Wednesday, January 21, 2009

निसर्गाची किमया - हिमवर्षाव २००९













आम्ही अमेरिकेत ज्या राज्यात राहतो तिथे बर्फ कधीच पडत नाही. बर्फ नाही, वादळ नाही, पाऊस सुद्धा येणार येणार म्हणता ऐनवेळी दुसरीकडे निघून जातो! समुद्रकिनारा जवळ असल्याने सतत दमट हवामान. अगदी टीपीकल मुंबईसारखे. कोणत्याच ऋतुची प्रखरता नाही! मध्यंतरी एक भलेमोठे वादळ येऊन थडणकार होते आमच्या शहरात. त्यानेही ऐनवेळी धोका दिला. नाही म्हणायला स्नो फॉलचे भाकीत खरे ठरले!

तसा या आधीच्या राज्यात राहत होतो तेव्हा बघितले होते बर्फाला २-४ वेळेला, पण अगदी ढीगाढीगाने बर्फ पडतो तसा नाही. बर्फ पडणार तर सकाळी काहीच चिन्हे दिसत नव्हती. नेहमीप्रमाणे कामे उरकली. याहूवर मैत्रिणीशी गप्पा मारल्या. त्याचवेळी थोडा पाऊस पडत होता. गप्पा संपवून बाहेर येवून बघत्ये तर बर्फ भुरभुरत होता! अरेवा! वारा असल्याने कापुस पिंजलेल्या कापसाप्रमाणे उडत होता. प्रत्यक्षात बाहेर जाऊन पाहते तर थोडा वेगही वाढला होता. लगेचच डीजी घेतला आणि बाहेर जाऊन काही फोटो काढले. २ दिवस पडणार होता. पण दुसऱ्या दिवशीचे काही सांगता येत नाही. दिवसभर खिडकीतून बघत होते बर्फाला. संध्याकाळी चहा घेऊन परत एकदा बाहेर जाऊन फेरफटका मारला. पण निरनिराळे फोटो घेऊ म्हणले तर इतका काही खास पसरलेला नव्हता. तरी सुद्धा थोडेफार छोट्या झुडुपांचे फोटो घेतले. पानांमध्ये बर्फ साठून राहिला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश! सूर्यप्रकाशात बर्फ छान चमकत होता. जिन्यामध्ये काही बर्फाचे तुकडे जमा झाले होते. काही बर्फ भुश्यासारखा होता! परत फेरफटका मारायला गेले. कारण की आज फोटो घेतले नाहीत तर परत काही बर्फाचे दर्शन नाही! तळ्याजवळ गेले. आज तळे आजुबाजूच्या बर्फामुळे छान दिसत होते. त्यात काही बदके नेहमीप्रमाणेच पोहत होती. जिन्यातून येतायेताच जसे सुचले तसे करत गेले ते तुम्हाला फोटोत दिसेलच.

काही तासातच सूर्याच्या प्रखरतेने सर्व बर्फ पार वितळून गेला. होत्याचे नव्हते झाले! एका दिवसाचा बर्फ मात्र मला खूप आनंद देवून गेला! हीच तर आहे निसर्गाची किमया!!

Monday, January 12, 2009

Tuesday, January 06, 2009

बाग











आमची बाग म्हणजे आमच्या सर्वांची बाग. आईबाबांची व आम्हां दोघी बहिणींची. भरपूर फुलझाडे आहेत आमच्या बागेत. नुसती फुलझाडे नाहीत तर फळांची झाडे पण आहेत. काही तर आपोआप उगवली आहेत. प्रथमदर्शनी जाईचा वेल आहे, तो प्रत्येक आल्यागेल्याचे स्वागत करतो. कोणीही आमच्याकडे आले की फाटकातून येतानाच "अरे वा! जाईचा वेल किती फुलला आहे तुमचा! मस्त वास येतोय फुलांचा! " असे म्हणून लगेच अंगणातील पडलेली फुले वेचून घरात प्रवेश करतो.

आमच्या बागेत विविध रंगांची व गंधांची फुले आहेत. प्रत्येकाची शान वेगळी! बागेबद्दल सांगायचे झाले तर मला थोडे भूतकाळातच जायला लागेल. बागेला कुंपण होते ते कोयनेलचे. त्याला पांढऱ्या रंगाची थोडीशी लांब आणि नाजुक अशी फुले असायची. ती फुले तोडून त्याच्या टोकाला एक छोटे देठ असायचे हिरवे, ते काढून आम्ही त्यातला अगदी थोडासाच असलेला गोड रस चाखायचो. त्या फुलाची दांडी होती ती एखाद्या बारीक नळकांडीसारखी. लहानपणी आपण काहीही करतो ना! कोयनेल अवाढव्य वाढले की आई म्हणायची "एकदा रामूला निरोप द्यायला पाहिजे, येऊन आमचे कुंपण नीट करून दे म्हणून" हा रामू येऊन आमचे कुंपण साफ करून द्यायचा. येताना भली मोठी कात्री घेऊन यायचा कुंपण कापण्यासाठी. आम्ही दोघी मग सांगायचो त्याला "कुंपणाला असा आकार द्या, तसा आकार द्या. " कापलेल्या कुंपणाचा पसारा तो एका भल्या मोठ्या पिशवीत घालून घेऊन जायचा. त्या दिवशी आमच्या बागेची इतर साफसफाई पण व्हायची. काही आपोआप उगवलेली झाडे दृष्टीस पडायची. मग हे कुठले बरे झाड असेल याची चर्चा व्हायची.

माझ्या मावसबहिणीने काही रोपटी दिली होती. त्यात अबोली होती, मोगरा होता. गुलाबाचे तर बरेच रंग होते आमच्या बागेत, लालचुटुक, गुलाबी, शेंदरी. बाबांच्या काही मित्रांनी गुलाबाची रोपटी भेट म्हणून दिली होती. प्राथमिक शाळेत असताना बाबा मला सायकलवरून बाल शिक्षण मंदीरमध्ये सोडायचे . सायकलवर बसताना माझ्या डाव्या हातात गुलाबाचे फूल, वर्गावर गेल्यागेल्या बाईंना देण्यासाठी! ते फूल मी खूप अलगद धरायचे, त्याला जराही धक्का लागू नये ह्याकडे माझे लक्ष असायचे! कोऱ्हांटीची फिकट पिवळी नाजूक फुले व अबोली रंगाची अबोलीची नाजूक फुले अलगद हाताने काढावी लागायची. शेंदरी व अबोली रंगाकडे बघून असे वाटायचे की फुले अशीच झाडावर राहू दिली पाहिजेत. झाडावरून काढल्यावर मोकळ्या झाडाकडे बघायला चांगले वाटायचे नाही. माझ्या बाबांची रोज सकाळी बागेमध्ये चक्कर असे. पूजेसाठी परडीत फुले काढत असत. त्यात जाईची तर असायचीच. शिवाय इतरही सुवासिक फुले, दुर्वा व उमललेले असेल तर जास्वंदीचे लालचुटूक तुरेवाले फूल! बदामी रंगाची जाळी असलेली प्लॅस्टीकची परडी होती. ज्या दिवशी जास्वंदीचे फूल असायचे तेव्हा आमचा देव्हाऱ्यातले सगळे देव त्या फुलाने झाकून जायचे.


बाकी सदाफुली होती, गुलबक्षी होती आणि कण्हेरी पण होती! सदाफुलीचा रंग व्हॉयलेट होता. फुलाच्या बाजुने व्हॉयलेट तर फुलाच्या मध्यावर गडद जांभळा रंग आणि मला अशाच रंगसंगतीच्या फुलाची सदाफुली आवडते! गुलबक्षीचा रंग तर असा काही सुंदर दिसायचा ना! म्हणजे त्या गुलबक्षीच्या झाडाला जी फुले येतात त्याचा रंग "गुलबक्षी रंग" म्हणूनच ओळखला जातो. ही फुले उमलायच्या आधी ज्या बिया झाडाला लागलेल्या असायच्या त्या काढून आम्ही एका डबीमध्ये जमा करून ठेवायचो. या झाडाच्या बियांचा रंग काळाकुळकुळीत असायचा. त्या काळ्या बियांभोवती हिरवे आच्छादन असायचे. मग आम्ही प्रत्येक बी त्यावरचे आच्छादन थोडे बाजूला करून बघायचो. काळी बी असेल तर काढायचो, जर का ती पांढरी झाली असेल तर नाही, कारण आता त्या पांढऱ्या बीचे कळीत रूपांतर होणार आहे! या काळा बिया आम्ही मैत्रीणींकरत साठवायचो कारण की त्यांना पण गुलबक्षी हवी असायची त्यांच्या बागेत! त्या गुलबक्षीचे विशेष महत्त्व गौरीगणपतीच्या दिवसात असायचे. या गुलबक्षीच्या वेण्या गौरींना असायच्या. आई हाताने या वेण्या बनवायची त्यांची देठे एकमेकात गुंफून!

कण्हेरीची गुलाबी रंगाची फुले परडीत काढल्यावर खूपच सुंदर दिसायची. कण्हेरीची पाने लांबलचक असतात. त्याची पाने
तोडून आम्ही "टिक टिक" वाजवायचो. कण्हेरीची दोन पाने म्हणजे लांबुळकी पाने समांतर रेषेत ठेवून त्याची टोके दोन्ही हातांच्या चिमटीमध्ये आणि मग ती एकमेकांच्या जवळ आणून परत लांब न्यायची. असे करताना "टिक, टिक, टिक, टिक" असा आवाज यायचा आणि मग असे करताना पाने तुटायची, मग परत दुसरी घ्यायची.

चिनी गुलाब ज्याचा रंग साधारण गुलबक्षी सारखाच असतो तो आमच्या बागेत असाच उगवला होता. चिनी गुलाब सपाट जमिनीवरच वाढतो. सपाट जमिनीवर त्याचा वेल असतो. वेलाची पाने साधारण दुर्वांसारखी लांब असतात आणि त्या वेलातून अधुनमधून फुले असतात. अजून एक "हजारी मोगरा" नावाचा मोगरा होता. त्याची तीन चार बुटकी झाडे होती. त्याची फुले साध्या मोगऱ्यासारखीच दिसायची, पण पांढरी शुभ्र नाहीत. त्या झाडांना अतोनात मुंगळे यायचे. शेवटी मुंगळ्यांना कंटाळून झाडे मुळासकट कापली. का कोण जाणे पण हा हजारी मोगरा त्याच्या वेगळेपणामुळे माझ्या लक्षात राहिला आहे.

सगळ्यात आधी आमचे आंगण पूर्ण मातीचे होते. ते अधुनमधून आई शेणाने सारवायची. अंगणात अगणित दुर्वा पण होत्या. जाईचा वेल दाराला लागुनच होता. जाईसमोर पेरूचे झाड होते. सुट्टीत आमच्या घरी सर्व भावंडे जमायची तेव्हा झाडावरचे पेरू तोडून खायचो. पेरूचे झाड काटकुळे व उंच होते. स्टुलावर चढून काठीने फांदी हलवावी लागायची मग पेरू खाली पडायचा. आम्ही भावंडे माना वेळावून बारीक नजरेने पाहायचो कुठे पिकलेला पेरू दिसत आहे का ते. पेरू पानाच्या आड लपलेले असायचे. थंडीमध्ये बरीच पाने गळून पडायची. आमच्या घरी एक मोठा खराटा होता त्याने सगळी पाने एकत्रित करून आमच्या अंगणात मस्तपैकी शेकोटी करायचो. पुण्यामध्ये त्यावेळेला भरपूर थंडी असायची. कुडकुडायला व्हायचे. दर रविवारी शेकोटीचा कार्यक्रम. सकाळी उठल्यावर आई सगळ्यांना आल्याचा गरम गरम चहा करून द्यायची. चहा घेऊन मग शेकोटीजवळच जाऊन बसायचो. शेकोटीची धग इतकी काही छान वाटायची ना! शेकोटीत पालापाचोळा, छोट्या मोठ्या काटक्या असायच्या. शेकोटी विझायला लागली की नुसताच धूर यायचा. मग आम्ही पुठ्ठ्याने वारा घालायचो. धूर निघून जायचा व परत शेकोटीची धग जाणवायला लागायची. तिथून अजिबात उठावेसे वाटायचे नाही. उन्हे वर आली की मग एकेक जण अंघोळीला उठायचा एक मोठा आळस देवून!

आमच्या बागेत पेरूव्यतिरिक्त छोटी केळी होती, सीडलेस पपई होती, सीताफळे होती. घरची फळे खाताना किंवा घरची फुले माळताना जो काही आनंद होतो, जे काही समाधान मिळते त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. काही फळभाज्या पण होत्या. हिरवे टोमॅटो, छोटी वांगी, कार्ली. बागेतल्या झाडांना आम्ही दोन प्रकारे पाणी घालायचो. एक भली मोठी प्लॅस्टीकची नळी नळाला जोडायचो आणि नळीने बागेला पाणी घालायचो. आमची जाई तर भरपूर पाणी प्यायची. नळाला पाणी आले नाही तर हौदातले पाणी बादलीत भरून घ्यायचो व तांब्याने घालायचो. बाबांनी आम्हाला सांगितले असायचे की जोपर्यंत झाड पाणी शोषून घेत आहे तोपर्यंत पाणी घालायचे. झाडांना भरपूर पाणी मिळाले पाहिजे. बागेला पाणी घालण्याच्या निमित्ताने आम्ही पण पाण्यात डुंबून घ्यायचो!

आमच्या अंगणाला रोजच्या रोज पाण्याचा सडा असायचा. सडा घालण्यासाठी प्रत्येकाची टर्न असायची. सडा घालायच्या आधी खराट्याने अंगण स्वच्छ झाडून घ्यायचे आणि मग सडा घालायचा. सडा घालताना फाटकातून कोणी आले तर काही वेळेला चुकून त्याच्या अंगावरच सडा पडायचा. माझी सडा घालण्याची टर्न असायची तेव्हा मला किती घालू न किती नाही असे व्हायचे. समाधान व्हायचेच नाही. एक बादली भरून घ्यायची, ती संपली की दुसरी, ती संपली की तिसरी. आमच्याकडे सडा घालण्यासाठी एक स्टीलचा व एक प्लॅस्टीकचा चंबू होता. मला प्लस्टीकचा गुलाबी रंगाचा चंबू खूप आवडायचा, कारण तो जास्त निमुळता होता त्यामुळे सडा जास्त छान पडायचा. मनसोक्त सडा घातले की खूप छान वाटायचे. सडा घालताना काही वेळेस चंबू हातातून निसटायचा. आमच्या घराला लागूनच ३-४ पायऱ्या होत्या. सुट्टीमध्ये आम्ही बहिणी जमलो की पायरीवर गिचमिड करून बसायचो. कुणी उठली की पटकन ती जागा दुसरी घ्यायची.

आमच्या अंगणाला जे फाटक होते त्याची पण एक मजा आहे. सुरवातीला मातीचे अंगण होते तेव्हा लाकडी फाटक होते. ते एका बाजूने बंद व एका बाजूने उघडे होते. जाता येता जो कोणी ते फाटक उघडून येईल तेव्हा ते लोटल्यावर तसेच सोडून द्यायचे तेव्हा ते दाणकन आपटायचे. लहान मुले तर सारखी ये जा करायची आणि सारखे आपटले जायचे. आई ओरडायची म्हणून मग लहान मुले मुद्दामुनच सारखी येजा करायची. नंतर जेव्हा सर्व अंगणात फरशी घातली तेव्हा दार बदलले आणि लोखंडी केले. त्याला बाहेरून व आतून दोन कड्या केल्या. बाहेरून आलेला सहज हाताने आतली कडी काढून दार उघडे आणि मग परत लावून घेत. या फाटकाची एक मजा म्हणजे वाऱ्याने याच्या कड्या हालायच्या. तेव्हा आमची चांगलीच फसगत व्हायची. कारण दार वाजले की आम्हाला समजायचे कोणीतरी आलेले आहे. आणि असेच वाऱ्याने जेव्हा आवाज येईल तेव्हा येऊन बघावे तर कोणीच नाही. मग ठरवले दार वाजले की लगेच बघायला जायचे नाही कोणी येणारे असेल तेव्हा तो आत येईलच की! अशा या गमतीजमती!


काही वर्षांनी मातीच्या अंगणात पूर्णपणे फरशा बसवून घेतल्या. त्यानंतर आणखीनच मजा यायची. सुट्टीत आम्ही सर्व भावंडे मिळून खूप मजा करायचो. अंगणातच सतरंज्या घालून जेवायचो. अंब्याचा भरपूर रस आणि पोळ्या. जेवणे झाली की गप्पा गोष्टी. मग भूताचा विषय. भूताच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. फरश्यांचे अंगण झाल्यापासून चिमण्यांचा वावर खूप वाढला. पाऊस पडला की अंगणात पाणी साठायचे ते पिण्याकरता यायच्या. आणि हो आमच्या बागेत गोड गुंजेचा पाला होता. काही रानटी फुले होती, त्यांना आम्ही टणटणी म्हणायचो. विविध रंगांची अगदी बारीक फुले एकत्रित असे एक फूल असायचे. ही फुले पण त्यांच्या वेगळेपणाने लक्षात राहिली आहेत.

बागेची सर्व प्रकारची मजा आम्ही दोघी बहिणींनी अनुभवली आहे! अशी होती आमची बाग अशी आहे आमची बाग! आवडली का तुम्हांला? अभिप्राय जरूर कळवा!

******** ******* ******** *******

या लेखातील फुलांचे फोटो आहेत ते माझ्या मैत्रिणीने मला दिले आहेत. तिचे नाव लिना बगावडे. ही माझी ऑर्कुटवरील मैत्रिण. माझ्या माहेरच्या बागेबद्दल मी जे काही लिहिले आहे त्यामध्ये वरील सर्व फुलांची झाडे होती. लिनाकडील फुलांचे फोटो मी पाहत असे तेव्हा मला माझ्या बागेची खूप आठवण यायची म्हणून मी तिला ती फुले मला देशील का? असे विचारले व लगेचच तिने मला तिची फुले दिली!! मी लिना बगावडे हिची मनापासून खूप खूप आभारी आहे!!

लेखातील जाईचा वेल व केळीचे झाड आईबाबांच्या बागेतील आहेत. तेव्हा फोटो घेऊन ठेवले त्यामुळे बरे झाले. आज ते माझ्या आठवणीत व तुम्हाला चित्ररुपात दिसत आहेत. आईबाबा त्या घरात आता राहत नाहीत. ते घर त्यांनी विकले. पण आमच्या फॅमिली डॉक्टरांनीच ते विकत घेतल्याने बागेचा बराच भाग अजुनही तिथे आहे!

जाईची फुले मला माझ्या मैत्रिणीकडून मिळाली आहेत. तिचे नाव भाग्यश्री. धन्यवाद भाग्यश्री.