Thursday, June 28, 2018

२८ जून २०१८

आज सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. काल मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती आणि म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती :D वीज गेल्यामुळे सर्व कारभार ठप्प होतातच पण इथे अमेरिकेत ते जरा जास्तीच ठप्प होतात. भारतामध्ये वीज जाते तेव्हा घरात गॅस सिलिंडर असल्याने स्वयंपाक, चहा, अंघोळीचे गरम पाणी या सर्व गोष्टी तरी करता येतात. इथे अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रीक शेगड्या असल्याने स्वयंपाक करता येत नाही. शॉवरला गरम पाणी नाही. शिवाय मायक्रोवेव्ह मध्ये चहा पण करता येत नाही. नेट बंद असल्याने सोशल मिडिया वर जाता येत नाही. व्होनेज फोन नेटशी जोडलेला असल्याने आंतर-राष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. :(



हीटर कूलर नाहीत म्हणजे थंडी असेल तर बसा कुडकुडत ! :D सध्या उन्हाळा सुरू असल्याने कूलर जरी बंद असला तरी आमचे तरी फारसे अडत नाही. आम्ही खिडक्यांची दारं नेहमीच थोडी उघडी ठेवतो. जरा तरी बाहेरची हवा येऊद्या ना राव ! आज मला कामावर जायचे नव्हते .उद्या परवा आणि तेरवाही कामावर जाण्याचे वेळापत्रक आहे. आम्ही दोघेा कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच दोघांचे जेवणाचे डब्बे करून फ्रीज मध्ये ठेवते त्यामुळे आज खूप काही अडले नाही. विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू. आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते.



सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच काम चालू असल्याने वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स मध्ये कळाले. या आधी २ ते ३ वेळा वीज नसल्याचे दिवस काढले होते पण त्यावेळेला वादळ वारे आणि पाऊसही होता.



रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले. आज आता रात्री नेहमीप्रमाणेच पोळी भाजी करीन. डब्बे भरीन आणि उद्या कामाला जाईन. वीज गेल्याने आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा गेला.
Rohini Gore

Sunday, June 03, 2018

पाऊस

पाऊस,,, आठवतोय मला,,, पावसाचे पाणी अंगणात साठायचे आणि मग आम्ही दोघी बहिणी कागदाच्या छोट्या मोठ्या होड्या करून पाण्यात सोडायचो,,, आठवतोय ,,, दुपारी वामकुक्षी घेत असताना जाग आल्यावर पूर्णपणे अंधारलेले असायचे,, कडकडाट चालू असायचा ढगांचा ,,, लख्खन वीज चमकायची आणि याची कोसळायला सुरवात,,, आठवतोय मला अमेरिकेत लांबलचक पत्र लिहिताना,, दार उघडे ठेवलेले असायचे,, पावसाळी वातावरण,, धोधो पाऊस,, अर्धवट लिहिलेलं पत्र सोडून गॅलरीत उभी राहिलेली मी आणि मन निघून गेलेलं भारतात,, आठवतोय मला पाऊस ,,, दिवसभर झिमझिमणारा आणि संध्याकाळी गारवा आल्यावर लगेच भजी करण्याची सुरसुरी,, आठवतोय पाऊस,,, जेव्हा जमीनीवर पडायला सुरवात व्हायची तेव्हा इच्छा व्हायची छत्री घेऊन चालायची,,, आठवतोय पाऊस,,,उन्हाच्या तलखीमुळे पहिल्या पावसाच्या सरी अंगावर घेतल्यावर सुखाची होणारी बरसात,, आठवत आहेत मला असे बरेच पावसाळे !! ये रे ये रे पावसा,,, तू येत रहा, तुझ्या येण्याची मी नेहमीच आतूरतेने वाट पाहत होते,,, पाहत आहे,,, पाहत राहीन. :)
Rohini Gore

Saturday, June 02, 2018

२ जून २०१८

आजचा दिवस खूप वेगळा आणि छान गेला. बरेच महिने झाले असतील, रोजनिशी लिहिली गेली नाही. आज ती लिहाविशी वाटली. एक तर नोकरीमुळे वेळ मिळत नाही. शनिवार रविवार पैकी एक दिवस कधी कधीऑफ मिळतो, तो आज मिळाला. गेला आठवडा भर धोधो हा शब्द कमी पडेल इतका पाऊस झाला. एक वादळ थोडेसे लांबून जात होते आणि नॉर्थ कॅरोलायना राज्यामध्ये वेस्टर्न भागातील काही शहरांमध्ये रोजच्या रोज पाऊस पडत होता. आर्द्रता भरपूर होती. आमच्या जवळच्या शहरात पूरही आला होता. पावसामुळेच मनात आपोआप जे आले ते काल लिहिले. काल झोपही छान लागली आणि सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला आणि त्यामुळेच खूप उत्साह आला.


आज कधी नव्हे तो केसांना रंग लावला. नेहमीचीच पोळी भाजी होती आणि स्वीट डीश म्हणून रताळ्याची खीर केली. इंडियन स्टोअर्स मध्ये मला रताळी दिसली आणि ती आणल्याने खीर केली गेली. दुपारी मनसोक्त झोप काढली. चहा पिऊन विनुने मला मॉलला सोडले आणि तो चालायला गेला. मी खरे तर मॉलला जाणार नव्हते पण मागच्या सोमवारी मला एक कानालतेआवडले होते. लोंबते कानातले होते आणि छान होते. मनात भरले होते. २० चे १० डॉलर्स ला होते. पण ते घेतले नाहीत. ते असतील तर ते आज घेणार होते पण नेमके ते तिथे नव्हते. बेल्क मध्ये फेरफटका मारला आणि टॉप्स बघत होते. सेल होता. दोन टॉप्स घेतले एक काळा आणि एक हिरव्या रंगाकडे झुकणारा खूपच वेगळा रंग होता. त्यातला एक टॉप मला कितीला पडला असेल ? चक्क १ डॉलर ८० सेंटला !! खूप खुश झाले मी !



नंतर एका दुकानात गेले तिथे पण एक कानतले आवडून गेले.तेही घेतले. खूपच छान आहेत. तर आजचा दिवस असा काहीतरी वेगळाच होता तर !अश्या रितीने रात्रीचे जेवण करून उद्याचा डब्बा भरून रोजनिशी लिहायला बसली आहे. चला उद्या कामावर जायचे आहे ! :) :D