या ती म्हणजे आमची जीप. जीपमध्ये बसून जगप्रवासाला निघायचो. त्यामध्ये कोको, बोर्नव्हीटा, कच्चे दाणे व गूळ असायचे.
दुपारच्या कडक उन्हात एक वेगळाच खेळ खेळायचो. बाहेर दोघांनी अंगणात उभे राहायचे व दाराच्या फटीत एक काचेचे भिंग धरायचे व एकाने भिंगाच्या समोर कोरा कागद. काचेच्या भिंगातून अगदी बारीक उन्हाचा कवडसा भिंगातून परावर्तित होऊन कागदावर बाहेरच्या दोघांचे चित्र उमटायला खूप वेळ लागायचा. झाडांची हिरवी पाने व कपड्यांचे रंग जसेच्या तसे पण फिकट दिसायचे.
टेपरेकॉर्डरवर स्वतःच्या आवाजात जाहिराती टेप करायचो, त्यात मग एक अमिन सायानी व्हायचा व बिनाका गीतमालेत गाणी गायचो. उन्हाळ्यातील पापड-पापड्या वाळवताना आम्हीच राखणदार. राखण करताना ओल्या तांदुळाच्या पापड्या, कुरडया खाणे व पापड लाटताना मोडून खाणे. संध्याकाळ झाली की मग रोज टेकडीवर फिरायला.
अजून एक उन्हाळ्यातील सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे अंगणात सडे घालणे. सकाळ-दुपार-संध्याकाळ १५-२० बादल्या पाण्यांचे सडे. सडा घातल्यावर जो गारवा येइल ना त्याचे सुख काही निराळेच असायचे. आमरस खाताना वाटी न घेता मोठ्यात मोठा वाडगा घ्यायचो.
आपल्या जीवनाची कॅसेट मागे करता येत नाही ना! नाहीतर सांगितले असते उन्हाळा माझ्या आवडीचा.
रोहिणी गोरे
Tuesday, September 05, 2006
Subscribe to:
Posts (Atom)