आई कुठे काय करते? तस म्हणायला गेले तर घरी राहून आई बरेच काय काय
करते. फक्त ती ते सर्व घरी राहून करते त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही.
नोकरी करणारी आई घरातली कामे पटापट आवरून बाहेर नोकरीवर जाते आणि आल्यावर
पण घरातली कामे करताना दिसते. तर नोकरी करणारी आई हा वेगळा विषय झाला.
घरातली आई फक्त झोपा काढत नाही तर बरीच कामेही करते. माझी आई आणि सासुबाई
मला नेहमी म्हणतात की "ह्यांनी" मला नोकरी करू दिली नाही. मी आईला म्हणते
की हो बरोबर आहे तुझे म्हणणे. पण तू घरात होतीस त्यामुळे आमच्या सहवासात
जास्त राहिलीस. नोकरी केली असतीस तर तुझा आम्हाला सहवास कितीसा मिळाला
असता?
पूर्वीच्या बायका घर, संसार आणि मुले यातच असायच्या. घरी
असणाऱ्या प्रत्येक आईने बरेच काही केले आहे. त्यामुळे तिचा आदर करा.अजूनही
काही आया घरच सांभाळताना दिसतात. पण त्या बरेच काही करत असतात. आता मी
माझ्या आईबद्दल लिहिते. आईचा दिवस पहाटे ५ वाजताच सुरू व्हायचा. आम्ही घरात
५ जणे होतो. आईबाबा, मी , रंजना, आणि आमचे आजोबा. आमच्या सकाळच्या शाळा
असायच्या त्यावेळे पासून नंतर आम्ही कॉलेज आणि नोकरीवर जाण्यापर्यंत आईने
कुटुंबासाठी खूप काही केले. आमच्या दोघींची लग्ने छान करून दिली. लग्नानंतर
वर्षभराचे सण आनंदाने केले. शिवाय रंजनाचे बाळंतपण केले. सकाळचा
आलं घालून केलेला चहा ती आम्हां सर्वांचाच करायची. नंतर एकेकाचे स्टोव्ह वर
पाणी तापवत ठेवायची. सर्वात आधी २ स्टोव्ह होते. एक वाजणारा आणि दुसरा
वातीचा. नंतर गॅस आणि शेगड्या जरी आल्या तरी पाणी तापवणे स्टोव्हवरतीच
असायचे. थंडीच्या दिवसात आम्हाला दात घासून चुळ भरण्यासाठी पण तापवलेले
पाणी द्यायची. थंडीच्या दिवसात कधी सुंठ घालून तर कधी आलं घालून चहा
करायची. पावसाळ्यात गवती चहा ठरलेला असायचा. पावसाळ्यात काढा करायला ती कधी
चुकली नाही. गरम गरम काढा घेतल्यावर आमचे सर्दी पडसे दूर दूर पळायचे.
कोणाचे डोके ठणकत असेल तर कपाळावर सुंठीचा लेप लावायची. खोकला झाला तर
हळद-गूळ-सुंठ-साजूक तूप एकत्र करून गोळ्या तयार असायच्या. आम्ही सर्व सकाळी
मऊ भात खाऊन जायचो. मऊ भातावर घरचे लोणकढे तूप आणि त्यावर घरी बनवलेले
मेतकूट असायचे. शिवाय प्रत्येकाला दूध प्यायला लावायची. मऊ भात खाल्य्याने
आम्हाला जेवणापर्यंत कधी कळकळायचे नाही. पोट शांत असायचे. पित्त व्हायचे
नाही. शाळा कॉलेजातून घरी आलो की रोजच्या रोज पोहे उपमे करायची. आम्हालाही
सणसणून भूक लागलेली असायची. रात्री जेवणात मुगाच्या डाळीची खिचडी किंवा गरम
गरम आमटी भात.
दुपारची शाळा कॉलेज असेल तर जेवणात तव्यावरून पानात
रोज गरम पोळी असायची. आमचे सर्वांचे करून ती सकाळी बरोबर ८ वाजता अंघोळ
पूजा केरवारे करून शिकवण्या घेण्यासाठी बसायची. ८ ते १० शिकवण्या घ्यायची.
पहिली ते सातवी सर्व विषय शिकवायची. शिकवण्या होत आल्या की आम्हाला
साडेदहाला जेवायला वाढायची. शिकवणीला बसायच्या आधी ती स्वयंपाकाची
पूर्वतयारी करून ठेवायची. भाजी चिरून ठेवायची, कणीक भिजवून व कूकरही
लावायची. आमच्या जेवणानंतर १ ते दीड पर्यंत बाबा घरी जेवायला यायचे. मग ती
दोघे एकत्र जेवायला बसायचे. मग थोडी विश्रांती घेऊन परत उठायची ते ३ ते ५
शिकवणी घ्यायची. नंतर आमच्या मधवेळेचे खाणे, आणि मग रात्रीचा स्वयंपाक. बाबांचे ऑफीस २ शिफ्ट मध्ये होते. ते सकाळी ७ ला निघायचे आणि १ वाजता
दुपारी घरी जेवायला यायचे. नंतर परत ३ ला जायचे ते ६ ला यायचे. ६ ला
आल्यावर मधवेळचे खाणे खाऊन ते शिकवणी घ्यायला बसायचे. ६ ते ९ शिकवण्या
झाल्या की आम्ही सगळेच एकत्र रात्रीचे जेवायला बसायचो.
ही झाली दैनंदिनीची कामे. एप्रिल मे महिन्यात शिकवण्या बंद असायच्या. या
दोन महिन्यात ती आमच्या दोघींचे ड्रेस घरी शिवायची. लहानपणी फ्रॉक,
कॉलेजमध्ये गेल्यावर सलवार, चुणीदार, त्यावरचे टॉप. सर्व प्रकारच्या फॅशनचे
फ्रॉक आणि चुडीदार तिने शिवलेले आहेत. उडत्या बाह्या, फुग्याच्या बाह्या,
कोपऱ्यापर्यंतच्या बाह्या, चौकोनी, पंचकोनी, व्ही गळे असायचे. आजोबांच्या
बंड्याही ती घरीच शिवायची. माझे आजोबा जेव्हा नोकरी करायचे तेव्हा आणि
आम्ही दोघी नोकरीवर लागलो तेव्हाही आईचा डबा खूप छान असायचा. पोळी भाजी,
चटणी, एका पोळीला तूप साखर लावलेली असायची. आणि मुख्य म्हणजे एका बाटलीत ती
ताक भरून द्यायची. मे महिन्याच्या सुट्टीत आम्हाला कूकर लावायला सांगायची.
दुपारचा चहा करायला सांगायची. आई पोळ्या करायची आणि आमच्या दोघींसाठी २-२
लाटायलाही द्यायची. अशा प्रकारे तिने आम्हाला कामाच्या सवयी लावल्या. नोकरी
करत असताना वर खर्चालाही पैसे द्यायची. शाळा कॉलेज मध्ये असतानाही तिने
वरखर्चासाठी पैसे दिले आहेत.
आजीच्या (आईची आई) चोळ्याही शिवायची.
आईचे ब्लाऊज तिचे तीच शिवायची. आम्ही टेलरकडे कधीच गेलो नाही. म्हणजे
शिलायची कितीतरी पैसे आईने वाचवले आहेत. फ्रॉक शिवल्यावर उरलेल्या कापडातून
तिने अगणित बाळंतविडे शिवलेले आहेत. बाळंतविड्याचे पैसेही तिने वाचवले
आहेत. पैसे वाचवले काय नि कमावले काय सारखेच ना ? पैसे वाचवून व शिकवण्याचे
पैसे मिळवून तिथे संसाराला खूप हातभार लावलेला आहे.
आईने कधीही
लोणी व तूप विकत आणले नाही. दूधदुभतं तर तिने इतके काही जपले आहे की
दूधापासून होणारे सर्व प्रकार करायची. अदमुरं दही, सायीचे दही, ताक, लोणी,
तूप हे सर्व तिने निगुतीने केले आहे. घरी कोणताही कार्यक्रम असो तिने
जास्तीचे लागणारे दही, लोणी तूप कधीच विकत आणले नाही. दूध जास्तीचे घ्यायची
म्हणजे मग त्यात सर्व काही व्हायचे. आमच्या लग्नकार्यात पण तिने कधी तूप
विकत आणले नाही. आमच्या घरी तिनी त्रिकाळ शिकवण्या असायच्या. आईचे पहिली ते
सातवीपर्यंतचे विद्यार्थी आणि बाबांचे ८वी ते १०वी पर्यंततचे सर्व
विद्यार्थी मिळून सर्वांचे वार्षिक परीक्षेनंतर छोटे स्नेहसंमेलन
करायची. या संमेलनात असणारे सर्व पदार्थ आई घरी करायची. यामध्ये बटाटेवडे
तिखटामिठीच्या पुऱ्या, गोडाचा शिरा, इडली सांबार असे पदार्थ असायचे. सर्व
विद्यार्थी नटून थटून आमच्या घरी यायचे. प्रत्येक जण काही ना काही करून
दाखवायचे. कुणी गाणे म्हणायचे तर कुणी नाच करायचे, तर कुणी नकला करून
दाखवायचे.
आई खूप धार्मिक आहे. श्रावणात ती संध्याकाळी वडे घारगे करायची. ब्राह्मण जेवायला घालाची. जिवतीची पूजा करून आम्हाला दोघींना पुरणाचा दिवा करून ओवाळायची. कोजागिरी पौर्णिमेलाही ती आम्हां दोघी बहिणींना ओवाळायची. दोघींना पांढरे कानातले गळ्यातले किंवा फ्रॉक, सलवार कुडता घ्यायची. आजोबा जेव्हा गेले तेव्हा तिने १३
दिवसात गरूड अख्यान ठेवले होते. ३० तीने सवाष्णी घातल्या होत्या. गणेश याग केला होता. दिवाळी झाल्यावर ती नातेवाईकांचे ग्रुप करून दही मिसळ करायची. सोबत उरलेले फराळाचे असायचे. प्रत्येक सणाच्या दिवशी कामवाली बाईला जेवायला बोलवायची आणि शिवाय ताट भरून तिच्या घरी द्यायची. कलई वाली ठरलेली होती. शिवाय फणी, सुई ती एका म्हातारी बाई कडून विकत घेत असे. बोहारीण पण ठरलेली होती. तिच्याकडून तर तिने चहाच्या कपबशांचे सेट घेतले आहेत. ते कधीच तिने विकत नाही घेतले. चिनीमातीच्या खोलगट डीशा, बरण्या, तिने बोहारणीकडूनच विकत घेतल्या आहेत. कल्हई करणाऱ्या बाईच्या मुलांना आण कामवाली बाईच्या मुलांना शिकवले आहे. त्यांच्याकडून तिने कधीच पैसे घेतले नाहीत. काहीजणांकडून शिकवणीचे पैसे त्यांना परवडत नाही म्हणून हप्त्याहप्त्याने घेतले आहेत. माझ्या आईला माणसे जोडण्याचा छंद आहे. ती कोणालाही
दुखवत नाही. अन्याय पण सहन करत नाही. स्वयंपाक करताना आधी काय करायचे आणि नंतर काय करायचे की वेळ वाचतो ते शिकवले. आहे. गजानन महाराजांच्या पोथीची अगणित पारायणे केली आहेत. दसऱ्याला आमच्या घरी संध्याकाळी विद्यार्थी आपट्याची पाने द्यायला अजूनही येतात. शिवाय संक्रांतीलाही ती भरपूर तीळगूळ करते. कारण संध्याकाळी तिचे व बाबांचे विद्द्यार्थी तीळगूळ घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी येतात.
दरवर्षी आई आमच्या अंगणात भोंडला करायची. दोन गोल व्हायचे
ऐलमा पैलमा म्हणायला. एक गोल आतला छोट्या मुलींचा, दुसरा गोल बाहेरचा.
आम्ही बहिणी आणि आमच्या मैत्रिणींचा. चैत्रातल्या हळदीकुंकवाला १०० एक
बायका असायच्या. सर्व नातेवाईक, आमच्या मैत्रिणी, आईच्या मैत्रिणी मिळून
सर्वजणी यायच्या. त्यांना अनुक्रमे आधी हळदी कुंकू, नंतर काकडीच्या जाड
चकत्या, नंतर बत्तासे असायचे. नंतर स्टीलच्या वाटीतून आंबेडाळ आणि नंतर
गारेगार कैरीचे पन्हे. ते झाले की आई प्रत्येकीची हरबऱ्याने ओटी भरायची.
नंतर मोगऱ्याचा गजरा द्यायची. चैत्रातल्या हळदीकुंकवाप्रमाणेच संक्रांतीचे
हळदी कुंकू पण खुप दणक्यात व्हायचे. कैरीचे लोणचे ५ किलो कैरीचे
घालायची. तसेच कैरीचे पन्हे पण बरणीतून घालून ठेवायची. येताजाता पन्हे
प्यायचो आम्ही. पन्ह्यात पण साखरेचे वेगळे, गुळाचे वेगळे करायची. हिवाळ्यात
तर खुपच प्रकार करायची. १०० लिंबे आणायची. त्यात लिंबाचे सरबत बाटल्यातून
भरून ठेवायची. लिंबाचे गोड लोणचे, तिखट लोणचे, लिंबे पिळून खाऱ्यातल्या
मिरच्या, करायची. शिवाय आवळ्याचे लोणचे, मुरंबे, गुळांबेही करायची. कोकमचे
सरबत करायचीच. शिवाय छुंदा करायची. इतके प्रकार करायची ना की आम्ही बाहेरचे
कोणतेही काहीही विकत आणले नाही कधीही. उन्हाळ्यात सर्व प्रकारची वाळवणं
करायची ते सुद्धा मोठाले डबे भरभरून. त्यात बटाट्याचे पापड, पोह्याचे पापड,
कुरडया, साबुदाण्याच्या चकल्या, चिकवड्या, १० किलोचा बटाट्याचा कीस,
मिरगुंड, उडुदाचे पापड, एक ना अनेक पदार्थ करायची. त्यामुळे आम्हा दोघी
बहिणींना सर्व प्रकारच्या चवा माहिती झाल्या.
आईने ४० बायकांना शिवण
शिकवले आहे. आईने आमच्या दोघींचेच फक्त केले असे नाही तर तिच्या सर्व
भाचवंडांचे केले. अगदी त्यांचे लग्न ठरल्यापासून केळवणे, त्यांच्या मुलांना
घरचे बाळंतविडे केले. आजोबांची सर्व भाचवंडे. बाबांची सर्व भाचवंडे
यांचेही केले. आईचा हात अगदी सढळ आहे. आईने आम्हां दोघी बहिणींना चांगले
वळण लावले. शिवाय चांगले संस्कारही केले. त्यामुळेच आम्ही दोघी बहिणी
आमच्या संसारात यशस्वी झालो आहोत. आईचे सासरे म्हणजे जणू तिचे वडीलच होते. आईने सासऱ्यांचे मनापासून केले. दीराचे केले. बाबांचीही ती आईच बनली. बाबांनीही तिला मनापासून साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीत अडवणूक केली
नाही. संसारत आलेल्या अडचणींवर आईने मात केली. आईचा चेहरा सतत हासतमुख
असतो. नीटनेटकी अजूनही राहते. (वय वर्ष ८४) घरही नीटनेटके ठेवते. बाबा वय
वर्ष ८८ यांचा उत्साहही वाढवते. अशा माझ्या आईला सलाम !
प्रतिकूल परिस्थिती मध्ये झगडून वर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा सलाम ! अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या , नोकरी करून घरही तितकेच छान रितीने
सांभाळणाऱ्या सर्व स्त्रियांना सलाम ! आणि हो, ज्या पुरूषांनी स्त्रीचा मान राखला, तिचा आदर केला, मग ती बायको असो , आई / बहीण असो किंवा ऑफीसमध्ये काम करणारी स्त्री कर्मचारी असो अशा पुरूष वर्गालाही सलाम. स्त्रीही स्त्रीचीच कधीही शत्रू होता कामा नये. @ Rohini
Gore ,,सर्व महिलांना महिला दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! स्त्रीशक्ती
वाढवत रहा. Wishing All International Women's Day !!