आजचा दिवस ली रिंगरचा होता. वेदर चॅनलवर रोजच्या दिवसाचे अंदाज वर्तविणारे सर्व आज आम्ही राहत असलेल्या शहरात आले होते. स्टॉर्मफेस्ट २०१४ या एका कार्यक्रमात वेगवेगळ्या वेदर चॅनलचे लोक आले होते. म्हणजे थोडक्यात त्यांची एक सभा भरली होती आमच्या शहरातल्या केप फिअर म्युझियममध्ये. शुक्रवारीच ली ने याची घोषणा केली होती आणि "मी तिथे हजर असणार आहे" असे पण सांगितले होते. शिवाय त्याच्या फेसबुकावरच्या पेजवर पण त्याने लिहिले होते. आम्ही आलोत. आम्हाला भेटा. मी पण लगेच या स्टेटसला लाईक करून "आम्ही येणार आहोत " असे लिहिले होते. तेही त्याने लाईक केले.
आज सकाळी उठलो आणि विनायक एका कामाकरता बाहेर पडला. मला म्हणाला मी येई तोवर तू तयार रहा. तो आल्यावर निघालो लगेचच. तिथे पोहोचलो आणि तिथे सुरू असलेल्या कार्यक्रमात जाऊन बसलो. तिथे एक जण वादळे कशी येतात याबद्दलची थोडक्यात माहिती सांगत होता. पूर्वी आलेल्या वादळांच्या फोटोंचे स्लाईड शो दाखवले. काही जणांनी प्रश्न विचारले. ते झाल्यावर ली रिंगरची भेट घेतली. आम्ही दोघांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि विनायकने सांगितले. "ही रोहिणी" त्याने अगदी लगेचच ओळखले आणि म्हणाला " ओऽह, रोहिणी!, तू खूप सुंदर सुंदर फोटो पाठवतेस त्याबद्दल अनेक धन्यवाद" मी पण त्याला म्हणाले कि तूला पाहून आणि भेटून मलाही खूप आनंद झाला आहे. मग आमचे एक फोटो सेशन झाले. त्याने सुचवले की न्यूज बॅनरच्या पार्श्वभूमीवर फोटो काढू. तिथल्या एकाला ली रिंगरने विनंती केली की आमच्या तिघांचा एक फोटो काढ. फोटो झाल्यावर मला सांगितले "बघ चांगले आलेत का"
हा ली रिंगर खूपच उत्साही आहे ! मार्च २०१३ ला मी याला फोटो पाठवायला सुरवात केली. मार्च २०१३ ते जून २०१४ पर्यंत त्याने मी पाठवलेल्या फोटोंपैकी १३ फोटो दाखवले. हे जे फोटो चॅनलला मी पाठवते ते मला विनुने सुचवले. विनू मला म्हणाला की तू इतके फोटो काढत असतेस तर या चॅनलला पाठवत जा. आणि हा सिलसिला सुरू झाला. त्यातला एक फोटो आहे तो माझ्या कायम लक्षात राहील अस आहे. तसे सूर्योदयाचे बरेच फोटो काढले आणि पाठवले पण त्यातला एक फोटो होता याबद्दल लिहिते. मला काही केल्या रात्रभर झोप येत नव्हती. शेवटी पहाटे दार उघडून बाहेर बघितले तर थोडे झुंजूमुंजू होत होते. आकाशात पावसाळी ढग जमा झाले होते. सूर्योदय दिसण्याची शक्यता अजिबात नव्हती. तरीही मी तशी बाहेर उभी राहिले. ढगांमधून सूर्य हळूहळू करत वर आला. त्याची किरणे जमिनीवर पसरली आणि त्याच वेळी क्लिक केले. आणि लगेचच परत सूर्य ढगा आड निघून गेला. हा फोटो मला खूपच आवडून गेला आणि तो ली रिंगला पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच हा फोटो दाखवला. त्याची मेल आली ही तू पाठवलेला हा फोटो पहा. मेल बरोबर "खूपच सुंदर फोटो" अशी त्याची प्रतिक्रिया पण आली.
ली रिंगर स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहे. त्याने काढलेले फोटो अर्थात एखादाच क्वचित या वेदर चॅनला तो दाखवतो. जोपर्यंत मी विल्मिंग्टन शहरात आहे तोपर्यंत मी या वेदर चॅनलला फोटो पाठवत राहणार. मी ली रिंगरची अत्यंत आभारी आहे. मी व विनू वेदर चॅनल वर रोजच्या रोज दाखवणारे फोटोज पाहत असतो. आम्हाला दोघांनाही त्याला प्रत्यक्ष पाहण्याची खूप उत्सुकता होती. आज तो आमच्या शहरात येणार आहे म्हणल्यावर आम्ही लगेचच त्याची भेट घ्यायची ठरवली. आज मि खूप आनंदात आहे.