इयत्ता ९ वी ला आम्हाला केळकर बाई होत्या जीवशास्त्र शिकवायला. बुटक्या व थोड्या जाड. वर्णाने गोऱ्या गोऱ्या पान!! चेहऱ्यावर नेहमी लालसर छटा. कुंकू पण लालचुटुक व मोठे लावणार. कानातले पण अगदी उठून दिसणारे घालणार. कंठीचे मंगळसूत्र तर त्यांना खूपच शोभून दिसायचे. त्यांचे यजमान रसायनशास्त्र शिकवायचे. दोघेही शिक्षक! त्या दोघांना आम्ही राजकपूर नर्गिस म्हणायचो. जीवशास्त्र त्या आकृतीच्या आधाराने शिकवायच्या, त्यामुळे विषय अगदी पक्का डोक्यात बसायचा. वर्गावर आल्या की डस्टरने फळा पुसून धड्यामधला जो भाग शिकवायचा आहे त्याची आकृती काढणार. मेंदू शिकवायचा असेल तर मेंदुची आकृती. ऱ्हदय शिकवायचे असेल तर ऱ्हदय काढणार. आकृतीला नावे देणार आणि शिकवायला सुरवात! ऱ्हदय म्हणले की नीला, रोहिणी, शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, ऱ्हदयाला असणाऱ्या झडपा. प्रत्येकाचे काय कार्य आहे हे व्यवस्थित समजावून सांगायच्या. धड्याखालची प्रश्नोत्तरे आम्हाला सोडवायला सांगायच्या. आकृतीच्या आधारे विषय शिकवल्यामुळे प्रश्नोत्तरे आमची आम्हाला सोडवायला सोपे जात असे.
९ वीला हिंदी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या रमा जोशी बाई पण अशाच लक्षात राहिल्या आहेत. बारीक चण व उंच. गोऱ्यापान! जो धडा शिकवायचा असेल त्यातला कोणताही एखादा पॅरा वाचून दाखवणार. आवाज खणखणीत! त्यतले अवघड शब्दांचे अर्ध सांगणार. शिवाय फळ्यावर पण ते शब्द लिहीणार. कठीण शब्द जास्तीत जास्त समजण्यासाठी हिंदीतून अधिक स्पष्टीकरण! स्पष्टीकरण देताना त्या शब्दाच्या अनुषंगाने येणारी इतर वाक्ये सांगणार. तो शब्द वापरून एखादे वेगळे वाक्य आमच्याकडून वदवून घेणार!
घाऱ्या गोऱ्या जमेनिस बाई आम्हाला इयत्ता १० वीला होत्या. त्या नेहमी पांढरी साडी नेसायच्या. गोल अंबाडा, निळे डोळे, गोरा वर्ण. परक्या देशातील एखादी गोरी बाई जशी दिसेल तशा दिसायच्या. त्या वर्गावर आल्या की वर्ग एकदम चिडीचूप! चेहरा थोडासा गंभीर व रागीट त्यामुळे कदाचित आम्हाला त्यांची भीती वाटत असावी. पण त्यांच्याकडे बघून हासले तर लगेच त्याही हासायच्या!
गरवारे शाळेत ११ वीला ज्युनियर कॉलेजला शिकवणाऱ्या एक शिक्षिका म्हणजे बोरगावकर बाई! सडसडीत बांधा. उंच, सावळ्या, लांबसडक केसांचा शेपटा घालायच्या. मरून रंगाचे कुंकू लावायच्या. कानात नेहमी रिंगा. नेहमी दोन्ही खांद्यावरून पदर. पदरही मोठा असायचा. साडी नेहमी पारदर्शक. मला तर या बाई खूपच आवडायच्या. त्यांच्या साड्या अजूनही माझ्या लक्षात आहेत. मरून रंग, मोरपंखी, ऑरेंज कलर या रंगांच्या साड्या. मधूनच एखादवेळेला फिकट आकाशी रंगाची असायची! हातात नेहमी २-३ खडू ठेवणार. त्या आम्हाला Organization of Commerce ला होत्या. जो धडा शिकवणार असतील तो आम्हाला वाचून यायला सांगायच्या. धड्यामधले points फळ्यावर लिहीणार आणि मग एकेकाचे स्पष्टीकरण. प्रत्येक points चे स्पष्टीकरण त्यांना आमच्याकडून अपेक्षित असायचे. कोणीच काहीच सांगितले नाही तर खूप रागवायच्या. सगळा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. त्यांची अपेक्षा अशी की आम्ही काहीतरी सांगावे, बोलावे, सगळे येणार नाहीच माहीत आहे, पण एखादी ओळ एखादे अक्षर तरी सांगा! आमच्याकडून थोडा जरी रिस्पॉन्स मिळाला तरी एकदम खूष व्हायच्या. आनंद लगेच चेहऱ्यावर दिसायचा. मग त्या धड्याच्या notes सविस्तर द्यायच्या.
Accounts ला मी क्लासला जायचे. सर्वच क्लास लावत असत. S.G.Joshi चा क्लास त्यावेळेला खूप प्रसिद्ध होता. कॉलेज घरापासून खूप लांब होते. बसने जावे लागायचे म्हणून मग रोजच्या रोज accounts चा क्लासला जाणे जमत नव्हते. माझ्या मामेअभावाच्या ओळखीचे एक सर होते. बापट सर! शनवारात रहायचे. त्यांच्या क्लासला मी शनिवार रविवार जायचे. खरे तर शिवार रविवार क्लास ते घेत नसत, पण माझ्याकरता त्यांनी घ्यायला सुरवात केली. सुरवातीला मी एकटीच होते. नंतर माझ्या ओळखीने १५-२० मुली झाल्या. क्लासला सतरंजीवर आम्ही बसायचो. गोलाकार बसायचो. बापट सरांनी accounts चे पुस्तक हातत घेतल्याचे मला आठवत नाही. सर्व तोंडी शिकवायचे. आधी problem dectect करायचे. मग त्याचे posting सांगणार. मग दुसरा problem सांगणार. सर्व प्रकारची गणिते अशीच सोडवून घेत असत. नंतर फक्त problems सांगायचे. आम्हाला सोडवायला सांगायचे. वेळही सांगणार. अर्ध्या तासात सोडवून झाला पाहिजे. मग जिचा problem tally होईल तिची वही हातात धरून problem कसा सोडवला आहे ते सांगून प्रत्येकजण आपला problem कुठे बरोबर कुठे चूक हे पहात असे. मला accounts मधले amalgamation खूप आवडायचे. डेबिट क्रेडीट पोस्टींग बरोबर करा. adjustments ची double entry करा सांगायचे. journal entries लिहिताना narration लिहायला विसरू नका, त्यालाही मार्क असतात सांगायचे. problem tally करताना आमची खूप स्पर्धा चालायची. कारण accounts मध्ये balance sheet tally झाली की तो बरोबर. टॅली होत नसेल तर कुठेतरी गणित चिकते आहे. मग एकेक स्टेप्स पडताळून पाहायच्या. त्यावेळेला कॅलक्युलेटर होते पण ते वापरायला बंदी असायची. सर्व बेरजा म्हणजे profit and loss accounts, balance sheet तोंडी कराव्या लागायच्या, त्यासुद्धा लाखांच्या व कोटींच्या आकड्यात! problem tally झाला की आम्हाला खूप आनंद व्हायचा. बापट सरांनी फळ्यावर गणिते कधीच सोडवून दाखवली नाहीत की हातात कधी पुस्तक घेतले नाही!!
गरवारे कॉलेजला मराठी शिकवायला आम्हाला लेखक श्री द. मा. मिरासदार होते. त्यांनी आम्हाला मराठी शिकवलेले आठवत नाही कारण सतत हशा पिकायचा!! हा मराठीचा तास आहे की हासण्याचा!! त्यांच्या तासाला इतर वर्गातली मुले आमच्या वर्गात येऊन बसायची. एका बाकावर चार चार मुले दाटीवाटीने बसायची. पूर्ण वर्ग गच्च भरलेला!! शेवटी काही मुलांना परत जावे लागायचे. शिपायाला सांगायचे आता मुलांना आत सोडू नकोस, दार लावून घे. तसेही गरवारे कॉलेजला वर्ग चालू असताना दारे लावली जायची. त्यामुळे प्रयेक तासानंतर मधल्या ५ मिनिटांत वर्गातून मुले बाहेर ये जा करायची. कुणाला तो तास बुडवायचा असेल तर तो लगेचच बाहेर पडायचा.
माझे आईबाबा घरी क्लास घेत असत पण मोठ्या प्रमाणावर नाही. एका वेळी जास्तीत जास्त १०-१२ मुले/मुली. आम्ही दोघी बहिणी पण त्या मुलांबरोबर अभ्यासाला बसायचो. त्यावेळी आमच्या घरी पण सतरंजी अंथरून क्लास घेतले जायचे. प्रत्येकाने पाटी आणावी असा आग्र असायचा बाबांचा! बीजगणित शिकवताना बाबा १-२ गणिते पाटीवर सोडवून समजावून सांगायचे. सगळ्यांना सांगायचे नीट लक्ष द्या, अडले तर लगेचच विचारा. मग आमची आम्ही गणिते सोडवायचो. गणिते सोडवताना कुणाला आले नाही तर जिचे/ज्याचे उत्तर बरोबर असेल त्याला/तिला बाबा सांगायचे की तू आता पाटीवर सगळ्यांना गणित सोडवून दाखव व समजावूनही सांग. खूप कठीण गणिते बाबा स्वतः सोडवून समजावून सांगायचे. भुमिती मधली गणितेही सिद्धता, त्रिकोणमिती वगैरे पाटीवर आकृती काढून शिकवायचे.
आमच्या घरी दर शनिवारी ग्रामचा तास असायचा. त्यात स्पेलिंग टेस्ट असायची. तिनही काळातील भूत, वर्तमान, भविष्य टेबल्स घोकून घ्यायचे बाबा सर्वांकडून. त्याकरता एक वही बाबांनी केली होती. त्यात सर्व क्रियापदे असायची. मग प्रत्येकाकडून एकेक क्रियापद घोकून घ्यायचे. i do, we do, you do, you do, he does, she does, it does, they do, i did, we did, he did, she did...... याप्रमाणे. २०-२५ मार्कांच्या छोट्या टेस्टही असायच्या. स्पेलिंग पाठ करताना पण प्रत्येक स्पेलिंग पाटीभर लिहून काढायचो व शिवाय मोठ्याने घोकायचो. शब्दाच्या उच्चारांप्रमाणे शब्द तोडून स्पेलिंग पाठ करायला बाबांनी शिकवले. जसे की disappointment dis-appoint-ment याप्रमाणे.
वर नमूद केलेल्या शिक्षकांमुळेच माझे आवडते विषय होते english, hindi, biology, algebra, organisation of commerce, accounts.
वरील सर्व फोटो मी सौ विमलाबाई गरवारे शाळेच्या फेसबुकवरच्या ग्रूप वरून डाऊनलोड केले आहेत. अमोल कानविंदे यानी हा ग्रुप
बनवला आहे. श्री अमोल कानविंदे यांन खूप खूप धन्यवाद !
बनवला आहे. श्री अमोल कानविंदे यांन खूप खूप धन्यवाद !