Wednesday, January 29, 2014

२९ जानेवारी २०१४

आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा खरच खूप वेगळा होता. ठप्प करणारा, गोठवणारा, हुडहुडी भरणारा. तशी तर थंडीच्या दिवसामध्ये हुडहुडी ही भरतेच पण त्यातून स्नो फॉल असेल आणि सूर्यप्रकाश नसेल तर शरीराच्या बरोबरीने मन ही अगदी पार थिजून जाते, गोठून जाते. डोके बधीर होते. अर्थात आमच्या शहरात असे गोठवणारे दिवस अगदी मोजूनच येतात ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणा, नाहीतर माझे काय झाले असते कोण जाणे !






वेदर चॅनलवर मंगळवार दुपारपासून ते बुधवार सकाळपर्यंत हळू हळू करत स्नो पडणार होता हे वर्तविले होते. त्यामुळे खिडकीबाहेर सारखी बघत होते. आम्ही ज्या शहरात राहतो तिथे आम्हाला ९ वर्षे पूर्ण झाली. त्यामध्ये मोजून तीनदा बर्फ वृष्टी झाली आहे. २००९, २०११ आणि आता हा आजचा २०१४ चा स्नो फॉल. यामध्ये यावर्षीचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे हवेतून कापसासारखा स्नो पडणार नव्हता.   आईस पडत होता. म्हणजे रिमझिम पाऊस कसा पडतो तसा पाऊस पडून तो खाली जमिनीवर पडला की त्याचे बर्फात रूपांतर होत होते. आज बुधवारी सकाळी प्युअर स्नो पडणार होता. तापमान मायनस १० दिवसभर. हिटर लावून सुद्धा भागत नव्हते. काल रात्रीपासूनच दरवाजा उघडून आणि खिडकीतून डोकावत होते. खाली पडणारा बर्फ साखरे सारखा दिसत होता. ग्रॅन्य्लेटेड शुगर सारखा.





हातात गोळा केला तेव्हा आणि वाटीत भरला असता तर कोणालाही वाटले असते साखर ठेवली आहे कि काय? रात्रभर अगदी थोडा थोडा पडत होता. मनात म्हणत होते एकदा दणादणा पडू दे ना, हा काय अगदी स्लो लोकलसारखा डकाव डकाव करत पडत आहे. अधूनमधून रात्रीही खिडकीतून बघत होते. नंतर थोड्यावेळाने झोप लागली आणि सकाळी उठून पाहते तर सगळीकडे पांढरे शुभ्र झाले होते. ज्या शहरांमध्ये  सहसा कधी स्नो फॉल होत नाही त्या शहरात कधी नव्हे बर्फ पडला तर भंबेरी उडून जाते. रस्ता साफ करणारी यंत्रणा नसते त्यामुळे सर्व काही बंद असते. आणि त्यातून आजचा बर्फ तर घसरडा होता त्यामुळे कोणी बाहेर पडू नका. वरच्या मजल्यावर राहत असाल तर जिन्याच्या कठड्याला धरून सावकाश उतरा असे सांगत होते. मी बाहेर जायचा प्रयत्न केला पण भयानक थंडी होती. तरीही पोळी भाजी करून मफलर जाकिट, जीन्स घालून कॅमेरा घेऊन खाली अगदी सावकाश उतरले. तळ्यावर गेले. काही फोटो काढले. सारे काही ठप्प होते. एखादा चुकार माणूस रस्त्यावरून जात होता. बदकेही बर्फाच्छादित जमिनीवर बसून डुलक्या घेत होती. चिटपाखरू नव्हते. एखाद दुसऱ्या माझ्यासारख्या उस्ताहित बायका सर्व अंगभर लपेटून बाहेर पडल्या होत्या.





खरे तर मला स्नोचे काही ना काही बनवायचे होते पण स्नो नेहमीसारखा भुसभुशीत नसल्याने बनवणे राहून गेले. चालताना जाणवत होते. जमिनीवरचा स्नो खूप कडक होऊन बसला होता. आणि त्यामुळेच घसरण्याची शक्यता जास्त होती. आज दिवसभर तसे कंटाळ्यासारखे झाले होते. कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी चमचमीत खायला करू असा विचार केला पण काय करायचे? पोटॅटो फ्राईड, बटाटा कीस की कांदा भजी. शेवटी पोटॅटो फ्राईड केले. हल्ली मी तेलकट करणे बंद केले आहे. एक दोन बटाट्याचे पोटॅटो फ्राईड केले पण ते चांगले झाले नाहीत. म्हणून लगेच आवरते घेतले. नंतर त्याच तेलात नाचणीचे व ज्वारीचे पापड तळले. आणि तेलकट खाऊन डोके दुखायला लागले. नंतर चहा केला आणि तो सुद्धा नेहमीसारखा मायक्रोवेव्ह मध्ये केला नाही. पारंपारिक पद्धतीने चहा पावडर घालून, आले किसून , दूध घालून चांगला उकळून केला. चहा मात्र छान झाला होता. आज दिवसभर बाहेर पांढरे पांढरे पाहून डोके बधिर होऊन गेले आहे. उद्याही मायनस तापमानच आहे. पण संध्याकाळ पर्यंत सर्व काही सुधारेल आणि मग परत थंडीच्या दिवसातही पुढच्या आठवड्यात थोडे हवामान गरम राहील.





हा असा स्नो फॉल एक दोन दिवसच ठीक. मला तर त्या एक दोन दिवसातच नकोसे होऊन जाते. बंद पेटीत राहून पेटी उघडून बाहेर काय चालू आहे ते बघायलाच फक्त पेटीचे दार उघडे करायचे . अगदी तसेच वाटते मला या दोन दिवसात. बंद पेटीत, कडेकोट बंदोबस्तात राहिल्यासारखे. मला थंडीतले मायनस तापमान आवडते अर्थात ते सुद्धा सेल्सिअस मध्ये पण स्नो! नको रे बाबा ! मायनस तापमान मी क्लेम्सनमध्ये असताना एंजॉय केले आहे. त्यावेळेला मला पहिली नोकरी एका चर्चमध्ये लागली होती. सुरवातीला कार नव्हती. त्यामुळे मी सकाळी ७ ला चालत चालत चर्चमध्ये जायचे. २० मिनिटे लागायची पोहोचायला. सर्व जामानिमा करून चालत सुटायचे. खूपच मजा यायची. चालताना तोंडातून वाफा यायच्या. आणि मायनस तापमानात कोवळी सूर्यप्रकाशाची किरणे आणि स्वच्छ सुंदर हवा खूप सुखावून जायची.

Sunday, January 19, 2014

१९ जानेवारी २०१४

आज बरेच बरेच दिवसांनी रोजनिशी लिहित आहे. आज लिहाविशी वाटली याचे कारण आजची संध्याकाळ खूप सुंदर गेली. थंडीचे दिवस असल्याने तसे बाहेर फिरणे किंवा चालणे कमीच झाले आहे. पण जरा कुठे थोडी थंडी कमी वाटली रे वाटली की लगेच आम्ही चालायला बाहेर पडतो. शनिवार रविवार पैकी एक दिवस आमचा चालण्याचा असतो. चालण्याची ठिकाणे दोनच ती म्हणजे नदी आणि तळे. या दोन्हीकडे आधी कारनेच जायला लागते. मग कार पार्क करून चालायला सुरवात करायची. उन्हाळ्याचे रोजचे चालणे म्हणजे राहत्या घरापासून बाजूचा असलेला रस्ता. अर्थात त्यावरून जास्त मजा येत नाही पण रोजच्या रोज चालायचेच असे ठरवले तर चांगला आहे. तसे तर पूर्वीसारखे भरपूर चालणे कमीच झाले आहे.






हल्ली मी रविवारी सकाळी संपूर्ण दिवसाचा पोळी भाजी , भात आमटी असाच स्वयंपाक करून ठेवते. काल खूपच थंडी असल्याने बाहेर पडलो नाही. त्यामुळे ग्रोसरी करायची पण राहून गेली होती. आज दुपारी चहा घेऊन कुठे जायचे हे ठरवत होतो. संध्याकाळ लवकर होत असल्याने तळ्याकाठी जायला तसे थोडे नको वाटते. तिथे खरे तर चालायला छान आहे पण शुकशुकाट असतो. तसा उन्हाळ्यात पण तिथे जास्त कोणी जात नाही. उन्हाळ्यात तर नदीवर खूप गर्दी असते. लहान मुलांना घेऊन नदीवरच्या पूलावरून सर्वजण चालत असतात. आज थोडे लवकर निघू म्हणजे सूर्यास्त पहिल्यापासून बघायला मिळेल आणि ग्रोसरी घेऊन घरी यायला पण जास्त रात्र होणार नाही असे मी  विनायकला म्हणाले. आम्ही दोघे चहा पिऊन लगेचच निघालो. खूप लवकर जातोय का आपण? असे मी म्हणाले,  पण जाऊदे, आता निघालोय ना.! नदीजवळच ग्रंथालय आहे तिथे पुस्तके परत केली आणि नदीवरून चालायला सुरवात केली. आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले की निरनिराळे रंग आकाशात तयार होतात. आज तसे काहीच झाले नाही. सूर्यास्ताला पण वेळ होता. चालण्याची फेरी पूर्ण केली आणि आईस्क्रीम खाल्ले. सूर्य हळूहळू खाली सरकत होता. अर्थातच सूर्यास्ताचे फोटो काढले. निळे आकाश त्याचे पाण्यावरचे निळे प्रतिबिंब आणि सूर्य अस्ताच जात आहे. अस्तास जात असताना त्याचे पाण्यातले प्रतिबिंब, त्याची सूर्यकिरणे असा एकूणच सूर्यास्ताचा फोटो खूप छान आला त्यामुळे आनंद झाला. ग्रोसरी केली. आणि आमच्या गावात असलेल्या एका दुकानात जिथे थोडे भारतीय किराणाही ठेवलेला असतो तिथे गेलो तर चक्क मला पाणी पुरीचे एक पाकिट दिसले. ९ वर्षात पहिल्याप्रथमच ! त्या पाकीटामध्ये ३० पुऱ्या आहेत त्यामुळे एकदा दही बटाटा पुरी करणार आहे.







आज त्या दुकानात जाऊन गुळाच्या छोट्या ढेपाही घ्यायच्या ठरवल्या होत्या. कारण की फेसबुकावर मी एक छान गुळाच्या पोळीचा फोटो पाहिला आणि मला आता जाम इच्छा झाली आहे गुळाच्या पोळ्या करून खाण्याची. बोअर काम आहे पण बघू कधी होतायत ते. काही वेळेला संध्याकाळ नाहीतर काही वेळेला पूर्णच्या पूर्ण दिवस इतका काही छान जातो की अगदी कायम लक्षात राहतो. तशीच आजची एक संध्याकाळ होती. आणि त्यामुळे आजच मला रोजनिशीची आठवण होऊन लगेच रोजनिशी लिहिली गेली.

Tuesday, January 14, 2014

भारतभेट २०१३ फोटो













भारतभेटीत जी मजा केली त्याचे फोटो इथे देत आहे. आईबाबांकडील बाग आहे त्यातली गुलाबाची आणि शेवंतीची फुले. आकाशकंदील, रांगोळ्या व इतर असे अनेक फोटो भारतभेटीमध्ये काढले. रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांच्या रांगोळ्या व त्यात रंग भरणे व काही दारापुढे नक्षी काढली. वेलबुट्टी काढली. दिवाळीची खूप हौस करून घेतली.

Wednesday, January 08, 2014

अनामिका ... (९)


मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न थाटामाटात पार पडते. संध्याकाळच्या रिसेप्शन पार्टीला सगळेजण तयार होतात. संजली पण एक छान साडी नेसून तयार होते. तिच्या हातात मोबाईल असतोच. अमितचा फोन येणार असतो. उशीराने विमानाचे उड्डाण असल्याने विमानतळावर गेल्यावर तो संजलीला फोन करणार अस्तो. अमितचा फोन कधी येईल या विचारात ती असते. तितक्यात फोन वाजतो. लगबगीने संजली नवऱ्या मुलीच्या खोलीत शिरते. "बोल अमित" अमित तिला सांगतो मी आता विमानतळावर जायला निघतोय तिथे पोहोचलो की साधारण तासा दोन तासाने तुला फोन करीन म्हणजे ११ वाजता. तू झोपणार नाहीस ना ! संजली म्हणते नाहीरे , मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आम्हाला सुद्धा घरी पोहोचतेपर्यंत उशीर होईलच. पण आता तुला नाही का बोलता येणार? कारण की आता इथे माझ्या आजुबाजूला कोणीच नाहीये. नंतर घरी गेल्यावर मात्र माझ्या मैत्रिणी असतील. पण तरी बघते मी कसे काय मॅनेज करता येईल ते !




रात्री उशीरापर्यंत मंडळी घरी परततात. सर्वजण खूप दमलेले असतात. घरात पसारा असतो. संजली व तिच्या मैत्रिणी खोलीत येतात कुणालाही बोलायची ताकद नसते. उद्या सकाळी पुण्याला परत जायला लवकर निघायचे असते. संजलीला झोप येत असूनही तिला जागेच रहायचे असते कारण की अमितचा फोन येणार असतो. संजली मात्र या सगळ्या गर्दीत मला अमितशी कसे काय बोलता येणार आहे कोण जाणे, अशा विचारात असते. कार्यालयात अमितचा फोन आला तेव्हाच का नाही बोलला आपल्याशी? काय करावे आता? अशा विचारातच ती आडवी होते. हातात मोबाईल असतोच. दारावरची बेल वाजते. कोणीतरी निरोप घेऊन आलेले असते की वरच्या मजल्यावरच्या पाहुण्यांमध्ये एका आजींना त्यांच्यासोबत झोपायची गरज आहे. त्यांना जरा बरे वाटत नाही तर कुणी तयार आहे का? संजली लगेचच होकार देते. दुसऱ्या मजल्यावर त्या आजीबाई एकट्याच एका रूममध्ये झोपलेल्या असतात. त्या म्हणतात माझा सून एका नातेवाईकांकडे गेली आहे ती उद्या येईल. आणि मला थोडे बरे वाटत नाही म्हणून तुम्हाला बोलावले. संजली त्या आजींना सांगते काही काळजी करू नका. मी आज तुमच्या सोबतीला आहे. काही लागले तर सांगा. फक्त मला एक फोन येणार आहे तर चालेल ना? आजी म्हणतात अगं हो, न चालायला काय झाले? मी तर आता औषध घेऊन लगेच झोपेन. कदाचित मला झोप लागेल. आज सबंध दिवस लग्नात दगदग झाली इतकेच. त्यामुळे थोडे ताप आल्यासारखे वाटत आहे.










त्यांच्या समोर असलेल्या कॉटवर संजली आडवी होते. रिंगटोन खूप कमी करते. संजलीला काही केल्या झोप येत नसते. केव्हा करणार हा फोन? असे म्हणत पाणी प्यायला उठते आणि आजींना झोप लागली आहे का नाही ते बघते. तर त्या शांत झोपलेल्या असतात. परत येऊन कॉटवर पडते. तिला खरे तर खूप झोप येत असते पण झोपता तर येत नसते अशी अगदी वाईट अवस्था होऊन जाते. अमितच्या फोनची वाट बघून बघून तिला कंटाळा येतो तेवढ्यात फोन वाजतो. तो अनिलचा असतो. तो विचारतो काय गं उद्या निघताय तुम्ही सर्व? मला उद्या एक महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे मी दिवसभर नाहीये आणि आईला पण जरा बरे वाटत नाही. तर लवकर निघून या. म्हणजे तुला पण घरी आल्यावर जरा विश्रांती मिळेल. संजली जांभया देत देत अनिलला उत्तरे देत असते. आणि म्हणते चल बाय. मी झोपते आता. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून फोन बंद करते. आणि लगेचच अमितचा फोन येतो. अमितचा फोन आल्यावर मात्र तिची झोप उडते आणि उत्साहात बोलायला लागते. त्याला ऐकू जाईल अशा आवाजात पण थोडे हळू बोलत राहते. त्याचे बोलणे थांबूच नये असे तिला वाटत असते. मागच्या काही आठवणी निघतात. अमित तिच्या आईवडिलांची पण चौकशी करतो. बऱ्याच वेळ गप्पा मारल्यावर अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो. विमानात बसायला सुरवात झाली आहे. मी तुला पोहोचल्यावर फोन करेन पण वाट पाहू नकोस. नंतर कधीतरी वेळ मिळेल तसा तुला फोन करीन आणि हो पुढच्या वर्षी आल्यावर अनिलला नक्की भेटेन मी. अगं तो माझा चांगला मित्र आहे पण पूर्वी काही घटना घडल्या आणि मी त्या घरात येईनासा झालो, ते का हे मी तुला सांगितलेच आहे, त्यामुळे त्याचे माझ्याशी बोलणे झालेच नाही.










परत एकदा आजींकडे बघते तर त्या शांत झोपलेल्या असतात. मनात म्हणते बरे झाले त्या झोपल्यात त्यामुळे मला अमितशी छान बोलता आले. तिला बराच वेळ झोप येत नाही. पहाटे पहाटे तिला थोडी झोप लागते.   सकाळी तिच्या मैत्रिणी तयार होऊन तिच्या खोलीची बेल वाजवतात तेव्हा संजली दचकून जागी होते. दार उघडताच ' अगं संजली तुला किती फोन केले. तु तुझा फोन बंद करून का ठेवलास? चल आवर लवकर तुझे. आपल्याला निघायचे आहे. संजली भराभर आवरून तयार होते. लग्नघरी सर्वांचा निरोप घेऊन संजली व तिच्या मैत्रिणी पुण्याला जायला निघतात. वाटेत संजली थोडी थोडी डुलकी घेत असते. तिला खूप दमल्यासारखे झालेले असते. ती तिच्या घरी येते तेव्हा आत्याबाई घरात असतात. अनिल मिटिंगला आणि मुलगा शाळेत गेलेला असतो. आत्याबाई विचारतात कसे झाले लग्न? खूप मजा केलीत का तुम्ही मैत्रिणींनी? स्वयंपाक तयार आहे. आपण दोघी जेवू. "हो आत्याबाई. खूप मजा आली लग्न छानच झाले. प्लिज आत्याबाई. तुम्ही बसा जेवायला. मी वाढते तुमहला. मला अजिबात भूक नाहीये. मध्ये वाटेत खाणे झाले आहे. मी वर जाते. आत्याबाईना जेवायला वाढून संजली वरच्य मजल्यावरच्या तिच्या खोलीत निघून जाते.











प्रवासाचा शीण जाण्याकरता ती डोक्यावरून अंघोळ करते. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळते व त्याचा अंबाडा घालते. एक कॉटनची हलकी साडी नेसून झोपते. झोपताना ती आठवणीने दार लावते. तिला आता कोणीही तिच्या खोलीत यायला नको असते. रात्रभर झालेले जागरण व दगदग यामुळे तिला गाढ झोप लागते. झोपेतून उठते तर अनिल आलेला असतो. तिल म्हणतो अगं किती गाढ झोपली होतीस. खूप दगदग झाली का?






नाहीरे, खूप मजा आली. थोडी कालच्या जागरणाने आणि लवकर उठून लगेचच प्रवासाला निघाल्याने थोडे दमायला झाले आहे इतकेच. ती खाली जाते आणि स्वयंपाकाचे बघते. थोड्यावेळाने सर्वजण जेवायला बसतात. जेवताना तिने व तिच्या मैत्रिणींनी कसे शॉपिंग केले, काय काय मजा केली, लग्न कसे थाटामाटात झाले. याचे सविस्तर वर्णन सांगते. अनिलला ते ऐकून बरे वाटते पण एकीकडे त्याच्या मनात प्रश्नचिन्हही उभे राहते की संजली यापूर्वी उत्साहात असायची पण
इतकी उत्साही कधी नाही पाहिली. काय कारण असावे बरे??

क्रमशः ...