Monday, August 21, 2017

खग्रास सूर्यग्रहण - एक अविस्मरणीय अनुभव !!







सूर्यग्रहण पहायला मिळेल असे काही आमच्या ध्यानीमनी नव्हते. अमेरिकेतल्या काही राज्यांमधून ते दिसणार होते. मागच्याच आठवड्यात कळाले की Brevard शहरात खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. Brevard शहर आम्ही राहत असलेल्या Hendersonville शहरापासून साधारण अर्ध्या तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे जिथे विनायक ऑफीसला जातो. सूर्यग्रहण बघण्याच्या काचा आम्हाला विनायकच्या ऑफीसमधून मिळाणार होत्या. २१ ऑगस्ट २०१७ हा दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील खूप आकर्षक दिवस ठरून गेला. सोमवारची मी रजा टाकली होती आणि विनायक बरोबर सकाळी सर्व तयारीनिशी मीही निघाले. विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स हे समोरासमोर आहेत. अगदी समोरासमोर नाही पण ऑफीस मधून २ ते ३ मिनिटे ड्राईव्ह केल्यावर एक मोठा चौक लागतो. हा चौक ओल्यांडल्यावर सरळ गेले की इंगल्स स्टोअर्स लागते जिथे मी काम करते पण मी काम करते ते आम्ही राहत असलेल्या शहरात. आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर. या इंगल्स स्टोअर्सची २०० ग्रोसरी आणि इतर अशी दुकाने आहेत २ ते ३ राज्यांमध्ये मिळून. या स्टोअर्समध्ये स्टरबक्स कॉफी आहे. शिवाय इथला कॅफे इतका काही छान आहे की इथे येऊन कोणीही कितीही वेळ बसावे. काहीही करावे. वाचावे, लेखन करावे, लॅपटॉपवर काम करावे.


खग्रास सूर्यग्रहण बघण्याच्या टप्यात विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स असल्यानेच या योग जुळून आला होता. आम्ही सकाळी निघालो ते विनायकने मला आधी इंगल्स मध्ये सोडले आणि तो ऑफीसला गेला. सुमारे १ वाजता मला विनायकने ग्रहण बघण्याच्या काचा आणून दिल्या. त्या आधी मी ९ ते १ कॅफेत बसून होते. ९ ते ११ वहीत बरेच काही लिहिले. ब्लॉगवरचे काही लेख अपूर्ण आहेत ते मला संपवायचे आहेत. लिखाणासाठी जो निवांत वेळ लागतो तो आज मला सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मिळाला होता. ११ वाजता मी व्हेज सँडविच खाल्ले. combo sub मध्ये सँडविच बरोबर कोक आणि बटाटा चिप्सही मिळतात. जेवण झाल्यावर मी सूर्यग्रहण पहाण्यासाठी इंगल्सच्या पार्कींग लॉट मध्ये एका झाडाखाली येऊन बसले. बरेच जण झाडाखाली अंथरूणे पसरून पहुडली होती. काही जण खुर्च्या आणून त्यावर बसले होते. तर काही जण कार मध्येच कूलींग लावून बसले होते. चित्रपटाची सुरवात झाली. किती छान दिसतोय सूर्य ! मनाशीच बोलले मी ! विस्तीर्ण लांबवर पसरलेले आकाश आणि काचेतून सूर्याचा गोळा एखाद्या श्रिखंडाच्या गोळी सारखा पिवळा दिसत होता. आजुबाजूला काळे निळे, तर काही धुरकट पांढरे ढगही दिसत होते. चंद्राची सूर्यावर सावली पडायला सुरवात झाली. ही चंद्राची काळी चकती हळूहळू पुढे सरकत होती. अधून मधून मी विनायकशी फोनवर बोलत होते. विनायकच्या ऑफिसमधले सर्वजण काम करता करता अधून मधून बाहेर येत होते आणि ग्रहणाला बघत होते. वेदर पार्टली क्लाऊडी
असल्याने काळे निळे ढग ग्रहणावरती येऊन परत बाजूला होत होते, असे दृश्यही बघायला मिळाले. सूर्य तर खूपच देखणा दिसत होता. मी अधून मधून सूर्यग्रहण बघत होते तर अधून मधून झाडाखाली सावलीत बसत होते. असा खेळ दीड तास चालला. २ वाजून ३० मिनिटांनी एक मोठा Climax ्स झाला. Climax तर मध्यंतराच्या आधीच संपला. आता स्टोरीत काही अर्ध उरला नाही म्हणून लोक परतायला लागले. चंद्राने सूर्याला स्पर्श केला तेव्हा दुपारचा १ वाजून ८ मिनिटे झाली होती. चंद्राने मुहूर्त अजिबात चुकवला नाही. स्पर्श करून जेव्हा तो पुढे सरकला तेव्हा तर सफरचंद दाताने तोडून थोडा भाग खाल्यासारखे कसे दिसते तसेच चित्र दिसले. Just like apple product symbol !


 Photo credit - Los Angles Times - from Net
Climax जेव्हा जवळ यायची वेळ आली तेव्हा तर सर्वजण श्वास रोखून सूर्याला आणि त्यावरच्या चंद्राच्या चकतीला पाहत होते. थोडे थोडे करत सूर्य झाकला जात होता. आता अगदी काही क्षणच उरले होते. सरते शेवटी बांगडी फुटलेल्या बारीक काचेचा तुकडा कसा दिसतो तसाच सूर्याचा तुकडा दिसला. आणि नंतर हळूहळू एक टिंब आणि नंतर काही सेंकदातच सूर्य पूर्णपणे झाकला गेला. तेव्हा तर "ये पल तो यही थम जाए तो अच्छा होगा " अशीच माझ्या मनाची अवस्था होऊन गेली. संध्याकाळ नाही तर पूर्णपणे अंधार ! रात्रच जणू ! आकाशात कुणीतरी टॉर्च घेऊन उभे आहे असेच वाटत होते. आता सूर्याकडे काचेशिवाय बघता येत होते. जेव्हा चंद्र उजवीकडून डावीकडे सरकला मात्र !अहाहा ! सर्वांना हिऱ्याच्या अंगठीचे दर्शन झाले. सूर्याची वळ्यासारखी दिसणारी कड आणि मधोमध सूर्याचा तेजस्वी तेजाचा हिऱ्यासारखा चमकणारा खडा ! काय ही निसर्गाची किमया ! देवा तुझी करणी अगाध आहे रे ! खूप गहिवरून आले मला. अश्रू गालावरून ओघळले. आता सूर्याची कोर उजव्या बाजूने दिसायला लागली आणि नंतर वाढत गेली. अडीचला मी परत कॅफेत येऊन बसले आणि हा अवर्णनीय अनुभव वहीत उतरवला. पावणेचारच्या सुमारास मी परत पार्कींग लॉटमध्ये गेले आणि झाडाखाली उभे राऊन सूर्याला परत डोळे भरून पाहून घेतले. आता चंद्राची सावली कमी कमी होत गेली आणि परत सूर्याचा तप्त पिवळा गोळा दिसायला लागला. चारच्या सुमारास कॉफी प्यायली आणि विनायकची वाट पाहत परत कॅफेत येऊन बसले. निसर्गाचे चित्र बदलून रपारप पाऊस पडायला सुरवात झाली. घरी परत येताना वाहतूक मुरंबा ! घरी आलो आणि लगेचच मी हा लेख टंकत आहे. आज मी खूप भारावून गेली आहे !! आता हे भारावलेपण २ दिवस तरी नक्कीच टिकेल. आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सूर्यग्रहणाचा अवर्णनीय सोहळा पहाण्याचा जबरदस्त योग जुळून आला होता तर !!!
Rohini Gore - smruti blog Photo credit - Los Angles Times from Net


Photo Credit - Only in North Carolina Page - Photo taken by Sallie J. Woodring Photography
Downlod from  Internet