चि. सई - चिमुरडी- माझी नात -श्रद्धा हास्पिटल मध्ये दिनांक २-११-८९ रोजी सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी सईचा जन्म झाला. हे पाखरू बहुधा काश्मीर - जम्मू कडून आले आहे. आमचा आनंदाचा दिवस. आम्ही (मी व सौ निर्मला ) नात मुख पाहिले. तांबुस चेहरा, लुकलुकणारे काळेभोर डोळे व काळे जावळ. नर्सने दुपट्यात गुंडाळून पाळण्यात आणून ठेवले.तिच्या चिमुकल्या बाल मुठीत मी व हिने १०० रुपयांच्या दोन नोटा ठेवल्या. नोटेसह मुठी मिटल्या व गालावर स्मितहास्य उमटले. घरी आलो. रोज तेल पाण्याने आंघोळ सुरु झाली. नंतर धुरी व मग मउ मउ गादीवर झोप. एक महिना केव्हा गेला ते कळले नाही. तीला घेण्यात वेळ जाउ लागला. मी तिला म्हणे, सई, आपलं काय ठरले आहे (वय १ महिना) मी लाडाने तिला माझ्या छातीवर घेउन झोपत असे आणि म्हणे सई आपण कॅरम खेळायचा ना? आता आता तिला समजू लागल्यावर मी तिला गोष्टी सांगण्यास सुरवात केली. ती गोष्टी मनापासून ऐकते. एखादे वाक्य गाळल्यास ती मला सांगते, असे नाही आजोबा, तिथे असे आहे.उंदराची गोष्ट सांगताना मी सांगायचो, उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला, गोंडेवाल्या गोंडेवाल्या, टोपीला २ गोंडे लावून देतोस? गोंडेवाला म्हणाला, हो डेकोटी !ती म्हणते असे नाही आजोबा, तो म्हणाला देतो की ! डेकोटी नाही !
१ जून १९९२ रोजी तिला हातात पेन्सील धरता आली. आगस्ट १९९२ मध्ये १ ते २० अंक ती पाटीवर लिहू लागली. १ ते १० पर्यंतचे अंक ती बरोबर ओळखते व काढते. १ - २ करता करता ती म्हणते, एकावर पूज्य दहा, सईचा नाच पहा ! हे पालुपद झालेच पाहिजे. चि. रंजनास सांगताना ती म्हणते, आई आई आजोबांच्या खिशातून जेम्सच्या गोळ्या, कॅटबरीच्या वड्या निघतात. श्री सुरेशराव यांच्या मातोश्री तिला नेहमी म्हणत, जगदंबा माझे आई ! म्हणून ती त्यांना जगदंबा आजी म्हणते आणि सौ निर्मलास नांदुरी आजी म्हणते. आजोबा आजोबा मी तुमची लेक, आई तुमची नात आणी बाबा जावई, तर मी तिला म्हणतो, अग सई, तू माझी आजी आहेस. ती मामांची आई.एकदा सत्यानारायणाच्या पूजेसाठी मी सोवळे नेसले होते. सई आईला म्हणाली, आई, तो बघ आजोबांनी नवीन फ्राक घातला आहे. सई ६ महिन्यांची असतानाखूप रडत होती. काही केल्या थांबेना. मी तिला उचलली आणि फाटका बाहेर ठेवली आणि म्हणालो आधी रडणे बंद कर. तर तुला आत घेईन. थोडावेळाने रड्णेथांबले. मी तिला घरात आणले. ती म्हणाली आजोबा पोपटाला बाहेर ठेवायचे ना? मला नाही ना? खरे तर ती खूप बोलायची म्हणून मीच तिला माझा पोपट आहे असे म्हणायचो. त्यानंतर असे काही झाले की मी म्हणायचो, सई बाहेर कुणाला ठेवायचे? सई म्हणे मला नाही, पोपटाला बाहेर ठेवायचे. तिच्या जन्माच्या दिवशीमी श्री. शहा काकांना फोन करून रंजनाला मुलगी झाली आहे असे सांगितले. तसे ते म्हणाले की बाबा, तुमच्याकडे लक्ष्मी आली आहे. आणि खरच माझ्या आजीचे (ती मामांची आईचे नाव लक्ष्मी होते) मी सईला म्हणे तू माझी आजी आहेस ! तिला बऱ्याच कविता पाठ आहेत. फुग्याची गोष्ट, लहान बाहुलीची गोष्ट. ती गोष्टी छानच सांगते. खिरीची, उंदराची टोपी, मगरीने हत्तीचा पाय धरला. इ. इ. आकाशातील पळणारा ढग ती मला दाखविते. झाडांना नळीने पाणी घालण्याची तिला भारी हौस ! घरा भोवतालची बाग अमितची व सईची.
आमच्या अंगणात सिडलेस पपईचे झाड होते. मी तिला पपई कुठे ? असे म्हणले की ती चटकन पपई कडे पहात असे. ती बोलायला लवकर लागली. आई नंतर तिने पपई हा शब्द उच्चारला. ९० च्या ७ जूनला पहिला पाऊस पडला. मी तिला खांद्यावर घेऊन पावसात खूप भिजलो. घरा भोवताली सीताफळाची ७ ते ८ झाडे होती. सिताफळे खूप येत असत. अंगणात कडेला एका झाडावर लहान पक्षाने एक घरटे बांधले होते. जास्वंदीचे ४ फूटी झाड होते. त्यावर घरटे होते. त्यात पक्षाने ३ गुलाबी रंगाची अंडी घातली होती. त्यात वाकून ती मी सईला दाखवित असे. सकाळ मध्ये येणारी पक्षांची, जंगली श्वापदांची चित्रे मी तिच्यासाठी कापून ठेवली. त्यात वाघ, तरस, माकड, बोकड, सांबर, सिंह रानमांजर, पाणमांजर कोल्हा, लांडगा, बिबट्या, कोळसुंद्र, रानकुत्रा, डुक्कर, गवा, हरण, चितळ, तसेच पक्षी मोर, हळद्या, कोतवाल, बुलबुल, वटवट्या, धोबी, खंड्या, निळकंठ. वाघाचेचित्र दाखवले की ती हमखास म्हणते "हा पहा हागोबा " तशी ती फार धीट आहे.ती दुपारची झोपायला खळखळ करायची. मी म्हणे, सयो, माळ्यावर मांजर आहेबरं का ! ते शेपटी फुगविते व खाली येते. त्याला कोणी रडत असेल तर आवडत नाही. तिची ३ चाकी सायकल माळ्यावर आहे. ती माळ्यावर जाते आणि म्हणते आजोबा, मांजर खाली बागेत गेले का हो? वर दिसत नाही. नेहमी मी तिला विचारतो, सई ही बाग कुणाची? माझी ! अंगण कुणाचे? माझे ! फरशी कुणीघातली गं? मी ! हे घर कोणाचं? माझं आणि तू कुणाची सई? तुमची आणि माझ्या बाबांची ! १९- ३- १९९३ ला संजना व सुरेश कोकणात ट्रीपला गेले होते. २१.३.९३ ला रविवारी रात्री ९-४० ला श्री सुरेश यांचा फोन दिपाली मध्ये आला. दिपाली म्हणजे शहा काकांचे दुकान. चि. सई बाबांशी व रंजनाशी बोलली. हॅलो कोण बोलत आहे? बाबा, येताना फणस, आंबे आणणार आहात ना? सायकल पण आणा. मी मजेत आहे. सिंपल डिंपल बरोबर खेळते. उद्या आजोबांबरोबर पार्कमध्ये जाणार आहे. अच्छा, बाय बाय ! नंतर ती मला विचारते, आजोबा, बाबांनी कोणता शर्ट घातला आहे? सांगा ना, मी म्हणले अगं फोनवर बोलणे ऐकू येते. शर्टाचा रंग कसा दिसेल? रविवारी ९.३० ला लागणारी जंगल बुक ही सिरियल सईला फार आवडते. त्यातील पात्रे तिला फार आवडतात.
१० जून १९९३ रोजी सईला मँटेसरीत प्रवेश मिळाला. ११.३० वाजता पटांगणात सर्व पाल्य व पालक जमले होते.चि. सई अजिबात रडली नाही. शाळा भरण्या आधी सईला कॅटबरी घेऊन दिली. नांदुरी आजीने तिला तुळशी बागेतून खेळ आणून दिला आहे. ती भातुकलीत रंगते. मला जेवायला वाढते. अंगणातील फरशीवर तीन चाकी चालविते. दिनांक २१.१०.९३ ला पर्वती पायथ्याशी घेतलेल्या नवीन घरात सौ रंजना, श्री सुरेश , त्यांच्या मातोश्री व सई यांनी गृहप्रवेश केला. नोव्हेंबर मध्ये येणारा तिचा वाढदिवस आता नवीन जागेत साजरा होणार आहे ! त्यामुळे सई व आम्ही सर्व आनंदात आहोत....... हे माझ्या बाबांचे लेखन आहे - श्री निळकंठ बाळकृष्ण घाटे २१.१०.१९९३ त्यांच्या हस्ताक्षरातली पाने मी स्कॅन केली आहेत.
Rohini Gore
No comments:
Post a Comment