बाबा गोष्टी खूप छान रंगवून सांगतात. त्यामुळे बाबा जिथे जातील तिथे सर्व लहान मुले त्यांच्या आजुबाजूला असतात. आजोबा गोष्ट सांगा ना ! असे म्हणल्यावर कोणती गोष्ट सांगु? भुताची, माकडाची की हत्तीची असे विचारतात. आम्हाला लहानपणी बाबा रोज गोष्टी सांगायचे. रोज एक तरी गोष्ट ऐकल्याशिवाय झोपलो नाही आम्ही दोघी बहिणी. त्यातली एक गोष्ट बाबांनी रचून सांगितलेली आहे. आणि तीच गोष्ट आम्हां दोघी बहिणींनाही खूप आवडते. गोष्टीचे नाव आहे " रंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जातात" :D
तर एकदा काय होते रंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जायचे ठरवतात. पण कधी जायचे आणि सगळ्यांची नजर चुकवून केव्हा जायचे? तर रंजनाची बाहूली म्हणते की आपण बाबा उठतात दूध आणायला तेव्हा पहाटेच उठून जाऊ. रोहिणीच्या बाहुलीलाही ते पटते. रात्री झोपायच्या आधी त्या दोघींच्या बाहुल्या नट्टा पट्टा करून तयार होतात आणि हळूच रंजनारोहिणीला झोप लागली का ते पाहून दोघींच्या पांघरूणात शिरतात. पहाट होते. बाबा उठतात आणि दार उघडे करून ठेवतात. शर्ट पॅंट घालून दुधाच्या बाटल्या घेऊन निघतात. रोहिणीची बाहूलीचे बारीक लक्ष असते. बाबा उठल्यावर ती हळूच रंजनाच्या बाहूलीला उठवते आणि म्हणते चल. लगेच जाऊया आपण. दार उघडेच आहे. त्या दोघी बाहुल्यांनी नट्टा फट्टा आधीच करून ठेवलेला असतो त्यामुळे वेळ न घालवता २ मोठाल्या पिशव्या घेऊन दरवाजातून हळूच बाहेर पडतात. फाटकाचे दार आवाज येणार नाही याची काळजी घेऊन लावतात आणि रस्यावरून चालायला लागतात. रिक्षाला हात करून थांबवतात. रिक्षावाल्याला सांगतात. आम्हाला मंडईत जायचे आहे. रिक्षावाला त्यांना मंडईत आणून सोडतो तेव्हा उजाडलेले असते. बाजार नुकताच सूरू झालेला असतो. भाज्यांचे गड्डे टोपलीत ठेवून भाजीवाल्या बायकाही आलेल्या असतात. बाहूल्यांना असा काही आनंद होतो. आणि त्या दोघी मिळून बरेच काही घेतात. बोरे, चिंचा आवळे, कोथिंबीर, मिरच्या, भाज्या, फुले. असे करता करता भाज्यांच्या पिशव्याही जड होतात. आणि गर्दीतून वाट काढत काढत त्या चालत येताना बाबांना दिसतात. बाबा विश्रामबागवाड्यात कामावर येताना चितळे बंधूच्या दुकानापाशी या बाहुल्या भांबावलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या बाबांना दिसतात. बाबा म्हणतात अरे या तर आपल्या रंज्यारोहिणीच्या बाहूल्या? या इथे कश्या आल्या? मग ते बाहुल्यांपाशी गेले आणि त्यांना रिक्षात बसवून दिले. बाबा म्हणाले आता परत अश्या कुठेही एकट्या जाऊ नका. इथे या गर्दीत तुम्ही चेंगरल्या असता तर? बाहुल्या म्हणाल्या, आम्ही परत असे नाही करणार. पण आम्हाला रंजना रोहिणी ओरडणार नाहीत ना? नाही ओरडणार. मी सांगीन त्यांना ओरडू नका म्हणून.
रिक्षाने रंज्यारोह्याच्या बाहुल्या घरी आल्यावर. फाटकाची कडी हळूच उघडली आणि जड पिशव्या घेऊन आत आल्या. तोपर्यंत रंजारोह्या उठून दात घासत होत्या. दात घासून चहा प्यायला आणि बाहेर येऊन पाहतात तर दोन पिशव्या भाज्यांनी भरलेल्या! अरे कोणी आणल्या या भाज्या? असे म्हणून इकडे तिकडे बघतात तर काय दोघींच्या बाहूल्या एका कोपऱ्यात उभ्या राहून हिरमुसलेल्या ! मग त्यांच्या लक्षात आले आणि बाहुल्यांना विचारले, काय गं तुम्ही आणली ही दोघींनी भाजी? आणि इतका नट्टा फट्टा कधी केलात. मग त्यांनी जे काही केले ते सांगितले आणि त्यांना बाबा मंडईत भेटले आणि त्यांनी आम्हाला रिक्षात बसवून दिले हेही सांगितले. मग त्या दोघी बाहुल्यांना ओरडल्या आणि म्हणाल्या आम्हाला सांगितले असते तर आम्ही घेऊन गेलो असतो तुम्हाला. पण एकट्याने कशाला जायचे? एवढे धाडस का करायचे. बाहुल्या म्हणाल्या आम्ही चुकलो. आम्ही परत असे कधीही करणार नाही. मग आई बाहेर आली म्हणाली जाऊ दे गं. त्या आता परत नाही अश्या वागणार. बघू तरी त्यांनी काय काय आणले आहे ते? बोरे, आवळे, चिंचा, आणि काय काय आई कोथिंबीर आणि भाजी पाहून खुश झाली. आणि रंज्यारोह्या रानमेवा पाहून खुष झाल्या. त्या बाहुल्यांना बोरे चिंचा दिल्या आणि म्हणाल्या पळा आता समोरच्या पारावर बसून खा ! बाहुल्या खुश झाल्या. आणि बाहुल्यांनी धाडस करून मंडईत जाऊन भाजी आणल्याबद्दल रंजनारोहिणीलाही बाहुल्यांचे खूप कौतुक वाटले.
त्या रात्री परत रंजना रोहिणीच्या पांघरूणात बाहुल्या शिरल्या आणि झोपल्या !
गोष्ट संपल्यावर बाबांनी आम्हा दोघी बहिणींना विचारले "कशी वाटली गोष्ट? " आम्ही बाबांना म्हणालो "बाबा आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला हीच गोष्ट खूप आवडली. :D