Showing posts with label रोजनिशी २०१८. Show all posts
Showing posts with label रोजनिशी २०१८. Show all posts

Monday, September 24, 2018

२४ सप्टेंबर २०१८

आज मला कामावर ऑफ होता त्यामुळे सकाळी सावकाशीने उठले. विनुलाही थोडे बरे वाटत नसल्याने तोही कामावर गेला नाही. बरे वाटत नव्हते म्हणजे काहीवेळेला हवा सतत बदलती असल्याने अंगदुखी आणि ताप आल्यासारखे वाटते तसे झाले होते. माझेही तसेच झाले होते थोडेफार. पण मग काहीतरी दिवसाचा वेगळेपणा होण्यासाठी मी आज वालमार्टला जायचे ठरवले. नेटही नव्हते. मग घरी बसून करायचे काय?   निघताना उसळ भात खाऊन निघाले. विनुने मला दुकानात सोडले आणि तो घरी आला. आज मी रिलॅक्स मूड मध्ये मला जे काही पाहिजे होते ते बघितले. तीन तास "हे बघ ते बघ" करण्यात गेले.


रविवारी ग्रोसरी केली नव्हती म्हणून बाकीचीही ग्रोसरी केली. त्यामध्ये आज हिरवी द्राक्षे बरीच आली  होती, ती घेतली. अनसॉल्टेड दाणे घेतले. कानातले तर मी नेहमीच बघते. त्यात मी आज कानातले भोपळे घेतले.
बाकी नेहमीचीच आठवड्याची  भाजी, दुध, दही, कांदे बटाटे वगैरे खरेदी केली.  विनू मला घरी आणण्यासाठी वालमार्ट मध्ये आला. आज दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते. मला उद्या कामावर जायचे नसल्याने आज निवांतपणा आहे. उद्याची पोळी भाजी करून झोपायच्या आधी या वेगळ्या दिवसाची रोजनिशी टंकत आहे. कानातले भोपळे आता मी कामावर जाईन तेव्हा घालीन आणि आज मला दुकानात बॅकपॅकही छान मिळून गेली.


१० डॉलर्सची मुळ किंमत मला सेल मध्ये ३ डॉलर्स ला मिळाली. ती पण एखाद दिवशी कामावर घेऊन जाईन.



त्यात  जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली, स्वेटर आणि टोपी  हे सर्व नीट  मावेल का ते आधी बघितले पाहिजे. मावल्यास तीच कामावर जाण्याची बॅग करीन. अर्थात त्याला पर्स सारखे आतले कप्पे नाहीयेत त्यामुळे बाकीचे सर्व कश्यात ठेवायचे? म्हणजे पैसे, क्रेडीट कार्ड, फोन,
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे. 

Saturday, August 18, 2018

१८ ऑगस्ट २०१८

काल आणि आज सुट्टी असल्याने घरातली कामे झाली आणि आरामही झाला. आज सकाळी उठले तेव्हा हवा खूप छान होती. फॉल सीझन सुरू झाल्यासारखेच वाटत होते. गरम नाही. आर्द्रता नाही आणि पाऊसही नाही. साफसफाईची आणि इतर काही कामे उरकली आणि आज दोघांनाही कामावर जायचे नसल्याने काहीतरी वेगळे करायचे असे ठरवले. मागच्या शनिवार सारखा काहीतरी वेगळा असा स्वयंपाक आज करायचा नाही तर बाहेरच जेवायला जायचे असे ठरवून बाहेर पडलो. कितीतरी महिन्यांनी बाहेर जेवायला गेलो. त्यानंतर डाऊनटाऊनला फिरलो. झाडांवरची पाने थोडा थोडा रंग बदलायला लागलेली दिसली त्यामुळे प्रसन्न वाटले आणि डाऊनटाऊनला असलेले मिनरल्सचे संग्रहालय पाहिले. तिथे किती फोटो घेऊन न किती नाही असे झाले मला. खूपच सुंदर संग्रहालय आहे. आज कानातले आणि गळ्यातले सोन्याचे घातले. मागील भारतभेटीमध्ये नेकलेस आणि कानातले असा सेट खरेदी केला होता. इथे कोणतेही सणसमारंभ होत नाहीत त्यामुळे सोन्याचे दागिने घालायची वेळच येत नाही. नुसते पडून राहण्यापेक्षा आज घालावे असा विचार आला आणि विल्मिंग्टनला घेतलेला उडत्या बाह्यांचा पिवळा टॉपही घातला.




खरेच असे काहीतरी वेगळे केले की जामच उत्साह येतो. मिनरल्स संग्रहालयात एक बाई कानातले बनवत होती. मला लगेचच कानातले खरेदी करण्याचा मोह झाला. तिने काही कानातले बनवलेही होते.ती म्हणाली की तुला पाहिजे ते रंग तू निवड मी तुला तुझ्यासमोर तुझ्यासाठी कानातले बनवून देते. मी माझा आवडता जांभळा आणि केशरी रंग निवडला. खूप वेगळ्या आकाराचे कानातले बनवून घेतले. मला तर खूपच आवडून गेले आहेत. डाऊनटाऊनला फूटपाथवरून फिरताना खूप छान वाटते. जेव्हा आम्ही हँडरसन मध्ये नव्याने रहायला आलो तेव्हा सुरवातीला इथल्या फूटपाथवर चालायचो. आज जवळजवळ अडीच वर्षानंतर डाऊनटाउनला फिरायला गेलो. मला नोकरी लागल्यापासून शनिवार रविवार मी कामावर आणि विनायक घरी असेच चित्र असते. सध्या मला शनिवार ऑफ मिळायला लागला आहे. तसे काही वेळेला पूर्वी पण मिळाला आहे पण आता ठरवले आहे की शनिवार ऑफ मिळाला की काहीतरी वेगळे करायचे म्हणजे उत्साह येतो. आत्ता रात्री उसळ केली आणि डबा भरला. उद्या कामावर जाण्यासाठी उत्साह आलेला आहे. आणि नवीन कानातले पण घालून जाणार आहे. फोटो इथे अपलोड करत आहे. :) Rohini Gore



Thursday, June 28, 2018

२८ जून २०१८

आज सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. काल मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती आणि म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती :D वीज गेल्यामुळे सर्व कारभार ठप्प होतातच पण इथे अमेरिकेत ते जरा जास्तीच ठप्प होतात. भारतामध्ये वीज जाते तेव्हा घरात गॅस सिलिंडर असल्याने स्वयंपाक, चहा, अंघोळीचे गरम पाणी या सर्व गोष्टी तरी करता येतात. इथे अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रीक शेगड्या असल्याने स्वयंपाक करता येत नाही. शॉवरला गरम पाणी नाही. शिवाय मायक्रोवेव्ह मध्ये चहा पण करता येत नाही. नेट बंद असल्याने सोशल मिडिया वर जाता येत नाही. व्होनेज फोन नेटशी जोडलेला असल्याने आंतर-राष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. :(



हीटर कूलर नाहीत म्हणजे थंडी असेल तर बसा कुडकुडत ! :D सध्या उन्हाळा सुरू असल्याने कूलर जरी बंद असला तरी आमचे तरी फारसे अडत नाही. आम्ही खिडक्यांची दारं नेहमीच थोडी उघडी ठेवतो. जरा तरी बाहेरची हवा येऊद्या ना राव ! आज मला कामावर जायचे नव्हते .उद्या परवा आणि तेरवाही कामावर जाण्याचे वेळापत्रक आहे. आम्ही दोघेा कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच दोघांचे जेवणाचे डब्बे करून फ्रीज मध्ये ठेवते त्यामुळे आज खूप काही अडले नाही. विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू. आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते.



सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच काम चालू असल्याने वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स मध्ये कळाले. या आधी २ ते ३ वेळा वीज नसल्याचे दिवस काढले होते पण त्यावेळेला वादळ वारे आणि पाऊसही होता.



रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले. आज आता रात्री नेहमीप्रमाणेच पोळी भाजी करीन. डब्बे भरीन आणि उद्या कामाला जाईन. वीज गेल्याने आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा गेला.
Rohini Gore

Saturday, June 02, 2018

२ जून २०१८

आजचा दिवस खूप वेगळा आणि छान गेला. बरेच महिने झाले असतील, रोजनिशी लिहिली गेली नाही. आज ती लिहाविशी वाटली. एक तर नोकरीमुळे वेळ मिळत नाही. शनिवार रविवार पैकी एक दिवस कधी कधीऑफ मिळतो, तो आज मिळाला. गेला आठवडा भर धोधो हा शब्द कमी पडेल इतका पाऊस झाला. एक वादळ थोडेसे लांबून जात होते आणि नॉर्थ कॅरोलायना राज्यामध्ये वेस्टर्न भागातील काही शहरांमध्ये रोजच्या रोज पाऊस पडत होता. आर्द्रता भरपूर होती. आमच्या जवळच्या शहरात पूरही आला होता. पावसामुळेच मनात आपोआप जे आले ते काल लिहिले. काल झोपही छान लागली आणि सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला आणि त्यामुळेच खूप उत्साह आला.


आज कधी नव्हे तो केसांना रंग लावला. नेहमीचीच पोळी भाजी होती आणि स्वीट डीश म्हणून रताळ्याची खीर केली. इंडियन स्टोअर्स मध्ये मला रताळी दिसली आणि ती आणल्याने खीर केली गेली. दुपारी मनसोक्त झोप काढली. चहा पिऊन विनुने मला मॉलला सोडले आणि तो चालायला गेला. मी खरे तर मॉलला जाणार नव्हते पण मागच्या सोमवारी मला एक कानालतेआवडले होते. लोंबते कानातले होते आणि छान होते. मनात भरले होते. २० चे १० डॉलर्स ला होते. पण ते घेतले नाहीत. ते असतील तर ते आज घेणार होते पण नेमके ते तिथे नव्हते. बेल्क मध्ये फेरफटका मारला आणि टॉप्स बघत होते. सेल होता. दोन टॉप्स घेतले एक काळा आणि एक हिरव्या रंगाकडे झुकणारा खूपच वेगळा रंग होता. त्यातला एक टॉप मला कितीला पडला असेल ? चक्क १ डॉलर ८० सेंटला !! खूप खुश झाले मी !



नंतर एका दुकानात गेले तिथे पण एक कानतले आवडून गेले.तेही घेतले. खूपच छान आहेत. तर आजचा दिवस असा काहीतरी वेगळाच होता तर !अश्या रितीने रात्रीचे जेवण करून उद्याचा डब्बा भरून रोजनिशी लिहायला बसली आहे. चला उद्या कामावर जायचे आहे ! :) :D